सांझ की दुलहन – पहिला भाग

दिर्घ कथा * मीना गोगावले

(पहिला भाग)

‘‘कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुलहन बदन चुराए, चुपके से आए, मेरे खयालों के आंगन में…’’ गाणं गुणगुणतच राजन बाथरूममधून बाहेर आला अन् म्हणाला, ‘‘वहिनी, माझा ब्रेकफास्ट…मला लवकर जायचंय आज.’’

त्याच्याकडे बघत हसून राधिकेनं म्हटलं, ‘‘काय भाऊजी? विशेष खुशीत दिसताय?

हल्ली रोजच ‘सांझ की दुलहन’ आठवतेय तुम्हाला?’’

‘‘काही नाही गं, रेडियोवर ऐकलं अन् सहज गुणगुणलो.’’

‘‘एखादं गाणं गुणगुणावसं वाटतं त्याचं काय कारण असतं माहीत आहे?’’

‘‘मला नाही माहीत,’’ काहीशा बेपवाईनं राजननं उत्तर दिलं.

‘‘याचा अर्थ असा की गाण्याचे शब्द तुमच्या हृदयात खोलवर झिरपले आहेत. एखादं गाणं जेव्हा नकळत ओठांवर येतं, तेव्हा मनात ती प्रतिमा आधीच तयार झालेली असते.’’

‘‘काही तरीच काय वहिनी…तू ही ना…’’

‘‘ऑफिसात कुणी बघून ठेवली आहे का? असेल तर मला सांगा, मी सांगते तुमच्या दादांना. ठरवून टाकूयात लग्न.’’

‘‘नाहीए गं कुणी, असती तर सांगितलंच असतं ना?’’

‘‘खरं?’’

‘‘अगदी खरं!’’ हसून राजननं म्हटलं अन् तिच्याकडे बघत म्हणाला, ‘‘एक सांगू?’’

‘‘सांग ना.’’

‘‘वहिनी, मला ना, सांझ की दुलहनच पाहिजे.’’

‘‘आता ती कशी असते बाई? आम्ही तर अशी कुणी नवरी बघितलीच नाहीए?’’

‘‘खूप खूप सुंदर! उतरून येणाऱ्या सायंकाळसारखी शांत, सर्व प्रकाश आपल्यात समावून घेतलेली, डोंगरामागे दडणाऱ्या सूर्याच्या सावळ्या प्रकाशासारखी, पानांमधून डोकावणाऱ्या कवडशांसारखी, रात्रीच्या चमचमणाऱ्या आकाशासारखी, डोळ्यातल्या स्वप्नासारखी…अतिशय सुंदर…!!’’

‘‘म्हणजे थोडक्यात तुम्हाला कवितेशी लग्न करायचंय.’’

‘‘कविता नाही वहिनी. ती प्रत्यक्षात असणार आहे. जशी सोनेरी गुळाबी संध्याकाळ स्वप्नातली असूनही प्रत्यक्षात असतेच ना? मला तिच हवीय, हुंडा नाही, मानपान नाही, काही नको.’’

‘‘म्हणजे तुम्ही शोधताय?’’

‘‘नाही, अजून तसं काहीच नाही.’’

‘‘मग?’’

‘‘आता तर फक्त मिटल्या डोळ्यातून डोकावते.’’

‘‘असं  मग काय म्हणते? सांगा की…’’

‘‘काही नाही. फक्त येते अन् जाते, उद्या येते एवढं वचन देते.’’

‘‘भाऊजी, स्वप्नं बघायला लागलात…चांगला संकेत आहे. बाबांना सांगते,’’

नाश्त्याची बशी त्याच्या हातात देत राधिका हसून बोलली.

राधिकेचा दीर राजन खूपच संवेदनशील, अतिशय सज्जन, मनाचा निर्मळ अन् खूप प्रेमळ. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा. सगळ्या सोसायटीत राजनदादा म्हणून प्रसिद्ध. कॉलनीतले सगळेच त्याच्या ओळखीचे. वाटेत चालताना, भेटलेल्या कोणी, आजही अडचण सांगितली की राजननं त्याला मदत केलीच म्हणून समजा. अन् वर सहजपणे म्हणेल, ‘‘त्याला गरज होती, मी मदत करू शकत होतो…केली!’’

‘‘असे बरे भेटतात तुम्हाला चालता चालता?’’ राधिका म्हणायची.

‘‘भेटतात खरे!’’

‘‘भाऊजी मग ‘ती’ का नाही भेटत?’’

‘‘ती अशी नाही भेटायची वहिनी.’’

‘‘मग कशी भेटायची?’’

‘‘त्यासाठी तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चालता चालता साधी सामान्य माणसं भेटतात. पण वहिनी, ‘ती’? ती स्पेशल आहे ना?’’

इतके दिवस सगळे त्रस्त होते. राजन लग्नाला होकात देत नव्हता. लग्न करणारच नाही म्हणायचा. पण आज मात्र त्यानं त्याच्या मनातली गोष्ट सांगितली होती.

राजन ऑफिसला निघून गेला अन् राधिका विचार करू लागली की इतका निर्मळ मनाचा अन् भाबडा आहे हा मुलगा, त्याला हवंय तसं पवित्र सौंदर्य आजच्या काळात असेल का? कुठं अन् कशी शोधावी त्याच्या आवडीची ‘सांझ की दुलहन’?

तेवढ्यात तिचा नवरा शिबू खोलीतून बाहेर आला. ‘‘कसला विचार करतेस?’’ त्यानं विचारलं.

‘‘इतकी सुंदर अन् पवित्र कुठं मिळेल?’’

‘‘काय घ्यायचंय तुला? कसली खरेदी?’’

‘‘भाऊजींसाठी नवरी…सांझ की दुलहन’’

‘‘उगीच चेष्टा करू नकोस.’’

‘‘अहो, एवढ्यात सांगून गेलेत, त्यांना कशी नवरी हवी आहे ती. स्वप्नातल्या सांजवेळेसारखी सुंदर, आज तर तुमचा भाऊ अगदी कवीच झाला होता.’’

‘‘भाऊ कुणाचा आहे? अन् लाडका दीर कुणाचा आहे?’’ राधिकेकडे हसून बघत शिबूनं म्हटलं, ‘‘चला, काही तरी बोलला एकदाचा.’’

‘‘काहीतरी नाही, बरंच बोललेत.’’

‘‘तर मग शोध ना जे काही हवंय त्याला ते.’’

‘‘कुठून आणायची अशी परी? तिचे चोचले असणार? ते कुणी पुरवायचे?’’

‘‘दीर भावजय आहेत ना चोचले पुरवायला. त्यानं बघून ठेवलीय का?’’

‘‘नाही.’’

‘‘मग?’’

‘‘अजून कल्पनेतच आहे. पण ती प्रत्यक्षात येईल म्हणालेत.’’

‘‘मग एखाद्या कवीला गाठा, कविता लिहून घ्या अन् द्या त्याला दुलहन म्हणून.’’

‘‘अहो पण निदान आता लग्नाला होकार तरी दिलाय ना? प्रयत्न करायलाच हवेत.’’

‘‘तर मग करा प्रयत्न. येडाच आहे…मी निघालो कामावर?’’ अन् शिबू निघून गेला. हा आणखी एक येडा. सतत काम काम. थांबायचं नाव नाही. सतत उंच आकाशात भराऱ्या जमीनीवर येणं ठाऊकच नाही. कुणी अडवणारं नव्हतं. शिबूनं आपल्या कामाचा पसारा एवढा वाढवालाय की आता त्याला स्वत:साठी वेळ देता येत नाहीए.

राधिका त्या उंच उडणाऱ्या पक्ष्याकडे बघत होती. आता कधी तरी रात्रीच तो खूप उशिरा घरी परतणार…सायंकाळी परतणारे पक्षी वेगळेच असतात. शिबू चांगला होता, पण बायकोची काळजी घेणं त्याला जमत नव्हतं. त्याचा तो पिंडच नव्हता.

तेवढ्यात बाहेरून सासरे म्हणाले, ‘‘सूनबाई, दूधवाला आलाय.’’

‘‘हो बाबा…’’ तत्परतेनं पातेलं घेऊन राधिका बाहेर धावली. दूध घेतलं अन् म्हणाली, ‘‘बाबा, तुम्हीही नाश्ता करून घ्या.’’

‘‘मांड टेबलवर, आलोच.’’

त्यांना वाढता वाढता राधिकेनं म्हटलं, ‘‘बाबा, एक सांगायचं होतं…’’

‘‘बोल ना?’’

‘‘राजन भाऊजी लग्न करायला तयार झालेत.’’

‘‘अरे व्वा! कशी हवीये मुलगी?’’

‘‘खूप खूप सुंदर हवी आहे.’’

‘‘एवढंच ना? अगं वाटेल तेवढ्या सुंदर मुली आहेत. त्यानं फक्त पसंत करावी, बार उडवून देऊ. सूनबाई, तू ही आघाडी सांभाळ. मी ती सांभाळतो.’’ बाबांनाही एकदम उत्साह आला होता.

‘‘कधीपासून दुसऱ्या सुनेची वाट बघत होतो शिवाय…’’

‘‘शिवाय काय बाबा?’’

बाबा काहीच बोलले नाहीत.

राधिकाला कळत होतं. तिच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. अजून घरात बाळाची चाहूल लागली नव्हती. बाबांची तिच खंत होती.

बाबांकडे एक नातलग आले होते. ते म्हणाले, ‘‘अहो, मुलगी तुम्ही बघा, होकार द्यालच. एकदा त्यांच्या घरी जाऊन या.’’

बाबांनी त्या नातलगानं दिलेली माहिती राधिकेला दिली. राधिका सगळ्या घरादाराची काळजी घेते. सगळ्यांना आनंद वाटावा म्हणून झपाटते. तिच्या मनांत शंका आली. राजन खूपच भाबडा आहे अन् ही मुलगी हॉस्टेलला राहिलेली. घरात जमवून घेईल का?

रात्री उशिरा शिबू आल्यावर तिनं विषय काढला.

शिबूनं समजूत काढली, ‘‘होस्टेलला राहणारी प्रत्येक मुलगी लवंगी मिरची नसते गं! स्मार्ट असेल, कारण तिथलं वातावरणच तसं असतं…तू काळजी करू नकोस.’’

बाबांनी फर्मान काढलं, ‘‘आज सगळे अमुक अमुक ठिकाणी जाणार आहेत. राजन, तुलाही यावं लागेल.’’

राजननं काहीही न विचारता ‘हो’ म्हटलं. ‘खरंच किती साधा आहे, कुठं जाणार, कशाला जाणार एवढंही विचारलं नाही,’ राधिकेच्या मनात आलं.

त्यांच्या घरी गेले. मुलगी समोर आली…खरोखरच अप्रतिम लावण्य होतं. बघताच राधिका म्हणाली, ‘‘भाऊजी, सांझ की दुलहन, हीच आहे.’’

हसून राजननं संमती दिली.

इतर काही ठरवायचं नव्हतंच. पण बाबांनी ठामपणे एवढं मात्र सांगितलं, ‘‘आम्हाला काहीही नको, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, त्याचा राग मानू नये. आमच्या घरात मोठी सून आहे. सगळं घर ती कौशल्याने सांभाळते. तिच्यामुळेच घरात शांतता, सौख्य, समाधान अन् आनंद आहे. नव्या सुनेनं ते सौख्य, तो आनंद, समाधान कायम ठेवावं.’’

राधिका विचार करत होती, या सुंदरीनं स्वत:च्या हातानं कधी ग्लासभर पाणीही घेतलं नसेल…किती नाजूक आहे ही…नखशिखांत सौंदर्य आहे.

घरी आल्यावर एकदाच राधिकेनं म्हटलं, ‘‘एवढं हे सौंदर्य, हे लावण्य आपण सांभाळू शकू? ती छान काम करेल?’’

‘‘नाही केलं तर आपण करू,’’ सहजपणे राजन उद्गारला.

‘‘तिचे नखरे, कोडकौतुक, चोचले झेपतील आपल्याला?’’

‘‘मी करेन ना सर्व,’’ राजन म्हणाला.

शिबूनं म्हटलं, ‘‘राधिका, नको काळजी करूस.’’

बाबांनीही म्हटलं, ‘‘सूनबाई, सगळं राजनवर सोपव. ती अन् तो बघून घेतील.’’

दिवसभर कामानं क्षीणलेली राधिका अंथरूणावर पडली, पण झोप लागत नव्हती. एकच गोष्ट मनात येत होती, राजन फार सरळ मनाचा अन् भाबडा आहे. ही सुंदरी त्याला समजून?घेईल का?

लग्नघरात जोरात तयारी सुरू झाली. राधिकेलाच सगळं बघायचं होतं. प्रत्येक जण तिलाच हाक मारायचा. पायाला चक्र लावून ती फिरत होती. नवरानवरीच्या पोषाखाबद्दल चर्चा झाली.

बाबांना गंमत वाटायची. ते म्हणायचे, ‘‘मॉडर्न युग आहे, चालू द्या.’’

नवरीच्या साड्या खरेदी केल्यावर राजननं राधिकेला विचारलं, ‘‘वहिनी, तुझी साडी मी पसंत करू की दादा करेल?’’

‘‘तुमच्या दादानं यापूर्वी कधी काही पसंत केलं होतं तर आत्ता करतील?’’ राधिकेनं म्हटलं. तिच्या मनात आलं की शिबूनं तर एवढ्या वर्षांत कधी म्हटलं नाही की ही साडी तुला शोभून दिसतेय की या साडीत तू किती सुंदर दिसतेस…आतासुद्धा त्याला खरेदीला चल म्हटलं तर ‘‘तुम्हीच जा’’ म्हणाला अन् कामावर निघून गेला. नकळत तिचे डोळे पाणावले.

‘‘वहिनी, काय झालं?’’

‘‘काही नाही…चला माझी साडी निवडूयात.’’

दुकानदारानं बऱ्याच साड्या दाखवल्या, जरीची सुंदर काळी साडी राजननं निवडली.

‘‘नाही भाऊजी, लग्नात काळा रंग अशुभ मानतात.’’

‘‘कुणी सांगितलं?’’

दुकानदारही म्हणाला, ‘‘मॅडम हा रंग तर सध्या फॅशनमध्ये आहे. तुमच्या गोऱ्या रंगावर ती खूप खुलून दिसेल.’’

शेवटी एक काळी अन् एक हिरवीगार अशा दोन साड्या राजननं वहिनीसाठी खरेदी केल्या.

घरी परतताना राजन म्हणाला, ‘‘तुझं दु:ख मला कळतंय वहिनी. मी मात्र सुंदरीला सुखात ठेवणार आहे. तिच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत हे मी बघेन अन् आलेच अश्रू तर ओठांनी टिपून घेईन.’’

‘‘भाऊजी, तुम्ही खरोखर खूप चांगले आहेत.’’ उदास हसून राधिका म्हणाली.

‘‘वहिनी, तिला एकदा घरात येऊ दे, ती तुझी मैत्रीण म्हणूनच वागेल. तू तिची थोरली ताई असशील.’’

राधिकेला तर आता त्या संध्यासुंदरीचा हेवाच वाटायला लागला. पण ती खुशीत होती. घर पाहुण्यांनी गजबजलं होतं. सगळे राधिकेच्या व्यवस्थापनाचं कौतुक करत होते. त्यामुळे ती सुखावली होती. थोरली जाऊ म्हणून कामं करत मिरवतही होती. बाबांनी तीन दिवस सतत सनई चौघडा लावला होता. सनईच्या सुरातच नव्या सुनेनं उंबरठ्यावरचं तांदळाचं माप ओलांडून घरात प्रवेश केला. कुणीतरी म्हणालं, ‘‘सूनबाई तांदूळ उधळेल अन् राजननं ते गोळा करायचे.’’

राधिकेच्या मनात आलं तिला आधीच सांगायला हवं होतं, माप हळूच ढकलं…पण तो बोलली नाही.

काही दिवसातच राधिकेच्या मनातली शंका खरी ठरली. सुंदरी खरोखर राणीच होती. सकाळी दहा वाजता झोपून उठायची. बाबांना चोरून राजन तिला चहा करून द्यायचा.

बाबांनी सुंदरीला म्हटलं, ‘‘राधिकेला घरकामात मदत करत जा,’’ तरी ती असहाय्यपणे म्हणाली, ‘‘मला येत नाहीत कामं करायला…मी कशी करू? काही बिघडलं तर?’’

राधिकानं बाबांना सांगितलं, ‘‘असू देत बाबा, ती झोपूनच उठते किती उशीरा.’’

तिचं स्वर्गीय सौंदर्य कोमेजून जाऊ नये म्हणून राधिका तिला स्वयंपाकघरात येऊच देत नसे. तिच्या ते पथ्यावरच पडायचं. तिचे सगळे नखरे राधिका सहन करत होती.

सुंदरी घरात आल्यावर राधिकेला मैत्रीण मिळाली नाही, उलट ती अधिकच एकटी झाली. कारण आता राजनही सतत सुंदरीभोवती असायचा. पूर्वी राधिका आपलं सुखदु:ख त्याच्याजवळ बोलायची. स्वयंपाकघरात ती काम करत असताना तो तिच्याबरोबर गप्पा मारायचा. पण आता तो सुंदरीजवळ असायचा. आपलं सगळं वागणं राधिका सहन करते, तिच्या चुकाही ती सावरून घेते. तिला कधी कुणासमोर उघडं पडू देत नाही हे सुंदरीच्या लक्षात आलं होतं. त्याचा ती पुरेपूर फायदा घेत होती. घरातलं वातावरण बिघडत होतं. राधिका जिवाचा आटापिटा करून सगळं सांभाळत होती. वातावरण आनंदी राहावं म्हणून प्रयत्न करत होती. पण सुंदरीनं जणू घरातली शांतता भंग करण्याचा, घरातले नियम, मर्यादा मोडण्याचा चंगच बांधला होता. रोज मैत्रिणीबरोबर पार्टीला जायचं.

एक दिवस बाबांनी यावर आक्षेप घेतला.

‘‘मी करते त्यात वाईट काय आहे? माझ्या मैत्रीणींबरोबरच असते ना?’’ तिनं बाबांनाच उलट विचारलं.

‘‘राजनला विचारत जा.’’

राजननं हो म्हटलं.

तिचा घराबाहेर राहण्याचा वेळ वाढत होता. बाबांनी म्हटलं, ‘‘राजन, अरे इतकी सूट देणं किंवा तिनं एवढं स्वैरपणे वागणं बरोबर नाही. शेवटी ती घरातली सून आहे. तुझी वहिनीही आहे ना घरात? ती कधी अशी वागली नाही.’’

‘‘ठिक आहे बाबा, तिच्या मैत्रिणीबरोबरच जाते ना? तुम्ही नका टेंशन घेऊ…मी आहे?’’

‘‘तुला ठाऊक आहे का, यावेळी होस्टेलची मुलंही बरोबर आहेत?’’ बाबा जरा रागानंच म्हणाले.

पहिल्यांदाच, आयुष्यात पहिल्यांदाच राजननं बाबांना प्रत्युत्तर दिलं, ‘‘बाबा, ती होस्टेलमध्ये राहून शिकली आहे. मोकळ्या वातावरणात वाढली, वावरली आहे. तिला एकदम कसं नको म्हणू? हळूहळू समजेल तिला. मी समजावेन.’’

बाबा बोलले नाहीत. पण ते दुखावले गेले आहेत हे राधिकेच्या लक्षात आलं.

चहाचा कप घेऊन ती बाबांजवळ आली. कोमलपणे म्हणाली, ‘‘बाबा, सध्या नवी आहे ती. एखादं बाळ झालं की आपसूक घरात राहील. बघा तुम्ही…’’ तिनं चहाचा कप बाबांच्या हातात दिला. दोघंही एकमेकांकडे बघून हसली.          (क्रमश:)

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें