नवजात बाळाच्या या समस्यांमुळे घाबरून जाऊ नका

* डॉक्टर व्योम अग्रवाल

रात्री ३ च्या सुमारास मला अंजनीचा फोन आला. अतिशय घाबरलेल्या आवाजात सुरुवातीलाच तिने अपरात्री फोन केल्याबद्दल माझी माफी मागितली. त्यानंतर रडत म्हणाली की, मागच्या अर्ध्या तासापासून तिचे ५ दिवसांचे बाळ खूपच अस्वस्थ आहे. त्यानंतर अचानक जोरात ओरडून मोठयाने रडू लागली. ५ मिनिटांपूर्वी त्याने शी-शू केली आणि आता निपचित पडलेय, असे तिने मला सांगितले.

बाळाच्या मूत्रमार्गात अडचण, संसर्ग किंवा त्याला मूत्रपिंडाचा त्रास झाला असावा, अशी तिला भीती होती. मी तिची समजूत काढत सांगितले की, नवजात बाळाबाबत असे होतेच. यामागचे कारण कदाचित असे असते की, बाळाचे त्याच्या मूत्र विसर्जनावर नियंत्रण नसते. त्यामुळे त्याचा मूत्रमार्ग अचानक बंद होतो, जेणेकरून त्याचे मूत्र सतत टपकत राहत नाही. सर्वसामान्यपणे बाळ २ महिन्यांचे होइपर्यंत असा त्रास होतोच. त्यामुळे घाबरण्याची किंवा बाळाची तपासणी करून घेण्याची गरज नसते. अंजनीला याबाबतची माहिती आधीच असती तर ती आणि तिच्या कुटुंबावर (आणि माझ्यावरही) रात्रीच्यावेळी यावर चर्चा करण्याची वेळ आली नसती.

बाळाचा जन्म कुटुंबात आनंद घेऊन येतो. विशेषत: पहिल्यांदाच आई होणाऱ्या तरुणीसाठी हा क्षण आणि अनुभव अविसमरणीय असतो. आजी, वहिनी, नणंद अशा घरातल्या अनुभवी बायका नव्या आईला बाळाची काळजी कशी घ्यावी, हे शिकवत असतात. बाळाच्या आजारावर सोपे उपाय सांगतात. विभक्त कुटुंबात आपल्या माणसांचे सल्ले मिळू शकत नाहीत, कारण आपली माणसे सोबत राहत नसतात. शिवाय त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला योग्यच आहे, हेही अनेकदा ठामपणे सांगता येत नाही.

बाळांमधील सामान्य समस्या

२४ वर्षांच्या अनुभवातून माझ्या हे लक्षात आले आहे की, नवजात बाळाला घरी घेऊन जाणाऱ्या बहुतेक मातांना एकसारख्याच समस्या जाणवतात. त्यावेळी डॉक्टरांशी लगेचच संपर्क न झाल्यामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे त्या अस्वस्थ होतात. आईपणाच्या उंबरठयावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या महिलांना येणाऱ्या अशाच काही समस्यांबाबत माहिती करून घेऊया.

शरीरावर लाल पुरळ : काही दिवसांपूर्वी एक बाळ श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे जन्मानंतर ३ दिवस आमच्याच रुग्णालयात होते. चौथ्या दिवशी बाळाला स्तनपानासाठी आईकडे देण्यात आले. काही वेळानंतर बाळाची आजी रागाने ओरडत आली आणि जाब विचारू लागली की, बाळाला कोणते औषध दिले? त्याला अॅलर्जी झालीय. अंगावर पुरळ उठलाय.

आमच्या डॉक्टरांनी लगेचच जाऊन बाळाची बारकाईने तपासणी केली. नंतर त्याच्या नातलगांना समजावले की, बहुसंख्य बाळांच्या अंगावर जन्मानंतर दुसऱ्याच दिवसापासून लाल पुरळ येते. याला इरिदेमा टॉक्सिकम म्हणतात. बाळ पहिल्यांदाच हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्याला होणारी ही एक प्रकारची अॅलर्जी असते. ती बाळासाठी अपायकारक नसते. ६-७ दिवसांत आपोआप ही अॅलर्जी बरी होते.

हिरव्या रंगाची शी : सर्वसामान्यपणे जन्मल्यानंतर पहिले २ दिवस बाळाला हिरव्या, काळया रंगाची शी होते. पुढील काही दिवस हा रंग बदलत राहतो आणि १० दिवसांपर्यंत सामान्य रंग येतो. बाळाला यकृताचा रोग असल्यास त्याला पांढरट रंगाची शी होते. बाळ फक्त स्तनपानावरच असते तेव्हा त्याने दिवसातून अनेकदा शी केली तरी त्यात चिंता करण्यासारखे काहीच नसते. त्यामुळे आईने घाबरून जायचे नसते.

बऱ्याचदा बाळाला जुलाब होणे आणि त्याचा बदललेला रंग पाहून आई खूपच काळजीत पडते. पण प्रत्येक वेळी स्तनपानानंतर शी करणे हे तितकेच सामान्य आहे जितके ३-४ दिवस पोट साफ न होणे. मी प्रत्येक आईला समजवतो आणि न विचारताही सल्ला देतो की, ही घाबरण्याची गोष्ट नाही. पण जर बाळ थकल्यासारखे दिसत असेल, दूध पीत नसेल किंवा कमी शी करू लागले असेल तर मात्र बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यायलाच हवा.

स्तनपान : एके दिवशी एका नवजात बाळाच्या आईने मला विचारले की, बाळ फक्त स्तनपानावर आहे, तरीही दिवसातून १५-२० लंगोट खराब करते. मी विचारल्यावर तिने सांगितले की, ती एका स्तनातून दूध पाजायला सुरुवात करते आणि ५ ते १० मिनिटांनंतर दुसऱ्या स्तनातले दूध पाजते. तिने सांगितले की, ती असे एका स्तनातील दूध संपले म्हणून करत नाही तर बराच वेळ एकाच स्थितीत बसून राहिल्यामुळे थकवा येत असल्याने करते.

प्रत्यक्षात हेच बाळाला जास्त शी होण्यामागचे कारण आहे. आईच्या स्तनात सुरुवातीचे दूध साखरेसारखे असते आणि त्यानंतरचे चरबीयुक्त असते. चरबीमुळे पोट भरते, तर साखरेमुळे शी जास्त होते. बाळाच्या आरोग्यासाठी हे दोन्ही त्याच्या पोटात समान मात्रेत जाणे गरजेचे असते. म्हणूनच तिला मी समजावले की, एका वेळेस बाळाला एकाच स्तनातले दूध पाजावे. अगदीच गरज भासली तरच दुसऱ्या स्तनातले दूध पाजावे. २ दिवसांनंतरच तिचा फोन आला की, बाळामध्ये बरीच सुधारणा जाणवत आहे.

दूध ओकणे : क्वचितच असे एखादे बाळ असते जे दूध ओकत नाही. काही सामान्य बाळे तर नाकातूनही दूध बाहेर टाकतात. बाळाचे वजन नीट वाढत असेल, दूध पिताना ते श्वास कोंडल्यासारखे करत नसेल, शी-शु व्यवस्थित होत असेल, दूध ओकल्यावरही त्याला लगेचच भूक लागत नसेल, पोट फुगल्यासारखे वाटत नसेल आणि त्याने ओकलेले दूध हिरव्या रंगाचे दिसत नसेल तर त्याने दूध ओकून टाकणे, ही सामान्य बाब आहे. मात्र जर बाळाचे वजन वाढत नसेल तर समजून जावे की, काहीतरी गडबड आहे आणि लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

झोपण्या-उठण्याची सवय : बाळाच्या जन्मानंतर काहीसा थकवा आलेल्या आईला सर्वात जास्त याचा त्रास होत असतो की, बाळ दिवसा दूध पिऊन झोपते, पण रात्री प्रत्येक १०-२० मिनिटांनंतर उठते आणि भूकेने रडू लागते. याचा संबंध गर्भावस्थेतील आईच्या उठण्या-झोपण्याच्या चक्राशी जोडलेला असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर दिवसा आई चालते तेव्हा बाळ झोके मिळाल्यासारखे आईच्या पोटात शांत झोपते. रात्री आई झोपल्यावर बाळ उठते. फिरू लागते. पाय वरखाली करू लागते. जास्त सक्रिय होते. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या दिवसरात्रीच्या या सवयी बदलण्यासाठी किमान २ महिने लागतात.

त्यामुळेच रात्री बाळ जगत राहते. जागेपणी त्याला दोनच कामे येतात. रडणे आणि दूध पिणे. हेच त्याच्या रात्रीच्या जागण्याचे आणि रडण्याचे कारण असते. त्यामुळे आईने दिवसा आराम करावा, जेणेकरून रात्री जागून बाळाला व्यवस्थित दूध पाजता येईल.

अधूनमधून बाळाला थोपटणे, खोलीत सौम्य प्रकाश, सुमधुर हळू आवाजातले संगीत बाळाला रात्री झोपण्यासाठी मदत करते. काहीही झाले तरी बाळाचे रात्रीचे रडणे म्हणजे त्याला भूकच लागली आहे, असे समजू नये. आई आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी ६ महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचेच दूध पाजायला हवे.

नवजात मुलींमध्ये रक्तस्त्राव : आपल्या मुलीचे डायपर बदलताना तिच्या योनीमार्गातुन रक्त येत असल्याचे सरीनच्या लक्षात आले. त्यामुळे ती घाबरली. नवजात मुलीमध्ये जन्माच्या पहिल्या आठवडयात मासिक पाळीच्या वेळेसारखा रक्तस्त्राव होऊ शकतो. तो ५-६ दिवसांनंतर थांबतो. हा रक्तस्त्राव  काही थेंबाइतकाच असतो. तो काही दिवसांनंतर स्वत:हूनच थांबतो. जन्मानंतर आईचे हार्मोन्स बाळाच्या शरीरापासून वेगळे झाल्यामुळे असे घडते. यात चिंता करण्यासारखे काहीच नसते.

प्रत्येक आईला एवढाच सल्ला द्यावासा वाटतो की, बाळाबाबत एखादी समस्या आल्यास स्वत:च डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करू नका. बाळाला लगेच बालरोगतज्ज्ञाकडे घेऊन जा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें