राधा ही बावरी

कथा * रेखा नाबर

‘‘पकडा पकडा माझी पर्स खेचली.’’

स्कूटरवरून चाललेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या तरूणाने राधाची पर्स खेचली. ती मदतीसाठी पुकारा करीत होती. कारमधून येणाऱ्या माधवने गती वाढवून आपली कार स्कूटरच्या समोर उभी केली. पटकन् उतरून त्याच्या हातातली पर्स खेचून घेतली व त्याला एक फटका लगावला. त्या दोघांनी पोबारा केला. माधव पर्स घेऊन राधाजवळ आला. ती खूप घाबरली होती.

‘‘ही घ्या तुमची पर्स. आतल्या वस्तू नीट तपासून घ्या.’’

‘‘थँक्स. मी रिक्षासाठी इथे थांबले होते. तर हा प्रकार घडला.’’

‘‘मिळाली ना पर्स! रिक्षासाठी नका थांबू. मी सोडतो तुम्हांला गाडीने. पत्ता सांगा तुमचा.’’

‘‘नको नको. मिळेल मला रिक्षा. जाईन मी. तुम्हांला कशाला त्रास?’’

‘‘भीती वाटते की काय, मी तुम्हांला पळवीन अशी. तशी काळजी करू नका. पण इथे थांबलात तर झाल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ शकते.’’

ती घाबरून ‘नको नको’ म्हणाली. त्याला हसू आले. तो गाडीच्या दिशेने चालू लागला व ती मागून तिने पत्ता सांगितला. गाडी सुरू झाली.

‘‘झाल्या प्रकाराने तुम्ही घाबरलाय. आपण कॉफी घेऊ या एखाद्या चांगल्या हॉटेलात.’’

‘‘नको नको. उशीर होईल. घरी सगळे वाट पाहत असतील.’’

‘‘मोबाईल वापरता ना? मग कळवा घरी. नाहीतर माझ्या मोबाईलवरून फोन करा.

बाय द वे माझं नाव माधव.’’

‘‘माझं राधा. मी करते मेसेज.’’

‘‘काय हो राधा मॅडम, पहिल्यांदा नको नको म्हणून नंतर राजी व्हायचं अशी कार्यपद्धती आहे का तुमची?’’

ती खुद्कन हसली व तिच्या गालावरची कळी त्याला खुणवू लागली.

कॉफीपानानंतर त्याने राधाला घरी सोडले. त्याचा मोबाईल नंबर न घेतल्याची तिला चुटपूट लागली. पण दोनच दिवसांनी तो तिच्या बँकेत आला. मनांत विचार आले ‘हा मलाच भेटायला आला की काय? पण मी या बँकेत काम करते हे त्याला कुठे माहिती आहे. सहज आला असेल कामानिमित्त, न बोलता जायला लागला तर झटकायचं त्याला. आधीच आगाऊपणा नको,’ इतर कस्टमरसारखं तो. मला त्याचं अप्रूप कशाला?

असे विचार मनांत आले तरी नजर त्याचा पाठपुरावा करीत होती. तो मॅनेजर पेंडसेंच्या केबिनमध्ये गेला.

‘‘हूं. म्हणजे पेंडसे साहेबांकडे काम आहे तर. मग तिकडूनच जाईल स्वारी. आपण आपलं काम करावं.’’

त्याने केबिनमध्ये शिरताना राधाच्या दिशेने नजर टाकली.

ती माझ्याकडे पाहतेय की भास झाला? मुलींच्या अथांग मनाचा पत्ता लागणं महाकठीण. माधव, आगे बढ़ो.

‘‘एक्स्युज मी. राधा जोशी मॅडम.’’

तिने पटकन् वर बघितले तर तो आणि पेंडसे सर. ती चटकन् उठून उभी राहीली. ‘‘येस सर.’’

‘‘रिलॅक्स. हे माधव आपटे. यांच्या कंपनीचा अकाऊंट आहे आपल्याकडे. त्यांना आवश्यक ते सहकार्य करा. सगळे अपडेटस् पाठवतो मी तुमच्या ई-मेलवर.’’

ती दबकन् प्रतिसाद देण्याचे विसरून गेली.

‘‘अहो जोशी मॅडम काय झालं? रिलॅक्स. कराल का तुम्ही हे काम?’’

भानावर येत तिने प्रतिसाद नोंदवला. ‘‘ये.ये..स.स.सर.’’

‘‘रिलॅक्स मॅडम. थँक्यू. तुम्ही बसा माधव आपटे.’’

पेंडसे साहेब निघून गेले. ‘‘नक्की. बसू ना?’’

‘‘बसा की. साहेबांनी सांगितलं ना?’’

‘‘पण तुम्ही नाही सांगितलंत.’’

‘‘आता सांगते फ्लिज बसा आणि मला डिटेल्स द्या.’’

हिला माझं येणं आवडलं नाही म्हणून जुलमाचा रामराम का? माझं काम करायचं नाहीए वाटतं! की मला टाळायला पाहतेय.

त्याने शांतपणे बसून डिटेल्स दिले.

‘‘निघू का? परत कधी येऊ?’’

‘‘अं..अं. या दोन दिवसांनी म्हणजे बुधवारी.’’

तो निघाला. किती कोरडं वागणं हे? चहा कॉफी विचारलीसुद्धा नाही. परत यायचं का? काम काय कोणाकडूनही करून घेता येईल. काम होतं तर डायरेक्ट माझ्याकडे यायचं ना? मध्ये पेंडसेसर कशाला? रागच आला मला. म्हणूनच चहा, कॉफी विचारली नाही. येईल की नाही दोन दिवसांनी?

‘‘या या बसा. पाणी प्या. उशीर झाला ना फार?’’

‘‘वाट पाहत होता ना माझी?’’

‘‘तसंच काही नाही. पण काम लवकर हातावेगळं झालेलं बरं.’’

कसं सांगू सकाळपासून वाट पाहत होते ते.

‘‘हो. ते तर झालंच पाहिजे.’’

हे आपलं सांगण्यापुरतं. ही वाटच पाहत होती माझी.

‘‘हा रिपोर्ट मी तयार केलाय. एकदा नजरेखालून घाला. तोपर्यंत मी कॉफी मागवते.’’

‘‘अरे व्वा! न विचारताच कॉफी? बरीच प्रगतीझालीय बच्चू.’’

‘‘बरं झालं. वेळेत काम आटपलं. आता निघू या का?’’

‘‘हो हो. तुम्ही घरीच जाणार ना? सोडतो तुम्हांला.’’

‘‘आलं लक्षात. याचसाठी उशीर केला होता तर.’’

‘‘चालेल.’’

‘‘रिक्षाने गेला असता तर जास्त वेळ लागला असता ना, तेवढा वेळ आपण ग्राऊंडला राऊंड मारून घरी जाऊ या का?’’

‘‘हरकत नाही. पण फार उशीर नको.’’

‘‘म्हणजे याला माझा सहवास हवासा वाटतो. ग्रेट.’’

‘‘इकडे पाणीपुरी खूप छान मिळते. स्वच्छही आहे. घेऊ या.’’

‘‘नको. मी रस्त्यावर कधी काही खात नाही.’’

‘‘मग आता कर सुरूवात. सॉरी करा सुरूवात.’’

‘‘नाही. अगं म्हटलेत तरी चालेल.’’

‘‘घोडं पुढे दामटतोय वाटतं?’’

‘‘सेम हियर. अरे म्हटलस तर खूप आवडेल. म्हणजे जवळीक वाढते ना?’’

‘‘काय म्हणालात?’’ स्वर ताठर वाटला.

‘‘तसं नाही. मोकळेपणाने बोलणं होतं. म्हणून म्हटलं.’’

‘‘खरंय अगं आणि अरे. दोघेही हसले.’’

दिवस पुढे सरकत होते. सहवास वाढत होता. एकत्र फिरणे, नाटक, सिनेमा चालू झाले. दोनो तरफ आग बराबर लगी थी.

मित्रमैत्रिणीत चिडवाचिडवी चालू झाली.

‘‘माधव, आपण असंच किती दिवस हिंडत फिरत राहायचं? एकमेकांत गुंतला आहोत. घरच्यांना सांगायला पाहीजे ना? माधवच्या अंत:करणाचा कोपरा ठुसठुसला. राधाच्या सहवासाने मी सुखावतो. मग ही जुनी आठवण मनाच्या पृष्ठभागावर येऊन का तरंग उठवतेय? आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आमचा भविष्यकाळ भूतकाळाने झाकोळला जाणार नाही ना? सांगावा का तिला भूतकाळ? एक दिवस आईने अचानक विषयाला तोंड फोडले.’’

‘‘माधवा, एका तरूण मुलीबरोबर काही जणांनी तुला बघितलं. म्हणजे बागेत, थिएटरमध्ये. तुला कोणी पसंत पडली असली तर सांग. मला सूनमुख बघायची घाई झाली आहे.’’

माधव क्षणभर गांगारला.

‘‘हो…हो…आ…ई…खरं आहे ते. पण मला काही कळत नाहीए.’’

‘‘कळायचय काय त्यात? जुळतायत ना तुमचे स्वभाव? मग करू या लग्न. सुरूवातीला थोडं अवघड वाटेल. भूतकाळ लवकरात लवकर मागे टाकायला हवा आणि भविष्याकडे कूच करायला हवी. गुंतलाय ना तुम्ही एकमेकांच्यात?’’

‘‘आई, तुला कोणी सांगितलं?’’

‘‘आई आहे मी तुझी. ओळखणारच ना! लग्न करायचय ना तिच्याशी? घेऊन ये तिला घरी. मग तिच्या आईवडिलांना भेटू. त्यांना माहिती आहे का?’’

‘‘बहुतेक असेल माहिती. रविवारी बोलावूं का?’’

‘‘हो बोलव ना! शुभस्थ शीघ्रम.’’

रविवारपर्यंत तो तीव्र मानसिक आंदोलनातून जात होता. कधी एकदा रविवारची संध्याकाळ येते असं त्याला झालं होतं. अखरे ती वेळ आलीच. गुलाबी रंगांची साडी, तसाच ब्लाऊज, पोनीवर अबोलीचा गजरा घातलेली राधा आली, तेव्हा ती साक्षात परी असल्याचा त्याला भास झाला. तो तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होता व लाजेने तिचे गाल आरक्त झाले होते.

‘‘घर सापडायला त्रास नाही ना झाला?’’

‘‘नाही मावशी. आधी आले…’’

तिचे बोलणे तोडून आई म्हणाली, ‘‘हां तेच. आधी आली नाहीऐस ना!’’

‘‘हो हो.’’

आईच्या वागण्याने माधव संभ्रमात पडला. तो संभ्रम वाढला जेव्हा सुशिला मावशी व सुधाकर काका म्हणजे आईची मैत्रिण व तिचे यजमान आले.

‘‘आं. तुम्ही आता कसे?’’

‘‘म्हणजे तुमच्याकडे येण्याचं काही वेळापत्रक आहे का?’’

‘‘नाही…तसं…नाही. पण आता. आई सांग ना.’’

‘‘माधवा, मुलाबरोबर तिचे आईवडिल नकोत का?’’

तो जोरात किंचाळला, ‘‘काय? राधा सुशिला मावशीची मुलगी?’’

‘‘प.ण.ती. पिंकी? जिच्याशी लग्न कर म्हणून तू धोशा लावला होतास.’’

‘‘पिंकी म्हणजेच राधा म्हणजेच पिंकी.’’ वडिलांचे समर्थन.

‘‘हो…हो..पण मला माहिती नव्हतं ना!’’

‘‘काय फरक पडतो? तुम्ही प्रेम केलेली व्यक्ति तीच आहे ना?’’ सुशिल.

‘‘खरंय ते. पण पूर्वी आई म्हणत होती. आई, सांग ना तू.’’

‘‘सांगते भावोजी. मीराच्या आठवणीतून हा बाहेरच पडत नव्हता. कुठल्याही मुलीचा फोटोसुद्धा पाहायला तयार नव्हता.’’

‘‘घोर निराशा झाली माझी जेव्हा मीरा अचानक अमेरिकेला निघून गेली. कॉलेजपासून आमचं प्रेम होतं. सगळ्या मुली अशाच फसव्या असतात असं ठाम मत झालं होतं. मला लग्नच करायचं नव्हतं. आई, राधाला यातलं काही माहिती नाहीए.’’

‘‘माधव, मला सगळं माहिती आहे. तुझा देवदास झाला होता. तुझ्या आणि माझ्या आईने मला माहिती पुरवून पार्श्वभूमी बरोबर तयार केली होती. मीराचा फोटो पाहून मी माझा मेकओव्हरसुद्धा करून घेतला. मला प्रथम पाहिलंस तेव्हा मीराचा भास झाला ना?’’

‘‘अंद…अं…हो…ही.’’

‘‘म्हणून तर तुझं माझ्याकडे लक्ष गेलं.’’

‘‘नजर पडली मीरावर पण प्रेमांत पडलास राधाच्या. खरं की नाही?’’

‘‘हो खरंय. पण ऑफिसच्या माझ्या जाण्यायेण्याच्या वेळा?’’

‘‘माझ्या दोन मैत्रिणी आहेत तुझ्या ऑफिसात. अगदी तुझ्याच सेक्सशनमध्ये. त्यांनी स्पाय मिशन केलं. वॉटस् अॅप, मेसेजवरून तुझी सर्व माहिती कळत होती. त्याप्रमाणे मी हालचाली करत होते.’’

‘‘मग रिक्षा शोधायला जाताना…’’

‘‘तू बाहेर पडलास की मला मेसेज यायचा. मग माझी ऑफिसातून एकझिट.

तुझी गाडी शेजारून जायची, पण तुझं माझ्याकडे लक्षच नसायचं.’’

‘‘अशा कितीतरी मुली रस्त्यावरून जातात. उगीचच कोणाला न्याहाळायचं म्हणजे? पण तू तरी कुठे ओळख दाखवलीस?’’

‘‘तू पुढाकार घ्यावासा असं वाटायचं. मी तुला आवडले की नाही काय माहीत.’’

‘‘मलाही असंच वाटत होतं.’’

माधवच्या आईने आणखी एक माहिती दिली.

‘‘बरं का माधवा, सुशिलेला जावई म्हणून तूच हवा होतास. अनायसे दोघांच्या पत्रिकाही उत्तम जमत होत्या. पण हा तिढा होता ना? तुम्ही मुलांनीच सोडवलेत हो ना.’’

‘‘मावशी, खरे धन्यवाद त्या चोरांचे मानायला हवेत..त्यांनी माझी पर्स पळवली म्हणून या महाशयांचं लक्ष गेलं. त्या निमित्ताने का होईना, मैत्रीची रूजूवात झाला.’’

‘‘चोरांचे आभार सहज मानता येतील.’’

राधाच्या वडिलांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘‘काय म्हणताय माधवराव! आभार मानायला ते चोर सापडेले पाहिजे ना!’’

‘‘सापडतील नक्की. तुम्हांला वाटलं एवढी मोठी गँग तयार करून, फ्लॅन रचून तुम्ही माझा पोपट केलाय. पण बच्चमजी, हम भी कुछ कम नहीं.’’

‘‘अगंबाई म्हणजे काय?’’ राधाच्या आईचे आश्चर्य.

‘‘माधवराव, छुपे रूस्तम निघालात हां तुम्ही.’’

‘‘छान झालं. त्यामुळेच मला माझ्या मनाजोगती सून मिळाली.’’

‘‘चला. शेवट गोड ते सगळच गोड. माधवच्या आई गोडाचा शिरा होऊन जाऊ दे.’’

‘‘चल गं सुशिले माझ्या मदतीला.’’

‘‘सुधाकरराव. शिरा होईपर्यंत आपण चक्कर मारून येऊ या का?’’

आता खोलीत राधा आणि माधवच राहिले.‘‘’’

‘‘शिरा खायच्या आधी तोंड गोड करावं म्हणतो.’’

राधा लाजून अधोवदन झीली. तिला माधवने कवटाळले.

‘‘हाय हाय मर जांवा. या खळीनेच मी घायाळ झालो. राधा ही बावरी.’’

‘‘माधवची’’ दोघांच्या हास्याचा मिलाप झाला.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें