शरीरावर उन्हाचे ५ परिणाम

* पारूल भटनागर

ऊन आपल्या शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम करते. सूर्याची किरणे म्हणजे अतिनील किरणांच्या (अल्ट्राव्हायोलेट) संपर्कात आल्यामुळे सन बर्न, उष्माघात, डोळयांना अॅलर्जी, एजिंग इतकेच नव्हे तर स्किन कॅन्सरही होऊ शकतो. चला, याविषयी कॉस्मेटोलॉजिस्ट पूजा नागदेव यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया :

यूव्ही किरणे तीन प्रकारची असतात. यूव्हीएला अल्ट्राव्हायोलेट एजिंग किरण या नावानेही ओळखले जाते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचा सैल होते आणि वयाआधीच वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात. यूव्हीबीला अल्ट्राव्हायोलेट बर्निंग किरण या नावाने ओळखले जाते. यामुळे सनबर्न वाढते. तर यूव्हीसीला अल्ट्राव्हायोलेट कॅन्सर किरण असे म्हणतात. यामुळे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे ही किरणे त्वचेचे नुकसान करण्याचे काम करतात. यामुळे त्वचेचे नेमके कसे नुकसान होते, हे जाणून घेऊया :

सनबर्न आणि सनटॅनची समस्या

शरीराला थोडयाफार प्रमाणात उन्हाची गरज असते. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते. हाडे बळकट होतात. पण जेव्हा त्वचा कडाक्याच्या उन्हाच्या संपर्कात येते तेव्हा सनबर्न आणि सनटॅन अशा दोन्ही समस्या निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी सन केअर गरजेचे असते. सनबर्न आणि सनटॅन हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. सनबर्नमुळे त्वचा काळवंडते. रुक्ष होते. तर सनटॅनमुळे त्वचा लाल होते. जळजळल्यासारखे वाटू लागते.

स्किन एजिंग आणि पिग्मेंटेशन

वय वाढू लागल्यावर त्वचेला सुरकुत्यांचा सामना करावाच लागतो, पण उन्हामुळे ही समस्या अधिकच वाढते. जास्त कडक उन्हामुळे त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात. यूव्ही किरणे त्वचेतील कोलोजन आणि इलॅस्टिक टिश्यूचे नुकसान करतात. त्यामुळे ती नाजूक होतात आणि पुन्हा आपल्या पूर्वीच्या आकारात येऊ शकत नाहीत. मेलानीन नावाच्या स्किन पिग्मेंटेमुळे आपल्या त्वचेचा रंग मिळतो. ते नॅचरल सनस्क्रीनसारखे काम करते. उन्हामुळे जास्त मेलानीनची निर्मिती होते. यामुळे टॅनिंग वाढते. जेव्हा मेलानीन असमान मात्रेत वाढते तेव्हा पिग्मेंटेशन होते. ते प्रेकल, ब्रेमिशेज व सनस्पॉटच्या रूपात दिसू लागते. यामुळे असमान स्किनटोनची समस्या वाढू शकते.

डोळयात इन्फेक्शनची भीती

उन्हाळा आपल्यासोबत खूप साऱ्या समस्या घेऊन येतो. सूर्याच्या अतिनील किरणांसोबत धूळमातीच्या संपर्कात आल्यामुळे डोळयांची जळजळ, खाज, डोळे लाल होणे अशा समस्या तसेच इन्फेक्शन होते. या किरणांमुळे दृष्टीवर दुष्परिणाम होण्यासह डोळयांच्या पडद्यावरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी थोडया वेळाने डोळे थंड पाण्याने धुवा. डोळे जळजळू लागल्यास ते चोळू नका, तर स्वच्छ कपडयाने पुसा. डोळयांना थंडावा देणारे आयड्रॉप वापरा. बाहेर जाताना गॉगल लावा, जेणेकरून सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळयांचे संरक्षण होऊ शकेल.

उष्माघात

उन्हाळयात खूप घाम येत असल्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे हिट स्ट्रोक म्हणजे उष्माघाताची समस्या निर्माण होते. यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. सेंट्रल डिसिस कंट्रोल आणि प्रिव्हेन्शननुसार उष्माघातामुळे शरीराचे तापमान खूपच वेगाने वाढते. याकडे दुर्लक्ष केल्यास जीवदेखील जाऊ शकतो किंवा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

कसे कराल रक्षण

* उन्हाळयात नेहमी सनस्क्रीन वापरा.

* यूव्हीए आणि यूव्हीबी प्रोटेक्शन करणारेच सनस्क्रीन वापरा.

* घराबाहेर पडताना उन्हापासून रक्षण करणारा गॉगल, छत्रीचा अवश्य वापर करा.

* शरीरातील आर्द्र्रता कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

* कुठल्याही प्रकारची अॅलर्जी झाल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा.

* तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसारच क्रीमची निवड करा.

* दररोज चेहऱ्याला अॅलोव्हेरा जेलने मसाज करा.

* आठवडयातून दोनदा चेहऱ्याला मुलतानी मातीचा पॅक लावा.

* नेहमी बाहेरून आल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें