नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी नेहमीच निरनिराळ्या विषयांच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आता आपल्या मनोरंजनाच्या पेटाऱ्यातून आणखी एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. “निवेदिता माझी ताई” असे या मालिकेचे नाव असून या मालिकेतून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशोक फळदेसाई आणि एताशा संझगिरी ही जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अशोक आणि एताशा यांनी याआधीच्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. आता नव्या मालिकेतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन कशा प्रकारे करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. यशोधन आणि निवेदिता ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. पण या मालिकेत त्या दोघांबरोबर एक लहानगा मुलगा दिसणार आहे. रुद्रांश चोंडेकर असे त्याचे नाव असून तो असीम या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. असीम हा निवेदिताचा लहान भाऊ. आता निवेदिता आणि यशोधन यांची जोडी छोट्या पडद्यावर किती रंगत आणते, हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल.

सोनी मराठी वाहिनी नेहमीच रंगतदार विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येते. “निवेदिता माझी ताई” या मालिकेचा विषयही तितकाच आगळावेगळा आहे. अभिनेता अशोक फळदेसाई आपल्या प्रॉमिसिंग अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेल. तसेच एताशा संझगिरीनेही याआधी काही मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे आणि आता या मालिकेत दोघेही नव्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतील. मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निवेदिता आणि यशोधन  यांच्या नव्या वेषभूषेची चर्चा नक्कीच रंगणार आहे. भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता असीम आणि निवेदिता या भावा-बहिणीचे अनोखे नाते कशाप्रकरचे असेल हे मालिकेतच आपल्याला पाहायला मिळेल. मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर दाखल होणार आहे. पाहायला विसरू नका “निवेदिता माझी ताई” लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.

‘सन मराठी’ घेऊन येत आहे नवीन मालिका कथा ‘सावली होईन सुखाची’

* सोमा घोष

कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला मालिकेचा ग्रँड प्रिमिअर सोहळा.

‘सन टीव्ही नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीने नेहमीप्रमाणे यावेळीदेखील एका नाजूक विषयात हात घातला आहे. ‘सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असणारी ‘सन मराठी’ एक नवीन प्रेमाची कथा ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेच्या माध्यमातून येत्या १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता घेऊन येत आहे.

प्रेमाच्या परिभाषा वेगळ्या असतात. कोणावर जीव जडला पाहिजे हे ठरवलं जात नाही ते आपसूक होऊन जातं. ‘सन मराठी’ वाहिनी ‘सावली होईन सुखाची’ ही नवीन मालिका घेऊन येत आहे, ज्यामध्ये कुटुंबाची गोष्ट तर आहेच पण त्यासोबत मोलकरीण आणि अनाथ मुलीची देखील गोष्ट दाखवण्यात आली आहे.

ही गोष्ट आहे श्रीमंत कुटुंबाची, कुटुंब आर्थिकदृष्ट्या कितीही परिपूर्ण असलं तरी घरातील सदस्यांना एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, माया काही वाटत नाही. जणू त्या घराने कधी प्रेम हे पाहिलंच नसावं. तसेच त्या श्रीमंत घराण्यातील एक सदस्य जो भूतकाळातील एका घटनेमुळे वाईट सवयींच्या आहारी गेला आहे, त्याच्यामुळे घरात सकारात्मक असं वातावरण नाही. पण त्याच घरात एक मोलकरीण आणि एक अनाथ मुलगी यांचा प्रेमळ स्वभाव देखील वावरतोय. कदाचित त्या दोघींच्या मनमिळावू स्वभावामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकतीच या मालिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला

मिळाली आणि प्रोमोमध्ये मालिकेचा नायक रोनक शिंदे ज्याला वाईट सवयी लागल्या आहेत आणि घरातील सर्वजण त्याच्या विरोधात आहेत आणि मालिकेची नायिका सीमा कुलकर्णी जी मोलकरणीच्या भूमिकेत दिसली आहे, त्यांच्यातील अबोल भावना पाहायला मिळाल्या. एखाद्यावर ठरवून प्रेम केलं जात नाही, ते आपसूक होतं, असंच काहीसं त्यांचं नातं आहे. त्या दोघांना एकमेकांची सोबत मिळेल का, हे लवकरच कळेल.

नुकताच, ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेचा ग्रँड प्रिमिअर सोहळा, मालिकेचे प्रमुख कलाकार रोनक शिंदे आणि सीमा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ठाणे येथे पार पडला. मालिकेला मोठं करणारे हे मायबाप रसिक प्रेक्षकच असतात म्हणून खास त्यांच्यासाठी मालिकेच्या टीमने मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या उपस्थितीत पाहिला आणि प्रेक्षकांनी देखील त्याचा आनंद लुटला आणि मालिकेच्या यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

रोनक शिंदे, सीमा कुलकर्णी यांच्यासह आरंभी उबाळे, रुतविज कुलकर्णी, धनंजय वाबळे, सुप्रिया विनोद, एकनाथ गिते, नैना सामंत, यश पेडणेकर, ज्ञानेश्वरी देशपांडे, अवनिश आस्तेकर, श्वेता मांडे, निशा कथावते, निलेश गावरे, पूनम चव्हाण, सलमान तांबोळी आणि आशिष चौधरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

रतिश तगडे, पदमनाभ राणे आणि महेश बेंडे निर्मित, निशांत सुर्वे दिग्दर्शित ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेची कथा-पटकथा महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिले असून विशाल कदम यांनी संवाद लिहिले आहेत. मालिकेची झलक पाहिल्यावर प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न पडला असेल की घरची मोलकरीण, होईल का साता जन्माची सोबतीण? जाणून घेण्यासाठी नक्की पाहा नवी मालिका ‘सावली होईन सुखाची’ १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें