हे बंध रेशमाचे

कथा * सुवर्णा पाटील

‘‘अरे तन्मय काय सुरू आहे तुझे? किती वाजले बघितले का? आता बंद कर तो मोबाईल आणि झोप आता.’’ आईच्या आवाजाने तन्मय त्याच्या मोबाईलच्या विश्वातून बाहेर आला.

‘‘हो ग आई, झालेच काम, तू झोप ना, तू का जागी आहेस. तुला सकाळी लवकर उठायचे असते ना…तू झोप मी पण झेपतच आहे आता.’’

आई तिच्या खोलीत गेली ही खात्री होताच तन्मयने पुन्हा मोबाईलवर चॅटिंग सुरू केली. उशिरा रात्रीपर्यंत मोबाईलवर चॅटिंग करतो म्हणून तुम्ही तन्मयबद्दल गैरसमज करू नका. नामांकित आयआयटी कंपनीत एका चांगल्या पदावर कार्य करणारा तन्मय एक हुशार व तितकाच हँडसम असा युवक आहे. त्याला कॉलेज जीवनापासून मित्र बनवायला खूप आवडते. त्याचे कॉलेजातील मित्रमंडळ पण खूप मोठे होते. पण जॉब लागल्यावर प्रत्येकजण आपल्या वाटेला गेला. आता फक्त भेट होते ती हाय हॅलो पुरतीच. असेच एक दिवशी फेसबुकवर त्याला एक मैत्रीण भेटली…अबोली. तसे व तिने तिच्या प्रोफाइलवर तिचा फोटो ही लावलेला नव्हता. होते फक्त एक अबोलीचे सुंदर फूल…

तन्मयची तिच्याशी छान गट्टीच जमली होती. त्याच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट तो तिच्याशी शेअर करायचा. कधी ऑफिसच्या कामामुळे तो अपसेट झालेला असला तरी त्या गोष्टी पण तिच्याशी बोलायचा. अबोली त्याला खूपच छान समजून घ्यायची. जर ती ऑनलाइन नसली तर तो अस्वस्थ व्हायचा. कारण तिच्याशी बोलण्याचे त्याच्याकडे दुसरे माध्यमच नव्हते. एकेदिवशी याच कारणावरून तन्मय अबोलीशी भांडला.

‘‘आपण आता किती छान मित्र झालो आहोत. तुला माझ्यावर विश्वास नाही का? मग तू मला भेटण्याचे का टाळत आहे. मला तुला प्रत्यक्ष भेटायचे आहे. तुझ्या डोळ्यांत डोळे मिसळून संवाद साधायचा आहे.’’

‘‘सॉरी तन्मय…हे आपण आधीच ठरवले होते की आपली मैत्री ही नेहमी ऑनलाइनच असेल. आपण एकमेकांना न पाहता मैत्री केली मग आता तू इतका का रागवलेला आहे?’’

‘‘हो मान्य आहे मला. पण कधी कधी तू ऑनलाइन नसते तेव्हा मला काय करावे हे सुचतच नाही. खरं सांगू का अबोली..मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय.’’

‘‘…तन्मय…’’

‘‘काय झाले अबोली? रागावली का माझ्यावर…पण मी तरी काय करू, प्लीज भेटायचे ना आपण…बोल ना…तुझे मुकेपण मला अजूनच अस्वस्थ करत आहे.’’

पण तन्मयच्या या वाक्याने अबोली ऑफलाइन झाली. तन्मयला समजलेच नाही तिला नेमके कशाचे वाईट वाटले. आजपर्यंत ती एकदाही अशी वागली नव्हती. उद्या बोलू असा विचार करून तो झेपण्याचा प्रयत्न करू लागला. पण अबोलीच्या ऑफलाइन गेल्याने त्याची झोपच उडवून टाकली होती. दुसरा दिवस उगवला पण दिवसभर अबोलीचे ऑफलाइन राहणे त्याला अस्वस्थ करत होते. तो उतावळेपणाने रात्रीची वाट पाहू लागला कारण काहीही असो अबोली रात्री आपल्याशी नक्की बोलेल याची खात्री होती. पण रात्री नेहमीची वेळ निघून गेली तरी अबोली ऑनलाइन आलीच नाही. तन्मयला खूप वाईट वाटले की आपण उगाच तिच्याशी भांडलो. आपण का तिला पाहण्याचा हट्ट केला. ती याच कारणाने रागावली असेल. त्याला स्वत:वरच खूप संताप येत होता पण त्यावर तो काहीही करू शकत नव्हता.

अबोलीची वाट पाहत पाहत एक महिना होऊन गेला. तन्मय दररोज रात्री नेहमीच्यावेळी ती ऑनलाइन येण्याची वाट पाहत असे…पण…तसे घडलेच नाही. त्याला आठवले की अबोलीचा उद्या वाढदिवस आहे आणि चॅटिंग करत असताना तिने सांगितले होते की तिला लहान मुले खूप आवडतात. त्याने ठरवले उद्या अबोलीसाठी काहीतरी वेगळे करू या. ती सोबत नसली तरी काय झाले?

दुसऱ्या दिवशी तन्मय सकाळी लवकर उठला. त्याने ऑफिसमध्ये रजा घेतली. तो एका मिठाईच्या दुकानात गेला. तिथून खूप सारे लहान मुलांना आवडणारी मिठाई घेतली व त्याच घराजवळ असलेल्या अनाथ आश्रमात गेला. पण गेटजवळ जाताच तो थबकला. समोरील दृश्य पाहून तो पाहतच राहिला.

सर्व लहान मुले एका तरूणी भोवती किलबिलाट करत होते. ते सर्वजण काहीतरी खेळ खेळत होते. ती तरूणी हावभाव करून त्यांना सांगत होती व ती मुले गाण्याचे नाव ओळखत होती. मुलांनी गाणे बरोबर ओळखल्यावर ती आनंदाने उड्या मारत होती आणि तोच आनंद, निरागसता त्या तरूणीच्या चेहऱ्यावर होती.

मोठी माणसे पण लहान मुलांसारखे निरागस असू शकतात का? हे कोडे तन्मयला पडले. हावभाव करतांना तिच्या गुलाबी ओठांची होणारी नाजूक हालचाल, वाऱ्याने उडणारे तिचे लांबसडक केस आणि ते सावरताना तिची होणारी धांदल…आपण इथे कशासाठी आलो हेच नेमके तन्मय विसरून गेला.

‘‘हॅलो मिस्टर, काय सुरू आहे?’’

एका लहान मुलाच्या आवाजाने तन्मय भानावर आला.

‘‘हम्मम…मी…ते…भेटायला आलो होतो.’’

‘‘हो का, मग भेटण्यासाठी गेटच्या आत यावे लागेल ना…तुम्ही तर केव्हाच गेट पकडूनच उभे आहात?’’

एवढ्याशा लहान मुलाने आपली फिरकी घ्यावी हे पाहून तन्मय थोडा रागावला. पण काय करणार. ती युवती व सर्व बच्चे कंपनी आता आपल्याकडेच पाहत आहे हे लक्षात आल्यावर तो म्हणाला, ‘‘नाही रे बेटा…तुम्ही सगळे खेळत होता ना, मग तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून थांबलो होतो.’’

‘‘हो का…आम्हाला माहिती आहे तुम्ही का थांबला होता? आणि तुमचे लक्ष कुठे होते?’’

तन्मय एकदम गोरामोरा झाला. या लहान मुलाने आपली चोरी पकडली म्हणून तो काही त्याला बोलणार तेवढयात समोरून एक वयस्कर गृहस्थ आले. त्यांनी त्या लहान मुलास बोलवले…‘‘’अजय इकडे ये…काय करतो आहे…आणि त्या दादाला काय त्रास देत आहेस?’’

‘‘नाही…नाही…मी काहीच केले नाही, उलट हा दादाच केव्हापासून…’’

आपली चोरी पकडली या भीतीने तन्मयने पुढे जाऊन त्या लहान मुलांचे म्हणजे अजयचे वाक्य पूर्ण केले. ‘‘नाही…याने मला काहीच त्रास दिला नाही. उलट तो मला आश्रमाबद्दल माहिती देत होता. खूपच हुशार आहे हा…’’ अजयही तन्मयकडे पाहून हसू लागला व खेळायला पळाला. पण त्याचवेळी तन्मयचे लक्ष त्या युवतीकडे गेले. त्या युवतीच्या नजरेनेही तन्मयची दखल घेतली हे त्याला जाणवले. तो तिकडे वळणार तेवढ्यात त्या गृहस्थानी त्याला ऑफिसमध्ये नेले.

‘‘नमस्कार मी धनंजय मोरे…सर्व जण मला गोरे काका म्हणतात. काय काम होते आपले?’’

तन्मयने त्यांना सांगितले की, ‘‘आज माझ्या एका मैत्रीणीचा वाढदिवस आहे म्हणून इथल्या लहान मुलांना खाऊ वाटायचा आहे आणि त्यांच्या शिक्षणासाठी काही मदतही करायची आहे.’’

‘‘अरे वा…छान…तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. मी सर्व मुलांना ग्राउंडवर बोलावतो…’’

‘‘मोरे काका, एक विचारू का?’’

‘‘हो…हो…विचारा ना…काही अडचण आहे का?’’

‘‘नाही अडचण अशी नाही. त्या मुलासोबत बाहेर खेळत आहे त्या कोण आहेत?

इथं कामाला आहेत का…’’ थोडे अडखळतच तन्मयने विचारले.

‘‘नाही…नाही…ती होय…ती आनंदी आहे.’’

‘‘म्हणजे मी नाही समजलो…’’

‘‘अहो तिचे नाव आनंदी आहे. तिला या निष्पाप मुलांचा खूप लळा आहे. ती त्यांना नेहमी भेटायला येते आणि आज तर तिचाही वाढदिवस आहे मग काय आजचा पूर्ण दिवस ती या मुलांसोबतच घालवते…मुलांनाही तिचा खूप लळा आहे. पण बघा ना एवढी सुंदर निरागस असूनही…’’

त्यांचे पुढचे वाक्य अपूर्णच राहिले. एक लहान मुलगी आली व त्यांना हात ओढत बाहेर घेऊन गेली. मीही त्यांच्या मागे मागे गेलो ग्राऊंडवर सर्व लहान मुले जमली होती. त्या सुंदर युवती म्हणजचे आंनदीच्या बर्थडेचे सेलेब्रशन सुरू होते पण एका वेगळ्याच पद्धतीने…आंनदीने आश्रमातील सर्व लहान मुलांचे औक्षण केले व त्यांना गोड खाऊ व एखादे गिफ्ट देत होती. माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य पाहून मोरे काकांनी सांगितले की, ‘‘या लहान मुलांचा वाढदिवस कधी आहे हे आम्हाला ही ठाऊक नाही. पण त्या आनंदापासून ते अलिप्त राहू नये म्हणून आनंदी या पद्धतीने तिच्या वाढदिवशी त्यांना हा आनंद देते.’’

‘‘खूप छान आहे ही कल्पना…आजच्या काळातही कोणी इतरांचा विचार करत असेल असे मला वाटलेच नव्हते. शी इज रिअली ग्रेट..मी त्यांच्याशी बोलू शकतो का?’’

तन्मयच्या या प्रश्नाने मोरे काका दु:खी झाले.

‘‘काय झाले काका? मी काही चुकीचे बोललो का?’’

‘‘नाही रे बाळा…तू आनंदीशी बोलू शकतो…पण…ती तुझ्याशी नाही बोलू शकत. कारण आनंदी मुकी आहे. एका भयंकर अपघातात तिने आपले आईवडिल व आपला आवाज दोघेही गमावले. आज जो तू तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहत आहे तो फक्त या मुलांमुळेच…ही मुले तिचे सर्वस्व आहेत…’’

हे ऐकून तन्मयला खूपच मोठा धक्का बसला. त्याला एकदाही आनंदीकडे पाहून या बाबीची जाणीव झाली नाही. आधी तो फक्त तिच्याकडेच आकर्षित झाला होता. पण आता त्याला तिच्याबद्दल प्रेम व आदरही वाटू लागला. तन्मय मोरे काकासोबत आनंदीकडे गेला. काकांनी त्या दोघांची ओळख करून दिली.

तन्मयने आनंदीला विचारले की, ‘‘तुम्हाला राग येणार नसेल तर…मीपण तुमच्या या सेलेब्रशनमध्ये येऊ का?’’

तन्मय आश्रमात आल्यापासून आपल्याकडेच बघत आहे हे आनंदीला जाणवलंच होते व त्याचे व्यक्तिमत्त्व आश्रमातील मुलांविषयीची कणव…त्याच्या चेहऱ्यावरील गोड हास्य..आनंदी त्याला नाही म्हणूच शकली नाही. तिच्या संमतीने त्यानेही त्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याचा तो दिवस खूपच छान गेला. त्या भेटीत त्याने आनंदीकडून तिचा फोन नंबरही मिळवला. रात्री घरी आल्यावरही तो एकदम छान मूडमध्येच होता. आनंदीच्या आठवणीने तो गालातल्या गालात हसतही होता. आज बऱ्याच दिवसानंतर त्याच्या आईने त्याला इतके आनंदी पाहिले होते.

‘‘काय रे तन्मय…आज एकदम रंगात आहे गाडी…कोणी स्वप्नातली परी भेटली की काय तुला?’’

आईच्या या प्रश्नाने तो एकदम भांबावून गेला.

‘‘काय गं आई…काहीही बोलत असते. मी झोपायला चाललो आहे तू ही लवकर झोप.’’

पण हे प्रकरण काहीतरी वेगळेच आहे, हे आईच्या नजरेतून सुटले नव्हते.

तिकडे आनंदीची स्थितीपण काही वेगळी नव्हती. तन्मयचे बोलणे, त्याचे तिला सांभाळून घेणे, मुलांशी केलेली दंगामस्ती…तिला राहून राहून आठवत होती आणि विशेष म्हणजे त्याने एकदाही ती मुकी आहे हे तिला जाणवू दिले नाही. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव वरूनच तो तिचे म्हणणे समजून घेत होता…जसे की ते दोघे खूपच जुने मित्र आहेत.

दुसऱ्या दिवसापासून तन्मय आणि आनंदीचे नवे जग सुरू झाले. एकमेकांना मोबाइलवर मॅसेजेस केल्यावाचून त्यांचा दिवच सुरू व्हायचा नाही. मग हे चॅटिंग छोट्या भेटीतून..प्रेमात कधी परावर्तित झाले दोघांनाही कळले नाही पण…

हो पण…आनंदीला भीती होती ज्या यक्तिवर ती मनापान प्रेम करते…ती व्यक्ती तिच्यापासून कायमची दूर जाते आणि तिला तन्मयला गमवायचे नव्हते म्हणूनच ती तिचे प्रेम व्यक्त करत नव्हती. पण तन्मय आता आनंदीशिवाय राहू शकत नव्हता. तो त्याच्या आईशी या विषयावर बोलला होता. तिलाही हे नाते मान्य होते मग काय तन्मयने त्याच दिवशी आनंदीला लग्नाचे विचारायचे ठरवले. ते दोघे संध्याकाळी एका बागेत भेटणार होते.

संध्याकाळी तन्मय नेहमीपेक्षा लवकरच तिथे आला. आनंदी येताच तो आतुरतेने तिला म्हणाला, ‘‘काय गं किती उशीर…पण तिच्या चेहऱ्यावरील खट्याळ हसू पाहून त्याला स्वत:ची चूक लक्षात आली. हम्मम समजले मला मीच आज जरा लवकर आलो. ते जाऊ दे, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. तू पूर्ण ऐकूण घे, तुझा निर्णय असेल तो मला मान्य आहे. बोलू…’’

तन्मयीची अधीरता पाहून आनंदीला लक्षात आले होते की त्याला का म्हणायचे आहे. तिने होकार दिला.

‘‘आनंदी…तू मला किती आवडतेस हे मी तुला सांगत नाही कारण न बोलताही तू हे जाणतेस पण मी आता तुझ्याशिवाय नाही राहू शकत…पण त्याच्याही आधी मला तुला अजून एक सांगायचे आहे. तू गैरसमज करू नको, आपली भेट होण्यापूर्वी माझे एका मुलीवर प्रेम होते.’’

हे ऐकून आनंदीच्या चेहऱ्यावरील भाव एकदम बदलून गेले.

‘‘थांब…आनंदी गैरसमज करू नको पूर्ण गोष्ट एक…अबोली…अबोली तिचे नाव…आम्ही ऑनलाइन भेटलो होतो. मी प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करायचो. तिला न पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. अगं हे तिला माहिती नव्हते. पण अचानक एके दिवशी ती माझ्या आयुष्यातून निघून गेली…काहीही न सांगता…’’

हे ऐकल्यावर आनंदी रडू लागली. तन्मयला वाटले की, आपले प्रेम प्रकरण ऐकून तिला वाईट वाटले. पण हे वेगळेच कारण होते. आनंदीने रडत रडतच आपला फोन तन्मयला दाखवला त्यात तिचे अबोली या नावाने फेसबुकवरील अकाउंट पाहून तर तो आश्चर्य चकित झाला ते ओपन करून त्यातील त्याचे व अबोलीचे चॅटिंग पाहून त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्यचे भाव रागात बदलले.

‘‘का केले तू हे…अबोली…की आनंद…तुझ्या त्या अचानक जाण्याने मी किती कोलमडून गेलो होतो माहिती आहे का तुला, मग पुन्हा का आली माझ्या आयुष्यात…पुन्हा माझ्या भावनांशी खेळायला…का केलेस असे…’’

आनंदी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. पण आता यावेळी शब्दविना ती त्याचा गैरसमज दूर करू शकत नव्हती आणि तिचे भाव त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हते. तन्मय रागाने तिथून निघून गेला. आपण आनंदीला एकटेच बागेत सोडून आलो याचेही त्याला भान नव्हते. फक्त एकच, डोक्यात होते अबोली की आनंदी आणि का…आणि याच विचारात त्याची वेगाने चालणारी गाडी केव्हा समोरील मोठ्या झाडास धडकली त्याला समजलेच नाही. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्याच्या मित्रांनी आनंदीच्या घरी फोन        केला ही बातमी ऐकताच आनंदीला खूपच मोठा धक्का बसला. आपल्या आईवडिलांचा अपघात तिच्या नजरेसमोर आला…आणि त्याच धक्क्याने ती जोरात किंचाळली व बेशुद्ध झाली. तिच्या मावशीने तिला शुद्धीत आणले व दोघीही तन्मयला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आल्या. तिथे त्याची आई होती. आनंदीने त्यांना प्रेमाने जवळ घेतले.

‘‘काळजी करू नका…आपल्या तन्मयला काहीही होणार नाही…’’

‘‘तू आनंदी ना…तू तर…तो तुलाच भेटायला आला होता ना…’’

तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी सांगितले की तन्मय आता शुद्धीत आला आहे. कोणीही एकजण त्याला भेटू शकतो. आनंदीने तन्मयच्या आईकडे पाहिले. त्यांनीही तिच्या डोळ्यातील प्रेम पाहून तिला परवानगी दिली.

आनंदी तन्मयच्या रूममध्ये गेली. तिला पाहताच तन्मयने तोंड फिरवले पण आनंदी त्याच्याजवळ गेली. तिने त्याचा हात हातात घेतला. ‘‘इतके रागावताता का आपल्या माणसावर…’’

तिचे शब्द ऐकून तन्मय तिच्याकडेच पाहतच राहिला.

‘‘हो मी बोलू शकते. केवळ तुझ्यामुळेच एक अपघाताने माझी वाचा गेली आणि दुसऱ्या अपघाताने परत आली. मीही तुझ्यावर खूपच प्रेम करते. मला माहित नव्हते की फेसबुकवर चॅटिंग करणारा तूच आहेस. मीही तुझ्यात गुंतत होते पण तू त्यावेळी भेटण्यासाठी आग्रह करत होता म्हणूनच मी तुझ्यापासून दूर झाली होती. पण आपण पुन्हा भेटलोच…आणि पुन्हा कधीही माझ्यापासून दूर करणारा नाही. नेहमी…असेच…’’

‘‘हो..का…नेहमीच असेच…म्हणजे कसे?’’

तन्मयच्या या खट्याळ वाक्याने आनंदी लाजली व तिचा हात त्याच्या हातातून सोडवू लागली पण तन्मयने त्याची पकड अधिकच घट्ट केली. मॅडम आता कुठे चालल्या पळून…आता हे रेशमाचे बंध कायमचेच विणले गेले. त्यातून तुमची सुटका नाही.

‘‘मलाही आवडेल हे बंधन कायमस्वरूपी…’’ आणि हीच तर खरी सुरूवात आहे आपल्या राजा राणीच्या संसाराची…नांदा सौख्य भरे…!!!

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें