धार्मिक उपवास एक जीवघेणं कर्मकांड

* हरि विश्नोई

धर्माच्या नावावर आपल्या समाजात वर्षांनुवर्षं विविध प्रकारे कर्मकांड होत आली आहेत. उपवास हा त्याचाच एक भाग आहे. पुण्य कमवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी, नवस करण्यासाठी किंवा अगदी दुसऱ्यांचं अनुकरण करून खाणंपिणं सोडून दिलं जातं. पण हे बरेच दिवस उपाशी राहणं जीवावर बेतू शकतं.

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये अशीच एक घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय आराधनाने सलग ६८ दिवस उपवास केला. यात ती संपूर्ण अन्नत्याग करून फक्त पाणी पित होती. यामुळे ती अशक्त बनली. पण तरीही तिला नववधूप्रमाणे सजवून-नटवून, रथात बसवून तिची मिरवणूक काढण्यात आली.

आराधनाचं व्रत पूर्ण झाल्यानंतर साजरा करण्यात आलेल्या सोहळ्याला बरीच गर्दी जमली होती. यात काही नेतेही उपस्थित होते. पण त्यानंतर दोन दिवसांनी त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईवडिलांविरूद्ध चुकीच्या उद्देशाने हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन त्यावर पडदा टाकू पाहणाऱ्या भक्तांनी मृत मुलीला बालतपस्वी म्हणून जाहीर केले.

धर्म एक व्यसन आहे आणि आपल्या देशात अशा धर्मांध आईवडिलांची कमतरता नाही, जे साधूसंतांच्या आहारी जाऊन आपल्या निष्पाप मुलांना त्यांच्या हातात सोपवतात किंवा मांत्रिकांच्या बोलण्याला भुलून आपल्या नको त्या स्वार्थासाठी मुलांचा बळी देतात. वर्तमानपत्रांमध्ये रोज अशा बातम्या छापून येत असतात.

धर्मांधांची कमतरता नाही

डोळे झाकून उपासतापास केल्याने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी बिजनौरमध्ये एक महिला देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस उपाशी राहिली. या दिवसांमध्ये ती फक्त दोन लवंग पाण्यासोबत अख्ख्या गिळून खात असे,

एक दिवस तिच्या अन्ननलिकेत लवंग अडकली आणि तिथे जखम झाली. त्यानंतर ४ दिवसांनी तिचा मृत्यू झाला. ती महिला वयाने मोठी होती पण आराधना तर अल्पवयीन होती.

कमी वयाच्या मुलीला ६८ दिवस उपाशी राहण्याचा परिणाम माहीत नव्हता. तिच्या आयुष्यासाठी हा निबंध धोकादायक ठरेल याची तिला कल्पना नव्हती. अशावेळी उपाशी राहण्याचे परिणाम काय होतील हे तिच्या आईवडिलांनी तिला समजावणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनी तिला असं करण्यापासून रोखणं आवश्यक होतं. पण त्यांना आपल्या समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची होती.

पुस्तकांतून मिळतंय प्रोत्साहन

धर्माच्या पुस्तकांत व्रतवैकल्यांचा महिमा सांगण्यात आला आहे. याला त्यागतपस्या म्हटलं गेलं आहे. योग दर्शन, जैनेंद्र सिद्धांत कोश, वसुनंदी श्रावकाचार, जैन दर्शन व्रत विधान, सर्वोदय जैन तंत्र, नैसर्गिक चिकित्सेने रोगमुक्ती आणि दैवी उपचार, इत्यादी अनेक पुस्तकांमध्ये उपवासामुळे पोट बरे होणे, तब्येत चांगली होणे, चेहऱ्यावर चमक येणे आणि विविध रोगांपासून मुक्ती असे फायदे सांगण्यात आले आहेत.

याशिवाय लोकांना धार्मिक उपवासांच्या पद्धती सांगून या चुकीच्या परंपरेला प्रोत्साहन देणारी कितीतरी पुस्तके तीर्थस्थळे, मंदिर, फूटपाथवर बेधडक विकली जातात. सत्यनारायण, संतोषी माता आणि वैभव लक्ष्मी इ. देवांच्या नावावर भक्तांच्या संख्येत वाढ होतच राहते.

निरर्थक गोष्टी

कधीतरी पोटाला आराम म्हणून किंवा आजारी पडल्यावर हलकं जेवण किंवा एकवेळ उपाशी राहाणं समजून घेण्यासारखं आहे. पण मोक्ष मिळवण्यासाठी महिनाभर सातत्याने उपाशी राहाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे.

पायी चालत तिर्थक्षेत्री जाणे किंवा लोळत लोळत मंदिरात जाणे, आपल्या शरीरावर चाबूक, चाकू, वगैरे मारून घेणे आणि उपाशी राहून कष्ट सोसणाऱ्यांचे गोडवे गायले जातात. त्यामुळे बरेचसे धर्मांध लोक जेवण-खाणं सोडून उपासतापास करत राहतात. काहीवेळा तर महिनोंमहिने उपाशी राहतात.

गुरू घंटाळ

धर्मगुरूंच्या मते उपवास हे महाकल्याणकारी, शास्त्रीय, पापनाशल, स्वर्ग आणि मोक्ष मिळवून देणारे तसेत मनातल्या इच्छा पूर्ण करणारे असतात. आपलं म्हणणं खरं ठरवण्यासाठी निरर्थक उदाहरणे देतात. माणसे अति खाल्ल्याने मरतात. भुकेने नाही असं त्यांचं म्हणणं असतं. लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी उपवास करूनही जिवंत राहिलेल्या लोकांच्या काल्पनिक गोष्टी ऐकवत राहतात.

धर्मगुरू व्रतवैकल्यांना प्रोत्साहन देतात कारण अशाच गोष्टींमुळे त्यांचा धंदा चालतो. व्रतांमध्ये दान करण्याचा सल्ला दिला जातो. दानामध्ये मिळालेला सर्व माल ते स्वत:च हडप करतात. असे उपवास करणाऱ्यांची संख्या वाढली की त्यांना हवी तशी वातवरणनिर्मिती आपोआपच मिळते.

गावांमध्ये आणि शहरांतही बऱ्याच मुली लग्न वेळेत आणि चांगल्या घरामध्ये व्हावं म्हणून १६ सोमवार, संतोषी माता आणि बृहस्पती यांसाठी दिवसभर उपाशी राहतात, गरीब महिला श्रीमंत होण्यासाठी वैभव लक्ष्मी व्रत करतात. पुरुष रोजगार आणि नोकरीतील बढती यासाठी मंगळवारचा उपवास करतात.

कर्मकांड

पुरूष असोत वा महिला उपवासाच्या नावावर आजकाल सगळे दिखावाच करत असतात. उपवास फक्त नावाला असतो. पण त्या दिवशी एरव्हीपेक्षा जास्त फळे, वडे, तिखट मीठ घालून राजगिऱ्याच्या पुऱ्या, पराठे, लाडू, मिठाई इ. गोष्टी मनसोक्त हादडल्या जातात.

एकादशी, अमावस्या, पौर्णिमा आणि इतर सर्व सण मिळून वर्षांतल्या ३६५ दिवसांपैकी साधारण २५० दिवस उपवासांचे असतात. आठवड्याला, पंधरवड्याला किंवा दर महिन्याला धान्य आणि मीठ असलेलं अन्न सोडून उपवास करणं शक्य आहे. पण भक्ती जीवावर बेतू शकते.

उपाशी पोटाचे परिणाम काय असतात?

वेळेवर न जेवल्याने तब्येतीवर वाईट परिणाम होतो. आहारतज्ज्ञ ममता यांच्या म्हणण्यानुसार बराच काळ शरीराला इंधन न मिळाल्याने ताकद देणारे ग्लायकोजन तुटू लागतात. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. खूप वेळ उपाशी राहिल्याने रक्तातील ग्लुकोज घटू लागते. पेशी कमकुवत होतात. रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. तसेच वजन कमी होते. असे सतत होत राहिल्याने मृत्यू ओढवू शकतो.

उपदेश

खरा दोष धर्मगुरू आणि धर्म प्रचारकांचा आहे. ते सतत सांगत असतात की उपवास केल्याने शरीर शुद्ध होतं. आत्म्याची ताकद वाढते, दु:ख नाहीसं होतं आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे भित्रे भक्त त्यांच्या बोलण्याला भुलतात.

सुखी राहण्यासाठी उपासतापासांच्या जंजाळातून बाहेर पडून अंधश्रद्धांपासून मुक्ती मिळवणं आणि विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. याशिवाय हे समजून घेण्याची गरज आहे की इच्छा उपवास करून वा मरून नव्हे, बुद्धिच्या आणि मेहनतीच्या बळावर पूर्ण केल्या जातात. आयुष्यातल्या समस्या कर्मकांडाने नाही तर समजूतदारपणे सोडवल्या जातात.

डोळे द्ब्राकून केल्या जाणाऱ्या उपवासांचा फायदा भक्तांना कमी तर धर्मगुरूंनाच जास्त होतो. आजच्या विज्ञानयुगात अशाप्रकारची ढोंगं करून आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे स्वत:ला फसवण्यासारखं आहे. उपवासाने कोणाचं भलं व्हायचं असतं तर एव्हाना ते झालंही असतं. त्यामुळे उपाशी राहण्याचा काहीच फायदा नसतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें