गुढीपाडवा

* नम्रता विजय पवार

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रात मराठी नववर्षाचं स्वागत पारंपारिक पद्धतीने साजरं केलं जातं. दारोदारी रांगोळ्या काढून, दारी तोरण लावून, गुढी उभारून, नवीन कपडे तसंच गोडाधोडाचा स्वयंपाक करून,एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन, घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन गुढीपाडवा साजरा केला जातो.

निसर्ग आणि गुढी

मराठी चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा वाढायला लागतो. याच सुमारास पानगळ संपून झाडांना नवीन पालवी फुटते. म्हणूनच चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा हा सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस मानला जातो. भर उन्हात हि हिरवीगार झाडे मनाला थंडावा देतात.

यादिवशी विजयाचं प्रतीक म्हणून दारोदारी गुढी उभारली जाते. गुढी उभारण्याची प्रथा अतिशय प्राचीन आहे. गुढी उभारण्यासाठी बांबू किंवा कळकाची काठी कोमट पाण्याने स्वच्छ करून या काठीला सर्वप्रथम चंदनाचा लेप आणि हळदीकुंकू लावले जाते. काठीच्या वरच्या बाजूस नवीन वस्त्र, चाफाच्या फुलांचा हार, साखरेची माळ, कडुलिंबाची पाने आणि चांदी वा तांब्याचा गडू उपडा ठेवला जातो.

मागील वर्षाच्या कटू आठवणी संपवून नवीन वर्षाची सुरुवात गोडाने केली जाते. संध्याकाळी गुढीची पूजा करून ती उतरवली जाते.

परंपरा आणि पोशाख

गुढीपाडवा हा दिवस मराठी माणसांसाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो. नववर्षाची सुरुवात दाराला आंब्याच्या पानांचे तोरण, रांगोळी काढून, गुढी उभारून, नवीन पारंपारिक पोशाख घालून तसंच घरी पारंपारिक पदार्थ बनवून केली जाते. यादिवशी घरातील पुरुष धोतर-कुर्ता, सदरा-लेंगा, कुर्ता-पायजमा परिधान करतात तर स्त्रिया पारंपरिक नऊवारी साडी, खण साडी, पैठणी परिधान करतात. घरातील लहान मुली खास खणाचे, काठपदराचे परकर पोलके घालतात. पारंपारिक दागिने, हिरव्या तसंच सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, गोठ, तोडे, बाजूबंद, हार, बोरमाळ, ठुशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नाकात पारंपरिक नथदेखील घालतात.

गुढीपाडवा आणि शोभायात्रा

आपल्या देशातील सण हे नेहमीच सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्रित आणण्याचं काम करतात. त्यात मराठी माणसे विशेष उत्सवप्रिय आहेत. सण सोबत मिळून साजरे करण्यात त्यांना विशेष आनंद मिळतो. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेशातदेखील साजरा केला जातो. परंतु महाराष्ट्रात या सणाचे खास आकर्षण असते ते म्हणजे शोभायात्रा. संपूर्ण महाराष्ट्रभर यादिवशी शोभायात्रांचं आयोजन केल जातं. यामध्ये कोणत्याही राजकीय हस्तक्षेप नसतो. सर्वसामान्य माणसं उत्साहाने या शोभायात्रांचं आयोजन करतात. विविध सामाजिक,शैक्षणिक देखावे उभारून जनजागृती केली जाते.

या शोभायात्रांमध्ये तरुणाई सर्वाधिक संख्येने सहभागी होते. अनेक तरुणी खास पारंपारिक म्हणजेच नऊवारी, पैठणी, खण साड्या, पारंपारिक दागिने, डोक्यावर फेटा बांधून, गॉगल लावून मोटार बाईक वरून या शोभायात्रांमध्ये सहभागी होतात. तर तरुण मुले कुर्ता पायजमा आणि फेटे परिधान करून सहभागी होतात. केशरी फेट्यांसोबतच काठपदर आणि बांधणी फेटेदेखील परिधान केले जातात. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरांमध्ये या शोभायात्रा काढल्या जातात. मुंबईतील गिरगाव, लालबाग, परेल, दादर तर ठाणे, डोंबिवली, बदलापूर सारख्या ठिकाणी या शोभायात्रा पहायला विशेष गर्दी होते. सामाजिक संदेश आणि पारंपारिक वेशातील तरुण तरुणी या शोभायात्रेतील विशेष आकर्षण असतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें