जबाबदारी तुमची छंद आमचे

* ऋतू वर्मा

अतुल एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर होता. महानगरातील राहणीमानाच्या तऱ्हा इतक्या महाग होत्या की त्याला इच्छा असूनही काही बचत करता येत नव्हती. जेव्हा घरच्यांनी लग्नासाठी आग्रह धरायला सुरुवात केली तेव्हा त्याची एकच इच्छा होती की त्याची पत्नीदेखील आर्थिकदृष्टया स्वावलंबी असावी जेणेकरून पुढील आयुष्य सुरळीत चालू शकेल. बघता बघता शोध संपला आणि प्रीती त्याच्या प्रेमाच्या नात्यात बांधली गेली.

प्रीती आल्यावर घर-गृहस्थीचा खर्चही वाढला, पण प्रीतीने घरखर्च किंवा इतर कोणत्याही प्रकारचा खर्च वाटून घेण्यात अजिबात रस दाखवला नाही, परिणामी वाढलेले अनेक खर्च अतुलच्या डोक्यावर आले.

अतुलने प्रीतीला घर-गृहस्थीत हातभार लावण्यास सांगितल्यावर ती रडू लागली. म्हणाली, ‘‘बायकोच्या कमाईवर गृहस्थीचा गाडा चालवणारा तू कसा पुरुष आहेस?’’ प्रितीच्या या वागण्याने अतुलला धक्काच बसला.

पल्लवी आणि सौरभच्या घरचीही अशीच परिस्थिती होती. कर्जाचा हप्ता, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च ही सगळी जबाबदारी

सौरभची होती, इतकेच काय तर कधी-कधी जर इतर काही खर्च अजून आला तर सौरभला मित्रांकडे कर्ज मागावे लागत असे, पण याचा पल्लवीवर काहीही परिणाम होत नसे. प्रत्येक बायकोचा दृष्टिकोन असाच असेल असे नाही. नितीन आणि ऋचाच्या बाबतीत गोष्ट जरा वेगळीच आहे.

ऋचाच्या नोकरीच्या जोरावर नितीनने पैसे उलट-सुलट व्यवसायात गुंतवले आणि मग ठणठण गोपाल. असे अनेकवेळा घडले. मग ऋचाला वाटू लागले की लग्नानंतर नवऱ्याला बळ देण्यासाठी नोकरी करणे ही तिची सर्वात मोठी चूक होती.

दोघांच्या कमाईवरच गाडी चालणार

आता काळ बदलला आहे आणि जगण्याची पद्धतही बदलली आहे. ती पूर्वीच्या काळाची गोष्ट होती जेव्हा नवरा नोकरी करायचा आणि बायको घर आणि मुलं सांभाळायची. आता महानगरांमध्ये महागाईच्या राक्षसाने इतके भयंकर रूप धारण केले आहे की २ जणांच्या कमाई शिवाय घर-गृहस्थीचा गाडा ओढणे अशक्य आहे.

जबाबदारी अशी वाटून घ्या

तुम्ही आणि तुमचा नवरा दोघेही नोकरी करत असाल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा :

* घर तुम्हा दोघांचे आहे, त्यामुळे जबाबदारी समान वाटून घ्या. संपूर्ण महिन्याचे बजेट बनवा आणि समान योगदान द्या, तुमच्या कमाईवर तुमचा हक्क आहे, पण तुमच्या पगाराची वारंवार धमकी देऊन तुमच्या पतीला कमीपणाची जाणीव करून देऊ नका, घराप्रती त्यांची जितकी जबाबदारी आहे तितकीच ती तुमचीही आहे.

* ज्याप्रमाणे तुम्ही तुमचे छंद पूर्ण करता, त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदारालाही छंद असतात. पगाराचा किती भाग हा छंद पूर्ण करण्यासाठी खर्च करायचा आणि किती भाग इतर महत्त्वाच्या कामांवर खर्च करायचा हे तुम्ही दोघांनी परस्पर संमतीने ठरविले जाण्याची आवश्यकता आहे.

* आजच्या काळाची मागणी आहे की पती-पत्नीमध्ये आर्थिक पारदर्शकताही असावी, अनेक वेळा पत्नी पतीला आपल्या पगाराबाबत चुकीची माहिती देते असेही दिसून येते. यामागचे मुख्य कारण हे असते की जर पत्नीने आपल्या पगारातून घर चालवले तर पती त्याची सर्व कमाई मित्रांवर किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर उधळेल, जे प्रत्येकवेळी योग्यही नसते.

* अनेक वेळा असेही पाहायला मिळते की पत्नी तिच्या मैत्रिणींचे बघून तिच्या पगाराच्या बाबतीत असुरक्षित राहते, भविष्यासाठी आपला पगार वाचवून ठेवावा असे तिला वाटते. कारण नवऱ्याचा काही भरवसा नसतो, पण जर नवराही असाच विचार करू लागला तर तुम्ही काय कराल? जर नात्यात विश्वासच नसेल तर अशा वैवाहिक जीवनाचा काही उपयोग नाही.

* तुम्ही आजच्या स्त्री आहात जी कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकते. मग जबाबदाऱ्यांना खंबीरपणे सामोरे जा, ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून आधीपासूनच तुमच्या जीवनसाथीबद्दल कोणतेही गृहितक बांधू नका

* तुमचा नवरा कंजूष असो वा शाही खर्च करणारा, पण तुम्ही लग्नाच्या पहिल्या महिन्यात हे ठरवून घ्या की तुम्ही दोघेही पगाराची किती टक्के बचत करणार.

घरातले काम ही दोघांची जबाबदारी

* प्रतिनिधी

नेहमी बायकांची एक तक्रार असते की त्यांचे नवरे त्यांना घरातल्या कामांमध्ये मदत करत नाहीत. ठराविक मर्यादेपर्यंत त्यांची ही तक्रार योग्यही आहे. कारण लग्नानंतर बहुतांश नवरे घरच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या तर योग्य रीतीने पार पाडताना दिसून येतात, पण जेव्हा गोष्ट स्वयंपाकघरात बायकोला मदत करण्याची असते किंवा मग घरातल्या साफसफाईची असते, तेव्हा बहुतेक नवरे  काही ना काही बहाणा करून ते काम टाळण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. म्हणायला तर पती आणि पत्नी संसार रथाची दोन चाके आहेत असे म्हटले जाते, पण जर फक्त एकाच चाकावर भार पडत असेल तर संसाराचा गाडा डगमगू लागणे स्वाभाविकच आहे.

नेहमी बायका आपल्या घरातील कामांमध्ये एवढया व्यस्त असतात की त्यांना स्वत:साठी वेळ देणेही शक्य होत नाही. अशात जर त्यांना घरातल्या कामांत पतिची मदत मिळाली तर त्यांचा भार कमी होतोच शिवाय पती पत्नीच्या नात्यातील गोडवाही वाढतो.

अशी वाटून घ्या कामे

घरातल्या कामांना तुच्छ समजणे सोडून काही कामांची जबाबदारी जर पतिने स्वत:वर घेतली तर घराचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. अशी अनेक कामे आहेत, जी पती आणि पत्नी वाटून घेऊ शकतात :

* किचनला लव्ह स्पॉट बनवा. बऱ्याचदा नवरे किचनमध्ये जाण्याच्या कल्पनेनेही कचरतात. पण इथे तुम्ही पत्नीसह जेवण बनवताना प्रेमाच्या एका नव्या स्वादाचाही आस्वाद घेऊ शकता. भाजी कापणे, जेवण डायनिंग टेबलवर मांडणे, पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवणे, सॅलड बनवणे अशी कामे करून तुम्ही तुमच्या पत्नीला मदत करू शकता. विश्वास ठेवा तुमच्या या छोटया छोटया कामांमुळे तुमची पत्नी मनापासून तुमची प्रशंसा करेल.

* कधीतरी सकाळी पत्नी उठण्याआधी स्वत: उठून तिच्यासाठी मस्त चहा बनवून तर पहा. तुमचा हा छोटासा प्रयत्न तिला दिवसभर आनंदी ठेवेल यात शंकाच नाही. जर पत्नीची तब्येत ठीक नसेल तर हलकाफुलका नाश्ता बनवून तिला आराम देऊ शकता.

* जर पतिने किचनमध्ये काही बनवण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना टोकू नका. किचन व्यवस्थित ठेवा. किचनमधील सर्व डब्यांना लेबल्स लावून ठेवा म्हणजे तुमचे पती प्रत्येक गोष्टीसाठी सारखेसारखे तुम्हाला विचारत राहणार नाहीत.

* जर तुमची तुमच्या पत्नीविषयी अशी तक्रार असेल की ती दिवसभर बाथरूममध्ये कपडेच धुवत बसते आणि तुम्हाला जराही वेळ देत नाही तर त्याचा सर्व दोष पत्नीला देऊ नका. सुट्टीच्या दिवशी या कामात तुम्ही तिला मदत करू शकता. कपडे ड्रायरमध्ये सुकवून ते वाळत घाला.

* बहुतेक घरांमध्ये आठवडयाची भाजी एकदाच आणून फ्रीजमध्ये ठेवली जाते. टीव्हीवर आपला फेव्हरेट शो किंवा क्रिकेट मॅच पाहण्यात रममाण झालेल्या  तुमच्या पतिराजांकडे तुम्ही मटार सोलायला देऊ शकता किंवा भाज्याही निवडायला देऊ शकता.

* तुमच्या घरातील गार्डनमधील रोपांना पाणी घालण्याचे कामही तुम्ही पतीला करायला सांगू शकता

* घरात एखादा पाळीव प्राणी असल्यास त्याला फिरायला घेऊन जाण्याची जबाबदारी दोघांनी आलटून पालटून घ्यावी.

* मुलांचा अभ्यास घेताना काही विषय तुम्ही शिकवा तर काही विषय तुमच्या पतिवर सोपवा.

* जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पतिने तुम्हाला घरातल्या कामांत मदत करावी तर त्यांना प्रेमाने आणि विनम्रतेने सांगा..

थोडे पेशन्स ठेवा, हळूहळू का होईना पण एकदा का तुमचे पती तुम्हाला मदत करू लागले की त्यांनाही जाणीव होईल की तुम्ही दिवसभर किती राबत असता. पती असो किंवा पत्नी घर दोघांचं आहे त्यामुळे घरातील जबाबदारीही दोघांनी वाटून घ्यावी. मगच संसाराची गाडी छान पैकी धावू लागेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें