परफेक्ट बॅलेंस

कथा * आशा ताटके

‘‘नेहा, खूप दमलोय गं! एक कप गरमागरम चहा अन् त्याच्यासोबत झणझणीत कांदा भजी देशील का? जरा लवकर…फास्ट!’’ राजननं येताच सोफ्यावर पाय पसरून जवळजवळ लोळणच घेतली.

कसंनुसं हसत नेहानं राजनला पाण्याचा ग्लास दिला अन् ती त्याच्या शेजारीच बसली. ‘‘चहा अन् भजी करते मी, पण थोडा वेळ लागेल. भराभर नाही होणार आज.’’

‘‘का? सगळं ठीक आहे ना?’’ जरा नाराज होत राजननं विचारलं.

‘‘गेले काही दिवस मला थकवा वाटतोय. थोडी विश्रांती घ्यावीशी वाटतेय.’’

नवऱ्याची नाराजी जाणवल्यामुळे नेहानं अगदी थोडक्यात आपली अडचण सांगितली. गेली इतकी वर्षं तेच तर करतेय ती…समस्या कोणतीही असो, कुणाचीही असो, ती सोडवणं हे नेहाचं काम होतं. सगळं सुरळीत झाल्यावरच ती राजनला सांगायची. त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेचा ताण येऊ नये हाच तिचा प्रयत्न असायचा. त्यातच तिचं सुख सामावलेलं असायचं.

‘‘ठीक आहे, माझी नाजूक राणी, भजी नाही तर नाही, चहासोबत निदान बिस्किटं तर देशील?’’ राजननं टोमणा दिला अन् नेहाकडे अजिबात लक्ष न देता तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला.

नाजूक नेहाच्या मनाच्या आरशावर जणू काही दगड मारला असं वाटलं तिला. खळकन् मनाचा आरसा फुटला. पण नाजूक असली तरी गेली पंधरा वर्षं ती हा संसार एकटीनं सांभाळतेय. लहान मोठी कित्येक कामं परस्पर करते ती. त्यामुळे त्याची आच किंवा त्याचा त्रास राजनपर्यंत पोहोचत नाही. टपटपणारा बाथरूमचा नळ कधी नीट झाला, बंद पडलेला पंखा कधी फिरायला लागला, बाथरूममधलं छताचं लीकेज कसं थांबलं याचा राजनला पत्ताही लागत नसे. मुलांचं संगोपन, बँकेची, पोस्टाची, विम्याची कामं सगळं तिच तर बघते आहे. बाजारहाट, वाणसामान, विजेची, पाण्याची बिलं भरणं इतकं व्यवस्थित होतंय ते तिच्यामुळेच ना?

एवढंच नाही तर लहान मुलांच्या ट्यूशन्स करून ती घरबसल्या थोडा फार पैसाही मिळवत होती.

नवरा अन् मुलांच्या सुखासाठी तिनं आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. स्वत:ला पार विसरली होती ती. राजन जेव्हा तिला झाशीची राणी किंवा राणी चेनम्मा म्हणायचा, तेव्हा तिला स्वत:चाच अभिमान वाटायचा. या संसाराची ती राणी होती, हेच तिचं सुख होतं. त्यासाठी स्वत:च्या इच्छांचा, आवडीचा त्याग करावा लागला याचंही तिला काही फार वाईट वाटत नव्हतं. त्याबद्दल तिनं कधी तक्रार केली नव्हती. पण आज तिला फार वाईट वाटलं. तिला थकवा वाटतोय. अशक्तपणा जाणवतोय त्याची थोडीसुद्धा काळजी राजनला वाटू नये? स्वत:ला कमी समजणं ही तिची चूकच होती.

नेहानं चहा केला. बिस्किटं प्लेटमध्ये ठेवली.

हात काम करत होते. मन अन् मेंदू मात्र भरकटलेले होते.

‘‘व्वा! काय चहा केलाय माझ्या राणीनं.’’ चहाचा घोट घेतल्याबरोबर राजननं म्हटलं.

‘‘राणी म्हणे! आता करताहेत उगीचच खोटी खोटी प्रशंसा. माझ्या अशक्तपणाबद्दल अजूनही काही काळजी नाहीए…कारण माझे त्रास, माझी दु:खं कधी मी सांगितलीच नाहीएत ना.’’ ती मनातल्या मनात तणतणंत होती.

‘‘नीरू अन् उमेश कुठं आहेत?’’ राजनचा प्रश्न तिच्या कानात शिरलाच नाही.

‘‘ट्यूशनच्या मुलांचं कसं चाललंय?’’ त्यानं पुन्हा विचारलं.

‘‘छान चाललंय, परीक्षा जवळ आलीय. त्यामुळे जरा जास्त वेळ द्यावा लागतोय.’’ नेहानं म्हटलं.

एखाद्या रोपट्याप्रमाणे माणसाच्या हृदयालादेखील वेळोवेळी प्रेमाच्या पाण्यानं शिंपावं लागतं. काळजी अन् सहानूभुती असं खत ही अधूनमधून घालावं लागतं. नाहीतर रोपटं सुकतं, कोमेजतं, विशेषत: स्त्रीचं संवेदनक्षम हृदय तर प्रेमाच्या हलक्याशा थोपट्यानं उसळून येतं अन् अवहेलनेच्या घावाने वाळून शुष्क वाळवंट होतं.

‘‘बरोबर आहे. परीक्षेमुळे वेळ द्यावाच लागेल, पण एक बरं आहे की तुला बाहेर नोकरीसाठी जावं लागत नाही. घरबसल्या पैसे मिळतात तुला. रोज नोकरीसाठी बाहेर जावं लागलं असतं तर किती थकायला झालं असतं?’’ राजननं पुन्हा घाव घातला.

नेहाला हे असह्य झालं. ती म्हणाली, ‘‘घरातच करायला शंभर कामं असतात अन् बाहेरचीही पुन्हा मला करावी लागतात, तीही तेवढीच असतात. तुम्हाला कधी ते करावंच लागलं नाही, म्हणून माहीत नाहीए. कारण तुमच्यावर कुठल्याही कामाचा ताण येऊ नये म्हणून मीच जिवाचा आटापिटा करून सगळं करत असते. त्यामुळेच माझं थकणं, माझा अशक्तपणा तुम्हाला जड जातोय. शेवटी माझंही वय वाढतंय. पूर्वीसारखी मी कशी राहीन? पण नाही, तुम्हाला तर मी कायम ताजी, टवटवीत, प्रफुल्लीत हवी असते ना?’’ संताप अन् अपमानानं तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.

‘‘अगं, तू तर रागावलीस? मी असं काय बोललो? तू तर माझी झाशीची राणी आहेस ना?’’ राजननं तिला खुलावण्याचा प्रयत्न केला.

‘‘पुरे झालं? खोटं खोटं बोलणं. तुमचा चेक बँकेत भरला आहे अन् इन्शुरन्सवाल्यांना फोन करून झालाय.’’ नेहानं म्हटलं.

‘‘मॉडर्न स्त्री उगीचच कुणासाठी जीव जाळत नाही. स्वत:ला हवं तेच करते अन् स्वत:चं अस्तित्त्व समोरच्याला जाणवून देते.’’ नेहाचा स्वर जरा उंच लागला होता.

‘‘उगीच राईचा पर्वत करू नकोस नेहा. तूच काही एकटी स्त्री नाहीएस जी घरातली अन् बाहेरची कामं करतेस. या वाढत्या महागाईत प्रत्येक स्त्री काहीतरी करून पैसे मिळवतेच. घर, कुटुंब अन् बाहेरची कामं यांची योग्य सांगड घालणं मॉडर्न स्त्रीला सहजच जमतं. थोडं विचारपूर्वक नियोजन फक्त करायला हवं.’’ राजननं जणू आगीत तेल ओतलं.

‘‘तुम्हाला म्हणायचंय काय? माझी समजूत कमी पडते की मला जबाबदाऱ्या सांभाळता येत नाहीत? इतकी वर्षं सगळ्यांची सांगडच घालते आहे ना? तुम्हाला कधी कशाची झळ बसली की कुठं काही कमी पडलं? घरात बाहेर सगळीकडे बॅलेन्स करते आहे तरी…म्हणतात ना, घर की मुर्गी दाल बराबर…तसंच आहे हे.’’ नेहाला संताप आवरत नव्हता.

तेवढ्यात नीरू अन् उमेश आले. त्यामुळे विषय तिथंच थांबला. नेहानं त्यांना दूध दिलं. खायला घातलं अन् ती त्यांचा अभ्यास घेऊ लागली.

वातावरणात ताण होता. ‘‘मी जरा बाहेर फिरून येतो.’’ असं सांगून राजन बाहेर निघून गेला.

तसं बघितलं तर राजन अन् नेहाचा संसार तसा सुखाचा होता. थोडीफार वादावादी होते पण ती गरजेचीही असते. संसार त्याशिवाय अळणी वाटतो.

नेहाला राजनचा अभिमान होता. तो खूप कष्ट करत होता. महिन्यातून तीनवेळा तरी टूरवर असायचा. रात्री उशिरापर्यंत बसून प्रोजेक्टवर काम करायचा. नेहा त्याच्या सुखसोयींची जिवापाड काळजी घ्यायची. त्याच्या सुखात तिचं सुख होतं.

खरं तर राजनचंही तिच्यावर फार प्रेम होतं. पण प्रेम असणं अन् मनाच्या तळातून ते बाहेर येऊन समोरच्या व्यक्तिला जाणवणं यात फरक असतो. प्रेमाचे दोन शब्द, बरं वाटत नसताना सहानुभूती, केलेल्या कामाचं कौतुक आणि प्रशंसा एवढ्यानंही माणूस आनंदतो.

नेहा नेहमीच प्रसन्न, टवटवीत अन् हसतमुख असायची. त्यामुळे राजनला तिला तशीच बघायची सवय होती. तिनं कधीच कुठलीच समस्या, कुठलाच प्रॉब्लेम राजनला सांगितला नव्हता, त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट कशी कौशल्यानं हाताळते हे त्याला कळतच नव्हतं. आज प्रथमच तिनं तिची तब्येतीची तक्रार अगदी नकळत, अनवधावाने राजनसमोर बोलून दाखवली. तो सहानुभूतीनं प्रेमानं विचारपूस करेल अशी तिची अपेक्षा होती. चूक तिथंच झाली. भांडणाचं कारणही तेच होतं. रात्री जेवताना पतिपत्नी गप्पगप्प होते.

मुलं मात्र चिवचिवत होती, ‘‘बाबा, आईनं दमआलू किती यम्मी बनवलेत ना?’’ बोटं चाटत निरूनं म्हटलं.

‘‘हो ना, खरंच!’’ राजननं कबूली दिली.

उमेशही नेहाला शाळेतल्या सायन्स टीचरबद्दल अन् वर्गात करायच्या प्रोजेक्टबद्दल काही बाही सांगत होता. नेहा उसन्या उत्साहानं त्याला प्रतिसाद देत होती.

जेवणं झाली. डायनिंग टेबल आवरून, मुलांना ब्रश करायला लावून, त्यांना रात्रीचे कपडे घालायला देऊन नेहानं आपले कपडे बदलले. मुलांना त्यांच्या खोलीत झोपवून तिनं खोलीत येऊन राजनकडे पाठ केली अन् झोपली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. राज पलंगावर पडून काही तरी वाचत होता. नेहा पलंगावर येताच त्यानं दिवा मालवला.

‘‘रागावली आहेस?’’ राजनच्या आवाजात लोण्याचा मऊपणा होता.

नेहा गप्प होती. काटा खोलवर रूतला होता. वेदना फार होती.

‘‘डॉर्लिंग, उद्या सायंकाळी मला टूरवर जायचंय. चार दिवस तरी लागतील परतून यायला. तू बोलली नाहीस तर कसं व्हायचं?’’

‘‘माझं डोकं दुखतंय. तुम्ही झोपा, मलाही झेपू द्या.’’ नेहानं म्हटलं.

‘‘मग मी तुझं डोकं चेपून देतो ना?’’ विनवणीच्या सुरात राजननं म्हटलं.

मघाच्या भांडणापासून आत्तापर्यंतच्या वेळात नेहानं मनोमन एक निर्णय घेतला होता. त्यामुळे तिनं वाद न वाढवता कूस बदलली अन् राजनकडे बघितलं. राजनला वाटलं चला, मौन सुटलंय, तो खरोखर हलक्या हातानं नेहाचं कपाळ चेपू लागला.

मनातल्या मनात नेहा हसली. ‘‘चांगलंय, करा सेवा.’’ तिनं डोळे मिटून घेतले. मनावरचं ओझं त्या निर्णयामुळे उतरलं होतं. तिला लगेच झोप लागली. राजनही शांत चित्तानं झोपला.

दुसरा दिवस नेहमीसारखाच होता. मुलं शाळेत गेली. राजन ऑफिसला गेला. नेहा रोजची कामं आटोपू लागली. पण काल जो निर्णय तिनं घेतला होता, तो मात्र ती विसरली नव्हती.

सायंकाळ झाली. मुलं अन् त्यांचे वडील घरी परतले. नेहानं सर्वांसाठी छान छान खाण्याचे पदार्थ तयार ठेवले होते. राजननं चहा फराळ आटोपला. नेहानं भरून ठेवलेली बॅग घेऊन तो टूरवर निघून गेला. निघण्यापूर्वी मुलांचे लाड केले. बायकोला मिठीत घेतलं. सगळं व्यवस्थित होतं नेहमीसारखं.

चार दिवसांनंतर राजन सकाळी नऊ वाजता घरी पोहोचला. मुलं शाळेत निघून गेली होती. नेहानं हसून स्वागत केलं. ‘‘तुम्ही स्नान करून घ्या. दोन बादल्या कडक पाणी बाथरूममध्ये तयार आहे. तुमचं आटोपेपर्यंत मी चहा अन् खायला तयार ठेवते.’’ तिनं म्हटलं.

राजनना वाटलं चला, सगळं सुरळीत आहे. तो सुखावला.

स्नान करून तो प्रसन्न चित्तानं डायनिंग टेबलवर आला, तेव्हा गरमागरम कांदा भजी, दुधी हलवा अन् वाफाळता चहा तयार होता. त्याला भजीबरोबर आवडणारी पुदिनाची चटणीही तयार होती.

राजन एकदम खुशीत आला. ‘‘मला ठाऊक होतं माझी राणी कधीच बदलणार नाही.’’ तो म्हणाला.

‘‘कशी झाली तुमची टूर?’’

‘‘चांगली झाली. कामं फार होती, पण मला समाधान आहे.’’

‘‘ऑफिसला किती वाजता जाल?’’

‘‘दुपारी तीनला जाईन. आत्ता घरीच थोडं काम करतो. जेवण झाल्यावर थोडी झोप घेईन, मग ऑफिसला जाईन. तू सांग, काय काय केलंस या चार दिवसांत?’’

‘‘केलं की! बरंच काही केलं.’’ नेहाच्या चेहऱ्यावर गूढ हास्य होतं.

‘‘सांग तरी.’’

‘‘एका शाळेत इंटरव्ह्यू देऊन आलेय. पार्ट टाइम जॉब आहे. सहावी, सातवीच्या मुलांना इंग्रजी अन् सोशल स्टडीज शिकवायचं आहे. दोन्ही विषयात माझा चांगला हातखंडा आहे.’’

‘‘इंटरव्ह्यू? ही काय भानगड आहे?’’ राजन जरा बावचळलाच.

‘‘होय डार्लिंग, इंटरव्ह्यू…भानगड वगैरे काही नाही. नोकरी मिळाल्यात जमा आहे. येत्या पहिल्या तारखेपासून जॉईन करेन. माझ्या दोघी मैत्रिणी तिथं शिकवताहेत. पगारही चांगला आहे. माझ्या मैत्रिणींनीच माझी शिफारस केली होती…झालं! नोकरी मिळाली.’’ नेहानं सांगून टाकलं. तिला माहीत होतं की राजनला हे अजिबात आवडणार नाही. आता आवडो की न आवडो, पण त्याला आता नक्की कळेल परफेक्ट बॅलेन्स कसा ठेवला जातो.

‘‘पण अचानक हे नोकरीचं काय सुचलं?’’ राजन जरा खिन्न होता अन् चकितही.

‘‘घ्या! आता यात सुचायचं काय? जर प्रत्येक मॉडर्न स्त्री घराबाहेर पडून नोकरी करते तर मी का नको?’’ चटणीमध्ये भजी बुडवून खात नेहानं म्हटलं.

‘‘त्या दिवशीचं माझं बोलणं जिवाला लागलं का तुझ्या?’’

‘‘छे छे, उलट तुम्ही बरोबरच बोललात. बॅलेन्स करण्याची, सांगड घालण्याचीच तर बाब आहे…’’ नेहा शांतपणे दुधी हलवा खात म्हणाली.

‘‘पण तुझी तब्येत बघायला हवी. थकवा, अशक्तपणा…’’

‘‘इश्श! कमालच करता. तुम्हाला माझ्या तब्येतीची काळजी कशी काय वाटायला लागली? नवल आहे…पण तरीही ऐकून बरं वाटलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे सगळं चालायचंच हो.’’

‘‘हो हो, जरा धीरानं घ्या…मी सांगतेय ना. मी डॉक्टरांना भेटून आले. त्यांनी तपासलं. त्या म्हणाल्या की दिसायला नाजूक दिसलीस तरी काटक आहेस तू. फक्त हिमोग्लोबिन थोडं कमी झालंय. सांगते तेवढ्या गोळ्या, टॉनिक घे. ठणठणीत होशील. आहारातही काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याही पाळते आहे.’’

‘‘अन् तुझ्या ट्यूशन्स?’’

‘‘होताहेत की! पार्ट टाइम नोकरी आहे. दुपारी साडेबाराला परत येतेय की. ट्यूशन तर दुपारी तीन वाजता सुरू होते. तीही आठवड्यातले चार दिवस. मुलं सायंकाळीच येतात. तुम्हीही सायंकाळीच येता. कामवाल्या बाईला सांगितलंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात थांबायला अन् सगळी कामं करायला. शाळेला शनिवार, रविवार सुट्टीच असते. म्हणजे सगळं बॅलेन्स होतंय की.’’ नेहा आघाडी भक्कमपणे लढवत होती.

‘‘अगं, पुढल्या महिन्यात दादा अन् वहिनी येताहेत आपल्याकडे…’’ पराभूत शिपायाच्या आवाजात राजन म्हणाला.

‘‘हो ना, ते तर फारच छान झालं. वहिनी किती सुगरण अन् हुशार आहेत. शिवाय दादा शिक्षक आहेत. पंधरा दिवस मुलांना फिजिक्स, मॅथ्स त्यांनाच शिकवायला सांगते.’’ नेहा हार मानायला तयार नव्हती.

‘‘म्हणजे तू नोकरी करण्याचं पक्कं ठरवलं आहेस?’’ राजननं शरणागती पत्करली.

‘‘अगदी पक्कं! तुम्ही बघा तर खरं, तुमची झाशीची राणी घरातल्या बाहेरच्या कामाची कशी सांगड घालते. कसं छान, योग्य नियोजन करते. तुमच्यामुळेच मला प्रेरणा मिळाली आहे. मी परफेक्ट बॅलेन्स करणारच! बरं, ते सोडा, तुम्ही दमला असाल, मी तुमच्या डोक्याला छान तेलाचं मालिश करून देते. मग तुम्ही थोडी झोप काढा.’’ नेहा मधात साखर घोळवलेल्या आवाजात म्हणाली.

‘‘जेवायला काय आहे?’’

‘‘तुमचे आवडते दुधीचे कोफ्ते, वांग्याचं भरीत. शेवग्याच्या शेंगेची आमटी अन् शेवयाची खीर…तोंडाला पाणी सुटलं ना?’’

‘‘हं!’’ राजन निरूत्तर झाला होता.

परफेक्ट बॅलेंसचा फंडा नेहाला जमला होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें