घरातून पळून जाणं उपाय नव्हे

* डॉ. अनामिका श्रीवास्तव

अशी कोणती समस्या आहे जी मुलीला घर सोडायला भाग पाडते. साधारणपणे सर्व दोष मुलीला दिला जातो, मात्र अशी अनेक कारणं असतात, जी मुलीला   स्वत:वर इतका मोठा अन्याय करण्यास भाग पाडतात. काही मुली आत्महत्येचा मार्गही अवलंबतात. परंतु ज्या जगू इच्छितात, स्वतंत्र होऊ इच्छितात, त्याच परिस्थितीपासून बचाव म्हणून घरातून पळून जाण्याचा मार्ग अवलंबतात. ही त्यांची हतबलता आहे.

आजचा बदलता काळ याचं एक कारण आहे. आज घडतं असं की प्रथम आईवडील मुलींना स्वातंत्र्य देतात, परंतु जेव्हा मुलगी काळासोबत स्वत:ला बदलू पाहाते, तेव्हा ते त्यांना अर्थात आईवडिलांना पसंत पडत नाही.

थोड्याबहुत चुकांसाठी मध्यमवर्गीय मुलींना समजावण्याऐवजी मारझोड केली जाते. घालूनपाडून बोललं जातं, ज्यामुळे मुलीच्या नाजूक भावना दुखावतात आणि ती बंडखोर बनते. घरातील दररोजच्या दोषारोपाने भरलेल्या वातावरणाला त्रासून जाऊन ती घरातून पळून जाण्यासारखं पाऊल नाइलाजास्तव उचलते.

जेव्हा घरातील वातावरणाचा मानसिकरित्या तिला खूप त्रास होऊ लागतो तेव्हा तिला इतर कोणताही मार्ग उमजत नाही. त्यावेळी बाहेरील वातावरण तिला आकर्षित करतं. आईवडिलांचं तिच्यासोबत उपेक्षित वर्तन सहन न होऊन ती या तणावग्रस्त स्थितीतून मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न करते.

आज मुलामुलींना समान वागणूक दिली जाते. परंतु मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये मुलींच्या मुलांशी मैत्री करण्याला संशयी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. जर एखादी मुलगी एखाद्या मुलाशी बोलत असेल, तर तिच्यावर संशय घेतला जातो. जेव्हा घरच्या मंडळींचे टोमणे ऐकून मुलीच्या भावना दुखावतात तेव्हा तिच्यामध्ये विद्रोहाची भावना जागृत होते; कारण ती विचार करते की ती चुकीची नसतानाही तिच्याकडे संशयी दृष्टीने पाहिलं जातं, मग समाज आणि लोक जसा विचार करतात तसंच आपलं व्यक्तिमत्त्व का बनवू नये? ही विद्रोहाची भावना विस्फोटकाचं रूप धारण करते. परंतु अशा परिस्थितीतही घरच्यांशी सहकार्यपूर्ण वर्तणूक तिची बाहेर वळणारी पावलं थांबवू शकतात, मात्र बऱ्याचदा आईवडिलांची उपेक्षित वागणूकच यासाठी सर्वाधिक जबाबदार असते.

आईवडिलांची मोठी चूक

बहुतेक आईवडील मुलांना समजून घेण्याऐवजी रागावतात. वास्तविक युवावस्था एक अशी अवस्था असते, जिथे मुलांना सर्वकाही नवनवीन वाटतं, त्यांच्या मनात सर्वांना जाणून आणि समजून घेण्याची जिज्ञासा असते. जर त्यांना चांगल्याप्रकारे समजावून सांगितलं तर ते अशी पावलं उचलणार नाहीत; कारण हा वयाचा असा टप्पा असतो, जिथे त्यांना कुणीही कितीही थांबवलं तरी ते थांबत नाहीत.

तारुण्यावस्थेत मनातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा वेडा ध्यास असतो, जो केवळ आणि केवळ आईवडिलांची सहानुभूती आणि प्रेमळ वागणूकच नियंत्रित करू शकतो. जर आईवडिलांनी असा विचार केला की त्यांच्या रागावल्याने, मारण्याने वा उपेक्षित वर्तणुकीने मुलं सुधारतील तर हा त्यांचा सर्वात मोठा गैरसमज ठरतो.

सहकार्यपूर्ण वर्तणूक आवश्यक

मुलींच्या घरातून पळून जाण्याला त्या स्वत:च जबाबदार आहेत. परंतु यामध्ये आईवडिल आणि बदलत्या काळाचीही प्रमुख भूमिका असते. आईवडील मुलींच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु आईवडीलांची सहकार्यपूर्ण वर्तणूक अत्यंत जरूरी असते.

मुलींनीही भावनांच्या आहारी जाऊन वा अट्टाहासापायी कोणतेही निर्णय घेणं योग्य नाही. मोठ्यांचं म्हणणं विचारपूर्वक ऐकूनच कोणाताही निर्णय घ्यावा; कारण एका पिढीच्या अंतरामुळे विचारांमध्ये मतभेद असू शकतात. मोठ्यांना विरोध करावा, परंतु त्यांच्या योग्य गोष्टी मान्यही कराव्यात नाहीतर हीच पलायन प्रवृत्ती कायम राहिली तर तुम्ही कल्पना करा की भविष्यात आपल्या समाजाचं स्वरूप काय असेल?

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें