धर्मावर होते पैशांची उधळपट्टी

* मोनिका अग्रवाल

राधेराधे… राधेराधे… राधेराधे… जय श्रीराम… जय श्रीराम… जय श्रीराम… रमाकांत पूर्ण श्रद्धेसह भक्तीत लीन झाले होते. सोबत घरातली मंडळी घंटा वाजवत होती. या आवाजामुळे मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. तो सतत जाऊन आईला सांगत होता, ‘‘आई, कृपा करून बाबांना सांग की, सर्वांना थोडया हळू आवाजात पूजा करायला लावा. उद्या माझा बोर्डाचा पेपर आहे आणि आवाजामुळे मी नीट अभ्यास करू शकत नाही.’’

त्याचे बोलणे रमाकांत यांनी ऐकले आणि रागाने म्हणाले, ‘‘ही काय अभ्यासाची वेळ आहे? उद्या परीक्षा असेल तर तुला आज देवासमोर नतमस्तक होऊन बसायला हवे.’’

बोला जय सीताराम… जय जय सीताराम… असे म्हणत ते बायकोवरच रागावले. अक्कल नाही का तुला? इथे महाराज पूजा करत आहेत आणि तू मुलामध्ये वेळ का घालवतेस? मूर्ख बाई… जा, सर्वांसाठी गरमागरम दूध आण. बिचारी, ‘हो’ असे म्हणत आत गेली.

प्रसाद तयार झाला का? महाराजांच्या सेवेत काही कमतरता नको. जितकी मनोभावे सेवा करशील तितकाच मेवा मिळेल… आपले अहोभाग्य म्हणून महाराज आपल्या घरी आलेत… किती जणांनी त्यांना आमंत्रण दिले असेल…  पण ते मात्र आपल्याकडेच आले. आज आपण जे काही आहोत ते केवळ त्यांच्यामुळेच, असे अधूनमधून सासू मोठयाने बोलत होती.

महाराजांच्या सेवेत संपूर्ण दिवस आणि अर्धी रात्र निघून जायची. झोपायला कसेबसे २ तास मिळायचे, मात्र तितक्यातच ४ वाजायचे आणि सासू आवाज द्यायची की, महाराजांच्या अंघोळीची वेळ झाली… तयारी केलीस का…? ६ वाजता त्यांना फेरफटका मारायला जायचे असेल… लक्षात आहे ना तुझ्या? सर्वात आधी उठून अंघोळ कर.

असे दरवर्षी व्हायचे. या घरी आली आल्यापासून हेच बघत आली होती. एखाद्या गरीब, गरजूने विनवणी करूनही त्याला घरातले कोणी साधे १० रुपये देत नसत, पण महाराज, बाबा-बुवांवर लाखो रुपये खर्च केले जात, याचे तिला दु:ख व्हायचे. ती लग्न करून आली तेव्हा सुरुवातीला फक्त एकच महाराज येत असत. तेही फक्त २ किंवा ३ तासांसाठी, पण हळूहळू नवऱ्याचा बाबा-बुवा, महाराजांवरील विश्वास वाढला. त्यातच उत्पन्नही वाढले आणि एका महाराजासोबत आणखी दोघे येऊ लागले. आता तर महाराज त्यांची पत्नी आणि सोबत ११ माणसांना घेऊन येतात. एकाचा पाहुणचार करणे सोपे होते, आता एवढ्या सर्वांची उठबस करावी लागते. त्यातच शेजारी, नातेवाईक महाराजांना भेटायला येतात आणि काम करणारी ती फक्त एकटीच असते.

नुकतीच घडलेली गोष्ट आहे जेव्हा शेजाऱ्यांकडे साक्षी गोपाळ महाराज आले होते. कितीतरी दिवस सकाळ-संध्याकाळी त्यांचे प्रवचन आणि पहाटेच्या प्रभात फेरीमुळे शेजाऱ्यांकडे वेळच उरला नव्हता. त्यांना व्यवसाय वाढवायचा होता आणि त्यासाठीच महाराजांची सेवा करायची होती.

ही कसली अंधश्रद्धा?

विश्वास किंवा श्रद्धा त्यांच्या स्थानी असते, पण अंधविश्वास हा आकलनापलीकडचा विषय आहे. हा कसला अंधविश्वास जो तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे दु:ख समजू देत नाही? लहानसहान गोष्टींसाठी बाबाबुवा, महाराजांकडे धाव घेणारे लोक पाहून माझे रक्त उसळते.

जसजशी आपण जागतिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, तशी लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढत आहे. संपूर्ण जगात अंधश्रद्धेच्या बाबतीत भारतीय आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ज्या देशाने उपग्रहासारखे वैज्ञानिक शोध लावले तोच आधुनिक भारत अंधश्रद्धेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

दान कशासाठी?

अनेकदा, नुकसानाच्या भीतीने, पुण्य कमावण्यासाठी किंवा नवस करताना अथवा तो पूर्ण झाल्याच्या मोबदल्यात दान दिले जाते. काही वेळा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी वायफळ उपाय सांगितले जातात. दानाचे विविध प्रकार असतात. धर्मगुरू, धार्मिक संस्था अशाच प्रकारचे दान गोळा करतात. राजकीय पक्ष निधीसाठी ज्या प्रकारे देणग्या गोळा करतात अगदी त्याच पद्धतीने हे दान गोळा केले जाते.

प्रत्यक्षात भक्त किंवा श्रद्धाळू भलेही गरीब किंवा कफल्लक असतील, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत कर्मकांडाच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळले जातातच. प्रायश्चित्त करणे, ग्रहदशा सुधारणे, दुर्भाग्य दूर करणे, अशा अनेक समस्या सोडवण्याच्या नावाखाली मोठी दक्षिणा उकळली जाते, पण ज्या धर्माला पुढे करून देवाच्या नावाखाली लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात त्याच देवाला किंवा धर्माला पुजारी, महाराज का घाबरत नाहीत, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

दिखाऊपणाचा फायदा कोणाला?

उदाहरण : एक निर्यातदार आहेत ज्यांना सर्व प्रकारचे छंद आहेत. तरीही वर्षातून दोनदा ते श्रीकृष्णाच्या वृंदावनात जाऊन भंडारा घालतात. कमाईतील एक भाग देवाला दिल्यामुळे जीवनात कुठलीच अडचण येणार नाही आणि दान केल्यामुळे नावलौकिकही होईल, असे त्यांना वाटते. त्यांच्या घरातील महिलाही सतत पूजा करतात.

मंदिराशिवाय घरातही लोक देवाच्या बऱ्याच मूर्ती ठेवतात आणि त्यांची सकाळ-संध्याकाळ पूजा करतात. महाराजांना प्रवचनासाठी घरी बोलावणे ही अभिमानाची बाब मानली जाते.

गरिबांना संपत्तीची तर श्रीमंतांना प्रसिद्धीची हाव असते. त्यामुळे मंदिरात दगड ठेवले जातात किंवा घरात महाराजांना बोलावले जाते. आता दानधर्मही दिखाऊपणाचे झाले आहे. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी लोक दानधर्म करतात किंवा घरी महाराजांना बोलावले जाते. असेही लोक आहेत जे भरपूर काळा पैसा कमावतात, परंतु पापाला घाबरतात, म्हणून ते सढळ हस्ते दान करतात, जेणेकरून त्यांना भरपूर पुण्य मिळेल. खोटा अभिमान असो किंवा ढोंगीपणा, पण असे अंधश्रद्ध वागणे चुकीचेच आहे.

सुशिक्षितही जबाबदार

भोंदूबाबांची दुकाने सुरू असतील, तर त्यामागचे एक कारण म्हणजे सुशिक्षित लोकही या सापळयात अडकून भरपूर पैसा खर्च करतात. बॉलीवूडही यापासून दूर राहिलेले नाही. कोणतेही दुकान ग्राहक गेल्यावरच चालते. हे पुजाऱ्यांचे दुकान आहे. त्याची भरभराट होत असेल तर यात जितका हात गरिबांचा आहे, तितकाच श्रीमंतांचाही आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, ज्या धर्माच्या, देवाच्या नावाखाली लोक महाराज, पुजाऱ्यांकडे जातात त्याच देवाच्या घरी काम करणाऱ्यांच्या मनात चुकीचे काम करण्याची इच्छा का आणि कशी निर्माण होते?

चुकीच्या मागण्या

उदाहरण : एका जोडप्याला अनेक वर्षांपासून मूल होत नव्हते. यासाठी ते अनेकदा एका भोंदू बाबांकडे जात होते. एके दिवश त्या बाबाने संधीचा फायदा घेऊन सांगितले की, तुझ्या पत्नीला रात्री माझ्याकडे पाठव. नवऱ्याची या बाबावर एवढी आंधळी भक्ती होती की, त्याने स्वत:च पत्नीला बाबाच्या स्वाधीन केले. त्या बाबाने रात्रभर त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सुशिक्षित लोक आणि नेत्यांसमोर धर्माचे गुणगान गाणारे हे बाबा, महाराज किंवा तांत्रिक जेव्हा एखादी आक्षेपार्ह मागणी करतात, तेव्हा ते त्यांच्या कानाखाली मारायचे सोडून त्यांची अवैध मागणी पूर्ण करतात.

उदाहरण

उत्तर प्रदेशातील एक बाबा असा दावा करायचा की, तो संधिवात बरा करू शकतो. त्यासाठी तो रुग्णाचे रक्त काढून तांब्याच्या भांडयात टाकायचा आणि नंतर रुग्णाला द्यायचा. एका डॉक्टरची सख्खी बहीण ही डॉक्टर भावाने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून या बाबाकडे उपचारासाठी गेली. त्यानंतर खूप आजारी पडली, कारण तिची हिमोग्लोबिन पातळी २ (सामान्य १५ किंवा १२) झाली. अशी उदाहरणे आपल्याला रोजच पाहायला मिळतात. अनेक डॉक्टर आणि परिचारिकांनी तिचा जीव वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिच्या उपचारांसाठी कुटुंबाला ५ लाख रुपये खर्च करावे लागले. प्रत्यक्षात या आजारावर नित्यनियमाने उपचार केल्यास महिन्याला केवळ एक हजार रुपये खर्च येतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें