गट एनआरआय

कथा * संध्या सिनकर

मासिक वाचताना मला एक छान लेख दिसला. ज्यांची मुलं परदेशात आहेत, त्यांच्या गटाविषयी माहिती. त्या लेखात मला गणेशचे नाव दिसले. गणेश माझा बँकेतला जुना सहकारी. मी लगेच गणेशला फोन केला. गणेशने सांगितलं , ‘‘तो पुण्याला एका लग्नाला गेला असताना त्याला पुण्यातील अशा गटाविषयी माहिती कळली. घरी आल्यावर त्याने त्याच्या मित्रांना फोन केले. काही दिवसातच हा गट तयार झाला. ज्याचं नाव सर्वांनी मिळून एकमताने ठरवलं ‘गट एनआरआय.’’’ तो पुढे म्हणाला, ‘‘आम्ही ललिताच्या घरी शुक्रवारी भेटणार आहोत. तेव्हा तू तिकडे ये. सगळयांना भेट. गप्पाही होतील व तुला माहितीही मिळेल. मी तुला पत्ता एसएमएस करतो.’’

मी ललिताच्या घरी पोहोचले तर सगळे जण जमले होते. स्वागत व ओळख होऊन मी सोफ्यावर विसावले. चमचमीत पदार्थांचा सुगंध दरवळत होता. गप्पांचा किलबिलाट आणि हास्याची कारंजी उसळत होती. खाद्यपदार्थांची रेलचेल होती. स्वातीने आपल्या ताटलीत थोडे छोटे बटाटे वडे आणि एक पिझाचा तुकडा वाढून घेतला आणि श्यामकडे वळत ती म्हणाली, ‘‘आपल्या गटाला एक वर्ष झालं वाटतच नाही ना?’’ श्यामने हसत-हसत मान डोलावली. ‘‘हो ना’’ ललिता माझ्याकडे वळून म्हणाली, ‘‘गणेशने पुढाकार घेतल्याने आमच्या सर्वांच्या सहभागाने हा ‘गट  एनआरआय’ तयार केला. मग आम्ही मानसशास्त्रज्ञ डॉ. कुलकर्णी यांना भेटलो. त्यांना या क्षेत्रातला खूप अनुभव आहे. त्यांच्या सूचना आणि एकंदर विचार करून आम्ही गटासाठी काही गोष्टी ठरवल्या. जशा की आठवडयातून एकदा एकाच्या घरी आाळी पाळीने भेटायचे. एकमेकांच्या आजारपणात/अडचणीत मदत करायची. दोन-तीन महिन्यांनी एक दोन दिवसाच्या सहलीचा कार्यक्रम करायचा. एकमेकांच्या संपर्कात राहायचे.’’

‘‘खरंच डिसेंबरमध्ये गणेशच्या डोळयाच्या शस्त्रक्रियेच्या वेळेला तुम्ही सगळे मदतीला होतात, त्यामुळे काहीच अडचण आली नाही,’’ निशा म्हणाली.

‘‘विद्या रस्त्यात धडपडली आणि पायात रॉड टाकायला लागला, तेव्हाही पाच दिवसाचं हॉस्पिटलचं वास्तव्य तुमच्या सगळयांमुळे खूपच सोपं गेलं. मुलांनाही बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही.’’ इति विजय.

‘‘खरंच आपलं कोणीतरी जवळ आहे. एक फोन केला की आपल्यासाठी चारजण धावत येऊ शकतात. या विचारानेसुद्धा अगदी निर्धास्त वाटतं आणि रात्रीची झोपही चांगली लागते.’’ निशा म्हणाली.

‘‘अरे फक्त गप्पा मारू नका .भरपूर फोटोही काढा. नेहमीप्रमाणे आपल्या वहीत रंगीत पेपर प्रिंट चिकटवयाची आहे. अर्थात फोटो निवडणे व चिकटवणे आणि मिटिंगचा गोषवारा लिहिणे हे काम अर्थातच  माझे.’’ विजयने ती वही मला दाखवली. भरपूर फोटो होते. १२ जणांचा ग्रुप.

गणेश व निशा

गणेश  बँकेतून निवृत्त व निशा निवृत्त शिक्षिका.

गणेशने सांगायला सुरूवात केली, ‘‘माझी मोठी मुलगी डेंटिस्ट आणि मुलगा संगणक अभियंता. दोन्ही मुलांनी बाहेरच्या देशात जायचे नाही असे ठरवले होते. त्याप्रमाणे घराजवळच मुलीसाठी प्रॅक्टिस करायला जागा शोधत होतो.

‘‘तेव्हा ती एका वरिष्ठ दंतवैद्याकडे अनुभव घेत होती. मुलगा पुण्याच्या एका मोठया संगणक कंपनीत नोकरीला लागला. आम्ही पुण्यात त्याच्यासाठी घर बघायला सुरूवात केली आणि आता मुलीच्या लग्नाच्या दृष्टीनेही प्रयत्न चालू केले. स्थळ बघत असताना माझ्या मित्राच्या मुलाची माहिती कळली. तो संगणक अभियंता. अमेरिकेत वास्तव्य. चांगला पगार. घरचे सगळे परिचित. त्यामुळे मुलीला म्हटले बोलून तर बघ त्याच्याशी. ते दोघे भेटले. एकमेकांना पसंत केले आणि लग्न करून मुलगी अमेरिकेत गेली. मास्टर्स केले व काम करायला सुरुवात केली. मुलगी तिकडे गेल्यावर तिने भावाला तिकडच्या शिक्षणाच्या आणि नोकरीच्या चांगल्या संधीबद्दल माहिती दिली व त्याने अमेरिकेत जाण्याचे ठरवले. आमची काही आडकाठी अर्थातच नव्हती. आता तोही मास्टर्स करून नोकरी करत अमेरिकेत स्थिरावला आहे.’’

मीना व शैलेश

मीना औषध निर्माण महाविद्यालयातून निवृत्त प्राध्यापिका, शैलेश औषध निर्माण कंपनीतून निवृत्त.

मीनाच्या शब्दात सांगायचं तर दोन मुली. मोठ्या मुलीने औषध निर्माण शास्त्रामध्ये मास्टर्स केले. लग्न करून नवऱ्याबरोबर पीएचडीसाठी जर्मनीत गेली. आता दोघेही शिक्षण संपवून जर्मनीत कार्यरत. दुसरी मुलगी एमबीबीएस. थोडा अनुभव घेऊन आता पुढील शिक्षणासाठी जर्मनीत.

ललिता व वसंत

ललिता गृहिणी, तर वसंत खाजगी कंपनीतून निवृत्त.

ललिताने सांगितले की, ‘‘दोन मुले. एक मुलगा व एक मुलगी. दोघेही संगणक अभियंता. दोन्ही मुलं संगणक अभियंता झाल्यावर पुण्याला एका मोठया संगणक कंपनीमध्ये नोकरीला लागली. मुलीचे लग्नही पुण्याच्या एका संगणक अभियंत्याशी झाले. आम्ही तिघांनीही एकाच संकुलामध्ये वेगवेगळया सदनिका घेतल्या. दरम्यान मुलाला त्याच्या कंपनीने एका प्रोजेक्टवर अमेरिकेला पाठवले. तिकडचे वातावरण त्याला आवडले. मग वर्षभरानंतर सुट्टीत येऊन लग्न करून तो परत अमेरिकेला निघून गेला. नंतर तो नोकरी बदलून अमेरिकन कंपनीमध्ये रुजू झाला. दरम्यान मुलगी आणि जावईसुद्धा अमेरिकेत शिफ्ट झाले. मग आम्ही पुण्याचे घर बंद करून आमच्या ठाण्याच्या मूळ घरी परत आलो.

नीता व मंदार

नीता गृहिणी, मंदार एअर इंडियातून निवृत्त.

नीताच्या म्हणण्यानुसार एक मुलगा मेकॅनिकल इंजीनिअर. भारतात ४ वर्ष नोकरी केली. अधिक चांगली संधी मिळाल्यामुळे ७ वर्षापासून दुबईत नोकरी करतोय. सूनसुद्धा दुबईत नोकरी करते.

विद्या व विजय

दोघेही खाजगी कंपनीतून स्वेच्छा निवृत्त.

विद्याच्या शब्दात एकच मुलगा. त्याची डिफेंसमध्ये जायची इच्छा होती. पण दृष्टीतील किंचितशा कमतरतेमुळे निवड झाली नाही. आता हॉटेल मॅनेजमेंट केले व मास्टर्स करून कॅनडामध्ये कार्यरत.

स्वाती व श्याम

स्वाती गृहिणी व श्याम राज्य सरकारी नोकरीतून निवृत्त.

श्यामने सांगितलं, ‘‘दोन मुलगे. दोन्ही संगणक अभियंता, दोघेही मास्टर्स करून अमेरिकेत कार्यरत.

‘‘विजय तू खूप छान वही ठेवली आहेस. फोटो व थोडक्यात माहिती दोन्ही मस्त. हा गट तयार झाल्यामुळे तुमची मुलंसुद्धा खुश झाली असतील ना?’’ मी म्हटलं. ‘‘मुलं खूपच रिलॅक्स झाली.’’ निशा म्हणाली, ‘‘सगळया मुलांनी काका काकूंचे नंबर घेऊन ठेवले आहेत. त्यामुळे कोणाची शुगर वाढली तर त्याला ओरडण्यासाठी बाकी काका-काकूंना फोन करणे हे मुले लगेच करतात.’’

स्वाती म्हणाली, ‘‘यावेळी मी मुलांना सांगितलं की दरवर्षी सुट्टीत तुम्ही भारतात येता. यावेळी तुम्ही दुसरीकडे फिरून या.’’

गणेश म्हणाला, ‘‘आम्ही आता इकडच्या जवळच्या निवृत्त पेन्शनर्स असोसिएशनला जोडून घेतले आहे. त्यामुळे त्यांची आहार विषयक व्याख्याने किंवा डॉक्टरांच्या व्याख्यानांना आम्ही जमेल तसे जातो. तसंच आता आमचा  आठवडयातून एकदा योगा क्लास लावायचा किंवा योगाशिक्षकाला घरी बोलावून एकत्र योगा करण्याचा विचार आहे. गेले दोन महिने आम्ही महिन्यातून  एकदा पालीतील वृद्धाश्रमाला एक दिवस जातो. थोडी आर्थिक मदतही करतो. कर्जतच्या ‘शांतिनिकेतन अनाथाश्रमात’ धान्य पाठवतो.

आणखी ८ जणांना आमच्या गटात सामील व्हायचं आहे. पण आता आम्ही विचार करतोय की छोटे १०-१२ जणांचे वेगळे वेगळे गट करावेत व वर्षातून २-३ वेळेला सगळया गटाने एकत्र भेटावे.’’

तेवढयात कुणीतरी गाणं लावलं व बरीच पावलं थिरकायला लागली. सगळं वातावरण आनंद, उत्साह व  सकारात्मकतेने भरलेलं होतं. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेताना मला वाटलं की असे सारखी आवड जसे प्रवास, वाचन, पाकक्रिया, गाणे व वादन असलेल्यांचेही गट बनायला हवेत व सर्वांनी जीवनातील आनंद भरभरून लुटायला हवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें