ना सासर तुरूंग ना तुम्ही कैदी

* अनुराधा गुप्ता

प्रेम विवाह असो किंवा ठरवून केलेले लग्न, प्रत्येक मुलीच्या मनात सासर विषयी थोडी भीती असतेच. अनेकदा तर ही भीती काळजीचे रूप धारण करते. पण समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा मुलीच्या मनात सासरच्यांविषयी नकारात्मक दृष्टीकोन तयार होऊ लागतो. अशा स्थितीत कुठलाही आधार नसतानाही मुलगी भावी सासरच्यांमंडळींमध्ये उणिवा शोधू लागते.

मॅरेज काऊंसेलर डॉ. वीरजी शर्मा सांगतात, ‘‘मुलींमध्ये सासरबद्दल भीती असणे स्वाभाविक आहे. पण अनेकदा ही भीती इतकी वाढते की मुलगी स्वत:च काही कल्पना रचून असा विचार करून ठरवून टाकते की सासरचे त्या स्थितीत तिच्यासोबत कसे वागू शकतील. जास्तीत जास्त मुली नकारात्मक विचारच करतात. याची दोन कारणे असू शकतात. पहिले की मुलीला सासरच्या सर्व सदस्यांचे स्वभाव माहीत असावेत व दुसरे हे की होणाऱ्या सासरच्यांबद्दल तिला काहीही माहीत नसावे.’’ दोन्हीही परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता तिला घेरून टाकतात. अशा काही चिंतांमधून कसा मार्ग काढावा यासाठी काही उपाय…

स्वत:ला व्यक्त न करू शकण्याची भीती

हे तर स्पष्टच आहे की सासरची जागा आणि माणसे दोन्ही मुलीसाठी अनोळखीच असतात. अशावेळी प्रत्येक मुलीला सासरच्या कुठल्याही सदस्याकडे आपल्या इच्छा, समस्या आणि भावना व्यक्त करण्यासाठी संकोच वाटतो. उदाहरण म्हणून एका नववधूचा चेहरा पाहण्याच्या विधीबद्दल बोलायचे झाले तर या विधिमध्ये काही कमतरता आहेत तर काही लाभसुद्धा आहेत. त्यातील लाभ हा आहे की घरातील नवी सदस्य झालेल्या नववधूला भेटण्याची, ओळख करून घेण्याची संधी सर्व नातेवाईकांना मिळते, तर उणीव अशी की दमलेली वधू लोकांच्या त्या गर्दीत स्वत:ला असुरक्षित समजू लागते.

या विधीव्यतिरिक्त असेही काही प्रसंग येतात, जेव्हा मुलगी तिच्या मनातील भावना सासरच्यांसमोर व्यक्तही करू शकत नाही आणि निराशेसह त्यांच्या म्हणण्यानुसार मान डोलावत राहते. डॉ. वीरजी याबाबत सांगतात, ‘‘लग्नाच्या सुरूवातीच्या दिवसात ही समस्या प्रत्येक मुलीला असते. पण ही काही कायमस्वरूपी नसते. पहिली बाब म्हणजे आपल्या मनातील बोलणे हा काही गुन्हा नाही. जर योग्य पद्धतीने आपले म्हणणे सर्वांसमोर मांडले तर सर्वजण त्याला पाठिंबा देतात. सासरच्यांसमोर हळूहळू खुलण्याचा प्रयत्न मुलीला स्वत:लाच करावा लागतो. यात तिला कोणी मदत करू शकत नाही.’’

स्वातंत्र्य हिरावले जाण्याची भीती

लग्नाआधी प्रत्येक मुलीच्या मनात हा प्रश्न नेहमी येतोच की लग्नानंतरही सासरी माहेरच्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळेल का? डॉ. वीरजी सांगतात, ‘‘लग्न नव्या नात्यांचे मिलन आहे. बंधन नाही. नव्या नात्यांच्या काही अपेक्षाही असतात आणि त्या पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण नात्यांचे बंध एकमेकांना समजून आणि एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यानेच घट्ट होतात. ही जबाबदारी फक्त मुलीचीच नसते. सासरचेही मुलीच्या आवडी निवडीचा विचार करतात म्हणून स्वत:ला सासरी कैदी समजू नये.’’

अनेकदा मुलींना याबाबत सतत भीती वाटत असते की सासरी आवडीचे जेवण, कपडे, फिरणे या सर्वांवर बंधने आणली जातील. इतकंच नव्हे तर काही करण्याआधी सासू सासऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल आणि मोठ्यांची परवानगी घ्यायला हरकत काय आहे? माहेरीसुद्धा मुली काही करण्याआधी आईवडिलांना विचारतातच आणि हे फक्त मुलींबद्दलच नाही तर प्रश्न अधिक अनुभव आणि कमी अनुभव असण्याचा आहे. सासू सासऱ्यांना मुलीपेक्षा अधिक अनुभव असतो. एखाद्या अनुभवावरूनच ते एखादे काम काम कर अथवा नको करू असे म्हणत असतील तरी यात तुमचे भलेच आहे. ही बाबही लक्षात ठेवा, जर सुनेने तिच्या निर्णयांमध्ये सासरच्यांना सहभागी करून घेतले तरच तेसुद्धा प्रत्येक कामात तिच्या मताला महत्त्व देतील.

घरातील काही नियम असतात त्यांना अनाठायी म्हणणे चुकीचे ठरेल. नियमांचे पालन केल्याने जीवनशैली शिस्तप्रिय बनते. हे नियम घरातील प्रत्येक सदस्यासाठी सारखेच असतात. म्हणून हे वैयक्तिक पातळीवर घेऊ नये. अशाच प्रकारे सासर म्हणजे तुरूंग आहे व प्रत्येक वेळी तिथल्या कैदेतून बाहेर पडण्याचा विचार करू नये. कारण हा विचार जर केलात तर तुम्हाला सून म्हणून सासरी कधीच स्वत:ची जागा निर्माण करता येणार नाही.

कुटुंबातील व्यक्तींच्या हस्तक्षेपाची काळजी

‘भांड्याला भांडे लागणारच’ ही म्हण गृहस्थ जीवनाला अगदी साजेशी आहे. कुटुंब एका व्यक्तीने बनत नाही तर अनेक व्यक्ती एकत्र आल्याने कुटुंब बनते. ज्या घरात ४-५ लोक असतात, तिथे परस्परांमध्ये सल्लामसल्लत करूनच प्रत्येक काम केले जाते. याला हस्तक्षेप समजण्याची चूक करू नये. कधी असेही होऊ शकते की तुमच्या सल्ल्याविरोधात काही निर्णय घेतले जातील, पण त्यात इतर कुटुंबीयांची सहमति असू शकेल. याला कुटुंबीयांचा हस्तक्षेप म्हणू शकत नाही. जेव्हा मुली माहेरी असतात, तेव्हा आईवडिलांनी घेतलेल्या हरकती त्यांना हस्तक्षेप वाटत नाहीत. कारण तिथे त्यांचे नाते भावनात्मक असते. सासरच्यांशी भावनात्मक रितीने जोडण्यात थोडा वेळ लागतो. म्हणून त्यांची प्रत्येक बाब हस्तक्षेप वाटतो.

पण अनेकदा सासरी काही लोक नव्या सुनेवर वचक ठेवण्यासाठी तिच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात. अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवावे. जर सासूसासऱ्यांची गोष्ट असेल तर त्यांच्यात आणि तुमच्यात एक सीमा रेषा आखावी. त्यांचे जे बोलणे सहज सोपे वाटेल ते ऐकले जाऊ शकते, ते जरूर ऐकावे. पण जे स्विकारार्ह नसेल तर आदराने त्यांना स्पष्ट नकार द्यावा.

अनैच्छिक जबाबदाऱ्या पेलण्याचे ओझे

नव्या नात्यांसोबत नव्या जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात हे स्विकारा. पण काही नाती मनापासून सांभाळण्यास थोडा त्रास होतो. अशा नात्यांमध्ये संबंधित जबाबदाऱ्या जोपासणे ओझे वाटू लागते. विशेषत: नणंद आणि जाऊ यांच्यातील कडू गोड नात्यांच्या गोष्टींनी कल्पनांनी मुली आधीच भांबावलेल्या असतात. उरलीसुरली कसर टीव्हीवरील सासूसुनांच्या भाडणांच्या आणि घरगुती वादाच्या मालिकांनी भरून काढलेली असते. मग मुलींच्या मनात नणंद, जाऊ व सासूच्या त्याप्रमाणे प्रतिमा निर्माण झालेल्या असतात.

पण वास्तविक ही नाती निभावणे इतकेही कठिण नसते. हे स्पष्टच आहे की पतिशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा उत्साह मुलींमध्ये असतो. पण सासरच्या सदस्यांबद्दल मात्र तो नसतो आणि नकारात्मक विचार चांगल्यालाही वाईट बनवू शकतात. नणंद, जाऊ आणि सासू सासरी नव्या सुनेसाठी सर्वात जास्त महत्त्वाच्या ठरू शकतात. ही नाती रूसव्या-फुगव्यांची आहेत खरी, पण ही नसतील तर गृहस्थ जीवन फिके आहे.

जीवनशैली बदलण्याची भीती

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एका नव्या बदलाचा सामना करावा लागतो. लग्नानंतर स्त्रिया आणि पुरूष दोघांच्याही आयुष्यात अनेक बदल घडून येतात. पण मुलींना लग्नाआधीच याबद्दल खूप भीती असते. याचे मुख्य कारण आहे वडिलांचे घर साडून पतिच्या घरी जाणे. सर्व घरातील नियम कायदे वेगळे असतात, राहणीमान वेगळं असतं. यामध्ये स्वत:ला सामावून घेणे प्रत्येक मुलीसाठी अवघड असतं.

घरात एका वेगळ्या वातावरणातून आलेल्या नव्या सूनेसोबत ताळमेळ बसवणं सासरच्यांसाठीही सोपं नसतं. आपल्या घरातील वातावरणामध्ये सुनेला सामावून घेणं हे सासरच्यांसाठीही एक आव्हान असतं. पण उभय पक्षांनी जर सोबत मिळून पुढे पाऊल टाकलं तर हे बदल चांगले वाटू लागतात.

अशाचप्रकारे सासर आणि सासरच्यांशी संबंधित अनेक बाबी असतात, ज्या लग्नाच्या आधीच मुलींना नकारात्मक विचार करायला भाग पाडतात. पण अशा नकारात्मक विचारांनी नव्या नात्यांची सुरूवात केली तर वाईट परिणामच दिसतात. म्हणून सकारात्मक विचार करावा. मग तुम्हाला अशक्य परिस्थितीमध्येही प्रकरणे सोडवण्याचा मार्ग मिळेल आणि सासरच्या प्रत्येक सदस्यांसोबत ताळमेळ बसवणे सोपे होऊन जाईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें