लग्नानंतरही रहाल रोमँटिक

* मिनी सिंह

‘प्रेम करणे आणि निभावणे सोपे नसते’ हे सर्वांनाच माहिती आहे. आईवडील, नातेवाईक, समाज, जातीधर्माच्या सर्व भिंती लांघून एक होणे अवघड असते. तरीही या सर्व सीमा ओलांडून जे एकत्र येतात त्यांना सहजीवनाचा मार्ग सापडतोच. त्यावेळी त्यांना असे वाटते की, त्यांना ते सर्व काही मिळाले जे त्यांना हवे होते.

परंतु, संसाराची जबाबदारी खांद्यावर येऊन पडताच त्यांना लग्न म्हणजे एखादे कंटाळवाणे बंधन वाटू लागते. लग्नाआधीचेच जीवन बरे होते, उगाचच लग्नाच्या बेडीत अडकलो, अशी भावना त्यांच्या मनात घर करू लागते.

लग्नापूर्वीचे रुसवे-फुगवे, एकमेकांची समजूत काढणे हे नाटकी होते असे वाटू लागते. लग्नाच्या अवघ्या २-३ वर्षांतच त्यांच्या वैवाहिक नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. त्यामुळे मनात नसतानाही अखेर हे प्रेमी युगुल सर्वसामान्य पती-पत्नीसारखे जगू लागतात आणि अगदी लहानसहान गोष्टींवरूनही त्यांच्यात भांडणे सुरू होतात. पाहायला गेल्यास भांडण हेही प्रेमाचेच एक रूप असते आणि छोटे-मोठे वाद तर प्रत्येक नात्यात होतातच, पण जेव्हा ते विकोपाला पोहोचतात तेव्हा घटस्फोट घेण्याची वेळ येते आणि सर्व काही संपून जाते.

प्रिया आणि समीरसोबतही काहीसे असेच घडले. कुटुंब आणि समाजाचे वाईटपण स्वीकारून त्यांनी लग्न केले. वैवाहिक जीवनात प्रेमाचे रंग भरले, पण हळूहळू हे रंग फिकट होऊ लागले. त्यांना हे नाते कंटाळवाणे वाटू लागले. प्रेम वगैरे सर्व खोटे असते, असे वाटू लागले.

नात्यामध्ये जागवा रोमान्स

लग्नापूर्वी प्रेमी युगुल जीवाला जीव देतात. त्यांना एकमेकांची प्रत्येक गोष्ट बरोबर वाटते. लग्नानंतर मात्र त्याच सर्व गोष्टी त्यांना कंटाळवाण्या वाटू लागतात. याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही भांडण करून विभक्त व्हावे आणि त्यानंतर तुम्हाला याचा पश्चात्ताप व्हावा.

* पतीपत्नीत प्रेमाची नवी ऊर्जा जागवणे कठीण नाही, फक्त थोडासा बदल आणि समजूतदारपणा गरजेचा असतो. यामुळे तुमचा जोडीदार आनंदी होईल, सोबतच तुमच्या नात्यातही नवेपणा येईल. प्रेमाची बाग पुन्हा सुगंधित होईल. नाती निभावण्यासाठी असतात, छोटयाछोटया कारणांमुळे रागावून तोडण्यासाठी नसतात, ही गोष्ट पतीपत्नी दोघांनीही समजून घेणे गरजेचे असते.

* लग्नानंतर प्रत्येक पतीपत्नीची जबाबदारी वाढते, तुमचे प्रेम जेवढे खरे आहे तेवढीच ही गोष्टही खरी आहे. कामाचा व्याप जास्त वाढल्यामुळे दोघे एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत आणि त्यामुळेच आपला जोडीदार पहिल्यासारखा राहिला नाही, असे वाटणे स्वाभाविक असते. पण असे मुळीच नाही, हे तुमच्या मनाला माहीत असते. पण हो, कामाचा कितीही व्याप असला तरी त्यातून आपल्या जोडीदारासाठी थोडासा तरी वेळ नक्की काढा. नेहमी शक्य नसले तरी आठवडयातून एकदा दोघांनी फिरायला गेलेच पाहिजे. आलिंगन देणे, वागण्यातील लडिवाळपणा, चुंबन, नजरेतून बोलणे, शारीरिक स्पर्श, या सर्वांमुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल आणि दिवसेंदिवस तुमच्यातील प्रेमही जास्तीत जास्त खुलत जाईल.

* पूर्वी तुम्ही प्रियकर-प्रेयसी होता, पण आता पतीपत्नी आहात. त्यामुळेच जीवनात थोडाफार बदल होणे स्वाभाविक आहे, याचा कधीच विसर पडू देऊ नका. छोटयाछोटया गोष्टींवरून रुसणे, समजूत काढणे यात काही गैर नाही, पण पराचा कावळा करू नका. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होईल आणि या नात्याचे ओझे वाटू लागेल. लग्नाआधी ज्या कुटुंबाचा विचार न करताच दोघे एकत्र येतात त्याच कुटुंबाचा विचार करून लग्नानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागतात.

* सकाळची सुरुवात जोडीदाराला चुंबन देऊन करा. मग पाहा, संपूर्ण दिवस तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि जोपर्यंत आपल्या जोडीदाराला पुन्हा पाहत नाही तोपर्यंत ही प्रसन्नता कायम राहील. एक चुंबन घ्यायला फक्त ६ सेकंद लागतात, पण तीच तुमच्या नात्यात नवा उत्साह जागवतील.

* पतीपत्नीसाठी घरात स्वतंत्र खोली असायला हवी. जोडीदाराला खुश करण्यासाठी बेडरूम सजवा. बिछान्यावर फुले असलेली चादर घाला. छोटया सुगंधित मेणबत्त्या लावा, जेणेकरून प्रेम जागवणारे वातावरण तयार होईल आणि तुमचा जोडीदार तुमच्या मिठीत येण्यासाठी आतुर होईल.

* जोडीदाराला मिठीत घेऊन जुन्या प्रेमळ गोष्टींना उजाळा द्या. लग्नाआधी एखाद्या दिवशी भेटता न आल्यास तुम्ही दोघेही कसे अस्वस्थ होत होता, त्याची आठवण जागवा. घरातले सर्व गाढ झोपल्यानंतर फोनवर एकमेकांशी हळू आवाजात बोलणे, तासनतास चॅटिंग करणे, फिरायला जाणे, भेटीसाठी आतुर होणे, अशा पूर्वीच्या सर्व गोष्टींना नव्याने उजाळा द्या.

* बिछान्यावर जाण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचा मूड पाहा. त्यानंतर चुंबन, हलकासा स्पर्श करून एकमेकांच्या डोळयात पाहा. यामुळे तुमच्या प्रेमाला नवी उभारी मिळेल.

* परमसुख मिळाल्यानंतर अनेकदा पतीपत्नी एकमेकांकडे पाठ करून झोपतात. असे करू नका. परमसुख मिळाल्यानंतर जोडीदारापासून वेगळे होऊन झोपू नका तर त्याला मिठीत घेऊन चुंबन द्या. प्रेमाने गप्पा मारा. दुसऱ्या दिवशी काय आणि कसे करायचे आहे, याचे नियोजन करा.

* शक्य तेवढा वेळ एकत्र घालवा. सकाळी एकत्र फिरायला जा. सकाळचा चहादेखील सोबतच बसून प्या. जसे लग्नापूर्वी जात होता तसेच हातात हात घालून सिनेमा पाहायला जा. रात्रीचे जेवण जेवतानाही पूर्वीप्रमाणेच नजरेच्या इशाऱ्याने एकमेकांशी बोला. एकत्र घालवलेले क्षण आठवून चेहऱ्यावर हास्य उमलू द्या. मग पाहा, आजही तुमच्या जोडीदाराचा चेहरा लाजून गुलाबी होईल.

सेक्स तज्ज्ञांच्या मते, पतीपत्नीसाठी बेडचे एक वेगळे महत्त्व असते. पण तोच वेगळा होतो तेव्हा नात्याचा अर्थ पुरता बदलतो. म्हणूनच कितीही मतभेद असले तरी बेड वेगळा होऊ न देणे गरजेचे आहे, ही गोष्ट दोघांनीही कायम लक्षात ठेवायला हवी.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें