१७ ब्रायडल केसांसाठी टीप्स

* गरिमा पंकज

प्रत्येकासाठी लग्नाचा दिवस हा त्याच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. विशेषत: मुलींसाठी, कारण त्या दिवशी त्यांना सगळयात सुंदर दिसायचे असते. भावी वधूच्या मेकअपमध्ये सुंदर केसांचे महत्त्व खूप जास्त असते. जर तुम्हीही या हिवाळयाच्या ऋतूत लग्न करणार असाल आणि केसांच्या समस्येने त्रस्त असाल किंवा तुमचे केस अधिक आकर्षक, निरोगी आणि चमकदार बनवायचे असतील तर या गोष्टी लक्षात ठेवा :

* लग्नाच्या काही दिवस आधी वधू-वर खूप घाबरून जातात. तणाव वाढतो. तणाव आणि चिंता यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते आणि डोक्यावरची त्वचाही कमकुवत होते. अशावेळी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सकाळी फिरायला जा. नियमित व्यायाम करा.

* भावी वधूला अनेकदा लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर जावे लागते, त्यामुळे धूळ आणि प्रदूषणामुळे केस कमकुवत आणि खराब होतात. याशिवाय जास्त वेळ उन्हात राहिल्यानेही केसांमधील ओलावा निघून जातो, ज्यामुळे केस गळण्यासोबतच इतरही समस्या निर्माण होतात. त्यामुळे कडक उन्हात बाहेर न जाणे उत्तम. निघायचेच असेल तर डोक्यावर स्कार्फ बांधून जा.

* लग्नाच्या दिवशी आणि त्याआधीही अनेक विधी असतात. या दरम्यान वधूला वेगवेगळया केशरचना कराव्या लागतात. हेअर ड्रायर, हॉट रोलर्स, फ्लॅट इस्त्री आणि हेअरस्टाइलसाठी वापरल्या जाणाऱ्या कर्लिंग चिमटयांमुळेही केस खराब होतात. वारंवार कलर ट्रीटमेंट केल्यानेही त्याचा केसांवर परिणाम होतो, कारण त्यात असलेली केमिकल्स केसांना इजा पोहोचवतात. त्यामुळे हेअर स्टाइलच्या साधनांचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.

* शरीर हायड्रेट ठेवा. त्यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहतील. भरपूर पाणी प्या.

* केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट घेत राहा. केस गळती रोखण्यासाठी अँटीब्रोकरेज ट्रीटमेंट घ्या.

* केसांचे आरोग्य थेट आपल्या आहाराशी संबंधित असते. मजबूत आणि निरोगी केसांसाठी जीवनसत्त्व बी १२, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि झिंक म्हणजेच जस्त तुमच्या आहारात मुबलक प्रमाणात असायला हवे. झिंक हे अवेळी केस पांढरे होण्यापासून प्रतिबंध करते आणि केस गळतीही थांबवते. विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्या. हे केस आणि डोक्यावरील त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

* केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर कमीत कमी करा. त्यांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. टॉवेलच्या मदतीने किंवा थोडावेळ उन्हात बसून केस सुकवणे हा सर्वात सोपा आणि योग्य मार्ग आहे. तुम्हाला हेअर ड्रायर वापरून केस सुकवायचे असतील तर त्याआधी केसांना सीरम लावा.

* केसांच्या पोषणासाठी तेल खूप महत्त्वाचे असते. नियमित तेल लावणे केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरते. ते रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करते आणि केस नैसर्गिकरित्या चमकदार बनवते.

* ओल्या केसांवरून फणी फिरवून ते विंचरू नका, नाहीतर बरेच केस तुटतात.

* केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही हेअर पॅक वापरू शकता. त्यासाठी केसांना मेहंदी लावा किंवा अंडी आणि दही मिसळून हेअर पॅक तयार करून केसांना लावा. त्यामुळे कोंडा निघून जातो आणि केस तुटण्याचा वेग कमी होतो.

* लग्नाच्या सुमारे महिनाभर आधी केसांना व्यवस्थित मेहंदी लावा.

* योग्य आहार घ्या, जेणेकरून केस कमकुवत होणार नाहीत.

* हिवाळयात कोंडयाची समस्या होऊ शकते. केसांमध्ये खूप कोंडा होत असेल तर अँटीडँड्रफ शाम्पू वापरा किंवा लिंबाचा रस इत्यादी लावून कोंडा दूर करण्याचा प्रयत्न करा. कोंडयामुळे केसांचे खूप नुकसान होते.

* लग्नापूर्वी केसांच्या बाबतीत कोणतीही हलगर्जी करू नका. आठवडयातून किमान ३ वेळा शाम्पू करा. शाम्पूनंतर कंडिशनर लावा. प्रथिनांनीयुक्त शाम्पू वापरा.

* ओले केस बांधू नका किंवा विंचरू नका. केसांची मालिश करा.

* केसांना तेलासोबत कोरफडीचा गर लावा. त्याने टाळूची मालिश करा. ते केसांच्या मुळांना हायड्रेट करते. ३० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.

* केस धुण्यासाठी किंवा ओले करण्यासाठी कधीही गरम पाण्याचा वापर करू नका, कारण त्यामुळे केसांचे नुकसान होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें