५ टीप्स सुखी वैवाहिक जीवनासाठी

* रीना जैस्वार

अरेंज्ड किंवा लव्ह, लग्न कसेही झाले तरी, सासरच्या लोकांमध्ये आपसांतील मतभेद, वैचारिक मतभेद यासारख्या तक्रारी ही घर-घरची कथा आहे, कारण आपल्या समाजात लग्न फक्त २ व्यक्तींचे नाही तर २ कुटुंबांचे असते, जिथे लोक एकमेकांच्या विचारांबद्दल आणि स्वभावाबद्दल अनभिज्ञ असतात. आजकाल मुलं-मुली लग्नाआधी एकत्र येतात आणि एकमेकांना समजून घेतात, पण कुटुंबातील बाकीच्या सदस्यांना समजून घेण्याची संधी लग्नानंतरच मिळते. ज्याप्रमाणे सून सासरचे लोक कसे असतील याबाबत संभ्रमात असते, त्याचप्रमाणे सासरचे लोकसुद्धा सूनेच्या वर्तणुकीबद्दल अनभिज्ञ असतात. सासरी पती व्यतिरिक्त, सासू-सासरा, नणंद, दीर, जेठ-जेठाणीसह अनेक महत्त्वाची नाती आहेत.

जर ४ लोक एकाच छताखाली राहत असतील, तर वैचारिक संघर्ष होणे स्वाभाविक आहे, परंतु जेव्हा तो आवश्यकतेपेक्षा जास्त वाढतो, तेव्हा संबंधांमध्ये कटुता येते.

आपापसांतील मतभेदाची कारणे

जनरेशन गॅप, कल्पना लादणे, अधिकार गाजविण्याची मानसिकता, वाढत्या अपेक्षा, पूर्वग्रह, आर्थिक समस्या, फसवणुकीला बळी पडणे, प्रेमात फूट पडण्याची भीती इत्यादी कारणांमुळे संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. कधी-कधी स्वत: नवरासुद्धा सासू-सुनेमध्ये दुरावा निर्माण होण्याचे कारण बनतो. या सगळयांशिवाय आजकाल सासू-सुनेच्या नात्यावर आधारित टीव्ही मालिकाही आगीत तेल टाकण्याचे काम करत आहेत.

विवाहित अंजली म्हणते, ‘‘घरात पती आणि २ मुले वगळता सासू, नणंद, दीर, जेठ-जेठाणी आणि त्यांची मुले आहेत. घरात अनेकदा एकमेकांमध्ये भांडण आणि दुराव्याचे वातावरण असते, कारण सासू-नणंदेला वाटते की आम्ही सूना म्हणजे फक्त काम करणारी यंत्रे आहोत. आमचे हसणे-बोलणे त्यांना काट्यासारखे टोचत असते. परिस्थिती अशी आहे की कुटुंबातील सदस्य आपापसात बोलतही नाहीत.’’

मुंबईतील सोनम म्हणते, ‘‘माझ्या लग्नाला एक वर्ष झाले आहे. माझ्या लक्षात आले आहे की माझे पती एकतर आईचे ऐकतात किंवा आमच्यातील मतभेदांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, जे मला योग्य वाटत नाही. पती हा पत्नी आणि घरातील इतर सदस्यांमधील दुवा आहे, जो दोन्ही पक्षांना जोडतो. तो जरी कोणत्याही एका बाजूचे समर्थन करत नसेल, परंतु योग्य-अयोग्यबद्दल एकदा त्याने अवश्य विचार केला पाहिजे.’’

त्याचप्रमाणे ५० वर्षीय निर्मला म्हणते, ‘‘घरात सून तर आहे पण ती फक्त माझ्या मुलाची पत्नी आहे. तिला पती आणि मुलांव्यतिरिक्त घरात इतर कोणीही दिसत नाही. त्या लोकांमध्ये ती इतकी व्यस्त असते की ती आमच्या जवळ येऊन तासभरही बसत नाही, ना आमच्या तब्येतीची चौकशीही करते. आम्ही तिच्या वागण्याने किंवा जीवनशैलीने कधीही आनंदी नसतो, ज्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. मुलींचा संदर्भ देत ती अनेकदा उलट उत्तर देते. अशा परिस्थितीत तिच्या असण्याने किंवा नसल्याने आम्हाला काही फरक पडत नाही.’’

लग्नानंतर नात्यांमध्ये आलेल्या अशा काही कटुता कशा दूर कराव्यात की जेणेकरून लग्नानंतरही नेहमी आनंदी राहता येईल, त्यासाठी येथे काही टीप्स दिल्या आहेत :

अंतर कसे मिटवायचे : मानसोपचारतज्ज्ञ डॉ वृषाली तारे सांगतात की संयुक्त कुटुंबात आपापसात गोडवा असणे फार महत्वाचे आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा राखण्याची जबाबदारी कोणत्याही एका व्यक्तीची नाही, तर घरातील सर्व सदस्यांची असते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने समान प्रयत्न केले पाहिजेत.

विचारांमध्ये पारदर्शकता आणा : डॉ. वृषालीच्या मते, कुटुंबात एकमेकांमध्ये जास्तीत जास्त संवाद असावा, जो समोरासमोर असावा, डिजिटल नसावा. दुसरी गोष्ट एकमेकांच्या मतांमध्ये पारदर्शकता असावी जी कोणत्याही मजबूत नात्याचा पाया असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही लग्नानंतरही काम करत असाल किंवा कुठेतरी बाहेर जात असाल, तर घरी पोहोचताच लवकर किंवा उशिरा येण्याचे कारण, कार्यालयातील दिवस कसा राहिला यासारख्या छोटया-छोटया गोष्टी कुटुंबातील सदस्यांसह शेअर करा. यामुळे घराचे वातावरण हलके होईल तसेच एकमेकांवरील विश्वास वाढेल.

मेंटल प्रोटेस्ट टाळा : आजकालची सर्वात मोठी समस्या अशी आहे की आपण आधीच आपल्या मनात अशी धारणा बनवून चुकलो असतो की सून कधीही मुलगी होऊ शकत नाही, सासू कधीच आई होऊ शकत नाही. अशा नकारात्मक विचारांना मेंटल प्रोटेस्ट म्हणतात. असे अनेकदा दिसून येते की सुनांची मानसिकता अशी असते की घरी त्यांच्या वाट्याचे काम पडले असेल. सासू, नणंद नक्कीच काहीतरी बोलतील. अशा विचारसरणीचा संबंधांवर वाईट परिणाम होतो आणि याच विचारसरणीसह लोक संबंध सुधारण्याचा प्रयत्नही करत नाहीत. त्यामुळे अशा नकारात्मक विचारांच्या वर्तुळातून बाहेर पडणे आणि एकमेकांमधील वाढते अंतर कमी करणे आवश्यक आहे.

समुपदेशकाची मदत घ्या : डॉ. वृषाली तारे म्हणतात की संयुक्त कुटुंबात किरकोळ वाद, वैचारिक मतभेद सामान्य गोष्ट आहे, जे संवाद, प्रेम आणि संयमाने सोडवता येतात आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचे शरीर आणि मन निरोगी असेल. पण जर प्रकरण गंभीर असेल तर घरातील सर्व लोकांनी संकोच न करता समुपदेशकाची मदत घ्यावी. बहुतेक नात्यांमध्ये कटुतेचे कारण मानसिक अस्वस्थता असते, जी लोकांना समजत नाही.

रूढीवादी मानसिकतेतून बाहेर पडा : विज्ञान आणि आधुनिकतेच्या काळात रूढीवादी चालीरीतींमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. घरातील सदस्यांच्या राहणीमानात आणि जीवनशैलीत झालेले बदल स्वीकारा, कारण एकमेकांवर विचार लादण्याने कधीही नात्यात गोडवा येऊ शकत नाही. सहिष्णुता आणि आदर देणे ही केवळ तरुणांची जबाबदारी नाही, तर वडिलधाऱ्यांमध्येदेखील ही भावना असली पाहिजे, अधिकार गाजविण्याऐवजी किंवा कल्पना लादण्याऐवजी व्यक्तीला नात्यापेक्षा अधिक महत्त्व द्याल तर संबंध आपोआप सुंदर होतील.

हे उघड आहे की नातेसंबंधांमध्ये मोकळेपणा आणि आपलेपणा यायला वेळ लागतो, परंतु नातेसंबंध असेच बनत नाहीत. यासाठी संस्कार आणि संगोपन महत्वाचे मानले जातात, कधीकधी योग्यवेळी योग्य विचार करणेदेखील खूप महत्वाचे असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें