कोरोना विषाणूबाबत एका गृहिणीचे पत्र

* पूनम अहमद

कोरोना, तुला माझ्या देशाबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही तुला नुसत्या शेणानेही पळवून लावू शकतो. तू येथे येऊन एका गृहिणीवर अन्याय केला आहेस. जेव्हा माझ्या मुलाच्या शाळेत तु याबाबत भीती निर्माण होत होती तेव्हा मी फेशियल करत होते.

पती अमित दौऱ्यावर होते. माझा मोबाइल वाजला. तसा तर मी तो उचलणार नव्हते, पण शाळेचे नाव पाहून मला तो उचलावाच लागला. मेसेज आला होता की, तुमच्या मुलाला घेऊन जा. त्यावेळी मला एवढा मोठा धक्का बसला की, मी तुला खूपच वाईटसाईट बोलले. कारण, त्यानंतर आमची किटी पार्टी होणार होती. टिश्यू पेपरने चेहरा पुसल्यानंतर मी बंटीला आणण्यासाठी त्याच्या शाळेत गेले. तर वाईट बातमी ऐकायला मिळाली. शाळा बंद झाल्या आहेत. तुम्ही बंटीला ओळखत नाही. त्याला सुट्टी म्हणजे माझ्या डोक्याला ताप. त्याच्या कलेने वागावे लागते.

अमित जेव्हा बाहेरून गाणे गुणगुणत येतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की, मी सावध राहिले पाहिजे, कारण असे काहीतरी घडलेले असते जे अमितला खूप आवडले आहे, पण माझ्यासाठी ते डोईजड ठरणार आहे. नेमके तसेच झाले. तुला याबाबत लिहिताना माझ्या डोळयात अश्रू तरळले आहेत, कारण अमितच्या कार्यालयातील सर्वांना पुढील ३ महिन्यांसाठी वर्क फ्रॉम होम दिले आहे. नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमचा त्रास किती असतो, ते गृहिणीला विचारा.

तर मग वर्क फ्रॉम होम सुरू झाले. याचा अर्थ अमित आता आरामात उठतील, त्यांच्या चहा-नाश्त्याची वेळ निश्चित नसेल. म्हणजे आता माझे मॉर्निंग वॉक गेले तेल लावत… बंटी आणि अमित दिवसभर असा ताप देतील की विचारूच नका. बंटीची शाळा कदाचित काही दिवसांनंतर उघडेलही, पण अमित ३ महिने ते ही घरून काम? लॅपटॉप सतत उघडाच असेल. रमाबाईने केलेल्या साफसफाईला अमित सतत नावे ठेवत राहतील. माझ्या चांगल्या दिनक्रमावर सतत टिका करत राहतील. मध्येच चहा बनिवण्याचे फर्मान येईल. बाजारातून काही आणायला सांगितले तर, ‘घरातून काम करणे अवघड आहे,’ हा टोमणा ठरलेलाच.

अमित खूपच खुश आहेत. कारण, आता मी गर्दीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी आठवडयाच्या शेवटी चित्रपट पाहायला जाऊया, असे सांगूच शकणार नाही. ट्रेन, फ्लाईट, अशा सर्वच गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहायचे आहे. अमित घरी आहेत म्हणून एक्स्ट्रा रोमान्स, प्रेमाच्या गोष्टी होतील, असे काहीच नाही. आता तर फक्त साबण, टिश्यू पेपर, सॅनिटायझर याबाबत बोलायचे? किती वेळा हात धुतेस, हातांची त्वचा कोरडी झाली आहे…

माझी कामवाली बाईही यात कुठेच कमी नाही. काल रमाबाई काय बोलत होती माहिती आहे? म्हणत होती, ‘‘दीदी, माझे पती सांगत होते की, कोरोना कदाचित तुझाही जीव घेईल… रमा सर्वजण घरून काम करत आहेत… तूही दहा दिवसांची सुट्टी घे.’’

जेव्हा मी तिच्याकडे रागाने पाहिले तेव्हा म्हणाली की, ‘‘दीदी, काय करणार, तुमची काळजी वाटते… आम्हीच कुठून तरी तुमच्या घरी हा कोरोना संसर्ग घेऊन येऊ नये इतकेच वाटते.’’

मी सावध झाले. जितके गोड बोलता येईल तेवढे बोलू लागले. ‘‘रमा, अगं असे काहीच नाही. काळजी करू नकोस… जे होईल ते बघून घेऊ… तू येतच रहा. पण हो, हात चांगल्या प्रकारे धूत जा.’’ मनातल्या मनात विचार केला की, आधीच अमित आणि बंटीची सुट्टी. त्यातच हीदेखील सुट्टीवर गेली तर… कोरोनाच्या औलादी, मीच काय, पण माझ्या पुढच्या ७ पिढयाही तुला माफ करणार नाहीत.

बंटी आणि अमितच्या न संपणाऱ्या ऑर्डर पूर्ण करता करताच मी मरून तर जाणार नाही ना? हाय, हे दोघे किती आनंदी आहेत? चला, अमितने हाक मारली. बापलेकाला संध्याकाळच्या चहासोबत गरमागरम भजी खायची इच्छा झाली आहे… वर्क फ्रॉम होम सुरू आहे ना, मग ऑफिसच्या कॅन्टीनमधील चटरपटर खायची सवय आता मलाच सहन करावी लागणार… जाऊ दे, मला कोरोनाबाबत बोलायचेच नाही.

उत्सवांपासून अलिप्त !

मिश्किली * माधव गवाणकर

सणउत्सवांपासून अलिप्त, दूर राहण्याची प्रवृत्ती माझ्यात आणि माझ्या काही बुद्धिवादी मित्रांमध्ये का निर्माण झाली? ते काही माझ्यासारखे अविवाहित नव्हते आणि मी विवाहित असतो, तरी ‘आरोग्य’ विषयाचा अभ्यास असल्यामुळे मी सणांपासून अलिप्तच राहिलो असतो.

कदाचित माझ्या पत्नीने ‘जरा म्हणून हौस नाही’ म्हणत मला नाक मुरडले असते. आईला दम्याचा त्रास व्हायचा. ‘अटॅक’च यायचा म्हणून मी दिवाळीतले फटाके कुमारवयातच बंद केले. इतरांचा विचार करणं हाच ‘धर्म’ आहे असं मी मानू लागलो. तेवढे ‘धूर’ होऊन जाणारे पैसेही वाचले. वेळेची बचत होऊ लागली. वाचनामुळेच मला फटाक्यांचं उपद्रवमूल्य कळलं. तेव्हा वाचन संस्कृती हीच माझ्या मते मराठी घराची गरज आहे.

एखादी गोष्ट केवळ समूह करतो म्हणून आपणही केलीच पाहिजे असं मला कधीच वाटलं नाही. रांगोळी हीसुद्धा मुलींनीच घातली पाहिजे असंही मी मानत नाही. रंगरेषांची आवड मुलांनाही असतेच की. बहुतेक सण कोकणात रात्री उशिरापर्यंत साजरे होतात. नाचगाणी असतात. माझ्या पित्तप्रकृतीला जागरण हा  विषय जमण्यासारखा नाही, हेसुद्धा एक कारण असावं. मी व्यसनं करत नाही,    त्यामुळे तरूणांच्या उत्साही ‘कार्यक्रमात’ मला कधीच स्थान नव्हतं. ते माझ्या पथ्यावर पडलं व मी सणांपासून दूर गेलो. कोकणात लग्नही सणासारखं वाजतगाजत करतात, पण मी अविवाहित असल्यामुळे मला अनेकजण लग्नकार्याला बोलावत नाहीत. अविवाहितांच्या स्वातंत्र्याचा द्वेष त्यात मिसळलेला असतोच, पण त्याचा फायदा असा झाला की लग्नातल्या ध्वनिप्रदूषणापासून मी बचावलो. त्यातली काही लग्न ‘फेल’ गेली हे आपण  बाजूला ठेवू!

‘देव’ ही संकल्पना नाकारल्यामुळे उत्सव कशासाठी साजरा करायचा? हा प्रश्न मला पडणं स्वाभाविक होतं. ‘फराळ’ वर्षभर मिळतो. कडबोळी, चिवडा, चकली, चिरोटे सगळं मी मनात येईल तेव्हा मटकावत असतो. मग दिवाळीत त्याचं वेगळं प्रयोजन काय? घरातल्या बायामाणसांनी फराळाचा व्याप करणं हे मला बघूनसुद्धा बोअरिंग वाटायचं. ‘रक्षाबंधन’ला एकही राखी न बांधता मी निघालो होतो. एका शाळकरी पोराने माझ्या ‘रिकाम्या’ मनगटाकडे आणि नंतर माझ्या चेहऱ्याकडे तुच्छतेने पाहिले की, हा कोणत्या ग्रहावरचा प्राणी? एकही राखी बांधून घेतली नाही याने? त्या पोराचं मनगट ४-५ राख्यांमुळे दिसेनासं झालं होतं. कदाचित मुलगा जन्माला येईपर्यंत मुलींना जन्म देत राहणं ही जी प्रथा आहे, त्यातलं ते कुटुंब असेल. मला त्या मुलाचं हसू आलं. किरकोळ प्रकृतीचा तो काडी पैलवान आपल्या बहिणींचं रक्षण कसं काय करणार होता? राखीचा अर्थ तरी त्याला कुणी सांगितला असेल का? आणि कमावत्या मुलींना भावाच्या आधाराची गरज का भासावी? त्यांनी शारीरिकदृष्ट्या सशक्त का असू नये? एकमेकींसाठी धाव घेणारा, गुंडाला बुकलणारा त्यांचा ‘सपोर्ट ग्रुप’ का असू नये? रूढी केवळ पाळायची म्हणून पाळायची व न पाळणाऱ्याबद्दल अढी बाळगायची. हे काही बरोबर नाही.

सुरेशला (खरं नाव वेगळं) मी सांगायचो. ‘अरे मित्रा, तुम्ही उत्सवाच्या वेळी दरवर्षी तुमच्याच आईला आजारी पाडता. बिचारी ती माऊली सण संपला की ती आजारी पडते. एवढं काम, एवढी दगदग तिला होते. तुम्ही हे प्रस्थ थोडं कमी करू शकत नाही का? माणुसकी हा धर्म महत्त्वाचा नाही का? पण तो खूप घाबरायचा. त्या मित्राला घरात, एकत्र कुटुंबात तशी किंमत नव्हती. शेवटी त्याच्या आईला ब्लड कॅन्सरही झाला. जन्मभर काबाड, कष्ट करणाऱ्या या     भाबड्या, सज्जन महिलांचे संसरात किती हाल होतात. सण अगदी मर्यादित स्वरूपात, गंमत म्हणून, बदल म्हणून केले तर या महिला वर्गाला दिलासा मिळेल. भक्ती म्हणजे सक्ती नव्हे! कृपया त्या बायाबापड्यांचा विचार करा.’

वर्षांनुवर्षं प्राध्यापकी करताना मला पहाटे उठून कामावर जावं लागे. त्यामुळे रात्रीचे सणसमारंभ मी टाळले. दिवाळी पहाटेचा संगीत कार्यक्रम संगीत कलेची इतकी आवड असूनही मी कधी ऐकायला गेलो नाही. फटाक्यांमुळे कानठळ्या बसत असताना व कानात कापूस असताना गाणी कशी एन्जॉय करणार? माझा टिव्हीही त्यावेळी बंदच असतो! पोषाखीपणा मला आवडत नाही. त्यामुळे ‘झगमगत’ कुठे जाणं मी टाळतो.

सणउत्सवांपासून दूर राहिल्यामुळे माझं काही नुकसान झालं का? मला तसं अजिबात वाटत नाही. रोजचे वाचन, लेखन, प्रसिद्धी हाच माझा शक्ती देणारा सण आहे. मंगेश पाडगावंकरांचं एक आवडतं पुस्तक मी जपून ठेवलंय. त्या काव्यसंग्रहाचं नावच मुळी ‘उत्सव’ आहे. असा निवांत एकांतातला शांत, सुंदर उत्सव मला मानवतो.

हल्ली प्रदूषण टाळण्यासाठी सुशिक्षित लोक सणाच्या मोसमात घरापासून दूर, पर्यटनाला, प्रवासाला जातात. त्यांच्याकडे पैसा आहे. आम्ही काय करावं? एखादा रसिक मित्र ते दोन चार दिवस मला आसरा देतो. त्याचा बंगला गोंगाटापासून दूर असतो. ‘पुरूष उवाच’सारखे दिपावली विशेषांक मात्र सणाच्या निमित्तानेच प्रकाशिक होतात. हाच एकमेव आनंद!

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें