– सोमा घोष
मराठी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मुळे चर्चेत आलेली मराठी अभिनेत्री रसिका सुनील मुंबईची आहे. तिने वयाच्या १८व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. कलेचा वारसा असलेल्या कुटुंबातच ती जन्मली. रसिकाला अभिनयाव्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात जाण्याची इच्छा नाही, कारण लहानपणापासून तिने आपली आजी आणि आई यांना रंगमंचावर अभिनय करताना पाहिले होते. लहान वयातच ती नृत्य आणि संगीत शिकली. कॉलेजमध्ये गेल्यावर ती रंगमंचावर काम करू लागली. स्वभावाने हसरी असलेली रसिका सध्या लॉकडाऊन काळात आपले छंद पूर्ण करत आहे. तिच्याशी बोलणे रोमांचक होते. या जाणून घेऊ, काय सांगते रसिका आपल्या एकूणच अभिनयसफरीबाबत :
अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?
माझी आजी कल्पना आणि आई मनीषा यांना मी लहानपणापासून नाटकात काम करताना पाहिले आणि तेव्हापासूनच माझ्यात अभिनयकलेप्रति आवड निर्माण झाली. पण मी स्वत: अभिनयाची सुरूवात कॉलेजला गेल्यापासून केली, कारण तेव्हा मला वाटले की मी या दिशेने मेहनत करू शकते आणि मी तसे केले.
प्रथम जेव्हा अभिनय करण्याबाबत तुझ्या पालकांशी बोललीस, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?
सुरूवातीपासूनच त्यांचा मला पाठींबा होता, कारण लहानपणापासून माझी आई मला नृत्य आणि संगीताच्या क्लासला घेऊन जायची. याच कारणामुळे मी भारतीय शास्त्रीय संगीतात विशारद केले आणि भरतनाट्यमची पदविका घेतली आहे. घरातून मला कोणीच अडवले नाही. माझी आई खूपच खंबीर व्यक्तिमत्त्वाची आहे. तिच्याकडून मला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते.
पहिला ब्रेक केव्हा आणि कसा मिळाला?
मी कॉलेजमध्ये अभिनयाला सुरूवात केली होती. त्याआधी मी नृत्य आणि संगीतात व्यस्त होते. मराठीत मी प्लेबॅक सिंगर होते. अभिनयाची सुरूवात मी एका व्यावसायिक नाटकाने केली. त्यानंतरचा माझा मोठा ब्रेक टीव्ही मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हा होता, ज्यामुळे मी लोकप्रिय झाले.
अभिनय करत असताना नृत्य आणि संगीत सुटेल याची भीती वाटली नाही का?
मला असे कधीच वाटले नाही, कारण असे वाटताच मी नवेकाही शिकायला क्लासला जाते. मला नवीन काही शिकण्यात खूप मजा वाटते. मी अनेक वाद्य वाजवायला शिकले आहे. मला तबला आणि हार्मोनियमसुद्धा वाजवता येते. अभिनय करत असताना माझे गायन जवळपास सुटले होते, पण आता परत मी गायनाकडे वळते आहे. मी काही व्हिडिओज आणि शोजही केले आहेत. मी ५व्या इयत्तेत असल्यापासून स्टेजवर वाद्य वाजवण्यास सुरूवात केली.
लॉकडाऊनमध्ये काय करतेस?
लॉकडाऊनमध्ये प्रोडक्टिव्ह काम करायचा प्रयत्न करत आहे, पण अभिनेता इरफान खान आणि अभिनेता ऋषी कपूर यांच्या मृत्यूने मला दु:खी केले आहे. ज्यातून बाहेर पडण्यासाठी मी संगीत आणि वर्क आऊटचा आधार घेतला आहे. इरफान खानच्या ‘करीब करीब सिंगल’ हा चित्रपट मला खूप आवडला होता, ज्यात त्यांची भूमिका अतिशय सशक्त होती. ऋषी कपूरचाही ‘अग्निपथ’ हा चित्रपट मला आवडला होता, कारण यात त्यांनी नेहमीच्या चॉकलेट बॉयच्या प्रतिमेला छेद देत भेदक खलनायकाची भूमिका केली आहे.
कोणत्या प्रकारचे पदार्थ बनवते आहेस?
मला जेवण बनवणे आवडते आणि या लॉक डाऊनमध्येसुद्धा बनवते आहे. मी दुधीची कोफ्ता करी छान बनवते. यासाठी मी काजू आणि टोमॅटो बारीक करून कमी तिखट करी बनवली, जी क्रिमी लायटर ग्रेव्ही तयार झाली. त्यानंतर दुधी किसून कोफ्ते बनवले आणि त्यात टाकले.
हिंदी चित्रपट अथवा शो केव्हा येणार आहे?
बोलणी सुरु आहेत, पण लॉकडाऊनमुळे सध्या बंद आहेत. मला चांगला आणि प्रभाव टाकेल असा अभिनय करायला आवडतो.
तुला आव्हानांचा सामना करावा लागला आहे का?
माझ्या पहिल्या मराठी शोमुळे मी खूप चर्चेत असायचे. दोन वर्षांनंतर मी हा शो सोडला व अमेरिकेत गेले. तिथे जाऊन काही वेगळे करायचे असे ऐकल्यावर प्रेक्षकांनासुद्धा आश्चर्य वाटले. पण मी भारतात माझ्या ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचे प्रमोशन करायला भारतात परत आले.
लॉकडाऊन समाप्तीनंतर इंडस्ट्रीला परत रुळावर यायला कोणती रणनीती वापरायला हवी?
याचे उत्तर आत्ता देणे कठीण आहे, कारण इंडस्ट्रीत संपुर्ण टीम असते. जिथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अतिशय कठीण आहे. बहुतेक ७०चे दशक परत येईल. दूर दूर उभे राहून रोमान्स करावा लागेल, जोवर कोरोनाची लस येत नाही. डिजिटल प्लँटफॉर्म आणखीन सक्रिय होईल व कथानकातही बदल करण्याची गरज भासेल.
फॅशन किती आवडते?
मला चांगले कपडे घालून तयार व्हायला आवडते, पण मला आरामदायक कपडे घालायला आवडते. ड्रेस कितीही सुंदर असो पण आरामदेह नसेल तर मी नाही घालू शकत.
‘गृहशोभिके’द्वारे काही संदेश द्यायचा आहे का?
प्रत्येकाने लॉकडाऊनमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित ठेवायला हवे, तरच आपण या परिस्थितीतून चांगल्याप्रकारे बाहेर पडू शकू. यासाठी घरातील प्रत्येक सदस्याने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
आवडता रंग – ब्लॅक आणि लव्हेंडर.
आवडती वेशभूषा – कंफर्टेबल आणि बॅगी कपडे.
फावल्या वेळात – संगीत ऐकणे आणि गाणी लिहिणे.
नकारात्मकता दूर करण्याचा उपाय – सकारात्मक विचार आणि मेडिटेशन.
आवडते पर्यटनस्थळ – देशात केरळ , विदेशात अमेरिका.
जीवनातील आदर्श – साधे राहणे आणि मला नाटकी लोक आवडत नाहीत.
आवडता परफ्युम – डेव्हिडऑफ.
सामाजिक काम – मेन्स्ट्रुअल पॅड्ससाठी काम करणे, जे मी सध्या करत आहे.