जीवघेणा रोग, पत्नी वियोग

* भारत भूषण श्रीवास्तव

प्रेम खरोखरच माणसाला आंधळं बनवतं. त्यामुळे माणूस एवढा भावुक, भयभीत आणि संवेदनशील होतो की व्यवहार व दुनियादारी शिकू शकत नाही. अगदी हेच ऋषीशसोबत घडले. त्याने नेहासोबत लव्हमॅरेज केलं होतं. प्रेयसी पत्नीच्या रूपात मिळाल्यामुळे तो खूप खूश होता. पेशाने फुटबॉल कोच आणि ट्रेनर ऋषीशचा आनंद त्यावेळी आणखी दुप्पट झाला, जेव्हा जवळपास दीड वर्षांपूर्वी नेहाने छानशा बाहुलीला जन्म दिला.

भोपाळमधील कोलार भागात असलेल्या मध्य भारत योध्दाज क्लबला प्रत्येक जण ओळखतो. त्याचा कर्ताधर्ता ऋषीश होता. हसतमुख आणि आनंदी असलेल्या या खेळाडूला जो कोणी एकदा भेटत असे, तो त्याचाच होऊन जात असे. परंतु कोणाला माहीत नव्हतं की वरून खूश असल्याचे नाटक करणारा हा माणूस काही काळापासून आतल्या आत खूप कुढत होता. ऋषीशच्या जीवनात काही असं घडलं, ज्याची त्याला स्वत:लाही कधी अपेक्षा नव्हती.

गेल्या ३ जुलैला ३२ वर्षीय ऋषीश दुबेने विष पिऊन आत्महत्या केली, तेव्हा ज्यालाही कळलं, त्याला त्याच्या आत्महत्येचं कारण जाणून आश्चर्य वाटलं. ऋषीशने पत्नीच्या विरहात जीव दिला. त्याचे आई-वडील दोघंही बँक कर्मचारी आहेत. त्या संध्याकाळी जेव्हा ते घरी परतले, तेव्हा ऋषीश घरात बेशुध्द पडलेला होता.

घाबरलेले आईवडील लगेच मुलाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यू संशयास्पद होता, त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं, तेव्हा कळलं की ऋषीशने विष घेतलं होतं. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. परंतु मरण्यापूर्वी ऋषीशने आपल्या आठवणींचे पोस्टमार्टेम पेनाने कागदावर केले, ते नष्ट होणारे नव्हते. कारण ते शरीर नव्हे, भावना होत्या.

तर मी नसणार

कुटुंब, समाज आणि जगाच्या विरोधात जाऊन नेहाशी लग्न करणारा ऋषीश ३ जुलैला सहजच हिंमत हरला नव्हता. हिंमत हरण्याचं कारण होतं, त्याला कायम धीर देणारी नेहा काही महिन्यांपासून त्याला सोडून माहेरी जाऊन राहिली होती.

पतिशी भांडण झाल्यानंतर पत्नीचे माहेरी जाऊन राहणे काही नवीन गोष्ट नाही, उलट ही एक परंपराच ठरत आहे. जी नेहानेही निभावली आणि जाताना छोट्या मुलीलाही सोबत घेऊन गेली, जिच्यावर ऋषीशचे खूप प्रेम होते.

२ महिन्यांपूर्वी काहीतरी कारणावरून दोघांत भांडण झालं होतं. हीसुध्दा काही आश्चर्याची गोष्ट नव्हती, परंतु नेहाने ऋषीशची तक्रार पोलीस स्टेशनला केली.

आपल्या सुसाइड नोटमध्ये ऋषीशने नेहाला उद्देशून लिहिलं होतं की तू माझी साथ सोडलीस, तर मी राहणार नाही आणि मी सोबत सोडून जाईन, तेव्हा तू राहणार नाहीस.

४ पानांची लांबलचक सुसाइड नोट भावुकता आणि विरहाने भरलेली आहे, ज्याचे सार याच २ वाक्यात सामावलेले आहे. दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की काहीही झाले तरी दोघंही एकमेकांशिवाय राहणार नाहीत. म्हणजेच स्थिती ‘मिलके ना होंगे जुदा आ वादा कर ले’सारखी होती.

वचन नेहाने मोडलं आणि ते पोलीस स्टेशनला नेऊन सार्वजनिकही केलं, त्यामुळे ऋषीशच्या मनाला वेदना होणं स्वाभाविक होतं. ही तिच पत्नी होती, जी त्याच्या मनाला शांती आणि रात्री सुखाची झोप देत असे. आपसात थोडीशी खटपट काय झाली की ती सर्व विसरून गेली.

वेगळे होण्यापासून आत्महत्येपर्यंत

तू मला धोका दिलास, धन्यवाद… पत्नीला लग्नापूर्वी दिलेल्या वचनांची आठवण करून देणारा ऋषीश काय खरोखरच आपल्या पत्नीवर एवढं प्रेम करत होता की तो तिच्याशिवाय जगू शकत नव्हता. या प्रश्नाचे उत्तर भलेभले तत्त्वज्ञानी आणि मनोवैज्ञानिकही क्वचितच देऊ शकतील.

ऋषीशच्या आत्महत्येच्या कारणाचा एक पैलू जो स्पष्ट दिसतो, तो हा आहे की त्याची पत्नीकडून अशी अपेक्षा नव्हती. पण असे तर अनेक पतींबाबत घडते की पत्नी एखाद्या विवाद किंवा भांडणामुळे माहेरी जाऊन राहू लागते. पण सर्व पती पत्नीच्या वियोगात आत्महत्या करत नाहीत?

म्हणजे आत्महत्या करणारे पती पत्नीवर एवढं प्रेम करतात की तिचं दूर राहणं सहन करू शकत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी कमी, नकारार्थी जास्त मिळते. ज्यांची खासगी कौटुंबिक आणि सामाजिक कारणे आहेत, जी आता वाढत आहेत, ज्यामुळे पत्नीच्या वियोगात पतींच्या आत्महत्येची प्रकरणे वाढत आहेत.

सामाजिक दृष्टीने पाहिले, तर काळ खूप बदलला आहे. कधी पत्नी खूप त्रास सहन करतात, परंतु माहेरच्यांचा हा सल्ला लक्षात ठेवतात की ज्या घरात लग्न करून जातेस, त्या घरातूनच तुझी अंत्ययात्रा निघाली पाहिजे.

या सल्ल्याची अनेक कारणे होती. त्यात पहिले महत्त्वाचे हे होते की पती व सासरच्यांशिवाय स्त्रीचे जीवन कवडीमोलाचेही राहत नाही. दुसरे कारण आर्थिक होते. समाजात व नातेवाइकांत त्या महिलांना चांगल्या नजरेने पाहिले जात नव्हते, जी पतिला सोडून देत असे किंवा ज्यांना पती सोडून देत असे. आता स्थिती उलट आहे. आता त्या पतींना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही, ज्यांच्या पत्नी त्यांना सोडून निघून जातात.

पतिला सोडणे सामान्य गोष्ट

पत्नी वियोग पूर्वीसारखी सहजरीत्या स्वीकारली जाणारी गोष्ट राहिलेली नाही की जाऊ दे, दुसरं लग्न करू असे आता होत नाही. शिवाय असेही म्हटले जाऊ शकते की आपण एका सभ्य, शिस्तबध्द आणि नात्यांना समर्पित असलेल्या समाजात राहतो.

या सभ्य समाजाचे तत्त्व हेही आहे की पत्नी जर पतिला सोडून निघून जात असेल, तर पतिचं जगणं कठीण होतं. त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून अनेक असे प्रश्न विचारले जातात की तो घाबरून जातो. अशाच काही कमेंट्स अशा प्रकारे आहेत.

तिला खूश ठेवू शकला नाहीस का? तिचं दुसरीकडे कुठे अफेयर चालू आहे का? घरचे तिला त्रास देत होते का? तिच्यात काही खोट आहे का? काय मित्रा, एक स्त्री सांभाळू शकत नाहीस, कसला पुरुष आहेस तू? आजकाल महिला स्वतंत्र्य आणि स्थितीचा फायदा अशाच प्रकारे उठवतात. जाऊ दे गेली तर, चुकूनही माघार घेऊ नकोस. आता फसलास बेट्या, पोलीस, न्यायालयाच्या फेऱ्यात. असं ऐकलंय की तिने तक्रार नोंदवलीय? आता रात्र कशी घालवतोस? दुसरी व्यवस्था झाली का?

कोणत्याही पतिची अशा अनेक असभ्य प्रश्नांपासून सुटका होत नाही. विशेषत: तेव्हा, जेव्हा पत्नी कोणत्याही परिस्थितीत परत यायला तयार नसते.

काय करणार बिचारा

पत्नीने परत न येण्याच्या स्थितीत पतिजवळ काही दुसरा पर्याय नसतो. पहिला मार्ग कायद्याजवळून जातो. त्यावरून सुशिक्षित, समजदार तर दूरच, पण अशिक्षित, अडाणी पतिचीही जायची इच्छा नसते. या मार्गावरील अडचणींचा सामना करण्याची ताकद प्रत्येकातच असते असे नाही. पत्नीला परत आणण्याचा कायदा अस्तित्वात आहे, परंतु तो तसाच आहे, जसे इतर कायदे आहेत. म्हणजेच ते असतात, पण त्यांची अंमलबजावणी करणे सोपं नसतं.

दुसरा मार्ग पत्नीला विसरून जाण्याचा आहे. बहुतेक पती हा स्वीकारतातही, परंतु या विवशता आणि अटीसोबत की जोपर्यंत नाते कायदेशीरपणे पूर्णपणे संपुष्टात येत नाही, तोपर्यंत जपमाळ जपत बसा, म्हणजेच अनेक सुखांपासून वंचित राहा.

तिसरा आणि चौथा मार्गही आहे, पण तोही प्रभावी नाहीए. खरा त्रास त्या पतींना होतो, जे खरोखरच आपल्या पत्नीवर प्रेम करतात. ते मार्ग शोधत नाहीत, तर सरळ निर्णयापर्यंत येतात, म्हणजेच आत्महत्या करतात. जशी भोपाळच्या ऋषीशने केली आणि जशी राजस्थानातील उदयपूरमधील विनोद मीणाने केली होती.

आत्महत्या आणि बदलाही

गेल्या २४ जुलैला उदयपूरच्या गोवर्धन विलास पोलीस ठाणे भागात राहणाऱ्या विनोदचेही काहीतरी कारणावरून पत्नीशी भांडण झाले, तेव्हा तीही माहेरी निघून गेली.

५ दिवस विनोदने पत्नीची वाट पाहिली, पण ती आली नाही, तेव्हा त्याने अशा प्रकारे आत्महत्या केली की ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहील. कोल माइंसमध्ये काम करणाऱ्या विनोदने स्वत:ला डॅटीनेटर बांधला. म्हणजेच मानवी बॉम्ब बनला आणि स्वत:ला आग लावली. विनोदच्या शरीराच्या एवढ्या चिंध्या उडाल्या की, त्याचे पोस्टमार्टेम करणेही कठीण झाले.

विनोदच्या उदाहरणात प्रेम कमी आणि दबाव जास्त आहे, ज्याचा बदला त्याने स्वत:शीच घेतला. कदाचित विनोदच्याही इतर आत्महत्या करणाऱ्या पतींप्रमाणे पुरुषार्थावर आघात झाला असेल किंवा स्वाभिमान दुखावला असेल किंवा तोही जगाच्या अपेक्षित प्रश्नांचा सामना करण्यास घाबरला असेल. काहीही असो, परंतु पत्नीच्या वियोगात एवढ्या घातक आणि हिंसक पध्दतीने आत्महत्या करण्याचे हे प्रकरण अपवाद होते. यात ऋषीशप्रमाणे काव्य किंवा भावुकता नव्हती. होती ती केवळ एक चीड आणि चरफड, जी त्या प्रत्येक पतित असते, ज्याची पत्नी त्याला जाहीररीत्या सोडते.

मग जाऊ का देता?

पत्नीच्या वियोगात आत्महत्या मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील २१ वर्षीय ब्रजलालनेही केली होती. पण त्याचे कारण वेगळे होते. ब्रजलालच्या लग्नाला अजून ३ महिनेच झाले होते की त्याची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली.

ब्रजलालसमोर काळजी आणि तणाव हा होता की तो नातेवाईक आणि समाजाच्या बोचऱ्या प्रश्नांना कसा सामोरा जाणार. अर्थात, इच्छा असती तर करूही शकला असता, पण २१ वर्षाच्या तरुणाकडून अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे की तो जगाशी लढेल.

इथे कारण वियोग नव्हे, तर अब्रू होते. ब्रजलालजवळ पुरेसा वेळ आणि संधी होती की तो आपल्या पत्नीची कृत्य आणि तिच्या माहेरच्यांची चूक लोकांना सांगू शकला असता व घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करू शकला असता. हीसुध्दा दीर्घ प्रक्रिया होती, पण त्यासाठी त्याच्याकडे वेळ होता, पण हिंमत, संयम आणि समजदारी नव्हती.

वेळ त्यांच्याकडे नसतो, ज्यांच्या पत्नीने काही किंवा अनेक वर्षे प्रेमाने घालवलेली असतात, परंतु मग अचानक सोडून निघून जातात. अशा वेळी हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे की जे पती पत्नीशिवाय राहू शकत नाहीत, ते शेवटी त्यांना जाऊ का देतात?

हा एक विचारात टाकणारा प्रश्न आहे, त्यात असं वाटत नाही की पत्नीवर प्रेम करणारा कोणताही पती जाणीवपूर्वक तिला पळवून लावतो किंवा जाऊ देतो. हमरीतुमरीवर येणे सामान्य बाब आहे आणि दाम्पत्य जीवनातील हिस्साही आहे, परंतु इथे येऊन पतींना वकिली करण्यास विवश व्हावं लागतं की पत्नी आपल्या मनमानीमुळे जातात. त्या आपल्या अटींवर जगण्याचा हट्ट करू लागल्या, तर पती बिचारे काय करणार? ते आधी त्यांना जाताना पाहत राहतात, मग विरहाचे गीत गातात आणि मग पत्नीला बोलावतात. एवढं होऊनही ती आली नाही, तर तिच्या वियोगात आत्महत्या करतात.

काही पत्नी पतिच्या प्रेमाला हत्यारासारखे वापरतात का? या प्रश्नाचे उत्तरही स्पष्ट आहे की हो करतात, ज्याचा परिणाम कधीकधी पतिच्या आत्महत्येच्या रूपात समोर येतो.

एखादी पत्नी असा हट्ट करत असेल की लग्नाला ५ वर्षे झाली. आता आई-बाबा किंवा कुटुंबापासून वेगळे राहू या, तर पतिचे चिडणे स्वाभाविक आहे की सर्वकाही सुरळीत चालू असताना, वेगळं का राहायचं? यावर पत्नी हट्ट करत अशी अट थोपते की ठीक आहे, जर आईवडिलांपासून वेगळं व्हायचं नसेल, तर मीच निघून जाते. जेव्हा डोकं ठिकाणावर येईल, तेव्हा न्यायला या. आणि ती खरोखरच सुटकेस उचलून मुलांना घेऊन किंवा मुलांना न घेताही निघून जाते. मागे सोडते, पतिसाठी संभ्रम, ज्याचा काही अंत किंवा उपाय नसतो.

अशी अजून अनेक कारणे असतात. त्यामुळे पत्नी चार दिवस एकटा राहील, तेव्हा त्याला बायकोची किंमत कळेल असा विचार करतात.

या पत्नी असा विचार करत नाहीत की पतिच्या आयुष्यात त्यांची किंमत आधीच आहे, जी अशा प्रकारे वसूल करणे घातक सिध्द होऊ शकते. यावरही पतिने ऐकले नाही, तर पोलीस स्टेशन आणि कोर्टकचेरीची पाळी आणणे म्हणजे पतिला आत्महत्येसाठी प्रोत्साहन देण्यासारखीच गोष्ट आहे.

दोघंही बचाव करा

पत्नीचं थेट समर्थन करणारी माहेरची माणसेही या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. मुलगी किंवा बहीण जे सांगते तेच खरं मानून चालतात आणि तिची साथही असं म्हणून सोडून देतात की, ‘अस्सं, तर ही गोष्ट आहे, आम्ही अजून मेलो नाहीए.’

मरतो तर तो पती, जो सासरच्या लोकांकडून अशी खोटी आशा करतो की ते मुलीच्या चुकीला थारा देणार नाहीत, उलट तिला समजावतील की तिने आपल्या घरी जाऊन राहावे. तिथे पती व त्याच्या घरच्यांना तिची आवश्यकता आहे. थोडंसं भांडण तर चालतच राहतं. त्यासाठी घर सोडणं शहाणपणाचं लक्षण नाही.

पण असे घडत नाही, तेव्हा पतिची उरली-सुरली आशाही संपुष्टात येते. भावुक स्वभावाचे पती जे खरोखरच पत्नीशिवाय राहू शकत नाहीत, त्यांना आपले आयुष्य वाया गेल्यासारखे वाटू लागते आणि ते हळूहळू सर्वांपासून दूर होऊ लागतात. त्यामुळे थोडीशी चूक त्यांचीही आहे, असे म्हणावे लागेल. पत्नी निघून गेल्यानंतर पतिने थोडा संयम बाळगावा, तर त्यांचे जीवन वाचू शकते.

पत्नीने काय करावं?

खरोखरच जर एखादी समस्या असेल, तर पत्नीने पतिसोबत राहत असतानाच ती सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण पतिपत्नी खरोखरच एका गाडीची दोन चाकं आहेत. ज्यांना घराबाहेरची लढाई संयुक्तपणे लढायची असते. पती जर आर्थिक, भावनात्मक किंवा खासगीरीत्या पत्नीवर जास्त अवलंबून असेल किंवा असामान्य रूपाने संवेदनशील असेल, तर पत्नीने त्याला सोडून जाऊ नये, ही पत्नीची जबाबदारी असते.

पत्नी स्वत:च्याच करतुतीने विधवा होत असेल अशा हट्टाचे कौतुक करायला हवे का? नक्कीच कोणाला हे पटणार नाही.

आईवडिलांची भूमिका

पतिच्या घरचे विशेषत: आईवडिलांनीही अशा वेळी मुलांची काळजी घेतली पाहिजे आणि सून येत नसेल तर मुलाला समजवावे की यात खास काही चुकीचे नाहीए आणि त्यामुळे प्रतिष्ठा धुळीला मिळत असेलही तरी मुलाच्या खुशीपुढे त्याची काही किंमत नाहीए. अशा प्रकारच्या गोष्टी त्याला हिंमत देतील. जर तुम्ही एवढेही करू शकत नसाल, तर त्याला टोमणे मारू नका.

पतिला सोडून निघून जाणाऱ्या पत्नी आणि बुचकळ्यात पडलेल्या पतींसाठी ‘आप की कसम’ चित्रपटातील ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मुकाम, वे फिर नहीं आते…’ हे जरूर गुणगुणले पाहिजे.

पत्नी विरहप्रधान या चित्रपटात नायक बनलेल्या राजेश खन्नाने आत्महत्या तर केली नव्हती, पण त्याचे जीवन कशाप्रकारे मृत्यूपेक्षाही वाईट अवस्थेत गेलं होतं, हे चित्रपटात सुंदररीत्या दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पतींनीही या गाण्याचा अंतरा लक्षात ठेवला पाहिजे.

‘कल तडपना पडे याद में जिन की, रोक ‘कल तडपना पडे याद में जिन की, रोक लो उन को रूठ कर जाने ना दो…’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें