जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

* नम्रता पवार

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने या गाण्यातून चित्रपटाबद्दलची गूढता अधिकच वाढवली आहे. त्यांच्या अफलातून संगीताने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.

‘जारण’च्या पोस्टरपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात टिझर आणि ट्रेलरने या उत्सुकतेत अधिकच भर टाकली. ‘जारण’चा ट्रेलर प्रचंड लोकप्रिय होत असून त्याला अनेक सकारात्मक प्रतिक्रियाही येत आहेत. भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. त्यात आता या प्रमोशनल साँगने उत्कंठा वाढवली आहे.

सोनाली आणि भार्गवीने आपल्या प्रभावी अभिनयातून या गाण्यात एक रहस्यमय आणि भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. गाण्याचा मूड संपूर्णतः भयावह, गूढतेने भरलेला असून, त्यातील संगीत, पार्श्वभूमी आणि दिग्दर्शन प्रेक्षकांच्या मनात थरकाप निर्माण करणारे आहे. गाण्याच्या माध्यमातून चित्रपटाची संकल्पना अधिकच स्पष्ट होत असून कथानकातील अस्वस्थ करणारी आणि विचारप्रवृत्त करणारी बाजू यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येत आहे.

निर्माते अमोल भगत म्हणतात, “ या गाण्यातून आम्ही ‘जारण’ची भीतीदायक आणि सोबतच भावनिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत, गायन आणि व्हिज्युअल्स यांचे जबरदस्त मिश्रण प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. चित्रपटाचा मूड आणि आशय या एका गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त होत आहे. या गाण्याची खास बाब म्हणजे सोनाली कुलकर्णी व भार्गवी चिरमुले या गाण्यात पाहायला मिळत आहेत. या दोघी उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच याव्यतिरिक्त त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे मैत्रीखातर त्यांनी या प्रमोशनल गाण्यात सहभाग घेऊन मला व चित्रपटाच्या पूर्ण टीमला सहकार्य केले.”

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, “ ‘जारण’चे प्रमोशनल साँग तयार करताना चित्रपटाचा मूड लक्षात घेऊनच हे गाणे करायचे होते. चित्रपटाची संकल्पना कुठेही विस्कळीत होणार नाही याची काळजी घायची होती. त्यामुळे हे जरा आव्हानात्मक होते. प्रत्येक मूड, ताल, आवाज यांच्याकडे आम्ही विशेष लक्ष दिले. अर्थात हे सगळे गायक, गीतकार यांच्या साथीनेच झाले. हे गाणे कमाल बनले असून प्रेक्षकांना ते नक्की भावेल. ”

या चित्रपटाचा भाग झाल्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘’माझ्यासाठी हा अनपेक्षित अनुभव होता. काय गाणे असेल, आपण कोणत्या झोनमध्ये जाणार आहोत, याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. या प्रमोशनल साँगचा झोन खूप वेगळा आहे. गाण्याचे बोल अहिराणी भाषेत असल्याने शब्द सहज कळत नाहीत. त्यामुळे ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. ते सतत लूपमध्ये ऐकत राहावसे वाटते. अतिशय भन्नाट गाणे आहे. मला खूप आनंद आहे, या चित्रपटाची जोडले गेले आहे.

अमोल भगत माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाची निर्मिती करतोय, तर त्याच्या चित्रपटात आपले काहीतरी योगदान असले पाहिजे, असे मनात होतेच आणि ही संधी समोरून चालून आली. त्यामुळे मी त्याला त्वरीत होकार दिला. त्यात हे गाणे मला स्वत:ला खूप आवडल्याने ते करतानाही मजा आली. कोरिओग्राफी खूप कमाल आहे. सगळेच अप्रतिम आहे. शिवाय सोबत भार्गवी आहे. खूप वर्षांनी एकत्र काम करत आहोत. आवडती माणसं असल्याने काम करताना खूप मजा आली.’’

भार्गवी चिरमुले आपल्या अनुभवाबद्दल म्हणते, ‘’ माझ्यासाठी हा खूप वेगळा आणि छान अनुभव आहे. एकतर कधीही न साकारलेली भूमिका मी केली आहे.  चित्रपटाविषयी मी ऐकून होते आणि सगळ्यांसारखीच उत्सुकता मलाही होती. गाण्याचे बोल, संगीत, चित्रीकरण सगळेच अप्रतिम आहे. जबरदस्त कथा, अभिनय यांचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपटगृहात येईलच. परंतु या प्रमोशनल साँगचा भाग झाल्याचा माझा अनुभव खूपच छान होता. यासाठी अमोलचं मनापासून आभार.’’

अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

 

 

 

रितेश देशमुखने ‘पीएसआय अर्जुन’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या !

* नम्रता पवार

मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अंकुश चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याच्या आगामी ‘पीएसआय अर्जुन’ या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर्स सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. दोन वर्षांनंतर, अंकुश ‘पद्यावर झलकताना’ नंतर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुश पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याने, त्याच्या देखण्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘पी.एस.आय.’ स्टाईल आयकॉन ज्याने तिच्या आकर्षक लूकमुळे इंटरनेटवर धुमाकूळ घातला. पोस्टर पाहिल्यानंतर अर्जुनच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

विशेषतः, मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने अंकुशला शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुशच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना रितेश देशमुखने आपल्या नव्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. रितेश देशमुख किंवा विशेष पथिमबायन हा सर्वांचे लक्ष वेधून घेईल कारण त्याला किंवा नव्या प्रवासाला तो आवडेल आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून मिळणारा उत्साही प्रतिसाद पाहून, ‘पीएसआय अर्जुन’ आधीच पडद्यावर हिट होण्याच्या मार्गावर आहे.

‘पी.एस.आय.’ विस्ट्रोमॅक्स सिनेमा आणि ड्रीमवीव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘अर्जुन’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषण पटेल दिग्दर्शित या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम शंकर आणि ध्रुव दास करत आहेत.

या व्हॅलेंटाईनला होणार लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचा अनोखा संगम!

* नम्रता पवार

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. या प्रेमाच्या दिवशी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने चित्रपटप्रेमींना एक खास भेट दिली आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली असून एव्हरेस्ट एंटरटेनमेंटकडून सर्व चित्रपटप्रेमींसाठी व्हॅलेंटाईनची ही खास भेट ठरली आहे. ‘ मुंबई-पुणे-मुंबई’, ‘ प्रेमाची गोष्ट’, ‘ ती सध्या काय करते’, ‘ऑटोग्राफ’ अशा सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे एक नवीन प्रेमकथा निर्माते संजय छाब्रिया यांच्यासह घेऊन येत आहेत.

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हणतात, पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या प्लॅनिंगनुसार ठरेल तेव्हा आयुष्यात काय घडेल? असंच काही या चित्रपटात ललितच्या बाबतीत घडणार आहे. प्रेम आणि नशीबाची ही जादुई सफर पाहाणं नक्कीच मनोरंजक ठरेल. या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिनेत्री ऋचा वैद्यसह हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री रिधिमा पंडित ही चित्रपटात दिसेल. प्रेक्षकांना या तिन्ही कलाकारांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळेल.

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणणं आमच्यासाठी खूप खास आहे. प्रेमाचा रंग आणखी गडद करणारी चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना प्रेमाचा एक नवा अनुभव देईल. या चित्रपटात प्रेमाची जादू आणि तंत्रज्ञानाचा मिलाप असल्याने प्रेक्षकांना प्रेमाचा हा प्रवास नक्कीच आवडेल.”

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “ प्रेमकथा सर्वांच्याच आठवणीतल्या असतात. त्या काळाच्या पलीकडे ही टिकतात. मी याआधी ही काही प्रेमकथा सादर केल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही माझी सातवी प्रेमकथा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली अतिशय आधुनिक प्रेमकथा आजच्या पिढीला नक्कीच आवडेल. व्हॅलेंटाईन डेच्या वातावरणात ‘प्रेमाची गोष्ट २’ ची अनोखी पहिली झलक म्हणजे आमच्याकडून प्रेक्षकांना एक विशेष रोमँटिक भेट आहे. ललित, ऋचा आणि रिधिमा यांचा अभिनय आणि अप्रतिम केमिस्ट्री चित्रपटाला खास रंगत आणेल. चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये प्रेम आणि नशीबाच्या खेळाची झलक पाहून प्रेक्षक चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत.” एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या जून २०२५ मध्ये अनुभवायला मिळेल.

 

 

१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

* नम्रता पवार

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा १८ ॲाक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब’मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ सेल्फी काढताना दिसत आहेत. सेल्फीत दिसणारे चेहरे आणि मागे दिसणाऱ्या चेहऱ्यांवरील हावभाव खूप वेगळे आहेत. या चेहऱ्यांमध्ये काही रहस्ये दडलेली दिसत आहेत. हे चेहरे काही वेगळंच सांगत आहेत. त्यामुळे ‘लाईक आणि सबस्क्राईब’मागे हे काय गुपित आहे. हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, ‘’ लाईक आणि सबस्क्राईब हा दैनंदिन शब्द झाला आहे. रोजच्या जीवनात हा शब्द सर्रास ऐकला जातो आणि याच शब्दांभोवती फिरणारी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा एक रहस्यमय चित्रपट असून प्रेक्षकांना निश्चितच खुर्चीला खिळवून ठेवेल. येत्या १८ ॲाक्टोबरला रोहित चौहान कोण आहे, याचा उलगडा होईल.’’

‘बाबू नाय… बाबू शेठ’

* नम्रता पवार

बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश ‘बाबू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. यावेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावात आगरी बेंन्जोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली. तर ‘बाबू’नेही त्याच्या अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एन्ट्री घेतली. यावेळी ‘बाबू’ची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला. आपल्या कोळी बांधवांना, भगिनींना घेऊन तो ही या कोळी नृत्यात सहभागी झाला. या उत्साहाने भरलेल्या वातावरणात अंकितच्या २० फूट पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या भव्य सोहळ्यात चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, इतर टीमसह कोळी बांधवही सहभागी झाले होते.

प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झणझणीपणा अनुभवायला मिळणार आहे. ९०च्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नोस्टॅल्जिक करणारी आहे तर तरूणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे. यात प्रेम, मैत्री, दुरावा, शत्रुत्व, बदला, ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे.’’

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ आगस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘‘सण कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो’’ – सीमा कुलकर्णी

* सोमा घोष

आकर्षक उंची, मृदुभाषी २७ वर्षीय मराठी अभिनेत्री सीमा कुलकर्णी ही महाराष्ट्रातील उस्मानाबादमधील तुळजापुरातली आहे. तिने मराठी चित्रपट, वेब सीरिज आणि अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. २०१६ मध्ये तिने ‘शिनमा येडा’ या चित्रपटातून या क्षेत्रातील प्रवास सुरू केला. त्यानंतर तिने अनेक वेब मालिका, चित्रपट आणि टीव्हीवरील मालिकांमध्ये काम केले. ‘मी पुन्हा येईन’ या मराठी वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

सीमा खऱ्या आयुष्यात फारशी संयमी नसली तरी अभिनयात मात्र ती प्रचंड संयम बाळगते. फिल्मी भाषेत सांगायचे तर तिला ‘अँक्शन’ आणि ‘कट’मध्ये जगायला खूप आवडते. तिच्या मते अभिनय क्षेत्र कधीच सोपे नसते. एका दृश्यासाठी तिने सुमारे ८ ते १० रिटेक दिलेत, जे तिला एका मोठया अभिनेत्यासोबत अभिनय करताना द्यावे लागले होते. मराठीशिवाय तिने हिंदी आणि मल्याळम मालिकांमध्येही काम केले आहे. सीमा तिच्या यशाचे श्रेय तिची आई शीतल कुलकर्णी आणि वडील विकास कुलकर्णी यांना देते. सन मराठी वाहिनीवर तिची ‘सावली होईन सुखाची’ ही मालिका सुरू आहे. यात ती गौरीच्या मुख्य भूमिकेत आहे.

ही मालिका करतानाचा तुझा अनुभव कसा आहे? ती तुझ्या वास्तविक जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

यामध्ये माझी भूमिका एका खेडयातील मुलीची आहे, जिला कुटुंबातील सर्व नातेसंबंध खूप आवडतात, परंतु तिच्या आई-वडिलांची इच्छा असते की तिने एका वृद्धाशी लग्न करावे, त्यामुळे गौरी पळून जाते आणि शहरात येते. तिथे घरकाम करू लागते. त्यादरम्यान, तिला एक ६ वर्षांची मुलगी भेटते, जिच्यावर ती आईसारखे प्रेम करते. दोघींमध्ये आई-मुलीचे नाते फुलते. हे खूपच भावनिक वळण आहे आणि मला ते करताना खूप मजा येत आहे.

वास्तविक जीवनात मला प्रत्येक नाते आणि कुटुंब खूप जास्त प्रिय आहे. त्यामुळे मालिकेतील नातेसंबंध माझ्या प्रत्यक्ष आयुष्याशी मिळतेजुळते आहे, पण ही मालिका असल्याने यात नाट्य थोडे अधिक आहे. याशिवाय आपल्या समस्यांशी कसे लढायचे हे मला माहीत आहे, पण मालिकेतील गौरीला ते समजायला आणखी काही वेळ लागेल. सुरुवातीला आईची भूमिका साकारणे अवघड वाटत होते. विशेषत: लहान मुलीसोबत अभिनय करणे अवघड आहे, कारण मुले मुडी असतात, पण ही मुलगी लहान असूनही चांगले काम करत आहे.

तुला किती तयारी करावी लागली?

मी त्या मुलीची आई आणि माझ्या आईचे वागणे पाहिले आणि तसे वागण्याचा प्रयत्न केला.

तुला अभिनयात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

लहानपणापासून टीव्हीवर चित्रपट आणि मालिका पाहून मी अभिनय करण्याचा विचार करत होते. तेव्हा मला नायिका व्हायचे होते. मला त्यावेळी अभिनेत्री आणि नायिकेतील फरक समजत नव्हता. मला नृत्याची आवड होती. माझे लहानसे शहर तुळजापूरमध्ये कोणालाच अभिनयाविषयी माहिती नव्हती आणि या क्षेत्रातील एकही कलाकार तिथला नव्हता, त्यामुळेच माझी इच्छा ऐकून सर्व माझ्यावर हसायचे. माझ्यावर माधुरी दीक्षित आणि मुक्ता बर्वेच्या कामाचा खूप प्रभाव होता. त्यांचे चित्रपट पाहिल्यानंतर मी त्याच जगात जगायचं, तेव्हाच मी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

तुला कुटुंबाकडून किती पाठिंबा मिळाला?

सुरुवातीला या क्षेत्राबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्यावेळी सोशल मीडियाची फारशी क्रेझही नव्हती. मी नृत्याची सुरुवात व्हिडीओ पाहून गणपती उत्सवात नृत्याच्या पथकात सहभागी होऊन केली. तुळजापुरात नृत्याचे वर्ग नव्हते. जेव्हा मी थोडी मोठी झाले तेव्हा आजूबाजूचे लोक नाचणे चुकीचे आहे असे म्हणू लागले. त्यामुळे घरचे वैतागले आणि त्यांनी मला नृत्य करण्यास नकार दिला. मी ठरवले की मला इथे राहायचे नाही. त्याच दरम्यान पुण्याच्या जवळपासहून एक दिग्दर्शक आला आणि त्याने स्थानिक चित्रपट बनवण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने स्थानिक कलाकारांना घेतले. आधी चित्रीकरण सुरू केले, पण त्यानंतर त्याने अचानक चित्रीकरण थांबवून आर्टिस्ट कार्ड बनवण्यासाठी पैसे मागायला सुरुवात केली. मी आईला येऊन सर्व सांगितले आणि २०१२ मध्ये मी त्याला आर्टिस्ट कार्डसाठी २५ हजार रुपयेही दिले. वडिलांना न सांगता आईने सर्व पैशांची व्यवस्था केली होती. त्या लोकांनी आमची मेहनत पाहून तो चित्रपट स्थानिक पातळीवर गावातील दोन चित्रपटगृहांत प्रदर्शित केला. सर्व कलाकारांचे सर्व पैसे वाया गेले, कारण गावातील कोणालाच अभिनय क्षेत्राची माहिती नव्हती. नंतर समजले की ते सर्व फसवणूक करणारे होते. माझ्या वडिलांनी तो चित्रपट पाहिला होता आणि त्यांनी मला पुढील कामासाठी पुण्याला पाठवले. तोपर्यंत सोशल मीडिया थोडा सक्रिय झाला होता. त्यामार्फत मी अनेक ठिकाणी माझे फोटो पाठवले, पण सर्वांनी मुंबई आणि पुण्याला यायला सांगितले.

तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?

पुण्यात आल्यावर मी मास मीडियाचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि थिएटरमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. तिथेही मला खूप चुकीचे लोक भेटले. मुंबईत आल्यानंतर मला या इंडस्ट्रीबद्दल खूप काही समजले. पहिला ब्रेक मिळणे सोपे नव्हते, पण पुण्यात असताना मी ‘मॅरेथॉन जिंदगी’ हा चित्रपट केला होता, ज्यात विक्रम गोखले आणि संजय नार्वेकर यांच्यासारखे मोठे कलाकार होते. तो माझा पहिला ब्रेक होता, पण मला त्यातून फारसा फायदा झाला नाही. मी पुण्यातून मुंबईला आले आणि छोटया भूमिका करू लागले. २०१८ मध्ये मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील काही भागांत काम केले. त्यानंतर ‘गुलमोहर’, ‘आणीबाणी’ ‘मेकअप’ आदी चित्रपटांत काम केले. एका रियालिटी शोमध्येही पहिल्या ६ मध्ये पोहोचले होते.

तुला किती संघर्ष करावा लागला?

कुठल्याही कलाकाराचा संघर्ष सुरूच असतो. आधी काम मिळवण्यासाठी, नंतर ते टिकवण्यासाठी आणि भविष्यात चांगले काम करण्यासाठी संघर्ष करावाच लागतो.

कोणत्या मालिकेने तुझे आयुष्य बदलले?

‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबसीरिज मी केली होती, ज्याने मला ओळख मिळवून दिली, सर्वांनी माझ्या भूमिकेचे कौतुक केले. थोडी टीकाही झली, कारण त्यात मी काही बोल्ड सीन दिले होते. एका दृश्यात मी बिकिनी घालून आले होते, पण त्या कथेत ते दृश्य आवश्यक होते.

इंटिमेट सीन म्हणजेच अंतर्गत दृश्य तू किती सहजतेने करू शकतेस?

कथेच्या मागणीनुसार मी कोणतीही भूमिका करण्यास मागेपुढे पाहात नाही. मला असा एक चित्रपट मिळाला होता, ज्यामध्ये अभिनेत्री फक्त बिकिनीमध्ये दिसणार होती, मात्र त्याचा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता, त्यामूळे मी नकार दिला.

हिंदी चित्रपटसृष्टीत तुला काम करण्याची इच्छा आहे का?

अर्थातच. मला मराठीच नाही तर प्रत्येक भाषेतील वेगवेगळया चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. मला विकी कौशल आणि ऋतिक रोशन यांच्यासोबत काम करायचे आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याचीही माझा इच्छा आहे.

तू उस्मानाबादची आहेस, तिथे काय काम करायची तुझी इच्छा आहे?

मला तिथल्या लोकांना अभिनयाची माहिती द्यायची आहे. होय, कारण तिथे या क्षेत्राबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. छोटया शहरातील असूनही तेथील अनेकांमध्ये खूप प्रतिभा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मी प्रसंगानुरुप फॅशन करते. कुठलाही ट्रेंड पाहून फॅशन करत नाही तर मला जे शोभेल तेच घालते.

मला खायला खूप आवडते. आईने बनवलेली डाळ ढोकळी खूप आवडते.

तू सण कसे साजरी करतेस?

सण कुठलाही असो, मला तो कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो.

तुला नवोदितांना काही संदेश द्यायचा आहे का?

तुमच्या कामावर प्रेम करा, मेहनत, समर्पण आणि संयम ठेवा, तरच तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.

आवडता रंग – पांढरा.

आवडता पोशाख – भारतीय साडी.

आवडते पुस्तक – कोसला कादंबरी.

आवडता परफ्यूम – टायटनचा कोणताही.

आवडते पर्यटन स्थळ – उटी.

वेळ मिळाल्यास – पुस्तकं वाचणे आणि वेब सिरीज पाहाणे.

जीवनातील आदर्श – प्रत्येकाला आदर देणे.

सामाजिक कार्य – प्राण्यांसाठी काम करणे.

स्वप्नातील राजकुमार – काम आणि कुटुंबाचा आदर करणारा.

जीवन जगण्याचा मंत्र – कृतज्ञत, कृज्ञत राहाणे.

‘‘कामासाठी कधीच संघर्ष करावा लागला नाही’’  अदिती सारंगधर

* सोमा घोष

अदिती सारंगधर ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. तिने मागील २० वर्षांमध्ये अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अदितीला अभिनयाची आवड नव्हती. मात्र, काळाच्या ओघात तिचे आयुष्य आणि करिअर बदलत गेले आणि शेवटी अभिनयालाच तिने आपले सर्वस्व मानले. तिचे वडील दीपक सारंगधर हे डॉक्टर होते आणि आई शैला सारंगधर बँकेत अधिकारी पदावर काम करत  होत्या.

अदिती मराठी इंडस्ट्रीतली सर्वात प्रसिद्ध आणि जास्त मानधन मिळणारी अभिनेत्री आहे. तिला डेली सोपची राणी म्हटले जाते, कारण तिची कुठलीही मालिका कमीत कमी ४ वर्षे चालते. कसदार अभिनयासाठी ती खूप मेहनत घेते आणि स्वत:ला एक ब्रँड मानते, जो तिला स्वस्तात विकायचा नाही.

अभिनयाव्यतिरिक्त तिला कथ्थक आणि सालसा नृत्यही येते. करिअरच्या या यशस्वी प्रवासात काही मित्र-मैत्रिणींमुळे ती सुहासला भेटली, जो  इंजिनीअर होता. ती त्याच्या प्रेमात पडली आणि तिने लग्न केले. त्यांचा मुलगा अरिन ६ वर्षांचा आहे. सामाजिक विषयावरील तिचे ‘चर्चा तर होणारच’ हे विनोदी अंग असलेले सामाजिक विषयावरील नाटक खूपच प्रसिद्ध आहे. याचे प्रयोग ती मुंबईत करत आहे. यात ती एका सामाजिक कार्यकर्तीच्या भूमिकेत आहे. याशिवाय अदिती मराठी मालिका आणि चित्रपटही करत आहे.

अदितीला ‘गृहशोभिका’ खूप आवडते, कारण हे मासिक महिलांच्या समस्यांना ठामपणे मांडून त्यावर निर्भयपणे आपले विचार मांडते. ती सांगते की, तिची आईही हे मासिक वाचायची.

अभिनयात येण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?

अभिनयात येण्याचा मी कधीच विचार केला नव्हता, कारण वयाच्या प्रत्येक टप्प्याबर माझे विचार बदलत गेले. लहान असताना वडिलांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जायचे, तेव्हा वडील वेटरला टीप्स देताना बघून मला वेटरचे काम करायचे होते. थोडी मोठी झाल्यावर आणि विमानाने प्रवास करू लागल्यावर मला एअर होस्टेस म्हणजे हवाई सुंदरीचे काम आवडू लागले आणि मला तेच करायचे होते. महाविद्यालयात गेल्यावर जेव्हा मी मानसशास्त्राचा अभ्यास करू लागले तेव्हा माझी बाल मानसशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती. महाविद्यालयात असताना रंगभूमीशी जोडले गेले आणि नाटकांमध्ये अभिनय करू लागले.

त्यामुळे एकपात्री प्रयोगाशी जोडले गेले. त्यावेळी माझ्या अभिनयाचे लोकांनी खूप कौतुक केले. यातूनच मला अभिनयची गोडी लागली. माझ्या कुटुंबातील कोणीही  अभिनयाच्या क्षेत्रातील नाही. सर्व डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स आहेत. मी सुट्टीत वैद्यकीय किंवा विज्ञानाच्या सहलीला जायचे.

तुम्हाला संघर्ष किती करावा लागला?

मला कामासाठी कधीच संघर्ष करावा लागला नाही. गेले एक वर्ष मी माझ्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला होता, पण त्यानंतरही मला चांगले काम मिळाले. प्रत्यक्षात कामासाठी संघर्ष करावा लागला नाही, पण मी ज्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे, तो टिकवून ठेवण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागतात. त्यासाठी योग्य माणसे आजूबाजूला असणे आवश्यक असते, जेणेकरून मी योग्य काम निवडू शकेन. माझ्या आयुष्यात मी अनेकदा चुकीचे निर्णयही घेतले आहेत, मात्र ते चुकीचे असूनही मी त्याबद्दल फारसा विचार केला नाही आणि माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला. मी पैशांच्या मागे धावत नाही, पण पैसे नसल्यास दु:खी होत नाही, जीवन जसे असेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.

कोणत्याही कलाकाराने सातत्याने अभिनय करू नये. यामुळे त्याला स्वत:ला समजून घ्यायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत एखादा ब्रेक घेण्याची गरज असते, कारण डेली सोपमध्ये काम केल्याने कलाकाराच्या प्रतिभेत नावीन्य शिल्लक राहात नाही. कोणत्याही कलाकाराला डेली सोप नाईलाजाने करावी लागते. कोणाला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तर कोणाला अन्य काही कारणामुळे डेली सोप हा उत्तम पर्याय वाटत असतो. मी स्पॅनिश शिकण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्यापैकी शिकले आहे, पण पूर्ण करायला मला वेळ मिळत नाही. १० महिन्यांत मी माझी सर्व अर्धवट कामे पूर्ण केली आहेत.

तुम्हाला कौटुंबिक आधार कितपत मिळाला?

माझ्या कुटुंबातील सर्वजण शिक्षण क्षेत्रातील आहेत, त्यामुळे माझी अभिनयाची आवड पाहून त्यांना धक्काच बसला. तरीही जे काही काम करशील त्यात तुझे सर्वोत्तम द्यायला विसरू नकोस, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर मी कामाला सुरुवात केली आणि माझ्या कामाचे कौतुक होताना पाहून त्यांना अभिमान वाटू लागला. अभिनेत्यापेक्षाही एक चांगली व्यक्ती बनणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये मला चांगली झोप लागणे आवश्यक आहे, ज्यामुळे मी सुखाने झोपू शकेन. सुरुवातीला माझ्या वडिलांना माझे काम आवडत नव्हते, पण नंतर माझे काम झाल्यावर ते मला न्यायला गाडी घेऊन स्टेशनपर्यंत यायचे. माझ्या कुटुंबीयांनी मला घराबद्दल कधीच कोणताही तणाव येऊ दिला नाही. म्हणूनच मी प्रत्येक कामात दिलेला शब्द पाळून माझे १०० टक्के देऊ शकले. मी इथपर्यंत पोहोचण्याचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांपासून ते माझ्या सासरच्या सर्वांना देते. माझ्या मुलाला माझे काम माहीत आहे, पण त्याने ते खूपच कमी पाहिले आहे. त्याला बाल रंगभूमी खूप आवडते. मी त्याला तिथे घेऊन जाते.

तुमचे आयुष्य बदलून टाकणारी मालिका कोणती?

‘वादळवाट’ ही मालिका, ज्यात मी प्रमुख भूमिकेत होते आणि ती मालिका साडेचार वर्षे चालली. या मालिकेमुळेच मी घराघरात ओळखले जाऊ लागले. यातील माझ्या कामाचे सर्वांनी कौतुक केले, त्यामुळे मला पुढे जाण्यास मदत झाली.

डिजिटल इंडियामुळे आजकाल मालिकांची रेलचेल वाढली आहे, त्याचा जरा अतिरेकच होत नाही का? तूम्ही त्याकडे कशा पाहतात?

इंडिस्ट्रीची प्रगती होत असून ती मोठी होत असल्याचे पाहून बरे वाटते, मात्र प्रगतीसोबतच काही चुकीच्या गोष्टीही येतात. त्यातून सावरत पुढे जाणे गरजेचे असते. हे खरे आहे की, सध्या कलाकारांना काम करण्याची जास्त संधी मिळत आहे.

तुम्ही कामासोबतच कुटुंबाची काळजी कशी घेता?

आम्ही दोघांनीही आमची जबाबदारी समान वाटून घेतली आहे. गरज पडल्यास तो घरात झाडूही मारतो आणि मी भांडी घासते. मी घराबाहेर अभिनेत्री असले तरी सकाळचा नाश्ता आणि चहा बनवून द्यायला मला आवडते. गरज भासल्यास सुहास मुलाला शाळेत पाठवतो आणि नाश्ताही बनवतो. बघायला गेल्यास हे नाते पती-पत्नीसोबतच एका चांगल्या जोडीदाराचेही आहे. हे नाते शेअर मार्केटसारखे असते जे कधी वर तर कधी खाली जाते.

तुमची प्रेमाची संकल्पना किती बदलली आहे?

प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आज पूर्णपणे बदलला आहे. तो वस्तूनिष्ठ झाला आहे. आजकाल लैंगिक आकर्षण जास्त वाढत आहे आणि प्रत्येकाला जास्त पैसे हवे आहेत. त्यामुळेच सध्या दिखाऊपणा वाढला आहे. कुठेही कोणाच्याही परवानगीची गरज भासत नाही. पूर्वी लपूनछपून भेटण्यात जी मजा यायची ती आता उरलेली नाही. ‘हम आपके है कौन’, ‘हम है राही प्यार के’ यासारखे चित्रपट जास्त आवडीचे झाले आहेत. पूर्वी प्रेमात एक ठेहराव असायचा आता तो दिसत नाही. याशिवाय आज लोकांमध्ये बांधिलकी आणि सहिष्णुता कमी होत चालली आहे.

‘‘प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभ्यास करावा लागतो’’ – जुई भागवत

* सोमा घोष

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली अभिनेत्री जुई भागवत ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेत बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसली. तिने वडिलांकडून संगीताचेही प्रशिक्षणही घेतले आहे. संगीताच्या अनेक कार्यक्रमातही तिने भाग घेतला होता. कलेच्या वातावरणातन जन्मलेल्या जुईची आई दीप्ती भागवत या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि अँकर आहेत तर वडील मकरंद भागवत हे एक प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आहेत. दीप्ती भागवत यांनी अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिकांसोबतच सहाय्यक भूमिकाही केल्या आहेत.

जुई भागवतने ‘उंच माझा झोका’, ‘पिंजरा’, ‘स्वामिनी’, ‘मोगरा फुलला’ यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. तिने झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये मकरंद देशपांडे परीक्षक होते. तिने यात भावनाप्रधान अभिनयासाठी पुरस्कार मिळवला. सध्या जुई सोनी मराठीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत सावनीच्या मुख्य भूमिकेत आहे, ही आतापर्यंत तिला मिळालेली सर्वात मोठी भूमिका आहे, जी प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची आहे. चित्रिकरणात व्यस्त असलेल्या जुईने वेळात वेळ काढून खास ‘गृहशोभिके’साठी गप्पा मारल्या. त्यातील हा काही भाग :

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कुटुंबाचा पाठिंबा किती होता?

माझे आईवडील आणि नातेवाईक सर्वजण सर्जनशील, कल्पक क्षेत्रात आहेत. माझी आई मराठी अभिनेत्री आहे आणि वडील संगीतकार आहेत. संपूर्ण घरातील वातावरण सर्जनशील असल्यामुळे मी बालपणीच कथ्थक आणि गाणे शिकायला सुरुवात केली. मला आठवते की, वयाच्या ८व्या वर्षी मी एकदा आईच्या सेटवर गेले होते, तिथे गेल्यावर मला वाटले, हे माझे क्षेत्र आहे. मी तिथल्या दिग्दर्शकांकडे माझे ऑडिशन घेण्याचा हट्ट धरला. माझ्यातील आत्मविश्वास पाहून त्यांनी लगेचच माझे ऑडिशन घेतले आणि मी एक छोटीशी भूमिकाही साकारली. मला कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायला, जिंकायला आणि बक्षिसे मिळवायला खूप आवडायचे. कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे मी महाविद्यालयापासूनच रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. पदवीचा अभ्यास करताना ५ वर्षे अभिनयही केला. त्यानंतर अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि या क्षेत्रात पदार्पण केले. त्या दरम्यान ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. तिथे मला सर्वोत्कृष्ट भावनाप्रधान अभिनयासाठी ‘बेस्ट एक्सप्रेशन ऑफ दि सीझन’ हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर कोविड आला. त्या काळात मला ही मोठी मालिका मिळाली. यात माझ्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरा वेलनकरसोबत काम करताना मला मजा येत आहे.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

मला पहिला मोठा ब्रेक ‘तुमची मुलगी काय करते’मध्ये मिळाला. ही मालिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. चित्रिकरणादरम्यान, मला उतारावरून कार चालवून अभिनय करायचा होता. मी काही दिवसांपूर्वीच कार चालवायला शिकले होते. त्यामुळे मी खूपच तणावात होते, पण सर्व व्यवस्थित पार पडले.

तुमची मुलगी काय करतेया मालिकेतील व्यक्तिरेखा तुझ्या स्वभावाशी किती मिळतीजुळती आहे?

या मालिकेतील माझी भूमिका आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सावनी मिरजकरची आहे. या मालिकेतून आजच्या तरुणाईची विचारसरणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, कारण महाविद्यालयात जाणारी मुले जेव्हा अमली पदार्थांचे सेवन, एखादे व्यसन किंवा समवयस्कांच्या दबावाला बळी पडतात तेव्हा त्यांच्या नकळत एक वेगळीच व्यक्ती होऊन जातात. ही एक सत्यकथा आहे, जी हरवलेल्या मुलीच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. ती बेपत्ता झाल्यानंतर तिला कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि कुटुंबाची काय स्थिती होते, यावर आधारित हे कथानक आहे. यात शांत महिला ते प्रसंगी वाघिणीचे रूप धारण करणाऱ्या आईची कणखर वृत्ती दाखवण्यात आली आहे. ही व्यक्तिरेखा माझ्या स्वभावापेक्षा खूप वेगळी आणि अवघड आहे. माझ्यासाठी ही पहिलीच मोठी मालिका आहे. ती साकारताना मला खूप काही शिकायची संधी मिळत आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्याचा अभिनय करणे सोपे नाही, कारण मुळात मी तशी नाही. त्यासाठी मला खूप संशोधन करावे लागले. या व्यक्तिरेखेत अनेक चढ-उतार आहेत.

एखाद्या मोठया कलाकारासोबत काम करण्यासाठी तुला किती तयारी करावी लागते?

खूप तयारी करण्याबरोबरच, योग्य शॉट मिळण्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते, कारण या मालिकेतील माझे सर्व सहकारी मुरलेले कलाकार आहेत आणि जवळपास सर्वच रंगभूमीवरून आलेले आहेत. अशा कलाकारांचे काम चोखंदळ असते, त्यामुळे त्यांच्या तोडीचे काम करणे सोपे नसते, पण मला सर्वांचे सहकार्य मिळाले. तांत्रिक ज्ञानही खूप जास्त मिळत आहे.

कोणत्या मालिकेमुळे तुझे आयुष्य बदलले?

मला याच मालिकेतून मोठे नाव मिळाले. प्रेक्षक मला ओळखू लागले. ते कुठेही भेटले तरी मला मालिकेतील नावानेच हाक मारतात.

आईवडील मराठी इंडस्ट्रीत असल्यामुळे तुला काम मिळणे सोपे झाले का?

माझ्यासाठी काहीही सोपे नाही, मात्र इंडस्ट्रीतील लोकांची माझ्यासोबतची वागणूक खूप चांगली असते, पण यामुळे मला कोणतीही संधी मिळाली नाही आणि मला ती नकोही होती. रंगभूमीवर काम करताना मला ही भूमिका मिळाली. मला कोणीतरी ओळखल्यानंतर दडपण येते, कारण माझी तुलना माझ्या आईशी होऊ लागते.

तुला हिंदी चित्रपटात काम करायची इच्छा आहे का?

हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे, काही स्क्रिप्टही मिळाल्या आहेत. चांगले कथानक मिळाल्यास नक्कीच काम करेन. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतही काम करण्याची माझी इच्छा आहे.

रिजेक्शन म्हणजेच नकाराचा सामना तू कसा करतेस?

रिजेक्शनला अनेकदा सामोरे जावे लागले, पण ज्या मालिकेत मला नकार मिळाला, ती न मिळणे माझ्यासाठी फायदेशीर ठरले. म्हणूनच मी कोणत्याही प्रकारे नाराज झाले नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी खूप काही माहीत करून घ्यावे लागते. मी नेहमी प्रयत्न करत राहाते.

तुझ्या स्वप्नांचा राजकुमार कसा आहे?

ज्याच्याशी सूर जुळतील आणि सहजतेने वागता येईल, तोच माझ्या स्वप्नांचा राजकुमार असेल.

आवडता रंग – फिकट जांभळा, फिरोजी.

आवडता पोशाख – भारतीय, पाश्चात्य.

आवडते पुस्तक – अल्केमिस्ट.

पर्यटन स्थळ – हिमालय ट्रेकिंग, युरोप.

वेळ मिळाल्यास – कथ्थक किंवा संगीताचा सराव.

सामाजिक कार्य – वृद्ध, अनाथ मुलांची सेवा.

आवडता पदार्थ – आईच्या हातची पुरणपोळी.

जीवनातील स्वप्न – कलेशी जोडलेले राहाणे.

जीवनातील आदर्श – शिकत राहाण्याची इच्छा.

अक्षया गुरवची ‘बंडखोरी’ रिवणावायली मधून येणार समोर

* सोमा घोष

मराठी चित्रपट हा नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटकांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची दृष्टी प्रेक्षकांना देत आहे. हेच मराठी चित्रपट हे बहू आयामी आणि विषयातील वैविध्य यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या चित्रपटातुन कलाकारांची सामाजिक जाणीवसुद्धा लक्षात येत असून बिटरस्वीट या चित्रपटाच्या नंतर अक्षया गुरव ही अभिनेत्री पुन्हा एकदा एका सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

रिवणावायली असे या चित्रपटाचे नाव असून, येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटही आपल्या भूमिकेविषयी अक्षया सांगते ‘सामाजिक दृष्टया कितीही पुढारलेलो असला तरी कुठे ना कुठे अनिष्ट रूढी परंपरा या आपल्या पाठीमागे तग धरून असतात. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत कितीही जनजागृती होत असली तरी कुठेतरी समाजात अनेक स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. तर शिकलेल्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासूनसुद्धा अडवलं जात आहे. अशाच एकदा बंडखोर मुलीची तिच्या संघर्षाची कथा म्हणजे रिवणावायली.’ तर याच चित्रपटाच्या विषयी पुढे ती सांगते ‘कलाकार आपल्या कलेतून समाजाचं एक प्रतिबिंब उभं करत असतो. कलाकार समाजाचा देणेकरी असतो, त्याने सामाजिक विषय हाताळताना विषयाची सवेंदनशीलता जाणून घेणे आणि त्यावर योग्य ती भूमिका घेणं ही त्याची जबाबदारी असते. तीच जबाबदारी मी या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे.’ अक्षया या चित्रपटात ‘ऐश्वर्या देसाई’ हे पात्र साकारत असून ती उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे.

या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

 ‘माझी मैना’ गाण्यात झळकणार अभिनेत्री मोनालिसा बागल

* सोमा घोष

“हो तिची दुनिया ही न्यारी तिची स्टाईल पुराणी जशी आहे मनाची राणी… कधी राऊंड राऊंड फिरे साऊंड लाऊड लाऊड करे ति गाते मर्जिची गानी…आली लाली गाली माझी मैना आहे निराली…” या दोन-तीन ओळीत मैना कशी आहे हे प्रत्येकाला समजलंय, पण या मैनाला पाहण्यासाठी गेले कित्येक दिवस प्रेक्षक आतुर होते. अखेर, ती मनाची राणी, जी गाते मर्जिची गाणी अशी निराली मैना प्रेक्षकांपर्यंत पोहचलेली आहे एका नव्या गाण्याच्या माध्यमातून ज्याचे नाव आहे ‘माझी मैना’.

साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, सुरेश गाडेकर निर्मित आणि संदेश गाडेकर सहनिर्मित ‘माझी मैना’ हे मराठी गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील मैना आहे अभिनेत्री मोनालिसा बागल आणि जो मैनेचं प्रेमाने आणि मनापासून कौतुक करतोय तो आहे AJ (Oye Its Prank).  या गाण्याच्या निमित्ताने मोनालिसा आणि AJ ही नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. मोनालिसाने आतापर्यंत वेगवेगळ्या पठडीतील भूमिका साकारल्या आहेत, या गाण्याच्या निमित्ताने पण ती सोज्वळ, गोड अशा भूमिकेत दिसणार आहे. त्यापेक्षा असं म्हणा की, ती ख-या आयुष्यात जशी आहे तशीच या गाण्यात दिसणार आहे.

‘माझी मैना’ गाण्याचे दिग्दर्शन शुभम गोणेकर याने केले असून संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अमोल दाते आणि नितिन कुटे यांनी पेलली आहे.

“दिलफेल सारे मागे माझ्या माझ्या दिलाचा तु रं राजा…. ति सोळा वर्षाची कोवळ्या स्पर्शाची चांदन माखून आली” गाण्याच्या या सुंदर ओळी आणि अर्थात संपूर्ण गाणं ऐकायला फार सुरेख वाटतं त्याचे कारण म्हणजे या गाण्याला लाभलेला आवाज. गायिका योगिता गोडबोले आणि गायक नितिन कुटे यांनी हे डुएट गाणं गायलं आहे. या गाण्यात शब्दांची सुंदर रचना, कानाला ऐकावेसे वाटतील असे गोड शब्द प्रशांत तिडके आणि नितिन कुटे यांनी मिळून लिहिले आहेत. नागेश नितरुडकर आणि राहुल धांडेकर हे या गाण्याचे डीओपी आहेत तर विनित गाडेकर आणि विराज गाडेकर यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.

निराळ्या अशा मैनेच्या प्रेमात पडण्यासाठी आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी नक्की ऐका ‘माझी मैना’ साईरत्न एंटरटेनमेंट या युट्युब चॅनेलवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें