धर्म असो किंवा सत्ता निशाण्यावर महिला का?

* नसीम अंसारी कोचर

अफगाणिस्तानमध्ये धार्मिक आणि राजकीय लढाई सुरू आहे. मुळात त्याचा धर्म इस्लाम आहे. कट्टरतावादी तालिबान हे शरिया कायद्याचे खंदे समर्थक आहेत. ते माणसाच्या कपडयांपासून ते त्याच्या वर्तनापर्यंत सर्वांवर स्वत:च्या कायद्याचे वर्चस्व गाजवू पाहातात. ते पुरुषाला दाढी, टोपी आणि स्त्रीला हिजाब घालायला भाग पाडतात. महिलांबद्दलचे त्यांचे विचार अत्यंत बुरसटलेले असतात.

तालिबान महिलांकडे फक्त सेक्सचे खेळणे म्हणून पाहातात. त्यामुळेच सुशिक्षित, नोकरदार आणि प्रगतीची ओढ असलेल्या अफगाण महिलांमध्ये निजाम बदलल्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांना माहीत आहे की, तालिबान भलेही असे सांगत असले की, ते महिलांचे शिक्षण आणि नोकरीवर गदा येऊ देणार नाहीत, तरीही जेव्हा संपूर्ण अफगाणिस्तान त्यांच्या ताब्यात येईल आणि तालिबानची सत्ता स्थापन होईल तेव्हा सर्वप्रथम महिलांची स्थिती बिकट होणार आहे. त्यांना पुन्हा एकदा आपली नोकरी आणि अभ्यास सोडून आपल्या घरात कैद व्हावे लागेल. स्वत:ला हिजाबमध्ये लपेटून शरिया कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

यावेळी अफगाण गायक, चित्रपट निर्माते, अभिनेत्री, नृत्यांगना, खेळाडू हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने अफगाणिस्तानातून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. तालिबानचा ताबा घेतल्यापासून मोठया संख्येने कलाकार अफगाणिस्तान सोडून गेले आहेत. त्याचे कारण म्हणजे तालिबानने त्यांना शरिया कायद्यानुसार त्यांच्या व्यवसायाचे मूल्यमापन करून व्यवसाय बदलण्याचे फर्मान सोडले आहे.

त्यांनी आज्ञा न पाळल्यास ते गोळयांचे लक्ष्य होतील, कारण तालिबान त्यांचा औदार्याचा मुखवटा त्यांच्या चेहऱ्यावर फार काळ ठेवू शकत नाहीत. अमेरिकन सैन्य पूर्णपणे माघारी फिरल्यानंतर ते त्यांचा खरे रंग दाखवतील.

आता फक्त आठवणी

ज्या अफगाणी महिला ६०च्या दशकात किशोरावस्थेत होत्या किंवा तारुण्याच्या उंबरठयावर पाय ठेवणार होत्या त्या आता वृद्ध झाल्या आहेत, मात्र त्यावेळच्या अफगाणिस्तानची आठवण येताच त्यांच्या डोळयात चमक येते. सुरुवातीला ब्रिटनची संस्कृती आणि नंतर रुसी संस्कृतीच्या प्रभावामुळे ६०व्या दशकात अफगाणी महिलांचे आयुष्य खूपच ग्लॅमरस होते.

आज जिथे त्या बुरख्याशिवय बाहेर पडू शकत नाहीत त्या अफगाणच्या जमिनीवर एकेकाळी फॅशन शोचे आयोजन होत असे. महिला शॉर्ट स्कर्ट, बेलबॉटम, मिडी, लाँग स्कर्ट, शॉर्ट पॅन्टसारख्या कपडयांवर रंगीत स्कार्फ आणि मफलर घालत. उंच टाचांच्या चपला घालत. स्टाईलमध्ये केस कापत. बिनधास्तपणे पुरुषांसोबत सर्वत्र फिरत. क्लब, खेळ, सहलीचा आनंद घेत.

काबूलच्या रस्त्यांवर दिसणारी अफगाणी महिलांची फॅशनेबल स्टाईल हॉलिवूडच्या अभिनेत्रींनपेक्षा कमी नव्हती. उच्च शिक्षण घेऊन त्या मोठया हुद्द्यावर काम करत. १९६० पासून १९८०च्या दरम्यानचे फोटो पाहिल्यास अफगाणिस्तानमध्ये महिला किती स्वच्छंद आणि स्वतंत्र होत्या, हे लक्षात येईल. फॅशनसह सर्वच क्षेत्रात त्या अग्रेसर होत्या. तेव्हाच्या काबूलचे फोटो पाहून असा आभास होतो की, तुम्ही लंडन किंवा पॅरिसचे जुने फोटो पाहात आहात.

फोटोग्राफर मोहम्मद कय्यूमींचे फोटो त्या काळच्या वास्तवाची झलक दाखवतात. वैद्यकीय असो किंवा हवाई क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात अफगाणी महिलांनी स्वत:चा ठसा उमटवला होता. १९५०च्या आसपास अफगाणी मुले-मुली विद्यापीठ आणि चित्रपटगृहातही एकत्र फिरायची, मौजमस्ती करायची. अफगाणी महिलांचे आयुष्यही खूपच आनंदी होते.

प्रत्येक क्षेत्रात होत्या अग्रेसर

त्याकाळी अफगाण समाजात महिलांची भूमिका महत्वपूर्ण होती. शिक्षण, नोकरी, अशा प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करत होत्या. १९७०च्या दशकाच्या मधल्या काळात अफगाणिस्तानच्या तंत्रज्ञानाच्या संस्थांमध्ये महिला असणे, ही सर्वसामान्य बाब होती. काबूलच्या पॉलिटेक्निक विद्यापीठात सर्व अफगाणी मुली पुरुषांसोबत शिक्षण घेऊ शकत होत्या. १९७९ पासून १९८९ पर्यंत अफगाणिस्तानातील सोव्हिएतच्या हस्तक्षेपादरम्यान अनेक सोव्हिएत शिक्षक अफगाणच्या विद्यापीठात शिकवायचे. तेव्हा महिलांवर तोंड झाकण्याची बंधने लादलेली नव्हती. त्या त्यांच्या पुरुष मित्रांसोबत काबूलच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरायच्या.

मात्र १९९० च्या दशकात तालिबानी प्रभाव वाढल्यानंतर महिलांना बुरखा घालण्याची ताकीद देण्यात आली. त्यांच्या घराबाहेर पडण्यावरही निर्बंध आले.

अफगाणिस्तान असो किंवा भारत, धर्माने सर्वात जास्त नुकसान महिलांचेच केले. सर्वात जास्त अन्याय महिलांवर केला. गुलामगिरीच्या शृंखलेत सर्वात जास्त महिलाच जखडल्या गेल्या. जर एखादा पुरुष धर्माच्या हातून मारला गेला तर त्याचे परिणाम भोगायची वेळही महिलांवर आली. एक पुरुष मेल्यावर कमीत कमी ४ महिलांना त्रास सहन करावा लागतो आणि तो आयुष्यभर सहन करतच कसेबसे जगावे लागते. ती त्या पुरुषाची आई, बहीण, पत्नी आणि मुलगी असते. धर्म हा महिलांचा सर्वात मोठा शत्रू आहे. धर्माच्या शृंखला तोडून टाकण्याचा निर्णय महिलांनाच घ्यावा लागणार आहे. ती हिंमत त्यांच्यात कधी निर्माण होईल, हे सध्या तरी सांगणे अवघड आहे.

धर्म हा एक बहाणा आहे

आता अफगाणिस्तानमध्ये इस्लाम आणि भारतात हिंदुत्व आपली पकड मजबूत करत आहे. दोघांमध्ये फारसा फरक नाही. ते इस्लामच्या नावावर तर हे हिंदुत्वाच्या नावावर मारहाण करतात. धर्माचे ठेकेदार अफगाणिस्तानमध्ये असोत किंवा हिंदुस्तानात, ते सत्ताधाऱ्यांना स्वत:च्या मर्जीनुसार वागवतात आणि त्यांच्या हातून हा गुन्हा घडवून आणतात. सत्तेची भाषा वापरून महिलांना अपमानित केले जाते.

इतके निराश का?

प्रियंका गांधी निवडणूक काळात प्रचारासाठी मैदानात उतरतात तेव्हा त्यांच्या कपडयांपासून ते दिसण्यापर्यंत राजकारणी टिकाटिप्पणी करतात. प्रियंकाला पाहून असे अनेकदा बोलले गेले की, सुंदर महिला राजकारणात काय करू शकणार? अशाच प्रकारे शरद यादव यांनी वसुंधरा राजेंवर केलेली टिका लक्षात असेलच. ते त्यांच्या लठ्ठपणावर खोचकपणे बोलले होते की, वसुंधरा राजे लठ्ठ झाल्या आहेत. त्यांना आरामाची गरज आहे.

महिलांसंबंधी असे बेताल बोलणाऱ्यांना धर्माचे फळ कधीच मिळत नाही. धर्माचे ठेकेदार अशा बोलण्यावर हसतात आणि सत्तेवर बसलेले अशा लोकांना प्रोत्साहन देतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सत्तेची ताकद प्राप्त करणाऱ्या महिलाही महिलांबद्दल असे हीन वक्तव्य करणाऱ्यांचा विरोध करण्याची किंवा त्यांना फटकारण्याची हिंमत दाखवत नाहीत.

वाहनपूजा नव्हे वाहनसुरक्षा महत्वाची !

* पूनम अहमद

फेसर सुमित्रा यांच्या घरी उत्साहपूर्ण वातावरण होतं. ३ महिन्यांपूर्वी बुक करण्यात आलेली नवीन ऑडी आज घरी येणार होती. पंडितजींनी कार घरी आणण्याचा मुहूर्त आजचा काढला होता. त्यांचे पती डॉक्टर चंद्रभूषण जे शहरातील प्रसिद्ध चिकित्सक आहेत, त्यांनी आज आल्या नर्सिंग होममध्ये जाऊन महत्वपूर्ण ऑपरेशन्सची जबाबदारी अन्य डॉक्टरांना सोपवली होती; कारण त्यांनी पूजेला बसणं जरुरी होतं. एमडी करणारा आणि इंजिनीअर असलेला चिराग मयंक यांनी आज सुट्टी घेतली होती, पंडिजींची पूजा बऱ्याच वेळापासून सुरू होती.

मुलं गाडी घेऊन आली तेव्हा पंडिजींनी कारला फुलांचा हार घातला, गोल प्रदक्षिणा घालत अनेकदा लाल टिळा लावला, प्रत्येक चाकावर पाणी शिंपडून, मग रस्त्यावर कारसमोर नारळ फोडला. कित्येक मंत्रोच्चार केले जे कुणालाच कळले नाहीत. सर्वांची नावं उच्चारून गाडीच्या चहूबाजूंनी प्रदक्षिणा घालत मंत्र पुटपुटले. त्यानंतर सर्वजण त्यांच्या पाय पडले.

पौराणिक मानसिकता

पंडिजींनी आधीच अंदाजे ५० लाखांच्या ऑडीच्या हिशेबाने ५ हजारांच्या शुभदानाचे संकेत दिले होते. गरीब रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या डॉक्टर चंद्रभूषणला कुणा पंडिताला कारच्या पूजेसाठी इतकी दक्षिणा देणं तितकंसं चुकीचं वाटलं नाही.

प्रश्न असा निर्माण होतो की उच्चशिक्षित कुटुंबही आधुनिक तंत्रज्ञानाची कार खरेदी करून पूजा मात्र पुराण काळातील का करतात? मंत्र, जप, पूजापाठ, कारचालकांचं आणि त्यात बसणाऱ्यांचं संरक्षण करतात का? जर कुणी सीटबेल्ट बांधत नसेल, सुरक्षेच्या कायद्याचं पालन करत नसेल. मद्यपान करून गाडी चालवत असेल, नटबोल्टची माहिती बाळगत नसेल, अशावेळी पंडितजींचे हे मंत्र त्यांचा जीव वाचवणार आहेत का? रोज रस्त्यावर इतक्या दुर्घटना घडतात, काही क्षणात अॅक्सिडण्ट्मध्ये गाड्यांचा चक्काचूर होऊन जातो. त्या कारचीही पूजा केलेलीच असते ना, मग?

आपण आधुनिक विज्ञानाच्या नवनवीन पद्धती पाहून इतक्या सोयीसुविधांचा लाभ घेऊन आनंदित होतो परंतु मानसिकरित्या आपण कदाचित पुराण काळातच जगत आहोत, जिथे पंडित-मौलवींनी सांगितलेले कर्मकांड, दानदक्षिणा वगैरे आपला पिच्छा सोडत नाहीत वा असं म्हणता येईल की आपल्यालाच त्या त्यागायच्या नाहीत.

कार खरेदी केल्यावर कारमध्ये बसणारे लोक हा विचार करतात का, की त्यांनी जर कारची पूजा केलेली आहे, आता मनमर्जीने वागलं तरी काही होणार नाही. नाही ना? मग? जर ड्रायव्हिंगवरच भविष्यात सुरक्षितता अवलबूंन आहे तर पंडितांनी सांगितलेल्या मुहूर्तावर वा त्यांच्या पूजेवर इतका विश्वास का? आपण या बुरसटलेल्या मानसिकतेतून का बाहेर पडत नाही.

धार्मिक अवडंबर

बंगळुरूमध्ये तर वाहन गणपती मंदिर आहे, जेथे वाहन खरेदी केल्यावर लोक प्रथम तिथे दर्शनासाठी जातात आणि तिथे उपस्थित पंडितांना बक्कळ दक्षिणा दिली जाते. हे काय करत आहोत आपण लेटेस्ट कार खरेदी केल्यावर धूर्त पंडितांना पैसे देऊन आशीर्वाद घेत आहोत? काय मूर्खपणा आहे हा? आपण डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक बनत आहोत परंतु धार्मिक अंधश्रद्धा सोडू शकत नाही; कारण त्यांची पाळंमुळं तर आपल्यात इतकी खोलवर रूजवली गेली आहेत की आपण यातून मुक्त होऊच शकत नाही. धार्मिक अवडंबराच्या नादी लागून जी चूक आपल्या पूर्वजांनी केली, आपणही इतके आधुनिक, सुशिक्षित असून त्यांचा अवलंब करत आहोत आणि हे केवळ इथेच नव्हे, परदेशातही अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. ग्रेट ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी नवीन कार खरेदी केल्यावर त्यावर ‘होली वॉटर’ शिंपडलं जातं.

पंडितांचा भरू नका खिसा

मुंबईच्या एका मल्टीनॅशनल कंपनीच्या एक्सपोर्ट मॅनेजर निधी रस्तोगी सांगतात, ‘‘५ वर्षांपूर्वी विवाह होताच आम्ही नवीन कार खरेदी केली होती. कोणत्याही पुजाऱ्याला विचारलं नाही, दानदक्षिणा दिली नाही, मुहूर्त काढला नाही. आम्ही दोघं आरामात शांतपणे गेलो आणि नवीन कार घेऊन छान फिरून, खाऊनपिऊन परतलो. आता ५ वर्षं उलटली. आम्हाला ३ वर्षांचा एक मुलगाही आहे. आजपर्यंत गाडीवर एक ओरखडादेखील उमटला नाही. सुयश म्हणजे माझे पती खूप सुरक्षित ड्रायव्हिंग करतात. जर कार घेण्यापूर्वी दिल्लीमध्ये बसलेल्या आमच्या नातलगांचा सल्ला घेतला असता तर माहीत नाही किती पैसे पंडितांच्या खिशात गेले असते, आम्ही त्यांना कारा घेतल्यानंतरच सांगितलं.’’

सुरक्षेचे नियम अधिक महत्पूर्ण

जग प्रगती साधत आहे. रोज नवीन शोध लागत आहेत. मनुष्य कधीच चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. नवीन तंत्रज्ञान आपल्याला रोज अचंबित करतं. तरीदेखील धर्मांधता, अंधश्रद्धा, अंधविश्वास, पंडित, मौलवी यांच्याबाबतीत आपण खूप  हळवे होतो. आपल्या मानसिकेतचा आवाका वाढवा. जीवनात येणारी सुखदु:ख नवीन तर्कांशी जोडा, पंडितांनी सांगितलेल्या शकुनअपशुकनाशी नव्हे. नवीन कार घेतल्यास मित्रमंडळी, कुटुंबियांसोबत त्याचा आनंद उपभोगा. पंडितांच्या जाळ्यात अडकू नका. तुमची सुरक्षितता तुमच्या हातात आहे. कुणा पंडिताच्या तंत्रमंत्रामध्ये नाही. सुरक्षेचे नियम लक्षात घेऊन आपल्या नवीन सफरीचा आस्वाद घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें