अशी साजरी करा इकोफ्रेंडली दिवाळी

– शैलेंद्र सिंह

२० वर्षीय प्रभात फार खुश होता. दिवाळी हा त्याचा सर्वात प्रिय सण होता. प्रभातच्या कॉलेजमध्ये सांगितले जात होते की दिवाळीत फटाके फोडू नयेत, पण प्रभातला काही या गोष्टी पटत नव्हत्या. आपल्या घरातल्या लोकांशी भांडून त्याने हट्टाने फटाके आणि फुलबाजा खरेदी केलेच. त्याने दिवाळीला आपल्या नातेवाईकांनाही बोलावले होते.

सर्वांनी ठरवले होते की आज आपल्या मोहल्ल्यात खूप धमाल करायची. त्याचे काही मित्र तर कानठळया बसवणाऱ्या आवाजाचे बॉम्ब फटाकेही आणणार होते.

संध्याकाळ होताच सर्व मुले परिसरात एके ठिकाणी जमा झाली. प्रभातच्या घराचे छत खूप मोठे होते, त्यामुळे सर्वजण तिथेच आले. प्रभात आणि त्याच्या मित्रांची धमाल सुरू झाली. फटाक्यांचा धूर सर्वत्र पसरू लागला होता.

अचानक प्रभातला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याला खोकलाही येऊ लागला. तो घाबरून खाली आला. घरातल्या लोकांनी ही गोष्ट काही फार मनावर घेतली नाही. पण प्रभातला अधिकच त्रास होऊ लागला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला.

कुटुंबीयांनी त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याला तपासल्यावर डॉक्टरांनी सांगितले की प्रभातला दम्याचा आजार आहे आणि दिवाळीच्या फटाक्यांच्या धुरामुळे तो अधिकच बळावला. ज्यामुळे प्रभातची तब्येत अशी खालावली. डॉक्टरांनी बरेच उपचार केल्यानंतर कुठे तो ठीक झाला.  डॉक्टरांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना स्पष्ट ताकीद दिली की याला पुन्हा कधीही धूर असलेल्या ठिकाणी पाठवू नका. यामुळे त्याचा दमा पुन्हा चाळवू शकतो. आता प्रभात कधीही फटाके फोडत नाही आणि इतरांनाही फोडण्यापासून परावृत्त करतो.

आनंद कमी आणि धूरच अधिक

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. पण या सणाबाबत कुठली वाईट गोष्ट असेल तर ती आहे आनंद साजरा करायला लोक फटाके आणि फुलबाज्यांचा वापर करतात ही. ज्यामुळे विषारी धूर सर्वत्र पसरतो आणि तो वातावरणाला विषारी करतो. हा धूर अस्थमाच्या रुग्णांना खूप त्रासदायक असतो. यांत लहान मुले, तरुण लोक, मोठी माणसे सर्व शामिल आहेत.

फटाक्यांमुळे श्वसनाच्या त्रासाबरोबर कानांचेही नुकसान होते. याच्या आवाजाने माणूसच नाही तर जनावरेही अस्वस्थ होतात. याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी हॉस्पिटल्स आणि शाळांच्या भागात सायलेन्स झोन केलेला असतो. या क्षेत्रात जोरात हॉर्न वाजवण्यास मज्जाव केलेला  असतो.

असे पाहण्यात येते की जेव्हा लोक जोरदार आवाजाचे फटाके फोडतात, तेव्हा ते स्वत:ही आपले तोंड दुसरीकडे वळवून आपले कान बंद करतात. म्हणजेच हा आवाज त्यांनाही आवडत नाहीच. यामुळे प्रश्न असा उद्भवतो की जी गोष्ट आपल्या कानांना आवडत नाही, ती दुसऱ्याला तरी कशी आवडेल. म्हणूनच जोरदार आवाज असलेले फटाके फोडूच नयेत.

जोखीमपूर्ण फटाका उद्योग

फटाके हे केवळ फोडणाऱ्यांसाठीच त्रासदायक ठरतात असे नाही तर ते बनवणाऱ्यांसाठीही तेवढेच धोकादायक असतात. फटाके बनवताना स्फोटक दारूचा वापर केला जातो. ज्यामुळे ते बनवणाऱ्यांच्या हातांचे नुकसान होते. जेव्हा ही दारू नाकाद्वारे फुफुस्सात पोहोचते, तेव्हा त्या व्यक्तिला गंभीर आजार होऊ शकतात.

दिवाळीच्या दिवसांत फटाक्याच्या दुकानात आग लागणे आणि स्फोट होणे अशा घटना वाढतात. अनेकदा तर यामुळे बाजारातही आग लागण्याच्या घटना वाढतात. म्हणूनच सरकारने फटाक्यांची दुकाने ही मोकळया जागांवर लावण्याचा नियम केला आहे. याउपरही फटाके विक्रेते गल्ली बोळात आपली दुकाने लावतातच. ज्यामुळे अपघात घडून येतात. जर हा फटाक्यांचा उद्योगच बंद झाला तर सर्व समस्याच सुटतील. फटाके आनंद कमी आणि दु:खच अधिक देतात.

गमगाटाचा होतो त्रास

दिवाळीत आनंद साजरा करण्याची दुसरी पद्धत म्हणजे विजेची रोषणाई करणे. यासाठी लोक मोठया प्रमाणावर लाइटची तोरणे, बल्ब आणि इतर सजावटीचे सामान यांचा वापर करतात. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एकमेकांच्या घराच्या सजावटीच्या चढाओढीत लोक जास्तीत जास्त रोषणाई करतात. यामुळे अधिक वीज खर्च होऊन विजेचे बिल वाढते. याचा विजेच्या पुरवठयावर परिणाम होतो. हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेल्वेस्थानके आणि मार्केट्स यांना पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही. विजेची रोषणाई करण्यासाठी लोक वीजचोरीही करतात. यामुळे जागोजागी फ्यूज उडण्याच्या घटनाही घडतात. ज्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो.

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव मानला जातो. लोक बाजारात रात्री उशिरापर्यंत खरेदी करत असतात. ज्यामुळे विजेचा जास्त प्रमाणात वापर होतो. हा विजेचा अपव्यय टाळण्यासाठी कमी प्रमाणात विजेचा वापर केला गेला पाहिजे. रोषणाई करण्यासाठी दिव्यांचा वापर करा, वातावरणासाठी ते पोषक असते.

रांगोळी नैसर्गिक रंगांनी बनवा

दिवाळीत घराबाहेर रांगोळी काढून सजावट केली जाते, पण हे रंग बनवण्यासाठी हानीकारक रंग वापरले जातात. त्यामुळे रांगोळी बनवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरले जावेत. यासाठी फूल आणि पानांचा वापर केला जाऊ शकतो. तांदूळ रंगवण्यासाठी हळद वापरा. पाने बारीक कापून त्यांचा वापर रांगोळी आकर्षक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. याच प्रकारे नैसर्गिक रंग बनवण्यासाठी वेगवेगळया रंगांच्या फुलांचाही वापर करता येतो.

इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यासाठी कृत्रिम रंगांवर बहिष्कार टाका. लखनौमधील प्रसिद्ध रांगोळी कलाकार ज्योती रतन सांगतात की नैसर्गिक रंगांपासूनही आकर्षक रांगोळी बनवता येते. रांगोळीत डिझाइन आणि रंगांचा वापर महत्त्वपूर्ण असतो. आज बाजारात विविध प्रकारची फुले आलेली आहेत, ज्यांच्यापासून रंगीबेरंगी रांगोळी बनवता येऊ शकते.

खाद्यपदार्थ सांभाळा

दिवाळीत भेटवस्तू देण्याचीही पद्धत असते. यांत खाद्यपदार्थ, मिठाई आणि इतर वस्तू दिल्या जातात. हे पदार्थ खूप दिवस आधीच पॅक केलेले असतात. या वस्तू पॅक करताना हा विचार केलेला असतो की या वस्तू दीर्घकाळ टिकल्या पाहिजेत. यासाठी त्या प्रिजर्व्ह केल्या जातात. अशावेळी हे चेक करणे गरजेचे आहे की जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह घातलेले हे पदार्थ आपल्या शरीराला हानिकारक तर नाही ठरणार. खाद्यपदार्थांमध्ये नुकसानकारक पदार्थ वापरले जाऊ नयेत. या सर्व गोष्टींची काळजी घेऊन इको फ्रेंडली दिवाळी साजरी करता येते. खाण्याच्या वस्तू तयार करतानाही ही काळजी घेतली गेली पाहिजे की त्यात शरीराला अपायकारक असे घटक वापरले जाणार नाहीत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें