काय उपयोग अशा धर्माचा?

* रोचिका अरुण शर्मा

महागडे कपडे आणि दागिने घातलेल्या महिला साजशृंगारासह राजेशाही थाटात पतीसह आलिशान गाडीतून उतरल्या तेव्हा सगळयांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या.

त्यांच्या आदरतिथ्यासाठी लोक फुलांचे हार घेऊन सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभे होते आणि त्यांना पुढच्या दिशेने घेऊन जात होते. त्यांच्यासाठी महागडे सोफे होते, त्यावर त्या बसल्या.

मागे बसलेल्या लोकांनाही समजले की, त्या नक्कीच मोठया घरच्या आहेत. प्रत्यक्षात आज इथे ज्या पूज्य व्यक्ती प्रवचन देण्यासाठी आल्या आहेत, त्यांच्या उच्चस्तरीय शिष्यांचे ते कुटुंबीय आहेत, ज्यांना येथे विशेष स्थान मिळाले आहे.

देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, असे दृश्य सर्वत्र दिसेल. आता वातानुकूलित खोल्यांमध्येही प्रवचने आयोजित केली जातात जिथे वातानुकूलित आलिशान गाडयांमधून येणाऱ्यांची विशेष काळजी घेतली जाते.

सत्संगाचा महिमा

लग्न झाल्यावर नेहा तिच्या सासरी गेली. तिथे लग्नानंतर इष्ट देवतेच्या पूजेची प्रथा होती. त्यासाठी सर्वजण आलिशान गाडीतून गेले. खूप ऊन होते आणि लांबलचक रांगेत उभे राहिल्यानंतर दर्शन मिळत होते. नेहाला वाटले की, आज उन्हात चांगलेच तापायला होईल, पण त्यांना रांग सोडून पुढे पाठवण्यात आले. लगेचच दर्शन घेतल्यानंतर मोठी रक्कम अर्पण करून ते परतले.

काम पटकन झाल्यामुळे सासू-सासरे खूप खुश होते, पण नेहा अस्वस्थ होती. न राहवल्यामुळे तिने आपल्या उच्चपदस्थ, अधिकारी असलेल्या सासूला विचारले, ‘‘आई, आपण देवाच्या ठिकाणी आपली प्रतिष्ठा आणि ओळख दाखवून रांगेत उभे न राहाता थेट दर्शन घेतो. अशा धर्माचा काय उपयोग? निदान तिथे तरी सर्वांना समान दर्जा मिळायला हवा ना?’’

‘‘मुली, हे गतजन्मीचे पुण्य आहे, त्यामुळेच आज आपल्याला एवढे नाव, प्रतिष्ठा मिळाली. यात काहीही चुकीचे नाही.’’

नेहाला त्यांचे म्हणणे पटले नाही, पण स्वत:ची पद-प्रतिष्ठा कुरवाळत बसणाऱ्या सासूसमोर गप्प बसणेच तिला समजूतदारपणाचे वाटले.

अशाच प्रकारे सॉफ्टवेअर प्रोफेशनल रिटा दर रविवारी आपल्या गुरूंच्या सत्संगाला जाते. आपल्या आजूबाजूला आणि कार्यालयात या सत्संगाचा महिमा आवर्जून सांगते. लोकांना सत्संगाच्या परिवाराशी जोडण्याचा खूप प्रयत्न करते. गुरूंना स्वत:चा मोठेपणा दाखवता यावा यासाठी ती असे करते.

धर्माचे शस्त्र

कार्यालयात उच्च पदावर असल्यामुळे तिच्या हाताखाली काम करणारे अनेक लोक फक्त तिला राग येऊ नये म्हणून सत्संग परिवारात सहभागी झाले. त्यांना त्या गुरुंबद्दल काहीही देणेघेणे नव्हते, फक्त नोकरीत बढती मिळावी, ही इच्छा त्यांना तिथपर्यंत खेचून घेऊन गेली.

रिटा सुशिक्षित असूनही हे सर्व का करत होती हे समजत नव्हते. कदाचित तिला अंतर्गत काही फायदा मिळत असेल किंवा ही फक्त तिची अंधश्रद्धाळू प्रवृत्ती असेल, मात्र केवळ तिच्या दबावामुळे तिच्या संपर्कात येणारे लोकही यात अडकले गेले.

अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला सापडतात ज्यावरून असे वाटते की, सुशिक्षित समाजावरही जात, धर्म, वर्ण, श्रीमंती यांचा खोलवर प्रभाव पडत चालला आहे, तो जराही डळमळीत झालेला नाही. तर्काचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. श्रीमंतांना आपली संपत्ती टिकवण्यासाठी धर्माचे हत्यार सापडले आहे. उपासना आणि कर्माचे फळ आहे असे सांगून गरिबांचे तोंड बंद ठेवण्याची पद्धतशीर सोय करण्यात आली आहे.

धर्मावर होते पैशांची उधळपट्टी

* मोनिका अग्रवाल

राधेराधे… राधेराधे… राधेराधे… जय श्रीराम… जय श्रीराम… जय श्रीराम… रमाकांत पूर्ण श्रद्धेसह भक्तीत लीन झाले होते. सोबत घरातली मंडळी घंटा वाजवत होती. या आवाजामुळे मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. तो सतत जाऊन आईला सांगत होता, ‘‘आई, कृपा करून बाबांना सांग की, सर्वांना थोडया हळू आवाजात पूजा करायला लावा. उद्या माझा बोर्डाचा पेपर आहे आणि आवाजामुळे मी नीट अभ्यास करू शकत नाही.’’

त्याचे बोलणे रमाकांत यांनी ऐकले आणि रागाने म्हणाले, ‘‘ही काय अभ्यासाची वेळ आहे? उद्या परीक्षा असेल तर तुला आज देवासमोर नतमस्तक होऊन बसायला हवे.’’

बोला जय सीताराम… जय जय सीताराम… असे म्हणत ते बायकोवरच रागावले. अक्कल नाही का तुला? इथे महाराज पूजा करत आहेत आणि तू मुलामध्ये वेळ का घालवतेस? मूर्ख बाई… जा, सर्वांसाठी गरमागरम दूध आण. बिचारी, ‘हो’ असे म्हणत आत गेली.

प्रसाद तयार झाला का? महाराजांच्या सेवेत काही कमतरता नको. जितकी मनोभावे सेवा करशील तितकाच मेवा मिळेल… आपले अहोभाग्य म्हणून महाराज आपल्या घरी आलेत… किती जणांनी त्यांना आमंत्रण दिले असेल…  पण ते मात्र आपल्याकडेच आले. आज आपण जे काही आहोत ते केवळ त्यांच्यामुळेच, असे अधूनमधून सासू मोठयाने बोलत होती.

महाराजांच्या सेवेत संपूर्ण दिवस आणि अर्धी रात्र निघून जायची. झोपायला कसेबसे २ तास मिळायचे, मात्र तितक्यातच ४ वाजायचे आणि सासू आवाज द्यायची की, महाराजांच्या अंघोळीची वेळ झाली… तयारी केलीस का…? ६ वाजता त्यांना फेरफटका मारायला जायचे असेल… लक्षात आहे ना तुझ्या? सर्वात आधी उठून अंघोळ कर.

असे दरवर्षी व्हायचे. या घरी आली आल्यापासून हेच बघत आली होती. एखाद्या गरीब, गरजूने विनवणी करूनही त्याला घरातले कोणी साधे १० रुपये देत नसत, पण महाराज, बाबा-बुवांवर लाखो रुपये खर्च केले जात, याचे तिला दु:ख व्हायचे. ती लग्न करून आली तेव्हा सुरुवातीला फक्त एकच महाराज येत असत. तेही फक्त २ किंवा ३ तासांसाठी, पण हळूहळू नवऱ्याचा बाबा-बुवा, महाराजांवरील विश्वास वाढला. त्यातच उत्पन्नही वाढले आणि एका महाराजासोबत आणखी दोघे येऊ लागले. आता तर महाराज त्यांची पत्नी आणि सोबत ११ माणसांना घेऊन येतात. एकाचा पाहुणचार करणे सोपे होते, आता एवढ्या सर्वांची उठबस करावी लागते. त्यातच शेजारी, नातेवाईक महाराजांना भेटायला येतात आणि काम करणारी ती फक्त एकटीच असते.

नुकतीच घडलेली गोष्ट आहे जेव्हा शेजाऱ्यांकडे साक्षी गोपाळ महाराज आले होते. कितीतरी दिवस सकाळ-संध्याकाळी त्यांचे प्रवचन आणि पहाटेच्या प्रभात फेरीमुळे शेजाऱ्यांकडे वेळच उरला नव्हता. त्यांना व्यवसाय वाढवायचा होता आणि त्यासाठीच महाराजांची सेवा करायची होती.

ही कसली अंधश्रद्धा?

विश्वास किंवा श्रद्धा त्यांच्या स्थानी असते, पण अंधविश्वास हा आकलनापलीकडचा विषय आहे. हा कसला अंधविश्वास जो तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे दु:ख समजू देत नाही? लहानसहान गोष्टींसाठी बाबाबुवा, महाराजांकडे धाव घेणारे लोक पाहून माझे रक्त उसळते.

जसजशी आपण जागतिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, तशी लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढत आहे. संपूर्ण जगात अंधश्रद्धेच्या बाबतीत भारतीय आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ज्या देशाने उपग्रहासारखे वैज्ञानिक शोध लावले तोच आधुनिक भारत अंधश्रद्धेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

दान कशासाठी?

अनेकदा, नुकसानाच्या भीतीने, पुण्य कमावण्यासाठी किंवा नवस करताना अथवा तो पूर्ण झाल्याच्या मोबदल्यात दान दिले जाते. काही वेळा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी वायफळ उपाय सांगितले जातात. दानाचे विविध प्रकार असतात. धर्मगुरू, धार्मिक संस्था अशाच प्रकारचे दान गोळा करतात. राजकीय पक्ष निधीसाठी ज्या प्रकारे देणग्या गोळा करतात अगदी त्याच पद्धतीने हे दान गोळा केले जाते.

प्रत्यक्षात भक्त किंवा श्रद्धाळू भलेही गरीब किंवा कफल्लक असतील, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत कर्मकांडाच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळले जातातच. प्रायश्चित्त करणे, ग्रहदशा सुधारणे, दुर्भाग्य दूर करणे, अशा अनेक समस्या सोडवण्याच्या नावाखाली मोठी दक्षिणा उकळली जाते, पण ज्या धर्माला पुढे करून देवाच्या नावाखाली लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात त्याच देवाला किंवा धर्माला पुजारी, महाराज का घाबरत नाहीत, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

दिखाऊपणाचा फायदा कोणाला?

उदाहरण : एक निर्यातदार आहेत ज्यांना सर्व प्रकारचे छंद आहेत. तरीही वर्षातून दोनदा ते श्रीकृष्णाच्या वृंदावनात जाऊन भंडारा घालतात. कमाईतील एक भाग देवाला दिल्यामुळे जीवनात कुठलीच अडचण येणार नाही आणि दान केल्यामुळे नावलौकिकही होईल, असे त्यांना वाटते. त्यांच्या घरातील महिलाही सतत पूजा करतात.

मंदिराशिवाय घरातही लोक देवाच्या बऱ्याच मूर्ती ठेवतात आणि त्यांची सकाळ-संध्याकाळ पूजा करतात. महाराजांना प्रवचनासाठी घरी बोलावणे ही अभिमानाची बाब मानली जाते.

गरिबांना संपत्तीची तर श्रीमंतांना प्रसिद्धीची हाव असते. त्यामुळे मंदिरात दगड ठेवले जातात किंवा घरात महाराजांना बोलावले जाते. आता दानधर्मही दिखाऊपणाचे झाले आहे. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी लोक दानधर्म करतात किंवा घरी महाराजांना बोलावले जाते. असेही लोक आहेत जे भरपूर काळा पैसा कमावतात, परंतु पापाला घाबरतात, म्हणून ते सढळ हस्ते दान करतात, जेणेकरून त्यांना भरपूर पुण्य मिळेल. खोटा अभिमान असो किंवा ढोंगीपणा, पण असे अंधश्रद्ध वागणे चुकीचेच आहे.

सुशिक्षितही जबाबदार

भोंदूबाबांची दुकाने सुरू असतील, तर त्यामागचे एक कारण म्हणजे सुशिक्षित लोकही या सापळयात अडकून भरपूर पैसा खर्च करतात. बॉलीवूडही यापासून दूर राहिलेले नाही. कोणतेही दुकान ग्राहक गेल्यावरच चालते. हे पुजाऱ्यांचे दुकान आहे. त्याची भरभराट होत असेल तर यात जितका हात गरिबांचा आहे, तितकाच श्रीमंतांचाही आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, ज्या धर्माच्या, देवाच्या नावाखाली लोक महाराज, पुजाऱ्यांकडे जातात त्याच देवाच्या घरी काम करणाऱ्यांच्या मनात चुकीचे काम करण्याची इच्छा का आणि कशी निर्माण होते?

चुकीच्या मागण्या

उदाहरण : एका जोडप्याला अनेक वर्षांपासून मूल होत नव्हते. यासाठी ते अनेकदा एका भोंदू बाबांकडे जात होते. एके दिवश त्या बाबाने संधीचा फायदा घेऊन सांगितले की, तुझ्या पत्नीला रात्री माझ्याकडे पाठव. नवऱ्याची या बाबावर एवढी आंधळी भक्ती होती की, त्याने स्वत:च पत्नीला बाबाच्या स्वाधीन केले. त्या बाबाने रात्रभर त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सुशिक्षित लोक आणि नेत्यांसमोर धर्माचे गुणगान गाणारे हे बाबा, महाराज किंवा तांत्रिक जेव्हा एखादी आक्षेपार्ह मागणी करतात, तेव्हा ते त्यांच्या कानाखाली मारायचे सोडून त्यांची अवैध मागणी पूर्ण करतात.

उदाहरण

उत्तर प्रदेशातील एक बाबा असा दावा करायचा की, तो संधिवात बरा करू शकतो. त्यासाठी तो रुग्णाचे रक्त काढून तांब्याच्या भांडयात टाकायचा आणि नंतर रुग्णाला द्यायचा. एका डॉक्टरची सख्खी बहीण ही डॉक्टर भावाने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून या बाबाकडे उपचारासाठी गेली. त्यानंतर खूप आजारी पडली, कारण तिची हिमोग्लोबिन पातळी २ (सामान्य १५ किंवा १२) झाली. अशी उदाहरणे आपल्याला रोजच पाहायला मिळतात. अनेक डॉक्टर आणि परिचारिकांनी तिचा जीव वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिच्या उपचारांसाठी कुटुंबाला ५ लाख रुपये खर्च करावे लागले. प्रत्यक्षात या आजारावर नित्यनियमाने उपचार केल्यास महिन्याला केवळ एक हजार रुपये खर्च येतो.

दानाच्या मोबदल्यात प्रेम मिळविण्याची धार्मिक पद्धत

* मोनिका गुप्ता

रामायण, गीता, कुराण, बायबल यासारख्या धार्मिक ग्रंथांना धंद्याचे माध्यम म्हणावे की मग नैतिक शिक्षण मिळविण्याचे माध्यम? पाहायला गेल्यास आज आपल्या देशात देवाच्या नावे सर्वात मोठा धंदा सुरू आहे. धंदा करायचाच असेल तर धर्माच्या नावाखाली कशाला? आजच्या युगात याचा काहीच अर्थ नसतानाही लोक हे ग्रंथ कशासाठी वाचतात आणि ऐकतात? देवाच्या नावाखाली एक माणूस दुसऱ्या माणसाला लुटून निघून जातो. धर्माच्या नावाखाली मारहाण केली जाते.

आपल्या ग्रंथात खरेच असे लिहिले आहे

प्रत्यक्षात एक धार्मिक कथा जिथे एका पत्नीने आपल्या पतिचे प्रेम मिळविण्यासाठी पतिलाच दान म्हणून दिले, ही पौराणिक कथा आहे, पण आजही ऐकविली जाते. फेसबूकवर, अध्यात्मिक कथांच्या पेजवर पोस्ट केलेल्या अशा कथांना बऱ्याच लाईक्सही मिळाल्या आहेत. आजचे युग, आजचा काळ, आजच्या लोकांशी त्या युगातील कथांचा खरंच काही संबंध आहे का?

ही कथा कृष्ण लीलांशी संबंधित आहे, त्याच कृष्णाशी ज्याने गोपिकांशी रासलीला खेळून स्नानाच्या वेळी गोपिकांचे कपडे पळवले होते. कथेच्या सुरुवातीचे वाक्य असे आहे की कृष्णाच्या १६००८ पत्नींमध्ये राणी होण्याचा मान फक्त ८ जणींनाच होता. हे कुठल्याही युगात स्वीकारले जाणार नाही, परंतु आजच्या काळात अशाप्रकारे त्याचे वर्णन करणे चुकीचे आहे.

लोभ आणि मत्सर

आजच्या युगात, पत्नी असूनही तुम्ही दुसरे लग्न केले तर आपला समाज आणि कायदासुद्धा तुम्हाला दोषी मानतो, कारण आजच्या काळात समाज आणि कायदा दोघेही याविरूद्ध आहेत. आजच्या युगात असे झाल्यास पहिली पत्नी पोलिसांपेक्षाही जास्त आक्रमकपणे विरोध करेल. अशावेळी सत्यभामाची कथा सातत्याने सांगून एकापेक्षा जास्त महिलांशी असलेल्या संबंधाच्या कथेचा गौरव का केला जातो?

कथेत असे सांगितले आहे की सत्यभामा आणि रुक्मिणी अशी कृष्णाच्या दोन राण्यांची नावे होती. सत्यभामाला गर्व होता की कृष्ण तिच्यावरच सर्वात जास्त प्रेम करतो. पण जिथे प्रेम असते, तिथे केवळ सकारात्मकताच असते. जिथे नकारात्मकता येते, ते प्रेम खरे असूच शकत नाही. शिवाय ही अभिमानाची गोष्ट आहे, गर्व असण्याची नाही. पण कथेत लेखक म्हणतात की कृष्णाचे तिच्यावर इतके प्रेम असूनही सत्यभामाला अधिक प्रेम हवे होते आणि तेच सत्यभामाच्या आयुष्यात लोभ आणि मत्सर घेऊन आले, जो इतका वाढला की सत्यभामाने कृष्णालाच दानात देऊन टाकले.

कथेत लेखक सांगतो की नारदला याबाबत समजले त्यावेळी त्याचे काम तर तसेही देवलोकात भ्रमण करणे हेच होते, मग ते भ्रमण करत राहाणे असो किंवा त्यावेळी कळ लावणे, काय फरक पडतो? आजच्या युगात नारदासारख्या व्यक्तिरेखेचे कौतुक करणे चुकीचे आहे, पण कथांमधून त्याला उच्च स्थान दिले जाते. नारदाने सत्यभामाला आपल्या जाळयात अडकवले आणि सांगितले की, तिने तुलाव्रत करावे, ज्यामुळे श्रीकृष्णाचे सत्यभामावरील प्रेम कितीतरी पटीने अधिक वाढेल.

बिनबुडाची कथा

आज जर तुम्ही तार्किकपणे या उपवासाचा संपूर्ण विधी ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल. या व्रताच्या संपूर्ण विधीबाबत नारदांनी सांगितले की आधी कृष्णाला दानात देऊन नंतर परत मिळविण्यासाठी कृष्णाच्या वजनाचे सोने द्यावे लागेल. सत्यभामा हे कार्य पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास कृष्ण नारदाचे गुलाम होतील. असा प्रेमाचा सौदा करायला कोण शिकविते? हा एक प्रकारचा जुगार आहे, हेदेखील येथे पौराणिक कथेच्या रूपात मनावर बिंबवले जाते.

नारदाच्या या खेळाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येते की या युगात सर्व मोहमाया आहे. आजही नारद प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिर, मशिदीत बसलेला दिसेल. कुठे फकीर म्हणून, कुठे पुजारी म्हणून, तर कुठे भगवी वस्त्र परिधान केलेला. कोणी चंदनाचा टिळा लावून सकाळी सकाळी टीव्हीवर ज्ञान पाजळत असतो.

अशा कथांचा असा प्रभाव पडतो की यामुळे कोणाचेही काम पूर्ण होत नाही. मेहनत घेण्याऐवजी आपण हातांच्या रेषा दाखवण्यातच धन्यता मानतो आणि हात पाहून भविष्य सांगणारा तुमचा भविष्यकाळ आणि सोबतच प्रत्येक समस्येचे समाधान सहजपणे सांगून झोळी घेऊन गल्लोगल्ली फिरतो. पण मग त्याच्या आयुष्यात स्थिरता का नसते?

सत्यभामाला प्रेम कृष्णच देऊ शकत होते, नारद नाही. ही वस्तुस्थिती सत्यभामा समजूच शकली नाही. तिच्यातील लोभ आणि अभिमानाने तिला विचारच करू दिला नाही. ती नारदाच्या बोलण्यात फसत गेली आणि विसरून गेली की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तोच आपले दु:ख दूर करू शकतो, इतर कोणीही नाही.

खरे प्रेम आणि खरा विश्वास

कथेतील सत्यभामाच्या व्रतानुसार कृष्णाला दानात देण्यात आले. आता कृष्णाला तराजूवर बसवून त्याच्या वजनाइतके सोने दान करण्याची वेळ आली. सत्यभामाने पूर्ण प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. तितके सोने गोळाच करू शकली नाही. शेवटी रुक्मिणीने खरे प्रेम आणि विश्वासाने सोने बाजूला करून तुळशीचे एक पान दुसऱ्या पारडयात टाकले आणि त्याचे वजन कृष्णाइतके झाले. सत्यभामाचा अभिमान तिथेच गळून पडला. यामुळे सोने तुच्छ झाले आणि तुळशीची पूजा श्रेष्ठ ठरली. सोने द्या प्रेम मिळवा हेदेखील सांगितले गेले आणि तुळशीची पूजा करा हेसुद्धा.

या कथेत उपदेश देण्यात आला की खरे प्रेम दिखावा करून मिळत नाही, प्रेम कोणतीही वस्तू नाही, जिचे वजन करता येऊ शकेल. जे पारखून पाहण्यासाठी योजना आखावी लागेल. वास्तव असे आहे की ही एक भावना आहे, जी अनुभवता येते.

या कथेमागचा छुपा उद्देश असा की साधुसंत पंडित पतिचे प्रेम परतवूही शकतात आणि परतही हिरावूनही घेऊ शकतात. म्हणूनच पतिला खूश करण्यासाठी त्याचे प्रेम मिळविण्यासाठी, मोठया प्रमाणात दान करा, अंधविश्वासाच्या मार्गावरून चाला. कोणाच्याही बोलण्यात येऊन आपले सर्वस्व गमावून बसा. जसे सत्यभामाने नारदाच्या शब्दात येऊन केले.

आजच्या काळात लोक जर देवाला खूप सारे सोने-चांदी दान करत असतील तर ते अशाच कथांनी प्रेरित होऊन. हे पुन्हा पुन्हा मनावर बिंबवले जाते की देव लोभी आहे. आपण त्याला काही देत नाही तोपर्यंत तो आपली इच्छा पूर्ण करत नाही. देव लाच घेतो आणि त्याचे एजंट येऊन घेऊन जातात. अशा प्रकारच्या कथांचा प्रसार-प्रचार आजच्या काळातत पुन्हा उच्च-नीचता आणि लुबाडणूक करण्यासाठी केला जात आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें