वारसा

कथा * पल्लवी पुंडे

अलीकडे वारंवार माझ्या मनात येतं की माणसाला त्याच्या कर्माची फळं या जन्मातच भोगावी लागतात. म्हणजे मी टेलिव्हिजनवरच्या क्रिमिनल आणि अध्यात्मिक कार्यक्रमांनी भारावून गेलोय म्हणून असं म्हणतोय असं समजू नका. मी रोज धर्मग्रंथ वाचतो असंही समजू नका. मी कुणा बुवा बांबांचा भक्तही नाही अन् पश्चात्तापाचं महत्त्व मला कळलंय असंही नाही.

सध्या माझी मुलगी राशी हिची मैत्री, तिच्या रमण नामक सहकाऱ्याशी फारच वाढली आहे. रमण विवाहित आहे, हे माझ्या काळजीचं कारण आहे. राशी एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर आहे. रमण सीनिअर मॅनेजर आहे. राशी पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती. बँकेतही तिच्या हुशारीचं कौतुक होतं. पण रमणबरोबर तिची जवळीक वाढतेय हे मला खटकत होतं. खरंतर मला मनातून फार भीती वाटत होती. माझी पत्नी शोभा आमच्या मुलाकडं न्यू जर्सीला यू.एस.ला गेली होती. तिला तिथं असं काही कळवणं योग्य नव्हतं. जे काही करायचं होतं, जो निर्णय घ्यायचा होता, तो मलाच घ्यायचा होता. आज माझा भूतकाळ मला वाकुल्या दाखवत माझ्यासमोर उभा होता.

मुजफ्फरनगरला मी नव्यानंच बदलून गेलो होतो. बिऱ्हाड अजून दिल्लीतच होतं. शोभाला दुसरं बाळ होऊ घातलेलं. पहिला मुलगाही अजून तसा लहानच होता. इथं मी जेमतेम दोनच वर्षं काढणार होतो. त्यामुळे बिऱ्हाड मांडायचा विचार नव्हता.

बँकेला जवळ असं एक छोटसं घर भाड्यानं घेतलं होतं. शेजारी एक कुटुंब राहत होतं. एक तरूण स्त्री आणि तिची दोन मुलं, बहुधा जुळी असावीत. तिसरी-चौथीत शिकत असावीत. बँकेत काम करणाऱ्या रमेशकडून समजलं होतं की ती स्त्री विधवा आहे. तिचा नवरा ही बँकेतच होता. काही वर्षांपूर्वी तो वारला होता. बँकेनं त्याच्या पत्नीला नोकरीवर ठेवून घेतलं होतं. मधल्या काळात ती सासरच्या लोकांबरोबर राहत होती, पण आता तिनं इथं स्वतंत्र बिऱ्हाड केलं होतं.

‘‘विनय सर, सांभाळून रहा हं! बाई एकदम चालू आहे.’’ रमेशनं मला सांगितलं होतं. रमेश तिला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होता हे मला बँकेतल्याच एका कर्मचाऱ्यानं सांगितलं होतं. तिनं त्याची डाळ शिजवू दिली नव्हती. म्हणताना रमेश तिच्याबद्दल इथं तिथं वाईट बोलत होता.

सौजन्याचा गुण तर आम्हाला वारसा हक्कानं मिळाला आहे. शेजाऱ्यांशी प्रेमानं वागा, त्यांना मदत करा, ही आम्ही लहानपणापासून ऐकलेली शिकवण आहे. शेजारी एखादी तरूण देखणी स्त्री असते, तेव्हा तर आम्ही पुरूष मंडळी अधिकच सौजन्यानं वागतो.

मी त्या दिवशी ऑफिसातून परतलो, तेव्हा ती तिच्या घराच्या पायऱ्यांवर बसून होती.

‘‘तुम्ही इथं का बसला आहात?’’ मी विचारलं. ‘‘सर, काय झालं…म्हणजे, माझी किल्ली हरवलीए. मुलं येतीलच आता…त्यांच्याकडे असते दुसरी किल्ली. तोवर इथं बसून वाट बघतेय त्यांची.’’ ती कशीबशी बोलली.

‘‘तुम्ही काळजी करू नका माझ्या घरात या.’’

‘‘अं?’’

‘‘म्हणजे, माझ्या घरात येऊन बसा. मी किल्ली बनवणाऱ्याला घेऊन येतो.’’

‘‘मी इथंच थांबते…तुम्ही किल्लीचं बघा.’’

‘‘ठिक आहे.’’

थोड्याच वेळात रचनाचं घर उघडलेलं होतं अन् मी आत सोफ्यावर बसून तिच्या हातचा चहा घेत होतो. दहा मिनिटातच तिची मुलंही आली. मुलं समजूतदार अन् गोड होती. थोड्याच वेळात माझी त्यांची छान बट्टी जमली.

माझ्या मुलालाही कधी एवढा वेळ दिला नसेल जेवढा मी निखिल आणि अखिलसाठी देत होतो. त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं, त्यांचा अभ्यास घेणं, रविवारी त्यांना फिरायला नेणं हे अगदी सहज अन् मजेमजेत सुरू होतं. मी तिला हक्कानं एकेरी नावानं संबोधू लागलो होतो. तिनं त्यावर कधी आक्षेपही घेतला नव्हता. प्रत्येक गोष्टीत ती माझा सल्ला घ्यायची. शाळेच्या पिकनिकला तिनं मुलांना पाठवलं होतं, ते माझ्याच सल्ल्यावरून.

बँकेत दोन दिवसांचा स्ट्राइक होता. आम्ही घरीच होतो. नेहमीच सुट्टीच्या दिवशी मी रचनाच्या घरी जेवायला जात असे. पण आज मुलं घरी नव्हती. ती शाळेच्या पिकनिकला गेली होती.

दारात उभं राहून मी विचारलं, ‘‘आत येऊ शकतो का?’’

‘‘विनय सर? तुम्हाला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली?’’

आम्ही दोघं जेवलो. मला जाणवलं आज रचना जरा बेचैन वाटतेय. तिनं मागचं आवरलं, मग आम्ही दोघं टीव्ही बघत बसलो. रचनाला मी विचारलं, ‘‘बरं नाहीए का?’’

‘‘डोकं दुखतंय सकाळपासून.’’ ती उत्तरली.

मी तिच्याजवळ सोफ्यावर जाऊन बसलो अन् हलक्या हातानं तिचं कपाळ चेपायला लागलो. कपाळ दाबता दाबता माझे हात तिच्या कानशिलांवरून खांद्यावर आले. तिनं डोळे मिटून घेतले होते. दोघांच्याही शरीराची थरथर एकमेकांना जाणवत होती. काही तरी बोलण्यासाठी तिनं ओठ उघडले अन् मी ते माझ्या ओठांनी बंद केले.

त्यानंतर तिनं डोळे उघडले नाहीत. आम्ही एकमेकांच्या जवळ जवळ येत गेलो. संकोच वाटत नव्हता, उलट जणू दोघांच्या देहांना याच जवळीकीची आस होती असं वाटत होतं. मनानं मनाची, देहानं देहाची भाषा समजून घेतली होती.

‘‘डोळे उघडू नकोस आज मी तुझ्या डोळ्यात मुक्कामाला आहे.’’ मी तिच्या कानांत हळूवार बोललो.

किती वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो कुणास ठाऊक. तिच्यापासून दूर होत मी म्हटलं, ‘‘रागावली नाहीस ना माझ्यावर?’’

‘‘मला स्वत:चाच राग येतोय. तुम्ही विवाहित आहात…असं घडायला नको होतं.’’

‘‘रचना, शोभाशी माझं लग्न म्हणजे एक तडजोड आहे. आमच्या घरच्यांनी लग्न करून दिलंय आमचं. तेच नातं कसंबसं निभावतोय मी. प्रेमाची जाणीव आज प्रथमच तुझ्या संगतीत झाली आहे.’’

‘‘पण, लग्न ते लग्नच ना?’’

‘‘रचना, सप्तपदी झाली म्हणजे प्रेम निर्माण होतं का? लग्नानंतर नवराबायकोत सेक्स घडतोच. पण प्रेम नाही निर्माण होत. तुला पश्चात्ताप होतोय का?’’

‘‘विनय, तुम्ही म्हणता त्या प्रेमाचा साक्षात्कार मलाही झाला आहे. प्रेम शक्ती देतं. वासना असेल तर पश्चात्ताप होतो. माझं लग्न झालं त्या माणसावर मी प्रेम करू शकले नाही. फक्त त्यानं माझं शरीर वापरलं. मनापर्यंत तो पोचलाच नाही. नंतर जे पुरूष जवळ येण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मीच जवळ येऊ दिलं नाही कारण त्यांच्या डोळ्यातली वासना…त्यांच्या गलिच्छ विचारांचाच तिटकारा वाटायचा मला. तुम्ही मात्र मला नेहमीच मानानं वागवलंत. माणूस म्हणून वागवलंत…अन् मी माझं शरीर तुमच्या स्वाधीन केलं. विधवा स्त्रीनं दुसरं लग्न केलं तर आता चालतं समाजाला. पण असे संबंध अनैतिकच ठरतात. मी आज चारित्र्यहीन ठरले आहे.’’

त्यानंतर आम्ही सततच एकमेकांबरोबर रात्री घालवू लागलो. तिची मुलं झोपली की सकाळीच उठायची. आम्ही निर्धास्त होतो. अधूनमधून सिनेमा, शॉपिंग, पिकनिक असं छान आयुष्य चाललं होतं.

अधूनमधून मी दिल्लीला घरी जात असे. दोन्ही मुलांसाठी भरपूर खाऊ, खेळणी घेऊन जायचो. शोभासाठीही साड्या, दागिने, तिच्या आवडीच्या गोष्टी नेत होतो. बघता बघता दोन वर्षं झाली. आता शोभा बदली घेण्यासाठी फारच जीव खात होती. इकडे रचना आमच्या संबंधांना काही तरी नाव, नात्याचा दर्जा मिळावा म्हणून गळ घालत होती. अन् मी या दोन बायकांना सांभाळू शकत नव्हतो.

रचनानं जे मला दिलं ते शोभाकडून कधीच मिळालं नव्हतं. पण शोभा माझा कायदेशीर पत्नी होती. त्या नात्याला असणारा सामाजिक सन्मान, नैतिक आधार अन् माझी मुलं हे सर्व रचना मला देऊ शकत नव्हती. शेवटी मी बदलीसाठी विनंती पत्र पाठवलं.

‘‘तुम्ही दिल्लीला जाताय?’’

मी रचनाला पत्ता लागू दिला नव्हता, पण तिला कळलंच.

‘‘हो…जावं लागणारच ना?’’

‘‘मला सांगावं असंही वाटलं नाही?’’

‘‘हे बघ रचना, हे नातं आता आपण संपवूयात.’’

‘‘पण तुम्ही तर माद्ब्रयावर प्रेम करत होता?’’

‘‘हो, करत होतो, आता नाही करत?’’

‘‘आता नाही करत?’’

‘‘तेव्हा मला भान नव्हतं, आता मी भानात आहे.’’

‘‘पण तुम्ही शोभाला घटस्फोट देणार होता, माझायाशी लग्न करणार होता…मग? आता काय झालं?’’

‘‘वेडी आहेस तू? दोन दोन बायका कशा करणार मी? अन् शोभाचा दोष काय? काय म्हणून मी घटस्फोट मागणार?’’

‘‘पण आता मी काय करू? कशी जगू? कुठं जाऊ?’’

‘‘उगीच तमाशे करू नकोस. मी तुझ्यावर बळजबरी केली नाहीए. जे घडत होतं, ते तुझ्या इच्छेनंच घडत होतं.’’

‘‘ठिक आहे. तुम्ही मला सोडण्याचा निर्णय घेतलाय. तेही बरोबरच आहे. पत्नी, मुलं, यांचा तुमच्यावर हक्क आहे. वाईट एवढंच वाटतं की स्पष्ट सांगायचं धाडस नाहीए तुमच्यात. मला कळलं नसतं तर कदाचित तुम्ही मला न सांगताही निघून गेला असता पण ज्या प्रेमाच्या गोष्टी बोलत होतात, त्या प्रेमाला एवढीही अपेक्षा नसावी?’’

‘‘तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस.’’

‘‘केवढा दांभिकपणा! मला वापरून घेतलंत अन् आता चक्क फेकून देताहात?’’

‘‘हो, हो! वापरलं तुला. काय करून घेशील? अन् तुला ही सुख मिळालंच ना? पुरेपूर पैसे दिलेत मी. किती खर्च केलाय ते विसरलीस का?’’

मी खरंतर फारच खालच्या पातळीवर उतरलो होतो. रचनानं मला कधीच तिच्यासाठी किंवा मुलांसाठी खर्च करू दिला नव्हता. उलट मीच तिच्याकडे जेवत होतो. चहा फराळ करत होतो. तिच्या एकटेपणाला सोबत करण्याचा मोठेपणा मिरवत होतो.

‘‘तुम्ही अन् तुमच्यासारख्या पुरूषांनी असहाय, एकटया स्त्रीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मी तुम्हाला धडा शिकवणार आहे. मला स्वत:चीच लाज वाटतेय, इतक्या हीन, हलकट माणासावर मी प्रेम केलं…देह अन् मन समर्पित केलं.’’

‘‘रचनानं माझ्यावर बलात्काराची केस ठोकली. ही बातमी कळताच माझ्या घरचे लोक, शोभा अन् तिच्या माहरेची मंडळी सगळीच मुजफ्फरनगरला आली. मी अक्षरश: रडून रडून शोभाची क्षमा मागितली.

‘‘मला एकच सांगा, जर तुम्ही तिथं नसताना, माझे एखाद्या पुरूषाशी असे संबंध झाले असते अन् मी तुमची क्षमा मागितली असती तर तुम्ही क्षमा केली असती?’’

मी काही बोलूच शकलो नाही.

‘‘उत्तर द्या विनय, गप्प बसू नका,’’ शोभा म्हणाली.

‘‘न…नाही…बहुधा.’’

‘‘बहुधा…अं? तुम्ही नक्कीच मला क्षमा केली नसती. पुरूष अनैतिक वागला तर स्त्रीनं त्याला क्षमा करावी असं समाजाला वाटतं. पण चुकून कुणा स्त्रीकडून असं घडलं तर लगेच तिला बदफैली, व्यभिचारी ठरवून समाज मोकळा होतो. खरंच, मला रचनाचा राग येत नाहीए, तिरस्कार वाटत नाहीए, मला तिचं कौतुक वाटतंय अन् दयाही येतेय. तिला केवढ्या मानहानीला सामोरं जावं लागतंय म्हणून दया येतेय अन् तिनं दांभिक पुरूषी अहंकाराला आव्हान दिलंय म्हणून कौतुक वाटतंय.’’

मी घायकुतीला आलो, ‘‘तू मला क्षमा करणार नाहीस.’’

‘‘मी तिच्यासारखी धाडसी नाहीए. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मुलांची आई म्हणून क्षमा करते आहे. एक पत्नी आणि एक स्त्री म्हणून क्षमा करणार नाही. तुम्ही कायम अपराधीच राहाल.’’

सगळ्या आळीतले लोक रचनालाच दोष देत होते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या सर्वगुण संपन्न असण्यावर जळणाऱ्या बायका अन् ज्यांना तिनं कटाक्षानं दूर ठेवलं होतं ते पुरूष अशावेळी मागे कसे राहणार? एकटी, देखणी विधवा स्त्री…तिला कोण आधार देणार?

रचना कोर्टात केस हरली. मी माझे सगळे सोर्सेस वापरून उत्तम वकील दिला. पाण्यासारखा पैसा खर्च केला. माझी समाजात पत होती अन् सामाजिक पाठिंबा होता.

रचनाला कुणाचाच आधार नव्हता. आता तिला तिथे राहणंही शक्य नव्हतं. मुलांनाही फार त्रास झाला होता. तिनं एका रात्रीत शहर सोडलं. त्यापूर्वी ती माझ्याकडे आली होती.

‘‘माझ्या मूर्खपणाची शिक्षा मला मिळाली आहे. माझ्या मुलांना मात्र विनाकारण त्रास झाला. पण मी त्यांना खूप शिकवेन, मोठं करेन. त्यांना मानानं जगता येईल एवढं मी नक्कीच करेन. पण एकच सांगते, तुमच्या या नीच, हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका. कुणा भोळ्याभाबड्या जिवाचा विश्वासघात करू नका, मुलांनाही करू देऊ नका.’’

ती निघून गेली…मीही दिल्लीला आलो. नव्यानं संसार, नोकरी एकूणच सगळं आयुष्य सुरू झालं. पण माझ्या अन् शोभात जो दुरावा निर्माण झाला होता, तो कधीच भरून आला नाही. तिनं म्हटलंच होतं, एक स्त्री, एक पत्नी, एक बदफैली पुरूषाला चारित्र्यहिन नवऱ्याला क्षमा करणार नव्हती. खरं तर मी तरी स्वत:ला कुठं क्षमा करू शकलो होतो? अन् रचनाला तरी कुठं विसरू शकलो होतो?

मी कुठलंच नातं प्रामाणिकपणे निभावलं नव्हतं. माझ्या मुलीच्या बाबतीतही तेच घडतंय का याची मला भीती वाटत होती. माझा भूतकाळ, त्यातील घटना जणू याक्षणी माझ्यापुढे उभ्या राहून खदाखदा हसत होत्या.

मी ताडकन् उठलो…नाही, राशीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही? मी तिच्याशी बोलतो, तिला समजावतो, माझा मुलगी आहे ती, माझं नक्की ऐकेल. तिनं नाही ऐकलं तर मी त्या रमणला जाऊन भेटेन. त्याच्या बायकोला भेटेन. पण खरं तर अशी वेळ येणारच नाही. राशीलाच सांगून काम भागेल.

मी तिच्या खोलीच्या दाराशी पोहोचलो. हळूच बघितलं तर ती तिच्या मित्राशी व्हिडिओ चॅट करत होती. बोलण्यात रमणचं नाव ऐकून मी तिथच थबकलो अन् आडूनच ऐकू लागलो.

‘‘तुझ्यात अन् रमण सरांमध्ये काय चाललंय?’’

‘‘या वयात जे चाललं तेच!’’ जोरात हसून राशीनं म्हटलं.

‘‘तुला ठाऊक आहे ना. ते विवाहित आहेत.’’

‘‘ठाऊक आहे मला.’’

‘‘तरीही तू?’’

‘‘राशी, तुझा मित्र म्हणून सल्ला देतोय, जो माणूस स्वत:च्या पत्नीशी प्रामाणिक राहू शकत नाही, तो कुणाशीही प्रामाणिक राहणार नाही…तुला केव्हाही डच्चू देतील ते…’’

खदाखदा हसली राशी. ‘‘पुरुष मला सोडणार नाही, मीच सोडते पुरूषांना.’’ दंभ होता तिच्या बोलण्यात.

‘‘अरे, आता तो कोंबडा स्वत: मरायला तयार आहे. तर त्यात माझी काय चूक? अं? त्याला बावळ्याला वाटतंय, मी त्याच्या प्रेमात पार बुडाले आहे म्हणून. पण त्या मूर्खाला हे कळतच नाहीए की मी त्याचा वापर करते आहे. त्याला वापरून मी पुढली पायरी गाठणार आहे. ज्या दिवशी तो मी अन् माझा स्वप्नं, माझी महत्त्वाकांक्षा यांच्यामध्ये येईल, त्याच दिवशी मी त्याच्यावर रेपची केस ठोकेन. तुला ठाऊक आहे, सध्या कोर्टात स्त्रियानांच न्याय मिळतो.’’

माझ्या छातीत जोरदार कळ उठली अन् मी खाली कोसळलो. माझ्या कानात रचनाचे शब्द घुमत होते. ‘‘तुमच्या या नीच, हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका…’’

पण वारसा मुलांना मिळाला होता…

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें