आरोग्य विम्याचे आहेत अनेक फायदे

* गरिमा पंकज

कोरोना महामारी अजूनही मुळासकट संपलेली नाही. एखाद्या व्यक्तीला कोरोना किंवा त्यासंबंधित गुंतागुंतीचा आजार झाल्यास आणि त्या व्यक्तीने खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास, एकूण खर्च रूपये १० लाखांपासून ते रूपये १२ लाखांपर्यंत जाऊ शकतो. कोरोना व्यतिरिक्तही अनेक प्रकारचे आजार आहेत जे लोकांना त्रासदायक ठरतात आणि त्यांच्या उपचारात त्यांची सर्व बचत संपून जाते. त्यामुळेच आरोग्य विम्याचे महत्त्व नाकारता येत नाही.

कोरोना काळात आपल्या सर्वांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे की, अचानक उद्भवलेल्या आजाराशी सामना करण्यासाठी, योग्य उपचार तसेच कुटुंबाच्या संरक्षणासाठी रूपये २-३ लाखांचा साधा आरोग्य विमा काढायला काहीच हरकत नाही. घरातील एकापेक्षा जास्त व्यक्ती आजारी पडल्यावर याचे महत्त्व अधिकच समजते. कोरोना काळात असा आजारी पडण्याचा प्रकार तुमच्या आजूबाजूच्या अनेक घरांमध्ये पाहायला मिळाला असेल. म्हणूनच तुमच्याकडे कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर चांगली पॉलिसी घ्या.

जर तुम्ही एम्प्लॉयी ग्रुप इन्शुरन्स कव्हर अंतर्गत येत असाल तरीही, तुम्ही स्वत:साठी किमान रूपये २५ ते रूपये १० लाखांचा आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. जरी तुम्ही विमा घेतला असेल तरी सध्याच्या परिस्थितीनुसार त्यात  बदल करणे आवश्यक आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही एका विमा कंपनीतून दुसऱ्या विमा कंपनीकडेही जाऊ शकता. अधिक सुविधा देणारी कंपनी निवडू शकता.

चला, याविषयी जाणून घेऊया :

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना

जवळपास प्रत्येक विमा कंपनी मूलभूत आरोग्य विमा संरक्षण देते, ज्यामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च, औषधांचा खर्च, डॉक्टरांचे शुल्क आणि चाचण्या इत्यादींचा सहभाग असतो. प्राथमिक आरोग्य विम्याचे २ प्रकार आहेत – पहिला वैयक्तिक आणि दुसरा फॅमिली फ्लोटर. वैयक्तिकमध्ये तुम्हाला फक्त कव्हरेज मिळते तर फॅमिली फ्लोटरमध्ये संपूर्ण कुटुंबाला कव्हरेज मिळते.

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना सहसा एखादी व्यक्ती, तिचा जोडीदार आणि त्यांच्या मुलांना संरक्षण देते. परंतु, काही विमा कंपन्या विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्याचे आई-वडील, भावंडे आणि सासू-सासऱ्यांनाही संरक्षण देतात. फॅमिली फ्लोटर आरोग्य विम्याचा एक फायदा म्हणजे संपूर्ण कुटुंबाला थोडया प्रमाणात संरक्षण मिळते.

मर्यादा/उपमर्यादा असलेली योजना घेऊ नका

अनेक आरोग्य विमा योजनांमध्ये रुग्णालयातील खोलीच्या भाडयावर मर्यादा घालण्यात आली आहे. अशा मर्यादा असलेली पॉलिसी घेणे टाळा.

उपचारादरम्यान तुम्हाला कुठे ठेवायचे, हे तुमच्या हातात नसते. असे असले तरी कोरोना काळात आपण पाहिले आहे की, अचानक एखादा गंभीर आजार होऊ शकतो आणि त्यानंतर कित्येक आठवडे रुग्णालयात राहावे लागते. त्याशिवाय विलगीकरणात म्हणजे वेगळया खोलीत क्वारंटाईनमध्ये राहण्याचीही गरज भासते. अनेकदा जो बेड किंवा रूम मिळेल ती घ्यावी लागते. आपण असे म्हणू शकत नाही की, स्वस्त बेडवर शिफ्ट करा.

आजीवन नूतनीकरण सुविधा

आयुष्यात कधीही नूतनीकरण करता येईल अशी पॉलिसी घ्या. खरेतर वृद्धापकाळात उपचारासाठी पैशांची जास्त गरज असते, कारण वृद्धापकाळात रोगांचे आक्रमण अधिक होते. सहसा या वेळेपर्यंत ती व्यक्तीही सेवानिवृत्त झालेली असते. त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नसतात. आरोग्य विमा काढताना या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोना कवच

तुम्ही कोरोनाच्या उपचारासाठी स्वतंत्र पॉलिसीही घेऊ शकता. आयआरडीएआरच्या सूचनेनुसार विमा कंपन्यांनी कोरोना विशेष पॉलिसी उपलब्ध करून दिली आहे. यालाच कोरोना कवच म्हणतात. यासाठी विम्याची रक्कम रूपये ५० हजार ते रूपये ५ लाखांपर्यंत आहे. कोरोना कवच पॉलिसी कमी कालावधीसाठी म्हणजे साडेतीन महिने, साडेसहा महिने आणि साडेनऊ महिन्यांसाठी असू शकते.

घरी उपचार घेतल्यावरही विम्याचा फायदा

कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या या युगात अनेक कंपन्या घरी राहून उपचारांवर होणारा खर्चही भागवत आहेत. याशिवाय अनेक विमा कंपन्या सरकारने स्थापन केलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेण्यावर होणारा खर्च भरून काढत आहेत. विमा घेताना तुमची कंपनी ही सुविधा देत आहे की नाही, हे तपासा.

महामारीला कव्हर करा

बहुतेक आरोग्य विमा पॉलिसी कोरोनासारख्या साथीच्या आजारांना कव्हर करतात. हे प्रामुख्याने त्या पॉलिसीवर अवलंबून असते. अशा काही पॉलिसी आहेत ज्यात महामारीचा समावेश नसतो. तुम्ही पॉलिसी दस्तावेज वाचून त्यानुसार पॉलिसी घ्या ज्यामध्ये हे सर्व समाविष्ट असेल.

गुंतवणूक सल्लागार मनीषा अग्रवाल सांगतात की, कोणतीही पॉलिसी घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.

कॅशलेस पॉलिसी अधिक उत्तम

अशी विमा पॉलिसी घ्या जी कॅशलेस सुविधा देत असेल. कॅशलेस विमा पॉलिसीचा फायदा असा की, पॉलिसीधारकाला रुग्णालयाचे बिल भरावे लागत नाही, उलट तो त्यासाठी थेट विमा कंपनीशी संपर्क साधू शकतो.

आरोग्य विमा पॉलिसी घेताना हेही तपासून पाहा की, तुम्ही राहता त्या शहरातील मोठया आणि सुसज्ज रुग्णालयांचा कॅशलेस रुग्णालयांच्या यादीत समावेश आहे का? यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

दावा निकाली काढणे

ज्या कंपनीचे दाव्याचे प्रमाण चांगले आहे, म्हणजेच जे जास्तीत जास्त लोकांचे दावे निकाली काढत आहेत आणि जे तुमच्या अपेक्षित सर्व गरजा पूर्ण करणार आहेत.

रिफिल लाभ पर्याय

जर तुमची रूपये ५ लाखांची पॉलिसी असेल आणि ते पैसे एखाद्या आजारपणात खर्च झाले आणि ३ महिन्यांनंतर तुम्हाला दुसरा आजार झाला तर अशी पॉलिसी घ्या ज्यामध्ये रिफिलचा पर्याय असेल, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या आजारासाठीही पैसे मिळतील.

बहुतेक पॉलिसींमध्ये हा फायदा समान व्यक्ती समान रोग आणि भिन्न व्यक्ती पण एकाच रोगासाठीही उपलब्ध आहे.

सह-पेमेंट टाळा

काही पॉलिसीमध्ये, सह-पेमेंटचीही तरतूद असते, म्हणजेच पॉलिसीधारकाला एखाद्या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाच्या काही टक्के रक्कम भरावी लागते. काही अशा योजनाही आहेत जिथे ६० वर्षांवरील लोकांसाठी खास सह-पेमेंटचा पर्याय असतो, म्हणजे संपूर्ण रक्कम कंपनीकडून दिली जात नाही तर तुम्हाला यातील काही खर्च करावा लागतो.

टॉप अप योजना

सध्याची परिस्थिती पाहाता अनेक कंपन्यांनी टॉप-अप योजना आणल्या आहेत. म्हणजेच समजा तुमचा रूपये ५ लाखांचा विमा असल्यास दीड-दोन हजारांच्या छोट्या रकमेतूनही हजारांच्या तुम्हाला अतिरिक्त रूपये ५ लाख टॉपअप मिळेल. म्हणजेच आधीच चालू असलेली पॉलिसी रूपये ५ लाखांची आहे आणि तुम्ही रूपये ५ लाखांचा टॉपअप घेतला तर तुम्हाला एकूण रूपये १० लाखांचे विमा संरक्षण मिळेल. साहजिकच अशी योजना फायददेशीर ठरते.

प्रत्येक विमा कंपनीचे स्वत:चे नियम असतात. त्यामुळे आरोग्य विमा घेण्यापूर्वी त्यात किती आणि काय कव्हर केले जाईल हे जाणून घ्या. चाचणी खर्च आणि रुग्णवाहिकेचा खर्च यासारख्या जास्तीत जास्त गोष्टींचा समवेश असलेली पॉलिसी घ्या, जेणेकरून तुम्हाला खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें