बाल्कनी अशी बनवा सुंदर

* नसीम अंसारी कोचर

लग्नानंतर शर्मिष्ठा लखनऊहून दिल्लीला आली तेव्हा मोकळया बागेतील घर सोडून सासरच्या तीन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये राहाणे तिच्यासाठी खूप त्रासदायक झाले. तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहाताना तिला गुदमरल्यासारखे वाटत होते. असे घर जिथे छत किंवा जमीन स्वत:ची नव्हती. तिथे सूर्यप्रकाशही येत नव्हता.

शर्मिष्ठा लहानपणापासून तारुण्यापर्यंत ज्या घरात राहिली तो बंगला होता. समोर बाग, मागे किचन गार्डन होते. प्रत्येक खोलीत खिडक्या, स्वच्छ मोकळी हवा होती. सकाळच्या सूर्याची पहिली किरणे घराच्या मध्यभागी अंगण आणि अंगणात पडणारी सूर्यकिरणे होती. त्यामुळे सासरी आल्यानंतर फ्लॅटमध्ये राहताना तिला श्वास कोंडल्यासारखे वाटत होते. फ्लॅट चारही बाजूंनी बंदिस्त होता, त्यात मोकळेपणाच्या नावावर एकच बाल्कनी होती, जिथे ती उभी राहून दीर्घ श्वास घेत असे.

शर्मिष्ठाला या घरात राहाणे भाग होते, कारण दिल्लीसारख्या ठिकाणी बंगल्याची कल्पनाच करता येत नाही, त्यामुळे बाल्कनीलाच असा लुक देण्याचा विचार तिने केला, ज्यामुळे निसर्गाशी जवळीक साधता येईल. शर्मिष्ठाने छोटया कुंडीत काही रोपे लावली.

घरातील तुटलेल्या वस्तू रंगवून त्यात छोटी मोसमी फुले असलेली रोपे लावली आणि बाल्कनीच्या रेलिंगला ठिकठिकाणी टांगली. काही ठिकाणी जुन्या बुटांमध्ये तर काही ठिकाणी चहाच्या किटलीत झाडांच्या वेली लोंबकळू लागल्या, त्या अतिशय आकर्षक दिसत होत्या. त्यांच्या मधोमध तिने रंगीत बल्ब आणि वाऱ्याच्या झुळुकीने कंप पावून कर्णमधुर संगीत ऐकवणाऱ्या लहान घंटा लावल्या.

बाल्कनीच्या एका कोपऱ्यात मोठया कुंडीत तुळस तर सदाहरित आणि गोड कडुलिंबाची काही रोपे मोठया कुंडीत लावली, त्यामुळे तो परिसर अधिकच हिरवागार दिसत होता. हळूहळू तिच्या बाल्कनीचे रूप बदलू लागले. एके दिवशी शर्मिष्ठाने बाजारातून बनावट गवत असलेला एक छोटा गालिचा विकत घेतला. तो बाल्कनीत पसरून तिने त्यावर दोन लहान बांबूच्या खुर्च्या आणि एक छोटासा टेबल ठेवला.

महिनाभरातच शर्मिष्ठाची बाल्कनी एका सुंदर बागेत रूपांतरित झाली, जिथे ती घरातली कामे आटपून सासू-सासऱ्यांसोबत गप्पा मारत बसू लागली. दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा दोन्ही तिने तिथे बसून प्यायला सुरुवात केली. शर्मिष्ठाच्या मेहनतीमुळे ती जागा त्या घरातील सर्वात सुंदर आणि घरातील प्रत्येक सदस्याची आवडती जागा बनली. हे पाहून आजूबाजूच्या फ्लॅटमधील लोकांनीही आपली बाल्कनी झाडे आणि रोपांनी सजवायला सुरुवात केली.

छोटं घर असो की घराबाहेर मोठी बाग, दोन खुर्च्या आणि एक टेबल, तिथे बसून सकाळचा चहा किंवा संध्याकाळची कॉफी पिणे, निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण अपार्टमेंट आणि फ्लॅट संस्कृतीत हे सर्व शक्य नाही, असा विचार करून लोक मन मारून राहातात.

पण असे निराश होण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या छोटयाशा बाल्कनीलाही इतके सुंदर बनवू शकता, जेणेकरून तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहाण्याचा आनंद घेऊ शकाल. तुमची बाल्कनी हिरवीगार आणि सुंदर कशी बनवायची ते आम्ही तुम्हाला सांगतो, जेणेकरुन ते तुमचे आवडते ठिकाण बनेल आणि तुम्ही तिथे अधिकाधिक वेळ घालवाल.

कृत्रिम गवताचा वापर करा

तुमच्या बाल्कनीचे क्षेत्रफळ मोजा, त्यानुसार बाजारातून कृत्रिम गवत खरेदी करा. ते फिकट किंवा गडद हिरव्या रंगाचे दिसते, जे अगदी खरेखुरे वाटते. हे कृत्रिम गवत एका मिनिटात तुमच्या बाल्कनीचे रूप बदलून टाकेल. तुम्हाला बागेत असल्यासारखेच वाटेल. त्याची देखभाल करणेही खूप सोपे आहे.

हँगिंग पॉट्स आणि कुंड्यानी सजवा बाल्कनी

बाल्कनी छोटी असली तरी बागकामाचा छंद त्यात पूर्ण होऊ शकतो. तुम्ही बाल्कनीला रंगीबेरंगी फुलांची रोपे आणि वेलींनी सजवू शकता. त्यात झेंडूची रोपे नक्की लावा. हिवाळयाच्या हंगामात, अनेक प्रकार आणि रंगांत मिळणारे क्रायसॅन्थेमम्सचे रोपही तुम्ही लावू शकता. त्याची जास्त देखभालही करावी लागत नाही. पेटुनियाही एक चांगला पर्याय आहे. त्यांना ६ ते ८ तास सूर्यप्रकाश लागतो आणि कमी पाणी लागते.

यासोबतच मॉर्निंग ग्लोरीची फुलेही गुलाबी, निळया, जांभळया आणि पांढऱ्या रंगात उमलतात. तीही तुम्ही लावू शकता. कोरल बेल्स, फर्न इत्यादी हिरवीगार आणि ताजेपणाची अनुभूती देणारी रोपे बाल्कनीत लावायला हवीत. व्यवस्थित काळजी घेऊ शकत असाल तर तुम्ही बोन्सायही नक्की लावा.

भिंतीवर लावा चित्रे

पुढील जागा फुलांनी आणि मागची भिंत सुंदर चित्रांनी सजवा. या भिंतीवर तुम्ही सुंदर वॉलपेपर किंवा स्टिकर्सही लावू शकता. नैसर्गिक सौंदर्याची उधळण असलेले अनेक स्टिकर्स ऑनलाइन मिळतात.

शोपीस नक्की लावा

टेराकोटा, माती किंवा चिनी मातीचे विविध प्रकारचे शोपीस तुम्ही बाजारातून खरेदी करू शकता. हे ऑनलाइनही उपलब्ध आहेत. हे खास बाग नजरेसमोर ठेवून बनवले जातात. वाटल्यास तुम्ही मिनी कारंजेही खरेदी करू शकता. जर तुम्ही ते बाल्कनीच्या एका कोपऱ्यात लावले तर ते तुमची बाल्कनी जास्तच शोभिवंत बनवतील. झळझळ पाण्याच्या आवाजामुळे तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचा भास होईल. यामुळे बाल्कनीला अतिशय आकर्षक लुकही मिळेल.

रंगीबेरंगी दिवे किंवा आकाशकंदील लावा

दिवाळीच्यावेळी वापरलेली लायटिंग तुम्ही बाल्कनीत लावू शकता. तुम्ही जुन्या कंदीलाला पिवळा किंवा लाल रंग देऊन तो लटकवू शकता. वाटल्यास मेणबत्तीच्या स्टँडमध्ये आकर्षक रंगांच्या मेणबत्त्याही लावू शकता. बाल्कनीत तुळशीचे रोप असेल तर त्यावर दिवा ठेवण्यासाठी जागा बनवा. तुम्ही तुमची बाल्कनी फुलपाखरू, तारा किंवा चंद्रासारख्या अनेक प्रकारच्या हँगिंग लाइट्स म्हणजे लटकत्या दिव्यांनी सजवू शकता.

आरामदायी खुर्ची किंवा झोपाळा ठेवा

तुम्ही बागेच्या खुर्च्या, उशा, टेबल इत्यादी वापरून तुमची बाल्कनी एका लहान दिवाणखान्यात बदलू शकता. बाल्कनी मोठी असेल तर तिथे एक दिवाही लावू शकता, जेणेकरून तुम्ही तिथे सकाळ, संध्याकाळ बसू शकाल आणि काही एकांतातील क्षण घालवू शकाल. पुस्तक वाचू शकाल, पावसाचा आनंद घेऊ शकाल, चहा किंवा कॉफी पिऊ शकाल.

बाल्कनीला स्टोअररूम म्हणजेच अडगळीची जागा बनू देऊ नका

बाल्कनीत निरुपयोगी वस्तू ठेवू नका. बरेच लोक बाल्कनीत लहान मुलांची सायकल, खेळणी किंवा खोके इत्यादी ठेवतात, त्यामुळे बाल्कनी खराब दिसू लागते. बाल्कनीत कपडे सुकवणेही गरजेचे असते. त्यासाठी असे स्टँड वापरा जे काम झाल्यावर दुमडून आत ठेवता येईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें