प्रतिक्षा फक्त तुझ्या होकाराची

कथा * मिनी सिंह

आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे, हे समजल्यावर दिव्याला हुंदका आवरता आला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, ‘‘एकदा माझे आयुष्य उद्धवस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा… कृपा करा, जशी आहे तसेच मला राहू द्या. माझ्या खोलीतून निघून जा,’’ असे सांगत तिने जवळ असलेली उशी भिंतीवर भिरकावली.

पाणावलेल्या डोळयांनी काहीही न बोलता नूतन खोलीबाहेर आल्या.

शेवटी तिच्या या परिस्थितीला नूतनच तर कारणीभूत होत्या. चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली, याचा साधा विचारही त्यांनी केला नाही. दिव्याच्या मनात कुणी दुसरे तर नाही… हेही जाणून घेतले नाही. दिव्याने अनेकदा सांगायचा प्रयत्न केला की, तिचं अक्षतवर प्रेम आहे… पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.

अक्षत आणि दिव्या एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. अक्षत दिव्यासोबत दिसताच नूतन त्याच्याकडे इतक्या रागाने बघायच्या की, बिचारा घाबरून जायचा. दिव्यावर प्रेम आहे, हे सांगायची त्याची कधीच हिंमत झाली नाही. मात्र मनोमन तो दिव्याचाच विचार करायचा आणि तीही त्याचीच स्वप्नं पाहायची.

‘‘निलेश चांगला मुलगा आहे, शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसेवाला आहे. त्यांनी त्यांच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला, याचा तुला आनंद व्हायला हवा. नाहीतर त्यांच्या मुलासाठी मुलींची कमतरता आहे का या जगात?’’

दिव्याचे वडील मनोहर यांनी नूतनला सांगितले. मात्र दिव्या मनापासून लग्नासाठी तयार आहे का? हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.

आईवडिलांची पसंती आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून दिव्याने जड अंत:करणाने लग्नाला होकार दिला. तिला आईवडिलांना दुखवायचे नव्हते. मुलाकडचे खूप श्रीमंत होते, तरीही त्यांना हवातेवढा हुंडा मिळाला.

‘आमची मुलगी एकुलती एक आहे. आमचे जे काही आहे ते तिचेच आहे. मग नंतर दिले काय किंवा आता लगेच दिले, तरी काय फरक पडणार?’ असा विचार करून मनोहर आणि नूतन त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. तरी काही केल्या त्यांचे समाधान होत नव्हते. आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे, हे सांगताना दोघेही थकत नव्हते. एवढया मोठया घरात मुलीचे लग्न ठरवून मनोहर यांच्या जीवनाचे सार्थक झाले, असे लोक कौतुकाने म्हणत.

काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून दिव्या सासरी निघाली. सासरी जाताना तिने पाहिले की, अक्षत एका कोपऱ्यात उभा राहून स्वत:चेच डोळे पुसत होता.

सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री इतर नववधूंप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहात होती. तो येताच दिव्याचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वत:ला सावरले, कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री जर पतीने पत्नीला सांगितले की, तो शारीरिक संबंध ठेवायला सक्षम नाही आणि त्यासाठी माफ कर तर ते ऐकून पत्नीला काय वाटले असेल?

क्षणभर दिव्या सुन्न झाली. तिचा पती नपुंसक आहे आणि फसवून त्यांनी लग्न लावले, हे ऐकून दिव्याच्या मनावर मोठा आघात झाला.

जाणूनबुजून तिला असे का फसवण्यात आले? तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला? असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीबाहेर निघून गेला. दिव्याने संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली.

सकाळी अंघोळ झाल्यावर ती मोठयांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या. तिने विचार केला की, रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला, याचा जाब त्यांना विचारावा. पण जाब विचारायला तिचे मन धजावत नव्हते. काय करावे, हेच तिला सूचत नव्हते, कारण रिसेप्शनवेळी निलेश असा काही वागत होता जसे की, त्यांची पहिली रात्र खूपच छान गेली. हसून तो आपल्या मित्रांना त्याबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते. दिव्याला असे वाटले की, कदाचित त्याने त्याच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले असेल.

पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना, असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली. तिने तेच खोटे सांगितले जे ऐकून आईवडिलांना आनंद होईल.

एका चांगल्या पतीप्रमाणे निलेश तिला माहेरी सोडायला गेला. अतिशय आदराने तो सासू-सासऱ्यांच्या पाया पडला आणि त्याने सांगितले की, तुम्ही दिव्याची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्याची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे मनोहर आणि नूतन यांना धन्य झाल्यासारखे वाटले. खरे काय आहे, हे त्यांना कुठे माहीत होते? ते फक्त दिव्यालाच माहीत होते. ती मनातल्या मनात कुढत होती.

सासरी येऊन दिव्याला आठवडा होऊन गेला होता. इतक्या दिवसांत एकदाही निलेश दिव्याच्या जवळ गेला नव्हता. तिच्याशी साधे प्रेमाचे दोन शब्दही बोलला नव्हता. तिच्यासोबत नेमके काय घडतेय आणि ती इतकी शांत का आहे, हेच तिला समजत नव्हते. निलेशने विश्वासघात केलाय, हे ती सर्वंना का सांगत नव्हती? पण सांगणार तरी काय आणि कोणाला? असा विचार करून ती गप्प होती.

एकदा झोपेतच दिव्याला असे वाटले की, कुणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित निलेश असेल, असा तिने विचार केला, पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावरून हात फिरवत होती त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून बघितले आणि तिला धक्का बसला. ती व्यक्ती निलेश नव्हे तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपडयांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहात होते.

‘‘तू… तुम्ही, इथे माझ्या खोलीत… का… काय करताय इथे बाबा?’’ असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र निलेशच्या वडिलांनी तिला खेचून स्वत:जवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. दिव्याला तिच्या डोळयांवर विश्वास बसत नव्हता की, तिचा सासराच तिच्यासोबत…

‘‘मी, मी तुमची सून आहे. मग तुम्ही माझ्यासोबत असे…’’ प्रचंड घाबरलेली दिव्या अडखळत बोलत होती.

‘‘सून…’’ मोठयाने हसत तो म्हणाला, ‘‘तुला माहीत नाही का? माझ्यापासूनच तुला या घराला वारस मिळवून द्यायचा आहे. म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे.’’

हे ऐकून दिव्याला वाटले की, जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल ओतत आहे. ती म्हणाली, ‘‘वेडयासारखे काय बोलताय? लाज विकून खाल्लीय का?’’

तो मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता. तो दिव्याच्या अंगावर धावून गेला. कसेबसे त्या नराधमापासून वाचत दिव्याने दरवाजा उघडला. समोर निलेश आणि त्याची आई उभे होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, सासरे जबरदस्ती करू पाहत आहेत. त्यांच्या तावडीतून मला वाचवा.

‘‘खूप झाला हा उंदिर, मांजराचा खेळ… नीट ऐक, इथे सर्व आमच्या मर्जीनुसारच घडत आहे. यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नकोस. जे होतेय ते होऊ दे.’’

सासूच्या तोंडून हे ऐकून दिव्याला काहीच सूचेनासे झाले. चक्कर येऊन इथेच पडायला होईल, असे तिला वाटले. कसेबसे स्वत:ला सावरत ती म्हणाली, ‘‘म्हणजे तुम्हाला माहीत आहे की, तुमचा मुलगा…’’

‘‘हो, म्हणूनच तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले, नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती.’’

‘‘पण मीच का… हो गोष्ट आमच्यापासून का लपवली? या सर्व गोष्टी लग्नाआधी… का तुम्ही सर्वांनी आमचा विश्वासघात केला? सांगा, सांगा ना?’’ रागाने दिव्या म्हणाली, ‘‘तुम्हाला काय वाटते, मी हे सर्व निमूटपणे सहन करेन? नाही, सत्य काय आहे, हे सर्वांना सांगेन.’’

‘‘काय म्हणालीस, सर्वांना सांगशील? कोणाला? तुझ्या बापाला, जो हृदयरोगी आहे… विचार कर, तुझ्या बापाला काही झाले तर तुझी आई काय करणार? तुला घेऊन ती कुठे जाणार? आम्ही जगाला सांगू की, तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलीस.’’

दिव्याचे केस ओढत निलेश म्हणाला, ‘‘तुला काय वाटले? तू मला आवडलीस म्हणून तुला लग्नाची मागणी घातली? जे आम्ही सांगू तेच तुला करावे लागेल, नाहीतर…’’ बोलणे अर्धवटच ठेवून त्याने तिला त्या खोलीतून बाहेर काढले.

संपूर्ण रात्र दिव्या बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजावत म्हणाली, ‘‘हे बघ सूनबाई, जे घडतेय ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तरी काय फरक पडतो? शेवटी आम्ही तुला या घराला वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे.’’

हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल दिव्याला तिरस्कार वाटू लागला होता. दिव्याकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद आणि नणंदेचा नवरा. आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडूनही दिव्याला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते, हे आता तिच्या लक्षात आले होते.

लग्नाला ३ महिने झाले होते. या ३ महिन्यांत असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनांध नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसेबसे तिने स्वत:ला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. मनोहर जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा दिव्याशिवाय या घराची गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. त्यांचा दिव्यावर खूप जीव आहे, म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाहीत, असे ते दिव्याच्या वडिलांना भासवायचे.

आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळत आहे, असे वाटून मनोहर यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडत आहे, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. वडिलांचा जीव दिव्याला धोक्यात घालायचा नव्हता, म्हणूनच ती गप्प होती. मात्र त्या दिवशी हद्दच झाली, जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांसोबत एका खोलीत बंद करण्यात आले. ती ओरडत होती, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती? खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्व दरवाजा उघडून आत आले. त्यांची नजर चूकवून दिव्या पळून गेली.

आपल्या मुलीला असे एकटे आणि भकास अवस्थेत पाहून मनोहर आणि नूतन यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने ते मुलीच्या सासरी गेले आणि त्यांनी जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, असे काहीच घडलेले नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेडया मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले, त्यामुळे विश्वासघात तर दिव्याच्या आईवडिलांनी केला आहे.

‘‘हो का, असे असेल तर तुमचा मुलगा नपुंसक आहे की नाही, याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का, याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य उजेडात येईल. तुम्हाला काय वाटले, आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालिनता पाहिली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवून देईन की, मी काय करू शकतो. मोठयात मोठया न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही… तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप, त्याला फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर मनोहर नाव लावणार नाही,’’ असे सांगताना मनोहर यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला.

त्यांचे असे बोलणे ऐकून निलेशच्या घरचे घाबरले. खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते, त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली.

‘‘काय विचार करतोस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही. मला फाशीवर लटकायचे नाही.’’ घाम पुसत निलेशच्या नराधम बापाने सांगितले.

त्यांना वाटू लागले की, हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांची अब्रु जाईलच, शिवाय शिक्षा होईल. त्यांनी खूप विनवण्या केल्या, जे हवे ते घ्या, वाटल्यास कानाखाली मारा, पण पोलिसांकडे जाऊ नका.

‘पोलीस, कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये’, असा विचार करून मनोहर शांत झाले, मात्र निलेशने लवकरात लवकर दिव्याला घटस्फोट द्यावा, अशी अट त्यांनी घातली.

दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे निलेशने निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सही केली. पहिल्या सुनावणीतच दिव्याला घटस्फोट मिळाला.

आता दिव्या स्वतंत्र झाली होती, पण तिला निराशेने घेरले. जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून रहायची. नीट खात नव्हती. कुणाशी बोलत नव्हती. ‘मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाचे बरेवाईट तर करून घेणार नाही ना?’ असा विचार सतत मनात येत असल्याने मनोहर आणि नूतन यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वत:लाच अपराधी मानत होते. दिव्याने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे, यासाठी काय करायला हवे, हेच त्यांना समजत नव्हते.

‘‘दिव्या बाळा, बघ कोण आले आहे,’’ तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिले आणि ती बघतच राहिली. ‘‘अक्षत,’’ तिच्या तोंडून शब्द फुटले.

एकेकाळी दिव्या आणि अक्षतचे एकमेकांवर प्रेम होते, पण ते सांगू शकले नाहीत, हे मनोहर आणि नूतन यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वत:च दिव्याच्या आयुष्याचा निर्णय घेतला. ‘आता मात्र अक्षतच त्यांच्या मुलीच्या ओठांवर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता,’ असा विचार करून त्यांनी अक्षतची दिव्याशी भेट घडवून आणली.

थोडासे संकोचत अक्षतने विचारले, ‘‘कशी आहेस दिव्या?’’ तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. ‘‘मला विसरलीस का? अगं, मी अक्षत आहे, अक्षत…

आठवतेय का?’’ तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले. तरीही दिव्या गप्प होती.

अक्षत हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चूकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे? कँटिनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे…? तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. दिव्या मात्र भकास नजरेने पाहात होती.

तिची अशी अवस्था पाहून अक्षतचे डोळे पाणावले. तो म्हणाला, ‘‘दिव्या तू स्वत:ला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वत:ला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दु:ख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना?’’

‘‘तर मग, मी काय करू? काय करू? मी तेच केले ना, जे माझ्या आईवडिलांनी सांगितले, पण मला काय मिळाले?’’ डोळे पुसत दिव्याने विचारले. तिचे बोलणे ऐकून नूतन हुंदके देत रडू लागल्या.

दिव्याचे हात आपल्या हातात घेऊन अक्षत म्हणाला, ‘‘कधीकधी आपल्याकडून चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की, आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वत:चे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हेच सांगत असते की, आपण आपली वाट स्वत: शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे, सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे.

‘‘दिव्या, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे… तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल, याचा विचार केला आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना? त्यांच्यासाठी, स्वत:साठी तुला निराशेच्या गडद होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल दिव्या…’’

अक्षतच्या बोलण्याचा दिव्यावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, ‘‘आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो. असे का होते अक्षत?’’

‘‘कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ… तुझ्या समोर तुझे सुंदर जग आहे,’’ अक्षतच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की, दिव्या अजूनही मी तेथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे जिथे तू मला एकटयाला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे दिव्या. मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळवून टाकेन.

अक्षतच्या छातीवर डोकं ठेवून दिव्या ओक्सबोक्शी रडू लागली, जणू कधीचे साचून राहिलेले दु:ख घळाघळा डोळयांतून ओघळत होते. मनातले दु:ख अश्रूंवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी यासाठी अक्षतनेही तिला मनसोक्त रडू दिले.

बाहेर उभ्या असलेल्या मनोहर आणि नूतन यांच्या डोळयांतूनही न थांबता अश्रू ओघळत होते, पण आज ते आनंदाश्रू होते.

नातं जन्मांतरीचं – पहिला भाग

(पहिला भाग)

दिर्घ कथा * रजनी दुबे

फोनच्या घंटीमुळे डोळे उघडले, तेव्हा लक्षात आलं मी बेडवर आहे…आपल्याच हॉस्पिटलच्या रूममध्ये. मी इथं केव्हा अन् कशी आले ते आठवेना. पुन्हा फोनची घंटी वाजली अन् लख्खकन् वीज चमकावी तसं सगळं आठवलं. मी दुपारी सगळी वर्तमानपत्रं घेऊन बसले होते. त्या सगळ्या वृत्तपत्रातून माझ्या लेकीचे अन् जावयाचे फोटो आले होते. दोन दिवसांपूर्वीच आम्ही तिचा साखरपुडा खूप थाटात केला होता. त्या समारंभाला राज्यपालही आले होते. फोटो त्यांच्या सोबतचा होता. शहरातील नामांकित डॉक्टरांच्या लेकीचा साखरपुडा शरद यांच्याबरोबर झाला. दोघेही आयएएस होण्यासाठी ट्रेनिंग घेत आहेत. अशी फोटो ओळही छापलेली होती.

फोटोत मी व माझे पतीही होतो. मला खूप समाधान आणि अभिमानही वाटत असतानाच फोन वाजला. मी रिसीव्हर उचलला, तेव्हा पलीकडून कर्कश्श आवाजात कुणीतरी ओरडलं. ‘‘माझ्या पोरीला आपली म्हणवून गर्वानं फुगली’ आहेस. ती माझी लेक आहे. ते माझं रक्त आहे. मी सांगतोय येऊन तिला सत्य काय आहे ते…’’

एवढं ऐकलं अन् रिसीव्हर माझ्या हातून गळून पडला अन् मी बेशुद्ध पडले. ती आत्ता शुद्धीवर येते आहे. थोडी मान वळवून बघितलं तर माझा हल्लीच डॉक्टर झालेला मुलगा तिथंच खुर्चीवर बसल्या बसल्या झोपलेला दिसला.

मुलगी…दिसली नाही. बाप रे! ती कुठं असेल? तो दुष्ट माणूस तिला भेटून तर गेला नाही ना? माझी पोर माझ्या काळजाचा तुकडा…माझ्या आयुष्याचा आधार…माझं सर्वस्व आहे माझी मुलगी…पण तो म्हणत होता ती त्याची आहे…तिच्या धमन्यांमधून त्याचं रक्त वाढतंय म्हणाला खरंय का ते?

पाऊस पडायला लागल्याचं आवाजावरून जाणवलं…पावसाच्या आवाजानं मन थेट भूतकाळात जाऊन पोहोचलं.

बाबांशी खूप वाद घालून, भांडूनच मी आमच्या छोट्या गावातून आयएएस होण्याच्या जिद्दीनं दिल्लीला आले होते. कोचिंग छान सुरू होतं. दुपारी दोन तास मधे वेळ असायचा. त्या वेळात मी जवळच्याच एका हॉटेलात लंच आटोपून पुन्हा क्लासला जायचे. त्या दिवशीही मी लंचसाठी निघाले अन् अवचित खूपच जोराचा पाऊस आला. जवळच्याच एका बंगल्याचं फाटक उघडं दिसलं अन् मी पळतच त्या घराच्या व्हरांड्यात जाऊन उभी राहिले. अन् मग मनात आलं की घरातल्या लोकांना माझं इथं असं येऊन उभं राहणं खटकणार तर नाही? पण पाऊस जोरात होता काय करू?

तेवढ्यात हळूहळू घराचा दरवाजा उघडला अन् आठ दहा महिन्यांची एक गोंडस मुलगी रांगत रांगत बाहेर आली. मी चकित होऊन तिच्याकडे बघत होते. ती माझ्याकडे बघून खुदकन् हसली अन् तिनं आपले चिमुकले हात पसरले. न राहवून मी तिला उचलून घेतली. मी दाराकडे बघत होते की तिची आई किंवा कुणीतरी बाहेर आलं तर मी सांगेन की बाळ पावसात जात होतं म्हणून उचलून घेतलं. पण बराच वेळ कुणी बाहेर आलं नाही, तेव्हा मीच आत जाण्याचा निर्णय घेतला. बाळाला कडेवर घेऊन मी दारातून आत आले. समोरच्याच भिंतीवर एका अत्यंत देखण्या तरूणीचा फोटो होता. त्याला हार घातलेला होता. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक वयस्कर स्त्री त्या हॉलमध्ये आली. मी त्यांना नमस्कार करून बाहेर पावसापासून बचाव करण्यासाठी मी उभी असताना हे बाळ रांगत बाहेर आलं अन् पावसात जात होतं म्हणून मी उचलून घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं.

marathi-koutumbik-katha

त्यांनी हसून मला बसायला सांगितलं. मी बाळाला खाली ठेवायला गेले तर ती मुलगी मलाच बिलगली. मला काय करू समजेना.

त्या स्त्रीनं म्हटलं, ‘‘मुली, थोडा वेळ खाली बस. तू उभी आहेस, त्यामुळे तू तिला बाहेर नेशील या लालसेने ती तुझ्याकडून माझ्याकडे येत नाहीए.’’

मी बाळासकट सोफ्यावर बसले. घर खूपच छान होतं. अभिरूची अन् वैभवाच्या खुणा सर्वत्र दिसत होत्या. जवळच टेबलावर जेवायचं ताट वाढलेलं होतं अन् त्यातलं अन्न गार झालं होतं. बाळामुळे म्हणजे प्रियामुळे त्या मावशींना जेवायला मिळालं नसावं असा मी अंदाज बांधला.

मी त्यांना म्हटलं, ‘‘मी सांभाळते हिला. तुम्ही शांतपणे जेवण घ्या.’’

त्या हसून म्हणाल्या, ‘‘हे तर रोजचंच आहे. हिला सांभाळणारी आया सध्या रजेवर आहे. हिच्या खोड्या आवरता आवरता माझं जेवण गार होतं.’’

माझ्या लक्षात आलं ही स्त्री म्हणजे बाळाची आजी आहे अन् त्या फोटोतली स्त्री म्हणजे बाळाची आई आहे. आता ही स्त्री म्हणजे त्या फोटोतल्या सुंदर तरूणीची आई किंवा सासू असणार.

माझ्या मांडीवर असलेली प्रिया माझ्या थोपटण्यामुळे झोपी गेली होती. ‘‘तिला इथं पाळण्यात झोपव,’’ मावशी म्हणाल्या.

मी हळूवारपणे बाळाला पाळण्यात झोपवलं अन् जाण्याची परवानगी मागितली.

‘‘तूच आता बोलली होतीस की लंचसाठी निघालीस अन् पाऊस आला याचा अर्थ तुझंही जेवण झालेलं नाहीए. ये आपण दोघी एकत्र जेऊयात.’’ मावशी बोलल्या.

मी प्रथम नकार दिला, पण त्यांच्या प्रेमळ आग्रहाला नकार देणं बरं वाटेना, शिवाय भूकही खूप लागली होती. त्यांनी अन्न गरम करून दोन ताटं वाढून आणली अन् मी पोटभर जेवले. जेवण स्वादिष्ट होतं. बरेच दिवसांनी घरचं जेवण मिळालं होतं. त्यामुळे पोट तुडुंब भरेपर्यंत जेवले. जेवणाचं कौतुकही केलं.

हसून मावशी म्हणाल्या, ‘‘आता रोजच तू लंचला इथं येत जा. तू भेटलीस की प्रियालाही आनंद होईल.’’

मी त्यांना विचारलं की हिची बाई किती दिवस रजेवर आहे? तर त्या म्हणाल्या, ‘‘बाईची सासू वारल्यामुळे ती गावी गेलीय. आता पंधरा दिवस तरी लागतीलच. दुसरी बाई शोधतोय, पण स्वच्छ अन् प्रेमळ शिवाय प्रामाणिक बाई मिळत नाही. स्वंयपाकाला आचारी आहे…पण बाळाला सांभाळायला कुणी स्त्रीच हवीये.’’

मला काय सुचलं कोण जाणे. मी अभावितपणे बोलून गेले, ‘‘मावशी, काळजी करू नका. मी तुमचे हे अडचणीचे दिवस निभावून नेते. मलाही हा वेळ मोकळा असतो. त्या कठीण अभ्यासक्रमाच्या ताणातून थोडा विरंगुळा म्हणून मी दोन तास तुमच्याकडे येऊन प्रियाला सांभाळेन, खेळेन तिच्यासोबत. तेवढ्यात तुमचं जेवण निवांत ओटापून घेत जा.’’

मावशींनी एका अटीवर माझं म्हणणं मान्य केले…रोजचा लंच मी त्यांच्याबरोबर घ्यायचा.

मी गमतीनं म्हटलं, ‘‘मावशी, इतका विश्वास कुणावरही टाकणं बरोबर नाही.’’

‘‘पोरी, जग बघितलं…इतकं वय झालंय. माणूस ओळखता येतो मला.’’ मावशींनी म्हटलं.

मग तर हा रोजचा नियमच झाला. लंच टाइममध्ये मावशींकडे जायचं. प्रियाशी खेळायचं, मावशींशी गप्पा मारत जेवायचं.

मावशी थोडंफार घरच्यांबद्दल सांगायच्या. त्यांचा मुलगा डॉक्टर आहे…लग्नाच्या वयाचा आहे, पण लग्नच करायला तयार नाही…घरात सून येणं गरजेचं आहे. माझी तब्येतही बरी नसते. प्रियाची काळजी वाटते वगैरे वगैरे…मलाही वाटायचं, इतकी देखणी होती यांची सून, मुलगा तिच्या प्रेमातून बाहेर पडणार कसा?

एक दिवस दुपारची घरी पोहोचतेय तोवर बाहेरूनच प्रियाच्या जोरजोरानं रडण्याचा आवाज ऐकला. धावतच आत गेले. किचनच्या दाराशी मावशी बेशुद्ध पडल्या होत्या. पाळण्यात प्रिया रडत होती. आधी तिला पाळण्यातून खाली घेतली. मावशींना चेहऱ्यावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होते. पटकन् सुचलं, मैत्रिण निशाला फोन करून डॉक्टराला पाठवून दे म्हटलं. तिला पत्ताही सांगितला. तिही ताबडतोब धावत आली. पाठोपाठ डॉक्टरही आले. मी व निशानं मावशीला बेडवर झोपवलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की बी.पी. एकदम कमी झाल्यामुळे चक्कर आली. आवश्यक उपचार करून डॉक्टर गेले. निशाही तिचा क्लास होता म्हणून निघून गेली. मी टेलिफोनजवळ एका कार्डावर मोठ्या अक्षरात लिहिलेले नंबर बघितले. गरजेच्यावेळी लागणारे ते टेलिफोन नंबर्स होते. त्यात डॉ. प्रियांशूंचा फोन नंबर सगळ्यात वर होता. आता मी त्यांना फोन केला. तो आईच्या तब्येतीबद्दल ऐकून एकदम हवालदिल झाला. ‘ताबडतोब येतो’ म्हणाला. मावशी आता शुद्धीवर आल्या होत्या. पण अजून पडूनच होत्या. त्यांचा गोरापान चेहरा मलूष्ठ दिसत होता. चेहऱ्यावर अन् सर्वांगावर थकवा जाणवत होता. या वयात लहान बाळाची जबाबदारी खरोखर फार अवघड असते.

माझी आईही माझ्या लहानपणीच वारली होती. बाबांनी दुसरं लग्न केलं नव्हतं. पण माझ्या काकीनं माझी जबाबदारी घेतली अन् खूप प्रेमानं मला वाढवलं…कदाचित त्यामुळेच मला प्रियाविषयी विशेष लळा होता…इथं मावशींची गोष्ट वेगळी होती. त्यांची तब्येत अन् वय बघता त्यांच्या मुलानं लग्न करणं गरजेचं होतं. मी विचारातच होते, तेवढ्यात, दारातून एका देखण्या तरूणानं घाईघाईनं प्रवेश केला. धावतच तो बेडपाशी पोहोचला. ‘‘आई काय झालं तुला? आता कशी आहेस? मला लगेच बोलावलं का नाही? फोन केला असता…’’

मला त्याच्या त्या बोलण्याचा रागच आला. मला तो फार मानभानी वाटला. मी जरा तडकूनच बोलले, ‘‘आता मारे इतकी काळजी दाखवताय…त्या लहान अजाण पोरीची काळजी घ्यायची जबाबदारी आईवर टाकताना काही नाही वाटलं? का नाही दुसरं लग्न करून घेत? तुम्हाला काय वाटतं सगळ्याच सावत्र आया वाईट असतात? मिस्टर, जगात चांगली माणसंही आहेत…मला तर वाटतं तुम्ही स्वत:ला देवदास समजताय अन् आपल्या देवदासी दु:खात तुम्हाला आईचं दु:ख लक्षात येत नाहीए.’’

डॉक्टर प्रियांशुचा आश्चर्यानं वासलेला ‘‘आ’’ बंद होईना. कॉलेजात मी उत्तम डिबेटर, उत्तम वक्ता म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी ज्या आक्रमकपणे मी बोलायची तसंच आत्ताही बोलून गेले. ‘‘बोला ना? का नाही म्हणताय दुसऱ्या लग्नाला?’’

एकाएकी माझ्या लक्षात आलं की डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा विस्मय नाहीसा होऊन तिथं आता मिश्किल, खट्याळ हसू उमटलं होतं. तेच मिश्किल हास्य ओठांवर असताना ते म्हणाले, ‘‘अगं बाई, दुसरं लग्न कधी करणार? अजून तर माझं पहिलंच लग्न झालं नाहीए…’’

‘‘म्हणजे?’’ मी आश्चर्यानं मावशींकडे बघितलं. आता ‘आ’ वासायची माझी पाळी होती.

एव्हाना मावशी हळूहळू उठून बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरही तसंच मिश्किल हास्य होतं. त्यांनी सावकाश बोलत मला समजावलं की प्रियांशु त्यांचा मुलगा आहे. प्रिया त्यांच्या मुलीची प्रियंवदाची मुलगी आहे, जिचा फोटो हॉलमध्ये लावलेला आहे. आता माझी चांगलीच गोची झाली होती. मी ओशाळून त्यांना ‘येते’ म्हटलं अन् निघायची तयारी केली.

इतक्या सगळ्या गोंधळात मावशीचं अन् माझं सकाळचं जेवण झालंच नव्हतं. एव्हाना संध्याकाळ ओसरून रात्र व्हायला आली होती. ‘‘तू आता जेव. आपण सगळेच जेवू. मग प्रियांशू तुला होस्टेलवर सोडून येईल.’’ मावशीनं म्हटलं.

डॉक्टरांनीही आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आचारी स्वयंपाकाला लागला. त्यानं झटपट जेवण बनवलं. तेवढ्या वेळात डॉक्टर कपडे बदलून आले.

जेवताना मी गप्प होते. प्रियांशूने म्हटलं,‘‘तुमचं कौतुक वाटतं मला. कारण तुम्ही हे अगदी बरोबर ओळखलं आहे की मला प्रियाची फार काळजी वाटते. कोणतीही मुलगी लग्न होऊन घरी येताच बाळाची जबाबदारी घ्यायला तयार होणार नाही. त्यातून म्हातारी सासू सांभाळायची…खरं ना?’’

आता मीही जरा सावरले होते. मी बोलून गेले, ‘‘असं काही नाहीए. इतका देखणा डॉक्टर, सधन घरातला मुलगा, प्रेमळ सासू हे बघून तर कुणीही मुलगी लग्न करेल तुमच्याशी.’’

माझ्या लक्षात आलं की मावशी अन् प्रियांशु पुन्हा तसंच मिश्किल हसताहेत. मला स्वत:च्या बोलण्याचा त्याक्षणी राग आला अन् लाजही वाटली. मी जेवण संपवून पटकन् हात धुतले.

तेवढ्यात प्रियांशुही हात धुवायला उठला अन् त्यानं विचारलं, ‘‘तुम्ही तयार आहात माझ्याशी लग्न करायला? कराल का माझ्याशी लग्न?’’

बाप रे! मला तर घामच फुटला.

मावशींनी सांभाळून घेत म्हटलं, ‘‘अरे, तिला लवकर सोडून ये. उशीर झाला तर बोलणी खावी लागतील.’’

प्रियांशुनं गाडी काढली. मावशींचा निरोप घेऊन मी गाडीत जाऊन बसले. होस्टेलच्या आधी एका आइस्क्रीम पार्लरसमोर त्यांनी गाडी थांबवली.

माझ्या बाजूचा दरवाजा उघडत ते म्हणाले, ‘‘अजून हॉस्टेलचं गेट बंद व्हायला अवकाश आहे. या ना, आइस्क्रीम खाऊयात. मी तर कित्येक दिवसात खाल्लं नाहीए आइस्क्रीम.’’

मी मुकाट्यानं उतरले. आम्ही आत जाऊन बसलो. त्यांनी माझी आवड विचारली.

मी चॉकलेट फ्लेवर सांगताच ते दोन आइस्क्रीम घेऊन आले. माझी नजर खाली होती, पण ते सतत माझ्याकडे निरखून बघत आहेत हे मला जाणवत होतं.

आइस्क्रीम संपल्यावर ते दिलगिरीच्या सुरात म्हणाले, ‘‘माझ्या बोलण्यानं तुम्ही दुखावला गेला असाल तर मी क्षमा मागतो. पण आईकडून जे काही तुमच्याबद्दल ऐकलं होतं अन् आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्ही इतर सामान्य मुलींपेक्षा वेगळ्या आहात. खरंतर मी अशा वेगळ्या मुलीच्या शोधात होतो. त्यामुळेच मी पुन्हा तुम्हाला लग्नाची मागणी घालतो आहे. मला ठाऊक आहे की तुमची स्वप्नं वेगळी आहेत. तुम्हाला कलेक्टर वगैरे व्हायचंय. पण लग्नानंतरही ते करता येईल. माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा असेल. प्रियावर जे निरपेक्ष प्रेम तुम्ही करता, तसं दुसरी कुणी मुलगी करू शकणार नाही…मला उत्तराची घाई नाहीए. तुम्ही विचार करा. भरपूर वेळ घ्या. तुमचा नकारही मी खिलाडूपणे स्वीकारेन. फक्त एकच अट. आई व प्रियाला मात्र नेहमीप्रमाणेच भेटत राहा.’’

काय उत्तर द्यावं मला समजत नव्हतं. त्यांनी मला होस्टेलच्या गेटपाशी उतरवलं अन् ते ‘गुडनाइट’ म्हणून निघून गेले.

आपल्या रूमवर गेल्यावर मी स्वत:ला पलंगावर झोकून दिलं. आत्तापर्यंत कुणा मुलानं अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलण्यासाठी मैत्री वाढवली तर मी त्याला असा काही झापायची की बिचारा पुन्हा बोलायचं धाडस करायचा नाही. पण आज प्रियांशुनं सरळ मला लग्नाची मागणी घातली अन् मी मुकाट ऐकून घेतलं. खरं तर मला राग यायला हवा होता अन् मला चक्क लाज वाटतेय? काहीतरी वेगळं छान छान वाटतंय. कितीतरी वेळ मी विचार करत होते. काहीच निर्णय घेता येईना, तेव्हा मी बाबांना फोन लावला. बाबांचा आवाज ऐकताच मला एकदम रडू फुटलं. ‘‘बाबा, तुम्ही ताबडतोब इथं या. मला तुमची फार गरज आहे.’’ बाबांनी नेमकं काय झालंय विचारलं तरीही मी काहीच बोलले नाही.

दुसऱ्यादिवशी बाबा आले. मी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. बाबांनी सगळी हकिगत शांतपणे ऐकून घेतली, मग मलाच विचारलं, ‘‘तुझी काय इच्छा आहे? मी त्या कुटुंबाला ओळखतो. प्रियांशु माझ्या मित्राचा, डॉक्टर नीरजचा मुलगा आहे.’’ बाबा स्वत:ही डॉक्टर होते.

मी म्हटलं, ‘‘मला समजतच नाहीए…म्हणून तर तुम्हाला बोलावून घेतलंय.’’

‘‘हे बघ, बेबी, एक बाप म्हणून विचारशील तर मुलगा आणि घराणं, दोन्ही उत्तम आहे. खरं सांगायचं तर इतकं चांगलं स्थळ मी ही तुझ्यासाठी शोधू शकलो नसतो. पण एक मित्र म्हणून विचारशील तर तुझी स्वप्नं यूपीएससी करून कलेक्टर व्हायचं आहे. अशावेळी लग्नाचा विचार दूरच ठेवावा लागतो. पण प्रियांशुनं तुला  लग्नानंतरही शिक्षण चालू ठेव, तो तुला सपोर्ट करेल असंही म्हटलंय, तर तू त्याला होकार द्यायला हरकत नाही.’’

मी बाबांना घेऊन प्रियांशुच्या घरी गेले. बाबांना भेटून मावशींना खूपच आनंद झाला अन् त्यानंतर दहा दिवसात मी डॉक्टर प्रियांशुशी लग्न करून, त्यांची बायको म्हणून त्या घरात आले. मावशींना मी आता आई अन् मम्मी म्हणत होते. सगळा वेळ माझ्यासोबत राहायला मिळत असल्यानं प्रियाही खुश होती.

खूपच दिवस गेले. खरं तर खूपच भराभर गेले. मी माझ्या संसारात खूपच रमले होते. आई अन् प्रियांशु मला अभ्यासाला बस म्हणून दटावत असले तरी मी अभ्यास करणं टाळतच होते. घर नित्य नव्या पद्धतीनं सजवणं, प्रियाला सांभाळणं आणि तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करून प्रियांशु व आईंना खायला घालणं यातच माझा वेळ जात होता. बाबांचे एक मित्र दिल्लीत वकिली करत होते. माझं कोचिंग सुरू असताना मी दर आठवड्याला त्यांच्याकडे जात होते. ते लग्नाला आले, तेव्हाही त्यांनी मला त्यांच्याकडे येत राहाण्याबद्दल सांगितलं होतं. पण मी त्यांच्याकडेही जात नव्हते. आपल्या या नव्या जगात मी खूपच आनंदात होते अन् तेवढ्यात माझ्या सुखाला दृष्ट लागली.

आमच्या बंगल्यातली प्रियंवदाची खोली तिच्या लग्नापूर्वी जशी होती, तशीच आईंनी ठेवली होती. मी विचार केला, एकदा  ही खोलीही छान स्वच्छ करून तिची पुन्हा नव्यानं मांडणी करूयात. खोली आवरताना  मला प्रियंवदाच्या काही डायऱ्या सापडल्या. मला एव्हाना इतकं समजलं होतं की प्रियंवदानं घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. प्रियांशु त्यावेळी एमएस करायला अमेरिकेला गेले होते. वडिलांनी परवानगी दिली नाही तेव्हा प्रियंवदा घरातून निघून गेली. तिनं लग्न केलं अन् मुलगी झाली तेव्हा मुलीला जन्म देतानाच तिचा मृत्यू झाला होता. तेव्हाच प्रियाशुनं प्रियाला आपल्याकडे आणलं होतं. मुलीचं पळून जाऊन लग्न करणं अन् त्यानंतर तिचा अकाली मृत्यू यामुळे बाबा इतके खचले की तेही पॅसिव्ह हार्ट अटॅकनं गेले. या पुढची माहिती मला प्रियंवदाच्या डायऱ्यांवरून मिळाली. एक डायरी प्रियाच्या जन्माची चाहूल लागल्यानंतची होती. प्रत्येक दिवसाची हकिगत त्या डायरीत नोंदलेली होती. शेखर म्हणजे प्रियंवदाचा नवरा. तिच्यावर जिवापाड प्रेम करत होता. त्याला मुलगीच हवी होती. त्यानं तिच्यासाठी शिखा नावही ठरवलं होतं. प्रियंवदाला मुलगा हवा होता. तिनं   त्याच्यासाठी प्रियंक हे नाव ठरवलं होतं. त्याची ती प्रेमळ, खोटी खोटी भांडणं वाचून तर माझे डोळेच भरून आले. त्याचक्षणी माझ्या मनात आलं की बिचारा शेखर! त्याला त्याच्या मुलीची म्हणजे प्रियाची नक्कीच खूप खूप आठवण येत असणार. पण प्रियांशु किंवा आई, कधीच?शेखरचं नावही घेत नाहीत…का बरं? पण आपल्या लेकीला भेटण्याचा हक्क तर बाप या नात्यानं शेखरला आहेच. मी कायद्याचा अभ्यास करत होते, त्यामुळे हक्क वगैरे मला जास्तच कळत होते.

मी गुपचुप एक पत्र शेखरला टाकलं की तुम्हाला प्रियाला भेटायची इच्छा होत असेल तर तुम्ही केव्हाही येऊ शकता. शेवटी ती तुमची मुलगी आहे. आता मी शेखरची वाट बघत होते की ते जेव्हा येतील तेव्हा आई व प्रियांशुला कसा आश्चर्याचा धक्का बसेल अन् प्रियाला बघून शेखरला किती आनंद होईल.                                                       क्रमश:

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें