नातं तेच, स्वरूप नवं

कथा * मोनिका अग्रवाल

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. आज सायंकाळी आम्ही दोघं गरमागरम चहाचे घोट घेत गप्पा मारत आहोत. आज लोकांच्या दृष्टीनं आम्ही आदर्श नवराबायको आहोत. आमचं एकमेकांवर खरोखर खूप प्रेम आहे. पण मधल्या काळातली परिस्थिती खूपच वेगळी होती. त्यावेळी आमचं नातं पार धुरकटलं होतं. काळजी अन् धुराचे ठसके…सगळंच असह्य झालं होतं.

दोन वर्षं कोर्टात केस चालली होती. नवरा-बायकोच्या घटस्फोटाचा खटला होता. घटस्फोटाची कारणं खरं तर अगदीच फुसकी होती. घरात घडलेल्या एका अगदीच किरकोळ घटनेबद्दल माझ्या नणंदेनं नीलेशला खूपच वाढवून अन् आक्रस्ताळेपणानं सांगितलं. नीलेशनं एकदम संतापून माझ्या थोबाडीत मारली…मला हा अपमान सहन झाला नाही. माझा आत्मसन्मान प्रचंड दुखावला. खरं तर घरात मला तसं महत्त्व नव्हतंच. घरकामाची मोलकरीण एवढीच माझी ओळख. घरातल्या कुठल्याही गोष्टीत दखल दिली की सासूबाईंना वाटायचं की, मी त्यांची सत्ता हिसकावून घेते आहे. नणंदेला वाटायचं, तिच्या भावाच्या प्रेमातला मोठा वाटा मी घेतेय. त्यावरून रोजच धुसफुस व्हायची. नीलेशचाही  माझ्यापेक्षा त्याच्या आईकडे व बहिणीकडे ओढा अधिक होता. तरीही आमचा संसार रूटुखुटू सुरू होता. एक मुलगाही झाला अन् मग तो प्रसंग घडला. मी ताबडतोब मुलाला घेऊन माझ्या माहेरी निघून आले. मला अशी आलेली बघून आईवडिल घाबरलेच. त्यांनी माझी खूप समजूत घातली पण मी ठरवलं होतं, आता वेगळं व्हायचं…शेवटी त्यांनीही हात टेकले.

दोन्ही बाजूंनी कोर्टात दावा दाखला झाला. खरं तर थोडी तडजोड करून प्रकरण मिटवता आलं असतं. पण नीलेशला तो आपला अपमान वाटला. नातलगांनी मध्ये लुडबुड करून प्रकरण अधिकच अवघड करून ठेवलं. नातलगांच्या मते हा प्रकार घराण्याच्या इभ्रतीवर बट्टा लावणं होतं. कुटुंबाचं नाक कापलं गेलंय असं काही म्हणाले. काहींनी अकलेचे तारे तोडले ‘अशा बायका प्रामाणिकही नसतात अन् पतिव्रता तर नसतातच…अशा बाईला घरा ठेवणं म्हणजे मुदतीचा ताप शरीरात सांभाळत बसणं आहे.’

वाईट गोष्टी तर चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढतात. दोन्ही बाजूंनी भरपूर चिखलफेक झाली. दोन्ही पक्ष जणू आरोपांची कबड्डी खेळत होते. नीलेशनं माझ्यावर वाईट  चारित्र्याचा आरोप केला…मी ही त्यांनी हुंड्यासाठी छळ केला म्हणून सांगितलं. आम्हाला एक मुलगा होता. सहा वर्षांचं वैवाहिक जीवन आम्ही एकत्र घालवलं होतं आणि आता आम्ही घटस्फोटासाठी भांडत होतो. खरं तर आता आम्ही दोघंही गप्प होतो. शांत आणि निर्विकार…वकीलच भांडत होते.

दोन वर्षं केस चालली. या काळात आम्ही नवरा बायको वेगवेगळे राहत होतो. दोघांनीही खूप काही सोसलं होतं. मी तर आईकडे आल्या आल्या चांगली नोकरी शोधून मुलाला उत्तम शाळेत अॅडमिशनही मिळवून दिलं होतं. पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही दोघांनीही मुलाच्या मनाचा, त्याच्या मन:स्थितीचा विचारच केला नव्हता. त्याचं मत जाणून घ्यावं असंही आम्हाला वाटलं नव्हतं.

मुलाला आमचं वेगळं होणं मान्य नव्हतं. पण सगळं त्याच्या डोळ्यादेखतच घडल्यामुळे तो गप्प होता. हियरिंगसाठी दोघांनाही यावं लागतं. आम्ही एकमेकांकडे तुच्छतेनं बघत असू. रागातच असायचो. एकमेकांवर सूड घेण्याचा विचार मनात असायचा. एकमेकांकडे बघून आपापली तोंडं फिरवून घेत होतो. बरोबरीचे नातलग स्फोटकं पेरल्यासारखेच होते. वकील आम्हाला शिकवायचे कोर्टात काय सांगायचं, कसं बोलायचं…कधी तरी आम्ही एकमेकांबद्दल चांगलंही बोलून जात असू…पण मग सावरून घेऊन पुन्हा पहिल्याप्रमाणे बोलत असू.

शेवटी एकदाचा घटस्फोट मंजूर झाला. पूर्वी नीलेशबरोबर खूपच खूप नातलग असायचे. हळूहळू संख्या कमी व्हायला लागली. नीलेशचे नातलग आनंदात होते. दोन्ही वकील आनंदात होते. पण माझ्या आईवडिलांना फार दु:ख झालं होतं. माझ्या फायली सांभाळत मी गप्प होते. नीलेशही त्यांच्या फायली घेऊन उदास बसले होते.

काय योगायोग बघा. त्या दिवशी कोर्टाचं काम थोडं उशीरा सुरू होणार होतं. बाहेर कडक ऊन होतं त्यामुळे सावलीसाठी आम्ही तिथल्याच एका टी स्टॉलवर बसलो होतो. आता हा देखील एक योगायोग म्हणायचा की आम्ही नवराबायको नेमके एकाच टेबलावर समोरासमोर होतो.

मी टोमणा मारला, ‘‘अभिनंदन…तुम्हाला जे हवं होतं, तेच आता घडतंय…’’

‘‘तुझंही अभिनंदन! तुलाही हेच हवं होतं. माझ्यापासून वेगळी होऊन तू जिंकते आहेस.’’ नीलेशनं म्हटलं. मला राहवलं नाही. मी बोलून गेले, ‘‘घटस्फोटाचा निकाल म्हणजे विजयाचं प्रतीक असतं का?’’

‘‘तूच सांग.’’ नीलेश म्हणाले.

मी उत्तर दिलं नाही. गप्प बसून राहिले. मग म्हटलं, ‘‘तुम्ही मला चारित्र्यहिन म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, बरं झालं अशा स्त्रीपासून सुटका झाली.’’

‘‘ती माझी फार मोठी चूक होती. मी तसं म्हणायला नको होतं…फार फार चुकलं…’’

‘‘मला प्रचंड मानसिक त्रास झाला.’’ मी निर्विकारपणे म्हणाले. आवाजात दु:ख नव्हतं, संवाद नव्हता. नीलेश म्हणाले, ‘‘मला कळतंय, पुरूष नेहमीच स्त्रियांसाठी हे हत्यार वापरतात. हा घाव स्त्रीचं अंत:करण रक्तबंबाळ करतो. तिचं मानसिक खच्चीकरण होतं. तू शुद्ध, पवित्र आहेस. तुझं चारित्र्य निष्कलंक आहे. मी इतकी खालची पातळी गाठायला नको होती. मला खरंच वाईट वाटतंय.’’

मी गप्प होते. नीलेशकडे बघितलं. काही क्षण तेही गप्प होते. मग एक दिर्घ श्वास घेऊन म्हणाले, ‘‘तू ही मला हुंड्यासाठी छळ केला म्हणालीस, पैशाचे लोभी म्हणालीस..’’

‘‘मीही खोटंच सांगितलं…मी ही चुकलेच. तसं काही नव्हतं.’’ थोडा वेळ कुणीच बोललं नाही…मग मी म्हटलं, ‘‘मी दुसरं काही म्हटलं असतं पण…’’ तेवढ्याच चहा आला.

मी चहाचा कप उचलताना गरम चहा माझ्या बोटांवर सांडला अन् मी कळवळले…नीलेशनंही अभावितपणे म्हटलं, ‘‘फार भाजलं का?’’

आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं.

‘‘तुझं कंबरेचं दुखणं कसं आहे आता?’’ नीलेशचं विचारणं मला खटकलं.

‘‘ठीकाय…’’ मी विषय संपवला.

‘‘तुमचं हार्ट…पुन्हा अटॅक वगैरे नाही ना आला?’’ मी विचारलं.

‘‘हार्ट ना? डॉक्टरांनी स्ट्रेस, स्टे्रन, मेंटल हॅरॅसमेंटपासून दूर रहा म्हटलंय.’’ नीलेश म्हणाले.

आम्ही एकमेकांकडे बघितलं…बघत राहिलो. जणू एकमेकांच्या चेहऱ्यावरचे ताणतणाव जाणून घेत होतो. एकटक बघता बघता मी विचारलं, ‘‘औषधं घेताय ना वेळच्या वेळी अन् नियमितपणे?’’

‘‘हो घेतो…पण आज नेमकी आणायला विसरलो.’’

‘‘तरीच आज थकल्यासारखे दिसताय…’’ मी सहानुभूतीनं म्हटलं.

‘‘हो…ते एक कारण आहेच आणि…’’ बोलता बोलता ते थांबले.

‘‘आणि मनावर ताणही आहेच ना?’’ मी वाक्य पूर्ण केलं.

काहीवेळ ते विचार करत होते, मग म्हणाले, ‘‘तुला १५ लाख रूपये द्यायचे आहेत आणि महिन्याला वीस हजार…’’

‘‘तर मग?’’ मी विचारलं.

‘‘एक फ्लॅट आहे…तुला ठाऊक आहेच. तो झ्या नावे करून देतो. सध्या १५ लाख माझ्यापाशी नाहीएत.’’ नीलेशनं मनातली गोष्ट सांगितली.

‘‘त्या फ्लॅटची किंमत तर तीस लाख असेल?’’

‘‘मला फक्त पंधरा लाखच हवेत.’’ मी माझी बाजू बोलले.

‘‘मुलगा मोठा होतोय…शंभर खर्च समोर येतील.’’ ते म्हणाले.

‘‘हो, पण वीस हजार दर महिन्याला तुम्ही देणार आहात ना?’’ मी म्हटलं.

‘‘हो, ते तर नक्कीच देईन.’’

‘‘तुमच्याकडे पंधरा लाख नसतील तर मला नका देऊ.’’ माझ्या स्वरात जुनी आपुलकी होती.

ते माझ्याकडे बघू लागले…मीही त्यांच्याकडे बघत होते. माझ्या मनात आलं, ‘‘किती साधा सरळ माणूस आहे…हा एके काळी माझा होता…माझा नवरा…इतका चांगला अन् मी त्याच्यातल्या उणीवा बघत बसले.’’

नीलेशच्या चेहऱ्यावर मला वाचता आलं…‘‘ही अजूनही माझ्या तब्येतीची काळजी करते…पैसाही नको म्हणतेय…मीच हिला समजून घ्यायला कमी पडलो.’’

आम्ही दोघं गप्प होतो. अगदी गुपचुप बसून होतो. फक्त एकमेकांचा चांगुलपणा आठवत होतो. दोघांच्या डोळ्यांत अश्रू होते.

‘‘मला एक सांगायचं आहे,’’ जरा चाचरत ते म्हणाले.

‘‘बोला ना?’’ माझाही आवाज चिंब भिजलेला.

‘‘मला जरा भीती वाटतेय…’’

‘‘नका भिऊ…बिनधास्त बोला…कदाचित तुम्ही माझ्याच मनातलं बोलणार असाल…’’

‘‘मला तुझी आठवण येते…नेहमीच यायची.’’

‘‘मलाही…’’ मी पटकन् बोलून गेले.

‘‘मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो.’’

‘‘मी पण…’’ ताबडतोब मी म्हटलं.

आमचे डोळे अधिकच पाणावले…आवाजात सच्चेपणा आणि चेहऱ्यावर एकमेकांविषयीचं अथांग प्रेम…

‘‘आपण आपल्या आयुष्याला एक छानसं वळण नाही का देऊ शकणार?’’ नीलेशनं विचारलं.

‘‘कसलं वळण?’’ मी प्रश्नार्थक मुद्रेत.

‘‘आपण पुन्हा एकत्र राहूयात. एकमेकांबरोबर…पतिपत्नीपेक्षाही मित्र म्हणून, एकमेकांचे पूरक म्हणून?’’

‘‘पण मग ही फाईल? ही कागदपत्रं?’’ मी विचारलं.

‘‘फाडून टाकूयात…’’ नीलेश उत्साहानं म्हणाले अन् आम्ही आपापल्या हातातली कागदपत्रं फाडून, चिंध्या करून भिरकावून दिली. आम्ही दोघंही उठलो.

एकमेकांकडे बघून हसलो अन् एकमेकांचे हात हातात घेतले.

दोन्ही कडचे वकील चकित होऊन बघत होते. आम्ही हातात हात घालून घराकडे निघालो. प्रथम माझ्या घरी गेलो. माझ्या आईवडिलांचे आशिर्वाद घेतले. त्यांना  मनापासून आनंद झाला. गेली दोन वर्ष ते खूप मानसिक ताण सोसत होते. आज त्यांचे चेहरे आनंदानं उजळले होते. आमच्या मुलालाही खूप आनंद झाला. त्याला बरोबर घेऊन आम्ही आमच्या घरी आलो. आता हे घर फक्त आम्हा तिघांचं होतं.

काळ बदलला, परिस्थिती बदलली. आम्ही ही बदललो. आता आम्ही पतीपत्नी आणि मित्र म्हणून राहतो. कुठंही कडवटपणा नाही. आमचे संबंध सुधरले आहेत आणि आमच्यासारखे सुखी आम्हीच आहोत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें