मुलींना मनसोक्त हसू द्या

* संध्या रायचौधरी

अनेक शोधांद्वारे हे सिद्ध झालंय की मोकळेपणाने हसल्याने केवळ व्यक्तीचं आरोग्यच स्वस्थ राहात नाही, तर ती व्यक्ती दीर्घायुषी होते. पण ही हसण्याची मुभा केवळ पुरुषांनाच नव्हे, तर स्त्रियांनाही असायला हवी.

भारतीय समाजातील परंपरा आणि सामाजिक टीकेच्या नावाखाली महिलांना मनसोक्तपणे हसण्याची मनाई करणं यावरून लोकांची जुनाट विचारसरणीच दिसून येते. आणि ही मनाई घरातील वयोवृद्ध लोकच करत असतात.

नंदिता आणि तिच्या ३ मैत्रिणी काही गोष्टींवरून खोलीत मोठमोठ्याने हसत होत्या तेव्हा बाहेर तिच्या खोलीत बसलेल्या काकीला ते फार विचित्र वाटलं. मुलींना रागावत ती म्हणाली, ‘‘हे सभ्य मुलींचं लक्षण नाही. मी जेव्हा कॉलेजात शिकवायची, तेव्हा एखाद्या मुलीला असं हसताना पाहून अशी ओरडायची की ती हसणंच विसरून जायची.

हसणं निर्लज्जपणा नाही

स्वत:ला सुशिक्षित म्हणवणाऱ्या काकींचे मुलींच्या हसण्याविषयीचे आपले व्यक्त केलेलं जुनाट विचार ऐकून खूपच विचित्र वाटलं. काकी रागाने म्हणाल्या की, आपल्या संस्कारात मुलींनी काही मर्यादा बाळगायला हव्यात. खी…खी… करून हसणं हे निर्लज्जपणाचं लक्षण आहे.

तर मग प्रश्न असा उद्भवतो की, मुलींना मुक्तपणे हसण्याचा अधिकार नाही का?

यामध्ये दुमत नाही की, समाजात दैनंदिन जीवनात मुली किंवा महिला मुक्तपणे हसत नाहीत. मोकळेपणाने हसण्याचं दृश्य एक तर आपण चित्रपटांतून पाहू शकतो किंवा मग जाहिरातीतून. आपल्या खऱ्या जीवनात त्या मोकळेपणाने कधीकधी तेव्हाच असतात, जेव्हा त्या केवळ आपल्या मैत्रिणी किंवा महिलांच्या घोळक्यात असतात आणि जिथे पुरुषांना मज्जाव असतो. ही आपली एक प्राचीन आणि गौरवशाली संस्कृती आहे. आपण संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश दिला आहे. पहिलं ज्ञान तर आपण आपल्या मुलींनाच देतो की हे काय मुलांसारखं खिदळता आहात? मुलींना लहानपणापासूनच शिकवलं जातं की हळूहळू हसा. आतमध्ये जाऊन हसा. इतकं मोठ्यानेही हसू नका की तुमच्या हसण्याचा आवाज ऐकून लोक तुमच्याकडे मागे वळून पाहातील.

हसण्यावर बंधन कशाला

पण दुसरीकडे पुरुष कुठेही हसू शकतात. पूर्वी घराची बैठक त्यांच्या हसण्याखेळण्यासाठी असायची, ते हसायचे तेव्हा त्यांच्या हसण्याचा आवाज आतपर्यंत जायचा. पण जर आतमध्ये खोलीत जिथे महिला असायच्या तिथून बाहेर बैठकीपर्यंत त्यांच्या हसण्याचा आवाज आलेला पुरुषांना चालायचा नाही. म्हणूनच असं म्हणता येईल की, मुलींच्या हसण्यावर बंधनं घालणं हा संकुचित मानसिकतेचाच परिणाम आहे.

परंतु एकीकडे जिथे महिलांच्या हसण्यावर निर्बंध घातले जायचे तिथे त्यांना रडण्यासाठी मात्र स्वातंत्र्य मिळालं होतं. मग त्यांनी कसंही रडावं. हुंदके देऊन रडावं किंवा जोरजोरात रडावं. उलट कुणाच्या घरी जर दु:खद घटना घडली आणि घरातून स्त्रियांच्या रडण्याचा आवाज आला नाही, तर पुरुषांमध्ये मोठी कुजबुज सुरू व्हायची.

पुरुषांचा पहारा

रुदालीच्या परंपरेविषयी तर तुम्ही ऐकलंच असेल. लग्न होऊन सासरी जातानाही  मुलीलाच रडावं लागतं. तिने आपला नवीन संसार थाटण्यासाठी आनंदाने जायचं नसतं. या प्रसंगी नवरदेव रडताना दिसत नाही उलट तो मजेत हसत असतो. इतकंच काय, जो नवरदेव घरजावई होण्यासाठी चाललेला असतो, तोदेखील पाठवणीच्या वेळेस रडत नाही.

वरात निघताना एका प्रथेनुसार जेव्हा आई आपल्या मुलाला विचारते की पत्नी मिळाल्यावर आता दुधाचं मोल तर विसरणार नाहीस ना, तेव्हादेखील मुलाला रडू येत नाही, मात्र आईच्या डोळ्यांत अश्रू उभे राहातात.

हसणं आणि रडणं ही मनुष्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे. मात्र, आपल्या महान संस्कृतीने महिलांना यासाठीही स्वातंत्र्य दिलेलं नाही. हसणंरडणं हे महिलांनी ठरवायचं असतं, पण त्यावरही पुरुषांचा पहारा असतो म्हणूनच महिला केवळ हसायलाच शिकल्या. मात्र, पृथ्वीराज चौहानच्या या देशात महिलांच्या हसण्यातूनही वेगळा अर्थ काढण्यास पुरुष स्वतंत्र आहेत. इथे बरीच लोक असंच समजतात की, स्त्री हसली की फसली. खरं तर पृथ्वीराज त्याच हसण्यावर फिदा होऊन संयोगिताला पळवून घेऊन गेले होते.

मनोचिकित्सक शिल्पी आस्ता म्हणते, ‘‘तसंही मोठ्याने हसणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण हे कुठे ना कुठे सोशल एटिकेट्सशी अवश्य जुळलेलं आहे. हसण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना असतं, मग ते पुरुष असो वा महिला, पण मीटिंगच्या दरम्यान लायब्ररी किंवा अशा कोणत्याही जागी जिथे हसण्याचा चुकीचा अर्थ काढला जातो, तिथे मोठमोठ्याने हसू नका. परंतु हसणं वा रडणं आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे, म्हणूनच जेव्हा योग्य संधी मिळेल तेव्हा मनसोक्त हसा. यामुळे मन हलकं होतं आणि आपण तणावमुक्त होतो. म्हणूनच हसा आणि तेदेखील मनापासून हसा.

अनेकदा आजीआजोबांच्या काळातही लग्नानंतर स्त्रियांना आपला पती आपल्या खोलीत आलेला चालायचा नाही. म्हणूनच रात्री सुनेच्या खोलीतून मुलाच्या हसण्याचा आवाज ऐकू आला तर क्षम्य होतं. पण सुनेच्या हसण्याचा आवाज आलेला चालायचा नाही. या संस्कृतीत पुरुषांनी मर्यादेचं उल्लंघन करणं हादेखील त्यांचा पुरुषार्थ मानला जातो. मात्र, महिलांनी बेपर्वाईने वागणं हे असभ्यतेचं वर्तन समजलं जातं.

स्वातंत्र्याचा अधिकार

तसं पाहिलं तर मुली आता या परंपरांचं उल्लंघन करू लागल्या आहेत. त्या मोकळेपणाने हसू लागल्या आहेत. याचं कारण म्हणजे त्या स्वत: निर्णय घेण्यास सक्षम झाल्या आहेत. आपल्याला करिअर निवडायचा अधिकार मिळायला हवा, याची त्यांना जाणीव झाली आहे आणि चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याची त्यांची ताकद हळूहळू वाढू लागली आहे.

पण एक पैलू हादेखील आहे की मुलींचा मोठमोठ्यांनी हसण्याचा आवाज ऐकून लोकांच्या भुवया उंचावतात. कदाचित यामागचं कारण हेच असावं की त्यांना असं वाटू लागतं की, आता आपल्या हातून मुली निसटू लागल्या आहेत, त्या बंड करू लागल्या आहेत. पण जर सर्व तर्कवितर्क बाजूला ठेवून आपण विचार केला तर मुलींचं मोकळेपणाने हसणं हे कानात घंटी वाजल्यासारखं वाटतं, नाही का?

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें