सांझ की दुलहन- अंतिम भाग

दिर्घ कथा * मीना गोगावले

(अंतिम भाग)

आत्तापर्यंत आपण वाचलंत : राजन आपल्या राधिका वहिनीशी खूप मोकळेपणानं बोलायचा. त्यानं एक दिवस त्याच्या भावी वधूबद्दल आपल्या कल्पना वहिनीला सांगितल्या. राधिका काळजीत पडली की ही अशी स्वप्नं सुंदरी प्रत्यक्षात कशी अन् कुठं भेटणार? अनेक मुली बघितल्या गेल्या.

शेवटी दूरच्या कुणा नातलगानं सुचवलेली मुलगी राजनला पसंत पडली. खरोखर स्वप्न सुंदरीच होती ती. या परीकडून घरकाम करणं कसं करवून घ्यायचं हे राधिकेला समजेना. सुंदरी घरात आली अन् घरातलं वातावरण बिघडायला लागलं. राजनला हे सगळं माहीत नव्हतं किंवा तिच्या प्रेमात तो आंधळा झाला होता. सुंदरी जरा अधिकच आधुनिक विचारांची होती.

तिचा मित्र, खरं तर प्रियकर कायम घरात ठाण मांडून बसलेला असे. शेवटी राजनला हे असह्य झालं अन् त्यांनी घटस्फोट घेतला.

राजनचं आयुष्यच भकास झालं. त्याच्या मनातून सुंदरी अजूनही जात नव्हती. दुसरं लग्नं करायला घरातून दबाव येत होता. पण राजनला लग्न करायची इच्छा नव्हती. पण शेवटी त्यानं लग्न केलंच. कमी शिकलेली, दिसायला सामान्य, गरीब घरातली मुलगी राजनची पत्नी म्हणून घरात आली. तिनं घरातली कामं राधिकेच्या बरोबरीनं हातात घेतली. सासऱ्यांची सेवा करून त्यांना जिंकून घेतलं. राजनचंही मन तिनं जिंकून घेतलं. एकूण घरात आता आनंदाचं वातावरण होतं…

– आता पुढे वाचा

दुसऱ्या लग्नानंतर आता राजन खरंच सावरला होता. आनंदात होता. इतके दिवस त्याच्या मनांत सुंदरी ठाण मांडून बसली होती. ज्यामुळे तो अनुशी आलिप्तपणेच वागत होता. पण आता त्याला तिच्याबद्दल खरोखरच प्रेम वाटत होतं. जे प्रेम सुंदरीला तो देत होता, तेच प्रेम तो आता अनुवर उधळत होता. सुंदरीला त्याच्या प्रेमाची किंमत नव्हती, पण अनु मात्र राजनच्या प्रेमाला प्रतिसाद देत होती.

त्या रात्री दोघांच्या हसण्याबोलण्याचे आवाज राधिकेला ऐकू येत होते. तिला खूप समाधान वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी राधिका उठली. नेहमीप्रमाणे अनु उठून खाली आली नव्हती. राधिकेनंच चहा केला. बाबांना त्यांच्या खोलीत नेऊन दिला अन् चहाचा टे्र राजनच्या खोलीच्या दाराबाहेर ठेवून तिनं दारावर टकटक केलं, ‘‘चहा तुमची वाट बघतोय.’’ तिनं सांगितलं अन् ती खाली येऊन कामाला लागली. अनुनं चहाचा ट्रे खोलीत घेतला. चहा तयार करून कप राजनच्या हातात देत म्हणाली,

‘‘मला थोडी फार खरेदी करायची आहे. तुम्ही याल माझ्याबरोबर?’’

‘‘येईन की?’’

राधिकेला सांगून, तयार होऊन अनु व राजन बाहेर पडले. ती दोघं परतली तेव्हा राधिका रात्रीचा स्वयंपाक आवरून त्यांची जेवणासाठी वाट बघत होती. बाबा आज सगळ्यांच्या बरोबर डायनिंग टेबलवर जेवायला होते. खूप आनंदात सगळ्यांचं जेवण झालं. राधिकेच्या सुरगणपणाचं अनुनं तोंड भरून कौतुक केलं. मागचं सगळं आवरायलाही मदत केली. बाबा त्यांच्या खोलीत, अनुराजन त्यांच्या खोलीत झोपायला गेले. राधिका आपल्या खोलीत एकटीच होती. शिबू धंद्याच्या कामानं टूरवर गेलेला.

आठ वर्ष झाली होती राधिकेच्या लग्नाला. अजून घरात लहान बाळ आलेलं नव्हतं. शिबू घरी नसायचा. तिला फार एकटं एकटं वाटायचं. खरं तर डॉक्टरांनी बाळ होणारच नाही असंही सांगितलं नव्हतं. राधिकेला बाळ नसण्याचं वाईट वाटायचं. तसं शिबूला वाटत नव्हतं. तो त्याच्या व्यवसायात रमला होता. राधिका मात्र बाहुल्या गोळा करून त्यांना नटवण्यात स्वत:ला रमवत होती. कधी खरंखुरं बाळ तिच्या घरात येईल? निदान राजन अनुला तरी लवकर बाळ व्हावं. आपलंच बाळ समजून आपण त्याला वाढवू…विचार करताना राधिकेला कसला तरी आवाज आला. मांजर आली असेल का? पण मांजरीला यायला खिडकी किंवा झोरोका नाहीए अन् दारं तर सगळीच बंद केली होती. ती स्वत:च्या खोलीबाहेर आली. राजनच्या खोलीला लागून असलेला गच्चीचा दरवाजा उघडा होता.

‘‘म्हणजे? राजन भाऊजी गच्चीवर गेलेत?’’ तिनं मनाशीच म्हटलं, ‘‘की गच्चीचं दार बंद करायला विसरलेत? टॉर्च घेऊन वर जाऊन बघावं का?’’

गच्चीवरून बोलण्याचा आवाज येत होता. ‘‘ही दोघं गच्चीवर गप्पा मारताहेत वाटतं.’’ राधिकेला हसू फुटलं. ‘‘चला, एकदाचा संसार मार्गी लागला म्हणायचा,’’ तिनं जोरात विचारलं, ‘‘गच्चीवर आहात का भाऊजी?’’

‘‘वहिनी, मी आहे अनू, खोलीत गरम होत होतं, म्हणून गच्चीवर आलेय.’’

‘‘ठिक आहे. झोपायला जाताना गच्चीचं दार नीट लावून घ्या.’’

‘‘हो वहिनी, मी बघते सगळं…तुम्ही अजून झोपला नाहीत?’’

‘‘नाही गं! झोप येत नाहीए.’’

‘‘शांत पडून राहा. लागेल झोप.’’

राधिकानं बाबांच्या खोलीत डोकावून बघितलं. त्यांना गाढ झोप लागली होती.

सगळं ठीकठाक आहे. मग ती का अशी अस्वस्थ आहे? काय खटकतंय? आपल्याला मूल नसणं? शिबूचं तिच्यापासून, घरापासून दूर राहणं? की आणखी काही कारण आहे?

रात्री बराच वेळ राधिकेला झोप लागली नाही. उशिरा केव्हा तरी लागली, ती मात्र गाढ झोप होती. पण सकाळी पुन्हा लवकरच झोप उघडली. डोळे अन् अंग जड वाटत होतं. ती उठून खोलीबाहेर आली. राजनची खोली उघडी होती. तिनं अनुला खालूनच मोठ्यानं हाक मारली, ‘‘अनु खाली ये गं! बाबांना चहा करून दे.’’

तिची हाक ऐकून राजन खोली बाहेर येऊन म्हणाला, ‘‘वहिनी, अनु इथं नाहीए, ती खालीच असेल.’’

‘‘अनु, खालीच आहेस का तू?’’ पुन्हा राधिकानं हाक दिली. पण तिला अनुची चाहुल लागेना. बाथरूममध्ये असेल का? पण बाथरूममध्ये बाबा गेलेत. अनु स्वयंपाकघरातही नव्हती. बाहेर बागेतही बघून आली राधिका…इतक्या सकाळी कुठं जाणार?

राधिकानं पुन्हा हाक दिली, ‘‘भाऊजी, माझ्या जावेला खाली पाठवा…चेष्टा पुरे झाली.’’

‘‘वहिनी, मी चेष्टा करत नाहीए. खरंच अनु खोलीत नाहीए…’’

‘‘नाहीए?’’

तेवढ्यात बाथरूममधून बाहेर आलेले बाबा म्हणाले, ‘‘सूनबाई, काल तू बाहेरचं दार लावायला विसरलीस का?’’

‘‘बाहेरचं दार उघडं आहे? गच्चीवरचं दार ही उघडं…? अनु घरात नाहीए

बाबा…हे…हे सगळं काय आहे? भाऊजी अनु घरात नाहीए…’’

‘‘रात्री तुमचं काही भांडण झालं का?’’

‘‘छे काहीच नाही…’’

खोलीत अनुचं सामानही नव्हतं. घरातली तिजोरी उघडी अन् रिकामी होती.

सून घर सोडून निघून गेली होती. फारच हुशार निघाली.

राधिकाला एकदम रात्रीचा प्रसंग आठवला. अनुचं गच्चीवर असणं, कुणाशीतरी बोलणं, तुम्ही झोपा म्हणणं…सगळं काही आधी ठरवल्याप्रमाणे होतं. अचानक घडलेलं नव्हतं. ‘‘ही तर भलतीच हुशार निघाली.’’ राधिका स्वत:शीच बोलली.

एव्हाना राजनलाही सगळं लक्षात आलं होतं. तो डोकं धरून बसून होता.

सगळ्या घरात भयाण शांतता दाटून होती. कुणाला काही बोलणं सुधरत नव्हतं. राधिकेनंच राजनला दुसऱ्या लग्नासाठी भरीला घातलं होतं. बाबांनी त्याच्या मागे ‘लग्न कर, लग्न कर’चा धोशा लावला होता. अन् राजननं या दोघांच्या म्हणण्याला मान देत लग्नाला अन् मुलीला होकार दिला होता. दोष कुणाचा होता? राधिकेला राजनचा संसार बहरलेला बघायचा होता. बाबांना वाटे शिबूला मूलबाळ नाही. निदान राजनचं प्रतिरूप घरात रांगावं, दुडदुडावं. राजनचा भाबडेपणा की त्यानं अनुला जवळ घेतलं. तिलाही तो स्वत:प्रमाणे भाबडीच समजला. अनु भाबडी नव्हतीच. तिनं या तिघांना व्यवस्थित गुंडाळलं होतं. सगळं सगळं घेऊन गेली ती…काहीही उरलं नाही.

रात्री फोन आला, ‘‘मी दुसरं लग्न करते आहे. तुमच्या घरातल्या त्या कोंदट वातावरणात माझा जीव गुदमरत होता. नवं आयुष्य सुरू करायचं तर पैसा हवा…तो मी घेऊन आले आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी मी तुमच्या कुटुंबातली सुन होते.’’

बाबांना धक्काच बसला…राधिकाही अवाक् झालेली. इतका विश्वासघात? आमचं चुकलं कुठं?

राजन या दोघांच्यामध्ये मूकदर्शक होता. वहिनी अन् बाबा काय म्हणाले ते त्यानं ऐकलं नाही. पुन्हा एक वाईट स्वप्नं बघितलंय त्यानं. रडायचं अन् गप्प व्हायचं. पुन्हा रडायचं अन् पुन्हा गप्प व्हायचं. आधी सुंदरीच्या सौंदर्यावर भाळला नंतर अनुच्या समंजस अन् सोशिवपणावर! दोघींनीही त्याचा विश्वासघात केला. का? त्याला समजतच नव्हतं. जगायचं कसं? मरता येत नाही म्हणूनच जगतो माणूस. घरात तर कुणीच कुणाशी नजरेला नजर भिडवत नव्हतं. सगळे एकमेकांची नजर टाळत होते. प्रत्येक जण स्वत:ला गुन्हेगार समजत होता. एकमेकांना दोष देण्यापेक्षा आपलंच चुकलं ही भावना प्रबळ होती.

बाबांना तर हा धक्का पचवणं फारच जड जात होतं. घराबाहेर, समाजात, नातलगांमध्ये, मित्रांमध्ये चर्चेचा एकच विषय होता. दुसरी सूनही घर सोडून गेली? घरातल्यांचाच दोष असणार. काही तरी नक्कीच असणार, नाहीतर एवढ्या चांगल्या मुलाच्या बाबतीत असं का घडावं? बाबांनी घराबाहेर पडणं थांबवलं होतं. घरातही ते कमीच बोलायचे.

इकडे शिबू धंद्याच्या वाढत्या व्यापात घराबाहेर जास्त वेळ राहत होता. राधिकेला द्यायला त्याला वेळ नव्हता. राधिका कधी प्रेमानं जवळ आली तरी तो तिला दूर लोटायचा. ‘‘मी फार दमलोय…उद्या बोलूयात…’’ असं म्हणायचा. दुसऱ्या रात्री थकवा अजून वाढलेला असायचा. मग राधिकेच्या जवळ जाण्याचं धाडस होत नसे त्याला.

बिचारी राधिका! मोडक्या शिडाची नाव वल्हवायचा प्रयत्न करत होती. त्या नावेला भोकंच भोकं पडली होती. ती बुजवताना तिचं वय वाढत होतं.

बाबा घराबाहेर काय?खोलीबाहेरही पडत नव्हते. स्वत:च्या एकटेपणांतच गुंग असायचे.

राजन आपल्या खोलीच्या खिडकीतून रस्त्याकडे बघंत कुणास ठाऊक कुणाची वाट बघत असायचा. संध्याकाळ उलटून रात्र व्हायची. घरात काय चाललेले आहे, त्याला गंधवार्ताही नसे. राधिका घरात पसरलेल्या या भयाण शांततेत चार शब्द बाबांशी तर चार शब्द राजनशी बोलायचा प्रयत्न करायची. त्या घरात तिचं स्थान नक्की काय होतं?

बाबांनी तिला बजावलं होतं, ‘‘तू माझी नाही तर या घराची सून आहेस. या घराला जे तू देशील, त्याहून जास्त तुला मिळेल,’’ शिबू रूपयांनी ठासून भरलेली बॅग राधिकेला द्यायचा अन् म्हणायचा, ‘‘हे घर तुझं आहे. हवं तसं चालव. मी तुला कधीही काही म्हणणार नाही. पण हे घर आनंदानं ठेवणं ही तुझी जबाबदारी.’’

ते पैसे बघून राधिकेच्या मनांत यायचं या पैशांनी घरातला आनंद विकत घेता येईल का? बाबांचा झालेला अपमान, त्यांचा दुखावलेला सन्मान परत घेता येईल का? अन् घराण्याचा कुलदिपक राजनची उध्वस्त झालेली स्वप्नं विकत मिळतील का? काय करू मी या कागदांच्या तुकड्यांचं?

शिबूनं कायम तिच्याकडे भावाचा अन् बाबांचा आनंदच मागितला होता. पण राधिकेचा आनंद कशात आहे हे त्यानं कधी विचारलं नाही किंवा समजूनही घेतलं नाही. भकास दिवस अन् एकलेपणानं भारवलेल्या रात्री ती कशा काढते हे त्याला कधी समजलंच नाही. स्वत:च्या यशाच्या मार्गावर पुढे पुढे जाताना आपलीच माणसं मागे मागे राहिली आहेत हे त्याच्या लक्षातच आलं नाही. जे काही त्यानं धरून ठेवलं होतं, ते हातातून सुटलं तर तो स्वत:च विखरून पडेल. महत्त्वाकांक्षा असावी पण त्यासाठी थोरला लेक, मोठा भाऊ, बायकोचा नवरा ही नाती विसरावी लागतात हे कुणी सांगितलं?

राजन पण आपला पगार राधिकेला द्यायचा. ‘‘वहिनी, हे घे, सांभाळ…मी काय करू याचं? मी हा पैसा सांभाळू शकत नाहीए.’’

‘‘अजून किती जबाबदाऱ्याचं ओझं माझ्यावर टाकणार आहात? या कागदाच्या कपट्यांनी आनंद विकत घेता येत नाही. मी तरी यांचं काय करू? माझ्या इच्छा, अपेक्षा, आनंद सगळं सगळं चिणलं गेलंय…मला नकोय आता जबाबदाऱ्या.’’

आज प्रथमच राधिका इतकं बोलली होती. तिची वेदना, व्यथा आजा प्रथमच त्याला कुठंतरी जाणवली होती. तिची चिडचिड, तिची अगतिकता कशामुळे होती? तिचा आक्रोश आमच्यामुळे होता की तिचा काही प्रॉब्लेम होता? तिनं तरी मन कुणाजवळ मोकळं करावं? राजन विचार करत होता.

राधिकेच्या खोलीवरून जाताना त्याला खोलीतून हंदके ऐकायला आले. तो थांबला.

‘‘वहिनी…’’

‘‘आले…आले…’’ म्हणाली राधिका. पण ती बाहेर येण्यापूर्वीच तो तिच्या खोलीत शिरला. प्रथमच तो या खोलीत आला होता. खोली बऱ्यापैकी अव्यवस्थित होती. काचेच्या मोठ्या शोकेसमध्ये अगणित बाहुल्या मांडून ठेवलेल्या होत्या. खोलीतलं ड्रेसिंगटेबल झाकलेलं होतं. वहिनी कधीच ते वापरत नसावी.

पलंगावरची चादर नीट करत राधिकेनं विचारलं, ‘‘कसे काय आलात भाऊजी?’’

‘‘असंच! वाटलं यावं, आलो,’’ तेवढ्यात बेडवरची बोलकी बाहुली बोलली, ‘‘मम्मा, आय लव्ह यू’’ राधिकानं तिचं बटन दाबून तिला गप्प केलं.

‘‘बोलू देत ना, छान वाटतय.’’ राजननं म्हटलं, ‘‘एक विचारू वहिनी?’’

‘‘विचारा, काय विचारताय? मला ठाऊक आहे तुम्ही काय विचारणार आहात ते?

भाऊजी, या घरानं, या घरातल्या आनंदानं माझ्याकडे पाठ फिरवली आहे. घर, घर नाही, धर्मशाळा वाटते. जिथं लोक राहतात पण त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. परक्यासारखेच असतात सगळे, कोण केव्हा रडलं, कोण केव्हा हसलं, कुणाला ठाऊक नसतं. कोण अश्रू गाळतं, रात्र जागवतं अन् कोणाची संध्याकाळ डोळ्यातल्या पाण्यानं झाकोळते हे कुणीही समजून घेत नाही.’’

‘‘वहिनी…शिबू दादा…?’’ काहीही न बोलता तो तिथून निघून गेला.

किती तरी वेळ वहिनींचे अश्रूंनी भरलेले डोळे अन् शब्द त्याचा पाठलाग करत होते. ‘‘या घरात मी एक जिवंत, हाडामांसाची, भावना असणारी स्त्री आहे हे कुणाला माहीत आहे? प्रत्येकजण स्वत:तच मग्न आहे. स्वत:तच गुंतलाय. माझं आहे कोण? कुणाला काळजी आहे माझा कुणाला वेळ आहे माझ्यासाठी?

संध्याकाळ दाटून आली होती पण आज राजननं खोलीची खिडकी उघडली नव्हती, संध्याकाळही जणू आज तिकडे फिरकलीच नाही, वारंवार त्याला राधिकाचा कोमजलेला चेहरा डोळ्यांपुढे येत होता. राजनहून फक्त दोन महिने मोठी होती ती. पण जबाबदाऱ्यांनी तिला अकाली म्हातारं करून टाकलंय. मोठेपणाच्या जाणिवेनं ती इतकी जखडली गेलीय की स्वत:चं जगणंच विसरली आहे. घरातली तीन मोठी बाळं, सासरा, नवरा, दिर यांना सांभाळते आहे. मनातून स्वत:च्या लहानग्या बाळासाठी झिरते आहे.

काळोख वाढला तसे बाबा खोलीतून बाहेर आले. हल्ली ते उजेडात बाहेर जाणं टाळतातच. ते फिरायला बाहेर पडले आणि राधिका रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.

फिरून आल्या आल्या बाबा म्हणाले, ‘‘सूनबाई, जेवायला वाढ. मी लवकरच झोपणार आहे.’’ राधिकानं त्यांना जेवायला वाढलं. ते आपल्या खोलीत गेले. मग राधकिनं राजनलाही जेवू घातलं. आपलं जेवण आटोपलं अन् स्वयंपाकघर आवरून ती आपल्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात लक्षात आलं. गच्चीचं दार उघडं आहे. राजन गच्चीवर असेल बहुधा. ‘‘भाऊजी…’’ तिनं हाक मारली. उत्तर आलं नाही तशी ती स्वत:च वर निघाली. गच्चीवर चांदणं होतं. राजन आपल्याच सावलीशी खेळल्यासारखा काही तरी शोधत होता.

‘‘काय शोधताय? काय हरवलंय?’’ राधिकानं विचारलं. आज खूपच दिवसांनी ती गच्चीवर आली होती. मधल्या काळात अनुबरोबर कधी कधी गच्चीवर यायची.

अचानक राधिकेला बघून राजन बावचळला…‘‘माझी अंगठी…बोटातून निघून कुठं तरी पडलीय, ती शोधतोय…’’

‘‘असेल इथंच कुठं तरी,’’ राधिकाही अंगठी शोधू लागली. ती जिन्याच्या पायऱ्यांवर अंगठी शोधत होती अन् तिला सापडलीही, ‘‘बघा, सापडली अंगठी.’’

‘‘अरेच्चा! मी कधीचा शोधतोय, मला नाही मिळाली.’’

‘‘ही घ्या…’’ राधिकेनं पायरीवरूनच वर उभ्या असलेल्या राजनला अंगठी द्यायला हात पुढे केला. अंधारात तिचा पायऱ्यांचा अंदाज चुकला अन् तिचा तोल गेला. राजननं तिला सावरायचा प्रयत्न केला. त्याचाही तोल गेला. घाबरून त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघंही त्यामुळे सावरली…पडता पडता वाचली अन् राधिकेच्या चेहऱ्यावरच्या उदास रेषा जणू पुसल्या गेल्या. कोरड्या केसांच्या बटांमधून दिसणारे शुष्क डोळे आनंदानं उजळले. पुरूष स्पर्श विसरून गेलेला देह एकाएकी सजीव झाला.

गेली इतकी वर्षं फक्त इतरांकरता कष्टकरणारी, स्वत:च सुखदु:ख विसरून दुसऱ्यांसाठी जगणारी राधिका बघत आला होता राजन. आज तिच्यात त्याला प्रथमच चैतन्यमय स्त्रीत्त्वाचा प्रत्यय आला. इतकं आकर्षण इतकी ओढ आहे तिच्या देहात, चेहऱ्यात…इतकं समर्पण, इतका आवेश, पूर्वी कधीच न वाटलेल्या या भावना, त्यालाही स्वत:ला सांभाळणं, साधेना. एकमेकांच्या मिठीत जणू सारी धरती, सारं आकाश सामावलं होतं. तिच्या देहाची थरथर, चेहऱ्यावरचे संपूर्ण समर्पणाचे भाव, डोळ्यातला आनंद अन् मादकता हे सगळंच अद्भूत होतं. त्यानं मिठी अधिक घट्ट केली. ‘‘या डोळ्यातला हा आनंद मी कधीच मावळू देणार नाही. घरातला, संसारातला सगळा सगळा आनंद मी तुला देईन. मी वचन देतो तुला…’’

तेवढ्यात खालून कुणी तरी हाक मारलेली ऐकू आली…‘‘वहिनी…’’

‘‘अरे  हा तर सुंदरीचा आवाज वाटतोय…’’

‘‘मी सुंदरी…दरवाजा उघडा.’’ पुन्हा हाक आली.

‘‘हे काय नवंच? आज तर राजननं खिडकीही उघडली नव्हती. मग सुंदरी कुठून आली? राजनची पहिली बायको? नाही…नकोय…आता कुणी नको…’’

बाबांचा खणखणीत आवाज ऐकू आला, ‘‘आता कुठल्याही सुंदरीला आमच्या घरात थारा नाही.’’

दारावर थापा ऐकू येत होत्या. राजन आणि राधिकानं ऐकल्या. पण दुर्लक्ष केलं. राजन म्हणाला, ‘‘सुंदरी आता घरात येणार नाही. सायंकाळची दुलहन रात्री घरी येत नाही. माझी सांझ की दुलहन मला भेटली.’’ दोघांची मिठी अधिकच घट्ट झाली.

कुठून तरी रेडिओवरच्या गाण्याचे सूर अलगद तरंगत आले, ‘‘कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं तो निकल आए जनमों के नाते, घनी थी उलझन,  बैरी अपना मन, अपना ही होके सहे दर्द पराए…दर्द पराए…कही दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुलहन बदन चुराए, चुपके से आए मेरे ख्यालो के आंगन में कोई सपनों के दीप जलाए…’’                                      समाप्त

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें