एकच प्रश्न

कथा * भावना गोरे

‘‘आकाश, तू आपल्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाहीस, अरे लग्नाला दहा वर्षं झालीत, पण अजूनही मला चिंटू गोटूपेक्षा तुझ्याकडेच जास्त लक्ष द्यावं लागतंय.’’ घाईघाईनं आकाशचा जेवणाचा डबा भरता भरता कोमल बोलत होती. तेवढ्यात आकाशचा फोन वाजला अन् तो घाईनं जाऊ लागला.

‘‘अरे, निदान डबा तरी घे…’’ हातात डबा घेऊन कोमल त्याच्या मागे धावली.

टिफिन घेताच आकाशची गाडी फुर्रकन निघून गेली.

आज कोमलला जरा निवांतपणा मिळाला. तिनं चहा करून घेतला अन् ती चहा घ्यायला शांतपणे खुर्चीवर बसली. लग्नानंतर कोमलला पाच वर्षं मूलबाळ नव्हतं. त्या काळात सकाळचा चहा ती अन् आकाश एकत्रच घ्यायची.

शेजारी राहणाऱ्या शीला मावशींचा नवरा परदेशात होता. दोन्ही मुलंही मोठी होऊन परदेशी निघून गेलेली. पण ती मजेत एकटी राहायची. अभिमानानं म्हणायची, ‘‘जवळ नाहीएत तर काय झालं? पण दोन मुलगे आहेत ना माझे.’’

कोमलला स्वत:ला मूल नाही म्हणून फार वाईट वाटे. पण आकाश तिला धीर द्यायचा. ‘‘होतील गं, तुलाही दोन मुलगे होतील…डॉक्टरांनी सांगितलंय ना, होईल तुला बाळ…तू अजिबात काळजी करू नकोस.’’

त्याच्या प्रेमळ स्पर्शानं, आपुलकीच्या बोलण्यानं कोमलला खूप आधार वाटायचा. तिचं दु:ख कमी व्हायचं.

कोमलची शेजारीण दिव्या रेडिओवर नोकरी करत होती. तिची लहानगी मुलगी मिनी कोमलला खूप आवडायची. एकदा कोमल बाल्कनीत उभी होती. सहज नजर खाली गेली तर मिनी शाळेची बॅग घेऊन तिच्या घरासमोर बसून होती. घर बंद होतं. कोमलला वाईट वाटलं. तिनं मिनीला वर बोलावून घेतलं. तिला खायला प्यायला दिलं. मग दिव्याला फोन केला, तर समजलं की अचानक एक मीटिंग ठरली, त्यामुळे दिव्याला यायला उशीर होतोय. कोमलनं तिला म्हटलं, ‘‘मिनी माझ्या घरी मजेत आहे, काळजी करू नकोस.’’

‘‘दिव्या घरी परतल्यावर तिनं कोमलचे मनापासून आभार मानले.’’

‘‘यापुढे तू काळजी करू नकोस, तुला उशीर झालाच तर मी मिनीची काळजी घेईन.’’ कोमलनं म्हटलं.

दिव्यानं म्हटलं, ‘‘तुझ्या मदतीबद्दल खरंच आभारी आहे. पण आता अशी वेळ येणार नाही. मी एका पाळणाघराची व्यवस्था केली आहे. शाळेतून मिनीला सरळ पाळणा घरात सोडतील अन् मी कामावरून येताना तिला घेऊन येत जाईन.’’

‘‘म्हणजे मिनीचं माझ्याबरोबर राहणं तुला आवडत नाही का?’’ कोमल उदासपणे म्हणाली. तिचे डोळे भरून आले.

तिच्या खांद्यावर हात ठेवून दिव्यानं म्हटलं, ‘‘असं नाहीए गं! तुला हवा तेवढा वेळ तू मिनीबरोबर घालव. पण मला  असं वाटतं की माणसानं नेहमीच आत्मनिर्भर राहावं. स्वावलंबी असावं. मी नोकरी करते त्या मागचं कारणही हेच आहे. माझ्या नवऱ्याचे तीन तीन फार्म हाउसेस आहेत. मी आरामात घरी बसून खाऊ शकते. पण मला ते नाही आवडत. स्वत: कमावण्याचं सुख आणि आनंद वेगळाच असतो.’’

कोमलला तिचं बोलणं पटलं. स्वत: नोकरी करावी असं तिलाही वाटू लागलं अन् लवकरच तिला संधीही मिळाली.

दिव्याच्या ऑफिसमधली एक मुलगी आजारी पडली. दिव्यानं बॉसला विचारून कोमलला त्या जागी नोकरीला लावलं. कोमलचा आवाज रेडिओसाठी फारच योग्य होता. तिनं थोडं प्रशिक्षण घेतलं अन् लवकरच ती रेडियोची लोकप्रिय आर्टिस्ट ठरली. तिला रेडियोवर परमनंट नोकरी दिली गेली. या काळात आकाशनंही तिला प्रोत्साहन दिलं. ती आता अगदी आनंदात होती. त्याचवेळी तिला समजलं की ती आई होणार आहे. डॉक्टरांनी तिला जुळं होणार हेही स्पष्टपणे सांगितलं.

आता नोकरी की कुटुंब हा प्रश्न होता. कोमलनं कुटुंबाला प्राधान्य दिलं. बॉसला अडचण सांगितली अन् नोकरीचा राजिनामा दिला. बॉसनं तिची अडचण समजून घेतली.

नऊ महिने पूर्ण झाले अन् कोमलनं जुळ्या मुलांना जन्म दिला. दोन देखणे राजकुमार कुशीत आले अन् कोमलचं मन आनंदानं, अभिमानानं भरून आलं.

सासर माहेरची मदत नसताना एकट्यानं दोन बाळांना वाढवताना कोमल थकून    जायची. पण आकाश तिला अजिबात मदत करत नसे. कोमल आपल्याच विश्वात दंग होती. तिला आकाशमधला बदल पटकन् जाणवला नाही. तो हल्ली खूपच वेळ ऑफिसात असायचा. बरेचदा तो ऑफिसच्या टूरवर असायचा. कोमलनं स्वत:चीच समजूत घातली की कदाचित बाळाच्या वाढत्या खर्चामुळे तो ऑफिसमध्ये जास्त काम करत असेल. पण तरीही दोन्ही बाळांना त्यानं कधी जवळ घेतलं नाही की कोमलची कधी काळजी घेतली नाही. तो असा कसा वागतो तेही तिला समजत नव्हते. मुलं झाल्यावर नवराबायकोतलं प्रेम अधिकच वाढतं असं ती ऐकून होती. पण इथं तर उलटाच अनुभव येत होता.

आता कोमलला लक्षात आलं होतं की आकाशला तिचा स्पर्शही नको असतो. बघताबघता बाळं पाच वर्षांची झाली. पण आकाश मात्र त्यांच्यापासून दूरदूरच होता. मधल्या काळात कोमलला आकाशबद्दल काहीबाही ऐकायला येत होतं. पण तिचं भाबडं मन त्यावर विश्वास ठेवत नव्हतं.

एक दिवस दिव्यानं तिला म्हटलं, ‘‘तुला एक आमंत्रण आहे. ‘रेडिओ प्रेझेंटशन’चा एक कार्यक्रम होता. नव्या जुन्या सर्व आर्टिस्ट कर्मचाऱ्यांना आमंत्रण होतं. आकाश ऑफिसच्या दौऱ्यावर होता. तिनं मुलांना पाळणाघरात सोडलं आणि ती छान आवरून तयार झाली आणि दिव्याबरोबर हॉटेल सूर्यात पोहोचली. पार्टीला नुकतीच सुरूवात झाली होती, तेवढ्यात तिला आकाश एका मुलीबरोबर दिसला. तो इथं कसा? ऑफिसच्या टूरवर होता ना? ती त्याच्या मागे धावली. तोपर्यंत लिफ्टचा दरवाजा बंद होऊन ती वर निघून गेली होती. तिनं रिसेप्शनिस्टकडे चौकशी केली. तर मिस्टर आणि मिसेस आकाशच्या नावानं रूम नंबर ५०१ बुक केली होती. कोमलला एकदम घेरीच आली.’’

तेवढ्यात तिला शोधत आलेल्या दिव्यानं तिला सावरलं. तोंडावर पाणी मारून सावध केलं. तिला पार्टीत नेलं.

कोमलचे जुने बॉस तिला बघून खुश झाले. म्हणाले, ‘‘कोमल लोक अजूनही तुझी आठवण काढतात. तुला वाटेल तेव्हा तू परत ये नोकरीवर. यू आर मोस्ट वेलकम.’’

कशीबशी पार्टी आटोपून घरी पोहोचली अन् धाय मोकळून रडू लागली. काय दोष होता तिचा म्हणून आकाश असं वागत होता? तो सरळ वेगळा होऊ शकला असता. पण अशी फसवणूक? का म्हणून? तिनं आकाशला फोन केला. तो बंद होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश घरी आला. कोमलनं टूरबद्दल विचारलं तर थोडा भांबावला अन् हॉटेल सूर्यात कुणा स्त्रीबरोबर रूमनंबर पाचशे एकमध्ये गेल्याचं तिच्या तोंडून ऐकल्यावर चिडून तो अद्वातद्वा बोलू लागला. तिलाच दूषणं दिली अन् घराबाहेर निघून गेला.

कोमलला खात्रीच पटली. आता आकाशच्या आयुष्यात तिला स्थान नव्हतं. दोन मुलांच्या पित्याचा मान तिनं त्याला दिला होता. तिला वाटलं तो तिला अभिमानानं मिरवेल त्या उलट त्यानं तिला त्याच्या आयुष्यातून हाकलून लावलं होतं. कोमलनं परोपरीनं प्रयत्न केले, विनवलं, मुलांची शपथ घातली. भांडली, धमकीही दिली पण तो मख्ख होता. त्यानं एकच वाक्य म्हटलं, ‘‘तुला मुलांचा खर्च देतो पण माझ्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस.’’

कोमलला खूपच अपमान वाटला. ती आता माहेरीही जाणार नव्हती. कोर्टातून रीतसर डायव्होर्स घ्यायचा. मुलांना आपलंच नांव लावायचं अन् त्यांना स्वाभिमानानं वाढवायचं. नव्यानं आयुष्य सुरू करायचं.

तिला बॉसचे शब्द आठवले. ‘‘यू आर मोस्ट वेलकम.’’ तिनं फोन केला. नोकरी मिळेल का विचारलं. त्यांनी आनंदाने होकार दिला. ‘‘यू आर मोस्ट वेलकम.’’

शांतपणे बसून कोमलनं खूप विचार करून निर्णय घेतला. इतक्यात घर सोडायचं नाही. नोकरी सुरू करायची. आयुष्याची विखुरलेली, विस्कटलेली पानं गोळा करून पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करायचं. स्वत:ला सिद्ध करायचं. रडत कुढत बसायचं नाही. ताठ मानेने स्वाभिमानानं जगायचं.

एकच वाटत होतं…पुढे मागे आकाशला पश्चात्ताप झाला अन् तो परत आला तर? त्यानं क्षमा मागितली तर ती त्याला क्षमा करू शकेल? तेवढा एकच प्रश्न तिला छळत होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें