हवामान आणि मूड

* शकुंतला सिन्हा

पावसाळयाच्या ऋतूत मुलांचे बाहेर जाऊन खेळणे बंद होते आणि ती म्हणतात – रेन रेन गो अवे… अशाच प्रकारे अति उष्मा किंवा हिवाळयाला कंटाळून आपण म्हणतो की, हा ऋतू कधी संपणार? हवामानाचे स्वत:चे नैसर्गिक चक्र असते आणि ते सहसा एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत स्वत:च्या वेळेनुसार येते. मात्र, सध्या वातावरणातील बदलामुळे अवेळी हवामानातही बदल पाहायला मिळतो.

कोणतीही परिस्थिती जसे की, खूप पाऊस किंवा खूप उष्णता किंवा खूप थंडी जास्त काळ राहाते तेव्हा त्याचा त्रास होतो आणि त्यामुळे चीडचिड होते, पण हवामानाचा आपल्या मनस्थितीवर खरोखर परिणाम होतो की, हा केवळ मनाचा खेळ आहे? हे जाणून घेण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा ७० च्या उत्तरार्धात आणि ८० च्या दशकाच्या सुरुवातीस या दोघांमधील संबंध समोर येऊ लागले.

हवामान आणि मनस्थितीमधील संबंध : हे नाते अतिशय गढूळ आहे, ज्याला तुम्ही अस्पष्ट, अंधुक, फिकट किंवा घाणेरडे काहीही म्हणू शकता. विज्ञानानुसार, हवामान आणि मूड किंवा मनस्थितीचा संबंध वादाने वेढलेला आहे आणि दोन्ही प्रकारचे वाद वेगवेगळे असू शकतात. १९८४ मध्ये, शास्त्रज्ञांनी मनस्थिती बदलाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला. राग, आनंद, चिंता, आशा, निराशा किंवा आक्रमक वर्तन यासारखे मनस्थितीमधील बदल सूर्यप्रकाश, तापमान, वारा, आर्द्रता, वातावरणाचा दाब इत्यादी घटकांवर अवलंबून असल्याचे अभ्यासात आढळून आले.

अभ्यासात असे दिसून आले की, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रतेचा मनस्थितीवर सर्वात जास्त परिणाम होतो. विशेषत: जेव्हा आर्द्रता वाढते तेव्हा एकाग्रता कमी होते आणि सतत झोपायची इच्छा होते. २००५ च्या अभ्यासात असे दिसून आले की, चांगल्या हवामानात घराबाहेर किंवा इतरत्र वेळ घालवल्याने मनस्थिती आणि स्मरणशक्तीही सुधारते.

बरे आणि वाईट

मूड किंवा मनस्थिती ही वसंत ऋतूमध्ये सर्वोत्तम आणि उन्हाळयात सर्वात वाईट असते. काही शास्त्रज्ञांना मात्र हा अभ्यास मान्य नव्हता, त्यामुळे त्यांनी २००८ मध्ये वेगळा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता यांचा मनस्थितीवर कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत नाही. तो पडलाच तरी नगण्य असतो. २००५ च्या अभ्यासात नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, चांगल्या हवामानाचा मनस्थितीवर अतिशय माफक सकारात्मक परिणाम होतो.

हवामान आणि मनस्थिती या विषयावर आणखी अभ्यासाची गरज आहे, पण एक गोष्ट ज्यावर जवळपास सर्वांचेच एकमत आहे ती म्हणजे हवामानाचा माणसावर होणारा परिणाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर अवलंबून असतो, जो प्रत्येकासाठी सारखा नसतो.

प्रत्येक माणूस हवामानानुसार बदलतो का? : हवामानाचा परिणाम किंवा संवेदना ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, स््नष्ठ (सीजनल इफैक्टिव डिसऑर्डर) ज्याला ऋतूनुसार मनस्थितीत झालेला बदल म्हणतात, त्याचा विचार केल्यास काही लोकांमध्ये हिवाळयात दिवस कमी झाल्यामुळे उदासीनता दिसून आली, ज्याला विंटर ब्लू असेही म्हणतात.

शास्त्रज्ञांच्या मते, जगातील ६ टक्के लोकसंख्येमध्ये विंटर ब्लू सिंड्रोम दिसून आला. याला मनस्थितीसंबंधी दुर्मिळ विकार म्हणतात. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या मते, हा अतिशय सौम्य पातळीचा विकार आहे.

भकास उन्हाळा : अभ्यासात असे दिसून आले की, काही लोकांना उन्हाळयात उदास किंवा भकास वाटते. विशेषत: बायपोलर डिसऑर्डर या आजारात लोकांना उष्णतेमुळे स्ट्रोक किंवा झटके येऊ शकतात. काही लोक उन्हाळयात चिंताग्रस्त, चीडचिडे किंवा हिंसक होऊ शकतात.

काही प्रकरणांमध्ये, खराब हवामानात (जास्त उष्णता किंवा थंडी किंवा पाऊस काहीही असू शकते) खराब मनस्थिती जास्तच खराब होऊ शकते.

संबंधित प्रतिक्रिया

२०११ मध्ये पुन्हा एक अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, भलेही थोडया लोकांवर होत नसला तरी हवामानाचा परिणाम अनेकांच्या मनस्थितीवर नक्कीच होतो. ज्या लोकांचा अभ्यास करण्यात आला त्यापैकी ५० टक्के लोकांवर हवामानाचा कोणताही परिणाम दिसून आला नाही तर उर्वरित ५० टक्के लोकांवर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून आला.

या सर्व अभ्यासानंतर, अभ्यासात सहभागी लोकांमध्ये हवामानाशी संबंधित खालील ४ गोष्टी किंवा प्रतिक्रिया दिसून आल्या –

हवामान आणि मनस्थितीचा संबंध नाही : ज्यांच्यावर हवामानाचा परिणाम होत नाही त्यांच्या मते, मूड आणि हवामानाचा काहीही संबंध नसतो

उन्हाळा प्रेमी : उन्हाळा आणि सूर्यप्रकाशात काही लोकांची मनस्थिती खूप चांगली असते.

उन्हाळा न आवडणारे : हिवाळा आणि ढगाळ वातावरणामध्ये अशा लोकांचा मूड किंवा मनस्थिती चांगली असते.

पाऊस न आवडणारे : काहींना पावसाळा अजिबात आवडत नाही. अशा दिवसांत त्यांचा मूड किंवा मनस्थिती खराब होते. सुमारे ९ टक्के लोक या श्रेणीत येतात. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉ. टॅक्सिया एवर्स यांच्या मते, पावसाळयात काळोख्या रात्री एकटेपणा आणि भीती सतावते आणि त्यामुळे मनस्थिती चांगली राहात नाही.

हवामान आणि सेक्समध्ये संबंध आहे का : हवामान आणि लैंगिक संबंधांबद्दल असा कोणताही सामान्य नियम नाही जो प्रत्येकाला लागू होईल. असे असले तरी, हवामानाचा परिणाम काही प्रमाणात सेक्स ड्राइव्हवर होतो.

उन्हाळयात सेक्स ड्राइव्ह हिवाळयापेक्षा चांगले : थंडीपेक्षा उष्ण वातावरणात सेक्सची इच्छा जास्त असते. शास्त्रज्ञांच्या मते, यासाठी हार्मोन कारणीभूत ठरतात. महिलांमध्ये सेक्स हार्मोन्स उष्णता आणि सूर्यप्रकाशात अधिक तयार होतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये सेक्स ड्राइव्ह वाढते. याशिवाय, सेरोटोनिन, फील-गुड न्यूरो ट्रान्समीटर हा वसंत ऋतू आणि उन्हाळयात महिला आणि पुरुष दोघांमध्ये जास्त प्रमाणात तयार होतो, ज्यामुळे मूड चांगला राहातो.

हिवाळयातील सेक्स ड्राइव्ह : या ऋतूत चांगले हार्मोन्स, सेरोटोनिनचे उत्पादन कमी होते आणि महिलांमध्ये इस्ट्रोजेनही कमी तयार होते, ज्यामुळे सेक्सची इच्छा कमी होऊ शकते. याशिवाय थंडीत अंगावर नेहमी जास्त कपडे घातल्याने त्वचेतील एक्सपोजर कमी होते, त्यामुळे काही प्रमाणात परस्पर आकर्षण कमी होते. या ऋतूत कमी कपडेही घालता येत नाहीत. पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी ड जीवनसत्त्वाची कमतरता हेही यामागचे एक कारण ठरू शकते.

सेक्ससाठी मान्सून सर्वोत्तम : सेक्ससाठी पावसाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गर्जनेने एक वेगळीच भीती जाणवते आणि सेक्सची इच्छा जागृत होते.

थंड वारा आणि पावसाच्या सरी सेक्सची इच्छा निर्माण करतात. पावसात मिठी मारल्याने प्रेम संप्रेरक ऑक्सिटोसिन वाढते, ज्यामुळे दोन्ही जोडीदारांमधील लैंगिक इच्छा वाढते.

सारांश : या अभ्यासांवरून असे दिसून येते की, काही व्यक्ती बदलत्या हवामानाशी मिळतेजुळते घेतात, म्हणजे एक प्रकारे हवामानरोधक असतात, त्यांच्यावर कोणत्याही हवामानाचा विशेष परिणाम होत नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बहुतेक पुरुष नैसर्गिकरित्या हवामानानुसार स्वत:मध्ये बदल करून त्यानुसार वागतात. दुसरीकडे काही लोक हवामानाबद्दल संवेदनशील असतात आणि हवामान बदलाची तीव्रता त्या विशिष्ट व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें