स्वच्छता आणि कोरोना

* डॉ. ममता मेहता

दुपारी अंथरुणात लोळणे झाल्यावर विचार केला की जरा पाय मोकळे करून यावे. दरवाजा उघडून बाहेर पाय ठेवले तोच काहीतरी पायाला लागले आणि तोंडातून किंकाळी निघाली आणि जणू काही बॉम्ब फुटला, ‘‘हे काय करून ठेवले आहे घराचे. माणसांना कमीतकमी वावरायला तरी जागा ठेव.’’ तिकडूनही उत्तरादाखल हल्ला चढवला, ‘‘दिवसभर झोपण्यातून वेळ मिळाला असेल तर स्वत:सुद्धा थोडे काम करा.’’

मी तणतणलो, ‘‘आता तूसुद्धा दिवसभर घरी आहेस तर का नाही स्वच्छतेकडे लक्ष देत?’’

तीसुद्धा चिडली, ‘‘तुम्हीही दिवसभर अंथरुणातच लोळत आहात, तुम्हीच का नाही थोडी साफसफाई करत?’’

मी छाती फुगवत म्हणालो, ‘‘हे माझे काम नाही. मी पुरुष आहे.’’

सुमी जवळ आली, ‘‘हो का? असे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे की हे काम पुरुषांचे नाही.’’

मी फुशारकी मारत म्हणालो, ‘‘माझ्या स्वत:च्या पुस्तकात.’’

सुमीने हात कंबरेवर ठेवले व म्हणाली, ‘‘तर मग कोणती कामं पुरुषांनी करायची आहेत हेही लिहिलं असेल तर सांगा तसं?’’

मी बाहू पसरले, ‘‘हो सांगितले आहे ना, इकडे ये सांगतो.’’

सुमीच्या चेहऱ्यावर लालिमा पसरली जी तिने आपल्या संतापामागे लपवली.

‘‘क्वारंटाईनमध्ये आहात, अंतर राखा.’’

मी उसासे भरले, ‘‘तेच तर करतो आहे, आणखी किती करु. रात्रंदिवस सोबत तरीही दुरावा.’’

मी सुमीकडे सरसावलो पण सुमीने मध्येच थांबवले.

‘‘हे फालतू काम करण्यापेक्षा काही उपयोगी काम करा.’’

‘‘हे पण तर उपयोगीच काम आहे.’’

‘‘आता नाही, भांडी घासणे जास्त महत्वाचे आहे. या जरा भांडी घासून घ्या.’’

‘‘सांगितलं ना ते माझे काम नाही.’’

सुमी चिडून म्हणाली, ‘‘ हे काम माझे नाही, ते काम माझे नाही असं म्हणून नाही चालणार. चुपचाप भांडी घासा नाहीतर पोलिसांना फोन करेन की इथे एक कोरोनाचा रुग्ण आहे.’’

मी मनातून तसा घाबरलोच पण वरवर असे म्हणालो, ‘‘या पोकळ धमक्या दुसऱ्या कोणाला दे. तू फोन करू शकते तर काय मी नाही करू शकत? मीही फोन करून सांगेन की इथे एक कोरोनाची रुग्ण आहे.’’

सुमी निर्धास्तपणे म्हणाली, ‘‘सांगा, चांगलेच होईल. ते मला तपासतील पण त्यात काहीच निघणार नाही. मला १४ दिवस आराम मिळेल आणि सगळे घरकाम तुम्हाला करावे लागेल. सध्या तर छान आयते खायला मिळते आहे. मग स्वत:च शिजवा, स्वत:च खा आणि स्वत:च भांडी घासा.’’

आता मात्र मी खरंच घाबरलो. ‘‘जाऊ दे ना मी तर गंमत करतो आहे. हे बघ भांडी वगैरे घासणे माझ्या आवाक्यातले नाही. मी साफसफाई करून देतो.’’

मी डब्बू, डिंगीला हाक मारली, ‘‘चला मुलांनो, आईला मदत करू या. थोडी साफसफाई करू, या इकडे.’’

सुमीने थांबवले. ‘‘काही गरज नाही साफसफाई करायची. जसे पडले आहे तसेच राहू द्या. तुम्हाला जे सांगते आहे ते करा, बस.’’

मी इरेला पेटलो, ‘‘अगं, मला हे काम जास्त सोपे जाईल. करू दे, बघ जरा किती घाण पडले आहे घर. सगळीकडे पसारा पडला आहे.’’

सुमी शेवटचा अल्टिमेटम देत म्हणाली, ‘‘मला ना साफसफाई करायची आहे, ना करवून घ्यायची आहे. तुम्हाला तुमचा पुरुषार्थ दाखवायचा आहे तर ही भांडी चमकवून दाखवा.’’

मी चरफडलो, ‘‘हे बघ एकतर हे माझे काम नाही तरीही मी करायला तयार आहे. मग मी जे करू शकतो ते मला करू दे ना.’’

सुमीने परत कटकट केली, ‘‘एकदा सांगितले ना की साफसफाई नाही करायची तर नाही. का मागे तुणतुणं लावता आहात.’’

मीही आता जोरात म्हणालो, ‘‘का नाही करायची, इतक्या घाणीत तू कशी राहू शकते. तुला सवय झाली असेल इतक्या घाणीत राहायची पण मला नाही आहे. म्हणून मी तर साफसफाई करणारच.’’

सुमीने तोंड वेंगाडले, ‘‘आले मोठे मिस्टर क्लीन. जणू काय आधी व्हाईट हाऊसमध्येच काम करायचे. मीही काही पाईपमध्ये राहात नव्हते. पण आता मला स्वच्छतेत राहायचे नाही, बस.’’

मी भूवया उंचावल्या, ‘‘पण का नाही राहायचे, का नाही करायची स्वच्छता. इतका पसारा असलेल्या घरात मन लागेल तुझे? सध्या  तर तू २४ तास घरातच आहेस.’’

सुमीने ओठ मुडपले, ‘‘हो, मला याच घरात राहायचे आहे. मला नाही जायचे कुठेच आणि मला असेही वाटते की तुम्ही आणि मुलांनीही याच घरात राहावे. काही कोणाच्या घरी जाऊ नये.’’

माझं डोकं गरगरलं, ‘‘कमाल आहे, स्वच्छता आणि इतर कुठे जायचा काय संबंध? तू तर कशाचा कुठेही कसाही संबंध जोडत असते.’’

सुमी म्हणाली, ‘‘संबंध कसा नाही. संबंध आहे. जवळचा संबंध आहे, जबरदस्त संबंध आहे.

मी म्हणालो, ‘‘तेच तर मी विचारतो आहे, काय संबंध आहे? तुझ्या या दीड शहाण्या मेंदूतून निघाले आहे तर सांग ना.’’

सुमीने खांदे उडवले, ‘‘यात दीड शहाणी किंवा अडीच शहाणी, अक्कल वगैरेचा प्रश्नच नाही, अगदी सोपे आहे. जितका पसारा जास्त तितकी प्रतिकारशक्ति जास्त आणि जेवढी प्रतिकारशक्ति जास्त तेवढा कोरोनाचा प्रभाव कमी. आपण जर अशाच पसाऱ्यात राहिलो तर आपल्याला ना कोरोना होईल ना आपल्याला कुठे जावे लागेल.’’

माझे डोके फिरले, ‘‘हे काय लॉजिक आहे? कोण म्हणतं की पसाऱ्यात राहिल्याने कोरोना होणार नाही?’’

सुमी अत्यंत विश्वासाने म्हणाली, ‘‘तुम्ही स्वत:च पाहा ना, कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण कुठे आहेत आणि मृत आहेत?’’

मी म्हणालो, ‘‘स्पेन, इटलीत.’’

‘‘आणि?’’

‘‘ यूएसए, फ्रांस, ब्रिटन.’’

‘‘ मग हे सगळे देश तर स्वच्छ देशांमध्ये येतात. जितका स्वच्छ देश, तेवढा कोरोनाचा प्रभाव जास्त होत गेला आणि लोकांचे श्वास कोंडत गेला.’’

‘‘आशियाई देशात एक चीन सोडला तर कोरोनाचे किती रुग्ण झाले होते? आपल्या इथेही जी शहरं स्वच्छ आहेत तिथेच कोरोना बिनधास्त फिरत आहे. पण जी शहरं अस्वच्छ आहेत, तिथे मात्र कोरोनाशी कमी लोक झुंज देत आहेत. आपल्या इथेही रोज लोकल न्यूज चॅनेलवर दाखवत असतात की शहरात किती अस्वच्छता होते आहे. आता संपूर्ण शहर रिकामे आहे. आता सहज स्वच्छता होऊ शकते. पण याकडे कोणी लक्ष देते आहे का?

‘‘नाही ना? ते यासाठी की कोरोना अस्वच्छता पाहून पळून जातो. म्हणून म्हणते की तुम्ही घराची साफसफाई राहूच द्या. जितके आपण अस्वच्छतेत राहू तेवढी आपली प्रतिकारशक्ति वाढेल आणि कोरोनाशी लढण्याची ताकतसुद्धा पुढचं पुढे पाहू, तुम्ही फक्त आता भांडी घासा. बस्स!’’

मी तोंड आ वासून मूर्खासारखा तिचे बोलणे ऐकत होतो. कळत नव्हते की तिला काय उत्तर द्यायचे? बिचारे आपले नेते स्वच्छ भारत मिशन चालवून देश स्वच्छ ठेवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहेत तर इथे हिचे नवेच काही चालू आहे. काय ही खरेच बरोबर म्हणते आहे? स्वच्छतेमुळे कोरोना प्रभावशाली आणि शक्तिशाली होतो का? यावर नंतर संशोधन करतो. सध्या तरी सिंक जवळ उभा राहून विचार करतो की भांडी कशी घासू.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें