पाठराखीण

कथा * सुधा काळेले

मुलगा अन् त्याच्या घरचे लोक पारुलताईंना बघायला येऊन गेले. त्यांच्या एकूण आविर्भावावरून ताई त्यांना पसंत नसाव्यात असं जाणवलं होतं. खरं तर ताईंना नाकारावं असं त्यांच्यात काहीच नव्हतं. उंच सडसडीत बांधा, उत्तम शिक्षण, चांगली नोकरी, आकर्षक नाक डोळे, फक्त रंग सावळा होता. ताई, स्वभावानेही नम्र, आनंदी अन् कुणाच्याही मदतीला धावून जाणाऱ्या होत्या. पण लग्न मात्र ठरत नव्हतं. ‘‘ठीक आहे. योग आला की पटकन् ठरेलच लग्न.’’ असं म्हणून जवळचे नातलग आईबाबांना धीर द्यायचे. पण ताई मात्र मिटून जायच्या. मनातल्या मनात खंतावत राहायच्या. त्यांचं वयही वाढत होतं.

या मे महिन्यात पारुल तीस वर्षांची होईल. वय वाढतं तसं स्थळ मिळणं अधिकच अवघड होईल. हाच एक विचार सतत आईबाबांची झोप उडवत होता.

आमची कुचंबणा बघून काही दुष्ट, विघ्नसंतोषी नातलगांनी, परिचितांनी जी काही स्थळं सुचवली ते बघून त्यांच्या वृत्तीची अन् बुद्धीची कीव करावीशी वाटली. कुणी तरी फीट्स येणाऱ्या मुलाचं तर कुणी तरी पैसे खाण्याच्या आरोपावरून बडतर्फ केलेल्या मुलाचंही स्थळ सुचवलं होतं. सावळा रंग आहे म्हणून काय वाट्टेल त्याला आम्ही आमच्या पारुलताई थोडीच देणार होतो?

माझे पती रवी पारुलताईंहून दोनच वर्षं लहान. ताईंचं लग्न लवकर ठरेना म्हणताना मग सासूसाऱ्यांनी म्हणजे आईबाबांनी रवीच्या लग्नाचा निर्णय घेतला. आमचा प्रेमविवाह होता. लग्न लवकर व्हावं ही माझ्या आईबाबांची घाई होती. ठरवून तरी किती दिवस ठेवायचं ना? शेवटी आमचं लग्न झालं.

रवी अन् पारुलताईंचं एकमेकांवर खूप माया होती. रवीने मला आधीच बजावलं होतं की पारुलताईला या घरात ती बिनलग्नाची मुलगी म्हणून ओझं वाटतेय असं कधी जाणवून द्यायचं नाही. कोणताही निर्णय प्रथम तिचं मत विचारायचं. मोठी बहीण, थोरली नणंद म्हणून तिचा योग्य तो मान राखला गेलाच पाहिजे. पारुलताई मला पहिल्या भेटीतच आवडल्या. मी माझ्या घरात आईवडिलांची एकटीच मुलगी होते. त्यामुळेच मला तर पारुलताईंच्या रूपात मोठी बहीणच मिळाली जणू. तीही माझ्यावर खूप माया करायची. माझं कोडकौतुक पुरवायची.

एकदा ऑफिसच्या टूरवर रवी गेले होते. रात्र बरीच झाली तरी पारुलताई आल्या नव्हत्या. मी आईबाबांना वेळेवर जेवायला घालून झोपायला पाठवलं होतं. मी मात्र अजून जागीच होते. मला काळजीही वाटत होती. तेवढ्यात कार फाटकाशी थांबल्याचा आवाज आला. मी खिडकीतून बघितलं, ताईच एका कारमधून उतरत होत्या. ड्रायव्हरसीटवर कुणी पुरुष होता. मला थोडं नवल वाटलं. एरवी ताईंना ऑफिसची कॅब सोडते घरी. आज कार कशी?

मला जागत असलेली बघून तिने विचारलं, ‘‘तू अजून जागीच आहेस?’’

‘‘तुमचीच वाट बघत होते. तुम्ही घरी परत येत नाही तोवर मला झोप येत नाही.’’

मी उत्तरले अन् शोधक नजरेने त्यांच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं, ‘‘जेवण गरम करू? जेवायचंय ना?’’

‘‘नको, आज ऑफिसात जेवण झालंय.’’ त्या म्हणाल्या. ‘‘दमलेय मी, झोपते आता. तूही झोप.’’

‘‘ताई गुड नाईट,’’ मी म्हटलं अन् माझ्या खोलीत आले.

पण झोप लागेना. काही तरी गडबड आहे. गेले काही दिवस ताई बैचेन वाटत होत्या. काही तरी मानसिक ताण किंवा दडपण आल्यासारखं जाणवत होतं. एरवी ऑफिसच्या अनेक गोष्टी त्या रवीसोबत, माझ्यासोबत शेअर करायच्या. पण असं ऑफिसातून इतक्या उशिरा येणं, कुणा पुरुषाबरोबर कारमधून येणं मला जरा खटकलं. त्यांना त्याच्याबरोबर लग्न करायचं असेल तर सगळं घर आनंदाने होकार देईल. त्यांच्या आनंदासाठी, त्यांनी निवडलेल्या, त्यांना आवडलेल्या कोणत्याही पुरुषाला आम्ही आपला म्हणू. पण त्या तसं काही सांगत नाहीएत. नाही का सांगेनात, मी शोधून काढल्याशिवाय राहाणार नाही. एकदा हे ठरवलं अन् मग मात्र मी गाढ झोपले.

सकाळी सहाला जाग आली तेव्हा पारुलताई ऑफिसला जायला आवरून तयार होत्या. मी आश्चर्याने विचारलं, ‘‘आज काय आहे, ताई? इतक्या लवकर?’’

‘‘अगं, एक मीटिंग आहे…महत्त्वाची आहे. आमचा ब्रेकफास्टही ऑफिसमध्येच होईल…चल मी निघते, मला उशीर होतोए..बाय…’’

मी काही म्हणणार त्याआधीच झपाट्याने ताई निघून गेल्या. मी त्यांच्या मागे जातोए तोवर त्या, त्या कालच्याच गाडीने फुर्रकन गेल्यासुद्धा!

मला आजही त्या ड्रायव्हरचा चेहरा दिसला नाही. मला शंका आली, ताई कुणा लफंग्याच्या जाळ्यात अडकल्या आहेत. शिवाय तो पुरुष विवाहितही असावा. मला शोध घ्यायलाच हवा. पण ताईंच्या अन् घरच्यांच्याही नकळत. ताईंचा अपमान व्हायला नको.

रात्री पुन्हा तीच गाडी ताईंना सोडायला आली. यावेळी मात्र मला ड्रायव्हरचा चेहरा थोडासा दिसला. कारण मी अगदी टपून अन् लपून बसले होते. आईबाबा आज हॉलमध्येच बसलेले होते. त्यांनी जेव्हा उशिरा येण्याचं कारण विचारलं तेव्हा थकलेल्या आवाजात त्या म्हणाल्या, ‘‘मीटिंग होती ऑफिसात, सकाळपासूनच कामं होती. दमलेय मी. झोपते आता.’’ ताई खोलीत निघून गेल्या.

‘‘काय झालंय या पोरीला कुणास ठाऊक? उशिरा येते, जेवत नाही, सोड म्हणावं ही अशी नोकरी. आम्हाला नकोय तिचा पैसा. धड झोप नाही, धड जेवण नाही, कशाला हवी असली नोकरी?’’ आई चिडून बडबड करायला लागल्या. मी त्यांना गोड बोलून शांत केलं. ‘‘मी ताईंना जेवायला लावते,’’ असं सांगून झोपायला पाठवलं.

मी जेवणाचं ताट घेऊन ताईंच्या खोलीत गेले. त्या फोनवर कुणाशी तरी बोलत होत्या. थोड्या त्रासलेल्या अन् चिडचिडलेल्या आवाजात बोलत होत्या. मला बघताच त्यांनी पटकन् फोन बंद केला. मी आग्रह केल्यावर हात धुऊन त्या जेवायला लागल्या. पण त्यांच्या आवडीचा स्वयंपाक असूनही त्या जेमतेम खात होत्या. धड माझ्याकडे बघितलंही नाही. मी त्यावेळी काहीच बोलले नाही. त्यांनी हात धुताच मी ताट उचलून खोलीबाहेर पडले.

दोन दिवसांनी रवी परत येणार होते. मी आईंना म्हटलं, ‘‘जरा एका मैत्रिणीला भेटून येते.’’ अन् मी घराबाहेर पडले. मी सरळ ताईंच्या ऑफिसात जाऊन थडकले. त्या जरा घाबरल्याच, घरी काही विपरीत घडलंय का? मला ऑफिसमध्ये का यावं लागलं?

मी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होते. हसून म्हटलं, ‘‘विशेष काहीच नाही. या भागात एका मैत्रिणीकडे आले होते, म्हटलं डोकावून जावं तुमच्याकडे. हल्ली तर तुम्ही ऑफिसच्या मीटिंग्जमुळे आमच्या वाट्यालाच येत नाही म्हटलं, इथेच तुमच्याशी थोडं भेटून बोलून घरी जावं.’’

‘‘इथे?’’ त्या घाबरून बोलल्या.

‘‘नाही तर असं करा ना, आज ऑफिसमधून रजाच घ्या ना,?थोडं भटकून घरीच जाऊ.’’

‘‘नाही ग! बॉस रजा देणार नाहीत. कामं फार आहेत.’’

‘‘विचारून तर बघा, कदाचित हो म्हणतीलही.’’

‘‘बघते विचारून…’’ नाइलाजाने त्या उठून बॉसच्या केबिनकडे गेल्या.

ताई केबिनमधून बाहेर आल्या तेव्हा तो बॉसदेखील त्यांच्यासोबत बाहेर आला. ‘‘अरेच्चा? हा तर तोच माणूस आहे जो ताईंना सोडायला अन् घ्यायला येतो.’’

माझ्या मेंदूने नोंद घेतली. ताईंना सुट्टी मिळाली होती. पण बॉसने त्यांना बाहेरपर्यंत सोडायला येणं मला काही रूचलं नाही. मी मुद्दाम बॉस समोर म्हटलं, ‘‘ऐट आहे ताई तुमची…दस्तुरखुद्द बॉस तुम्हाला सोडायला येतात… ऑफिसच्या इतर मुली जळत असतील तुमच्यावर…खरं ना?’’

ताई काही बोलल्या नाहीत. फक्त उदास हसल्या. आम्ही थोडं भटकलो. काही बारीकसारीक खरेदी करून घरी पोहोचलो. ताई लवकर आल्याने आईबाबांनाही खूप आनंद झाला.

रात्रीची जेवणं झाली. सगळे आपापल्या खोल्यांमधून झोपायला गेले. मी हॉलमध्येच एक नवी आणलेली कादंबरी वाचत बसले होते. मला ताईच्या खोलीतून काही आवाज ऐकू आला. मी धावत तिकडे गेले. खोलीचं दार आतून बंद नव्हतं. मी बघितलं, ताई खोलीतल्या बाथरूमच्या वॉशबेसिनवर ओणवलेल्या होत्या. त्यांना ओकारी झाली होती. मी पटकन् पाण्याचा ग्लास त्यांच्यापुढे धरला. चुळा भरून त्या पलंगावर येऊन बसल्या. मी वॉशबेसिनचा नळ सोडून वॉशबेसिन स्वच्छ केलं अन् त्यांच्याजवळ येऊन बसले.

‘‘काय झालं, ताई? अजीर्ण होण्यासारखं तर आपल्या घरात जेवण नसतं. तुम्हाला त्रास का झाला? अन् बोलता बोलता मला एकदम शंका आली.

‘‘ताई, तुमचा बॉस. खरं सांगा ताई, तुमची चिडचिड, तुमची काळजी, ताण त्या बॉसचंच हे काम आहे ना? मला खरं खरं सांगा. मी यातून मार्ग काढेन. कुणाला काहीही कळू देणार नाही, फक्त मला विश्वासात घेऊन खरं खरं सांगा.’’

माझा आधार देणारा प्रेमळ स्पर्श अन् माझं आश्वासन यामुळे त्या एकदम मला मिठी मारून हमसून हमसून रडू लागल्या. मी आधी तर त्यांना मनमोकळं होईतो रडू दिलं. ताईंना दिवस गेले होते…पण निदान अॅबॉर्शन करता येईल इतपत तरी परिस्थिती असायला हवी. मला माझी डॉक्टर मैत्रीण आठवली. तिची मदत घेता येईल.

ताई थोड्या सावरल्या. त्यांनी हळूहळू सांगायला सुरूवात केली. ‘‘हे बॉस नव्यानेच ट्रान्सफर होऊन आमच्या ऑफिसला आले. आल्या आल्याच त्यांनी माझ्यात इण्टरेस्ट घ्यायला सुरुवात केली. बोलताना म्हणाले, दोनतीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला आहे. मूलबाळ नाही. घरातला एकांत, एकटेपणा खायला उठतो. मी त्यांच्या आयुष्यात सहचरीची भूमिका घेऊ शकेन का? माझ्या मनात आलं, आपणही तिशीच्या आहोत, लग्न करून घरसंसार थाटायचं आपल्याही मनात आहे, तेव्हा हा शिकलेला, कमावता, चांगला माणूस आहे, त्याला हो म्हणायला काय हरकत आहे? मी त्यांना होकार दिला व घरी येऊन त्यांनी माझ्या आईबाबांना भेटावं असंही सांगितलं. ते म्हणाले, ठीक आहे. मी लवकरच येऊन भेटतो. मला खूप आनंद झाला. दाखवण्याच्या वगैरे भानगडीशिवाय लग्न ठरत होतं. आईबाबा तुम्ही दोघं सगळ्यांनाच किती आनंद होईल. या स्वप्नांत मी दंग होते. त्यांनी एक दिवस मला म्हटलं, ‘‘तूही आधी माझं घर बघून घे. चहाला ये.’’ मी अगदी नि:शंकपणे त्यांच्या घरी गेले. तिथे त्यांचा सभ्यपणाचा मुखवटा गळून पडला. त्यांनी माझ्यावर चक्क बलात्कार केला. मी घाबरून बेशुद्धच पडले. शुद्धीवर आल्यावर काय घडलंय ते मला कळलं. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मी या गोष्टीची वाच्यता कुठेही करू नये. कारण त्यांच्या कॅमेऱ्यात माझे अश्लील फोटो आहेत. कुठल्याही क्षणी ते त्यांचा वापर करून मला आयुष्यातून उठवू शकतात. मी मुकाट्याने घरी आले. त्यानंतर मला कळलं की त्यांचं लग्न झालेलं आहे. पत्नी हयात आहे व दोन मुलंही आहेत. पण त्या फोटोंच्या धमकीवर ते अजूनही मला ब्लॅकमेल करताहेत. मी काय करू? कशी मी फसले. त्यांच्या बोलण्यावर भाळले अन् एकटीच त्यांच्या घरी गेले. आता मी काय करू? आईबाबांना काय वाटेल?’’ ताई पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागल्या.

मी त्यांना मिठीत घेतलं. धीर देत म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही शांत व्हा. अजिबात काळजी करू नका. प्रथम आपण माझ्या डॉक्टर मैत्रिणीकडे जाऊ. ती तुम्हाला या संकटातून मोकळं करेल. त्यानंतर तुमच्या बॉसला मी बघते. तुमची खरं तर काहीच चूक नाहीए. तुम्ही सज्जन, भीरू आहात म्हणूनच त्याने तुमचा गैरफायदा घेतला. पण मी त्याचे दात त्याच्याच घशात घातल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. ही गोष्ट फक्त तुमच्या माझ्यातच असेल. रवी, आई किंवा बाबा कुणालाही काहीही कळू द्यायचं नाही. आता तुम्ही शांतचित्ताने झोपा.’’

दिवा मालवून, त्यांना निजवून मीही झोपले. अगदी गाढ झोपले. सुदैवाने रवी टूरवरून परतले नव्हते. अन् आईबाबांची खोली अगदी शेवटी असल्याने त्यांना काहीच कळलं नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मी अन् ताई एकत्रच घराबाहेर पडलो. मैत्रिणीकडे गेलो. तिने तपासलं अन् म्हणाली, ‘‘फारच वेळेत आलात, अजून आठ दिवस गेले असते तर कठीण झालं असतं,’’ मी आनंदाने मैत्रिणीला मिठीच मारली.

ती म्हणाली, ‘‘अगं अशा अनेक मुली येतात माझ्याकडे, फसवल्या गेलेल्या, बलात्कार झालेल्या, मी त्यांना मोकळं करते. त्यांना समजावते, धीर देते. यामुळे जपून अन् सावधपणे राहायचं आणि पूर्ण आत्मविश्वासानेच वावरायचं. स्वत:ला अपराधी समजू नका. लोकांना घाबरू नका, समाजापासून तोंड लपवू नका अन् त्या अपराध्याला शासन करता आल्यास तसंही करा. नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी.’’

ताईंचं अॅबॉर्शन अगदी व्यवस्थित झालं. आम्ही दोघी रिक्षाने घरी आलो अन् मी आईंना सांगितलं, ताईंना ऑफिसातच घेरी आली. त्यांनी मला मैत्रिणीकडून बोलावून घेतलं. मी सरळ त्यांच्या ऑफिसमधून त्यांना घेऊन माझ्या डॉक्टर मैत्रिणीकडे गेले. तिने तपासून सांगितलं, अॅनिमिया आहे. औषधं, फळं अन् विश्रांती घेऊन बरं वाटेल. काळजीचं कारण नाहीए.

आई म्हणाल्या, ‘‘मी तर सतत सांगते, नीट जेवत जा, झोपता जा, सारखं आपलं काम, काम! बरं झालं आता आठ दिवस विश्रांती घ्यावी लागतेय, तेवढा तरी जिवाला आराम.’’

आठ दिवसांतच ताई खडखडीत बऱ्या झाल्या. मला मिठी मारून म्हणाल्या, ‘‘मोठ्या संकटातून तू मला सोडवलंस…कसे तुझे उपकार फेडू?’’

मी हसून म्हटलं, ‘‘उपकाराचा प्रश्नच नाही येत. अजून तर बघा, काय काय घडणार आहे…’’

मग आम्ही बॉसच्या बायकोला जाऊन भेटलो. त्यांना बॉस ताईला त्रास देतात, ब्लॅकमेल करायला बघतात वगैरे सांगितलं. अॅबॉर्शनचा विषय आम्ही पूर्णपणे टाळला. पण त्याने बायको हयात नाही, मूळबाळ नाही वगैरे सांगून लग्नाची मागणी घातल्याचंही सांगितलं. ती बिचारी अवाक् झाली. काही वेळाने म्हणाली, ‘‘या माणसाने इथेही हेच धंदे सुरू केलेत. कशीबशी आम्ही लखनौहून ट्रान्सफर घेतली होती. निदान नव्या ठिकाणी तरी हा चांगला वागेल अशी आशा होती. पण आता मी त्यांना क्षमा करणार नाही. चला, सरळ पोलिसात जाऊया. धडा शिकवायलाच हवाय त्यांना.’’

त्यांचे आभार मानून, त्यांच्या धाडसाचं कौतुक करून आम्ही त्यांच्यासह पोलीस चौकीत गेलो. तिथे रीतसर तक्रार नोंदवून पोलीस कुमुक घेऊन ऑफिसात पोहोचलो.

आम्हाला, पत्नीला अन् पोलिसांना बधून बॉसचा चेहरा पांढराफटक पडला. ऑफिसातही लोक चक्रावून गेले. तेवढ्यात ऑफिसातली अजून एक मुलगी म्हणाली की, त्याने तिलाही त्रास दिलाय. पोलिसांनी सरळ त्याला अरेस्ट केलं.

घरी आलो तोवर रवी आले होते. त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की ताईंना व इतर मुलींनाही बॉस त्रास देत होता म्हणून त्याला धडा शिकवलाय.

आईबाबांना सुनेचा फारच अभिमान वाटला. रवीही म्हणाले, ‘‘तुझ्यासारखी चतुर व धाडसी मुलगी मी बायको म्हणून निवडली याचा मलाच फार अभिमान वाटतोय.’’

आम्ही दोघी, मी अन् ताई एकमेकींकडे बघून फक्त हसलो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें