चला, पुन्हा एकदा

कथा * गरिमा पंकज

‘‘काहीतरी नक्कीच होते आपल्या दोघांमध्ये… आजही तुला बघून मनाच्या तारा आपसूकच छेडल्या जातात…’ नेहाकडे पाहताच अमितच्या तोंडातून नकळतच शब्द बाहेर पडले. मोकळे सोडलेले केस, टपोरे डोळे, कपाळावर उभी टिकली आणि डोळयांत कितीतरी प्रश्न… आपल्या साडीचा पदर सावरत नेहाने वळून पाहिले आणि त्याचवेळी दोघांची नजरानजर झाली.

अमित एकटक तिला पाहतच राहिला. नेहाच्या नजरेनेही क्षणात त्याला ओळखले होते. अमितला काहीतरी बोलायचे होते, पण नेहाने स्वत:ला सावरले आणि आपले लक्ष दुसरीकडे वळवले.

अमितला असे वाटले की, क्षणभर मिळालेला आंनद दुसऱ्याच क्षणी हरपला. नेहाने नजर चोरत पुन्हा त्याच्याकडे पाहिले. अमित अजूनही तिच्याकडेच बघत होता.

‘‘हॅलो नेहा,’’ अमितला रहावले नाही. तो तिच्या जवळ गेला.

‘‘हॅलो, कसे आहात?’’ दबक्या आवाजात नेहाने विचारले.

‘‘जसे सोडून गेली होतीस,’’ अमितने उत्तर दिले. ते ऐकून नेहाने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाली, ‘‘असे अजिबात वाटत नाही. थोडे जाड झाला आहात.’’

‘‘हो का?’’ असे म्हणत अमितही हसला.

दोघेही जवळपास ४ वर्षांनंतर एकमेकांना भेटले होते. ४ वर्षांपूर्वी असेच स्टेशनवर येऊन नेहाला गाडीत बसवून अमित तिच्यापासून वेगळा झाला होता. नेहा त्याच्या आयुष्यातून दूर जात होती. अमितला तिला थांबवायचे होते, पण दोघांचा स्वाभिमान आडवा आला. ती माहेरी जात होती. दोघांनाही माहीत होते की, ती कायमची जात आहे. पुन्हा परत येणार नाही. त्यानंतर २ महिन्यांच्या आतच घटस्फोटाची कागदपत्रे अमितला मिळाली. दीर्घ कायदेशीर कार्यवाहीनंतर दोघांच्या जीवनाचे मार्ग वेगळे झाले.

‘‘चहा घेणार की कॉफी?’’ मनात दाटून आलेल्या जुन्या आठवणींना आवर घालत अमितने विचारले.

‘‘हो, कॉफी घेईन. तुम्ही मात्र चहा घ्याल ना? पण मला कॉफीच प्यायला आवडेल.’’

‘‘हो, चालेल. लगेच घेऊन येतो.’’

नेहा कॉफी आणायला गेलेल्या पाठमोऱ्या अमितकडे बराच वेळ पाहत होती. घटस्फोटानंतर तिने लग्न केले होते, पण अमित अजूनही एकटाच राहत होता. नेहा त्याच्या मनात अजूनही कायम होती. नेहासोबतही असेच काहीसे घडले होते, पण लग्नानंतर सर्व बदलते. तसेच नेहालाही बदलावे लागले.

‘‘कशी आहेस? सर्व सुरळीत सुरू आहे ना?’’

अमित चहा आणि कॉफी घेऊन आला होता. नेहाच्या जवळ बसून त्याने असे विचारताच दीर्घ श्वास घेत नेहा म्हणाली, ‘‘सर्व ठीक सुरू आहे, पण सध्या माझ्या तब्येतीबाबत मी थोडीशी काळजीत आहे.’’

‘‘का? काय झाले तुला?’’ काळजीच्या स्वरात अमितने विचारले.

‘‘काही नाही. थोडासा दम्याचा त्रास आहे. श्वास घेणे अवघड होते.’’

‘‘सध्या कोरोना संसर्ग पसरत आहे. त्यामुळे तुला जास्त काळजी घ्यायला हवी.’’

‘‘हो, काळजी तर घेतेच. डेहराडूनमध्ये २ दिवसांचे काम आहे. त्यानंतर नागपूरला जायचे आहे. सध्या सुजय नागपूरमध्येच रहायला गेले आहेत.’’

‘‘हो का? मीही कामानिमित्त दिल्लीला आलो होतो. मलाही कोटाला माघारी जायचे आहे.’’

‘‘माझी ट्रेन सकाळी ६.४०ची आहे. अमित, जरा तुम्ही पाहा ना, ट्रेन कधी येईल? स्टेशन मास्तरांना विचारून या ना? ट्रेन वेळेत येईल की उशिराने?’’

‘‘हो, लगेच विचारून येतो,’’ असे सांगून अमित निघून गेला.

चौकशी केल्यावर समजले की, लॉकडाऊन जाहीर झाले आहे आणि त्यामुळे ट्रेन रद्द करण्यात आली आहे. नेहा घाबरली. ‘‘आता काय होईल? ट्रेन कधी सुरू होणार?’’

‘‘नेहा, अगं आतापर्यंत एवढेच समजू शकले आहे की, ३१ मार्चपर्यंत सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व काही बंद केले आहे. लॉकडाऊनमुळे ट्रेनवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.’’

‘‘अरे बापरे, मग आता मी कुठे जाणार? असे कसे झाले? हॉटेल सुरू आहेत की नाहीत?’’

नेहा घाबरली होती. तिला शांत करीत अमित म्हणाला, ‘‘नेहा, काळजी करू नकोस. माझ्या चुलत भावाचे येथे जवळच घर आहे. सध्या तो मुंबईत नोकरी करतो. त्यामुळे घराची चावी माझ्याकडे देऊन ठेवली आहे. मला अनेकदा कामानिमित्त येथे यावे लागते. त्यावेळी मी त्याच्याच घरात राहतो. तूही माझ्यासोबत तिथेच रहा. एवढा तरी विश्वास आहे ना माझ्यावर?’’

‘‘ठीक आहे, चला,’’ नेहा अमितसोबत निघाली.

अमित तिला चुलत भावाच्या घरी घेऊन आला. एका बेडरूमच्या त्या घराला मोठी बाल्कनी आणि एक झोपाळाही होता. छोटीशी बागही होती. तिथे सुंदर झाडे लावली होती. घर छोटेसेच होते, पण फारच सुरेख होते.

अमितसोबत घरात येताच नेहाने तिचा नवरा सुजयला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. बिकट परिस्थितीत पूर्वाश्रमीच्या पतीची मदत घेऊन त्याच्यासोबत त्याच्या घरी थांबण्याच्या नेहाच्या निर्णयावर सुजयने कुठलाच आक्षेप घेतला नाही. उलट ती सुरक्षित असल्याचा त्याला आनंद झाला.

‘‘अमित, तुमचे आभार,’’ नेहाने घर न्याहाळत म्हटले.

‘‘तू फ्रेश हो. मी जेवण बनवायला घेतो. आज तू माझी पाहुणी आहेस ना?’’

‘‘अरे वा, म्हणजे तुम्ही जेवण बनवणार? जेव्हा आपण सोबत राहत होतो तेव्हा स्वयंपाकघरात डोकावूनही बघत नव्हता.’’

‘‘नेहा मॅडम, वेळ आणि परिस्थिती खूप काही शिकवते. तू माझ्या हातचे जेवून तर बघ. बोटंही चाटशील.’’

‘‘फारच छान. बोलण्यात तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही,’’ मनात नसतानाही नेहाच्या मनातील जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या.

लगेचच विषय बदलत नेहा म्हणाली, ‘‘अमित, तुमच्यात खूपच चांगले बदल घडले आहेत.’’

‘‘धन्यवाद,’’ असे म्हणत अमित हसतच कामाला लागला. त्याने खरोखरंच स्वादिष्ट जेवण बनवले.

नेहा आवडीने जेवली. थोडा वेळ गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर झोपायची वेळ अली. बेडरूम एकच होता. अमितने पलंगाकडे बघत सांगितले, ‘‘नेहा, तू येथे आरामात झोप.’’

‘‘तुम्ही कुठे झोपणार?’’

‘‘माझे काय? मी बाहेरच्या सोफ्यावरही झोपू शकतो.’’

‘‘ठीक आहे.’’

नेहा आरामात पलंगावर पहुडली. तिच्या डोळयावर प्रचंड झोप होती. ती खूपच थकली होती. तरीही रात्रभर झोपू शकली नाही. नुसतीच कूस बदलत होती. मनात काही कडू तर काही गोड आठवणी फेर धरून नाचत होत्या. अमितची मनस्थितीही काहीशी नेहासारखीच होती. सकाळी ८ वाजता नेहा उठली. तिने पाहिले की, अमित अंघोळ उरकून स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होता.

‘‘अरे वा, अगदी गृहिणीसारखेच काम करीत आहात.’’

‘‘बायको सोडून गेली की, हीच वेळ येते मॅडम.’’

अमितने हसत सांगितले. नेहा बागेत गेली. अमित चहा घेऊन तेथे गेला. चहा पित नेहा म्हणाली, ‘‘अमित मला हे आवडलेले नाही. आधीच सांगून ठेवते, दुपारचे आणि रात्रीचे जेवणही मीच बनवणार. तुम्ही फक्त भांडी धुवा.’’

‘‘जशी तुझी आज्ञा,’’ असे अमित हसतच म्हणाला.

अशा प्रकारे दोघेही लॉकडाऊनच्या काळात एकमेकांची मदत करीत वेळ निभावून नेत होते. अमित शक्य तेवढी सर्व कामे स्वत:च करीत असे. त्याला नेहाच्या तब्येतीची काळजी वाटत होती. तो नेहाला केरकचरा काढणे किंवा साफसफाईच्या कामांना हात लावू देत नव्हता.

एके दिवशी भल्या पहाटेच नेहाची तब्येत खूपच बिघडली. नेहाने सांगितले की, तिचे इनहेलर हरवले आहे. अमित लगेचच धावपळ करीत बाजारात गेला. खूप शोधाशोध केल्यानंतर त्याला मेडिकलचे एक दुकान उघडे दिसले. तेथून इनहेलर आणि इतर औषधे घेऊन तो धावतच घरी आला. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. नेहाची तब्येत खूपच बिघडली होती. मात्र वेळेवर इनहेलर मिळाल्याने तिला थोडे बरे वाटले.

तोपर्यंत अमितने एका भांडयात पाणी गरम केले. त्यात लॅवेंडर तेलाचे ५-६ थेंब टाकले. ते भांडे नेहाला आणून दिले आणि तिला ५-१० मिनिटे वाफ घ्यायला सांगितले. यामुळे नेहाला खूपच बरे वाटले.

त्यानंतर अमितने एक ग्लास गरम पाण्यात मध घालून ते नेहाला प्यायला दिले. हळूहळू नेहाला बरे वाटू लागले. अमितने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत सांगितले, ‘‘आजपासून रोजच तुला मध किंवा हळद घातलेले गरम पाणी प्यावे लागेल. त्यामुळे तुला बरे वाटेल.’’

नेहाच्या लक्षात आले होते की, अमितचे खरोखरंच तिच्यावर खूप प्रेम आहे आणि वेगळे झाल्यानंतरही त्याचे मन तिच्यातच गुंतलेले आहे. पण ही गोष्ट लक्षात यायला उशीर झाला होता.

ती अमितच्या जवळ येऊन बसली आणि त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, ‘‘मला माझा भूतकाळ पूर्णपणे विसरायचा आहे. आजपासून मी फक्त तुमच्यासोबत घालवलेले चांगले क्षण लक्षात ठेवेन, खरंच!’’

‘‘नेहा, कोण म्हणते की पूर्वाश्रमीचे पतीपत्नी चांगले मित्र होऊ शकत नाहीत? तू आयुष्यात खूप पुढे निघून गेली आहेस. आपले जुने नाते आता पुन्हा जुळले जाऊ शकत नाही. तरीही मैत्रीचे नवे नाते आपल्यात नक्कीच निर्माण होऊ शकते. हो ना?’’

त्या दिवशी पहिल्यांदाच एकमेकांना मिठी मारून दोघेही आनंदाने रडले.

दुसऱ्या दिवशी नेहा एक फूल घेऊन अमितजवळ आली.

‘‘हे काय?’’ तो गोंधळला.

‘‘फूल आहे, गुलाबाचे…’’

‘‘ते दिसतेय, पण आज या गरिबावर इतकी मेहेरबानी कशासाठी?’’

‘‘कारण आजच्याच दिवशी आपण एकमेकांना पहिल्यांदा भेटलो होतो. विसरलात का?’’ लडिवाळपणे पाहत नेहाने विचारले.

‘‘अरे हो, आठवले. आजचा दिवस तुझ्या लक्षात आहे?’’

‘‘हो! चला, आजचा दिवस खास बनवूया.’’

‘‘नक्कीच.’’

त्यानंतर दोघांनी मिळून फुलांनी घर सजवले. बगिच्यात टेबल आणि खुर्ची मांडून दुपारचे जेवण केले. एकमेकांच्या आवडीचे कपडे घातले. जेवणात एकमेकांच्या आवडीचेच पदार्थ होते. एक सांगत असे आणि दुसरा स्वयंपाकघरातून तो पदार्थ घेऊन येत असे. दोघांनी ती पहिली भेट आठवत एकमेकांसाठी गाणे गायले. शेरोशायरी केली. एकमेकांना भेटवस्तू दिल्या. भरपूर गप्पा मारल्या आणि त्यानंतर कधीतरी एखाद्या संध्याकाळी पुन्हा भेटू, असे वचन एकमेकांना दिले.

हे सर्व त्यांनी इतक्या आवडीने आणि मैत्रीच्या नात्याने केली की, त्यामुळे तो दिवस त्यांच्यासाठी खास ठरला.

रात्री नेहाने आपल्यासोबतच झोपायला अमितला सांगितले आणि म्हणाली, ‘‘आज मला एक सुंदर चूक करायची आहे. फक्त आजच्याच दिवशी माझ्या मित्रासाठी मी माझ्या नवऱ्याशी प्रतारणा करणार आहे.

अशा प्रकारे दोघांच्याही जीवनात लॉकडाऊनचा तो संपूर्ण दिवस आयुष्यभरासाठीच्या आठवणीत राहिला. जुने गैरसमज, नात्यातील कटुता दूर झाली होती. एकमेकांवर काहीही हक्क राहिला नसतानाही दोघे एकमेकांसाठी काहीही करायला तयार होते. एक वेगळेच नाते निर्माण झाले होते, ज्याने त्या अडचणींच्या दिवसांतही त्यांना वेगळयाच रंगात रंगवून टाकले होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें