बायकोचं माहेरी जाणं तेव्हा आणि आता

मिश्किली * समीक्षा राऊत

नवरा बायकोची भांडणं तर नेहमीच होतात. पण बायको रागावून माहेरी जाऊन बसली तर नवऱ्याची परिस्थिती काय असते यावर आम्ही विचार केला, तेव्हा लक्षात आलं की वीस पंचवीस वर्षांपूर्वी जी परिस्थिती असायची ती आज राहिली नाहीए.

पूर्वीच्या भांडणाची कारणंही तशी निरागस असायची. ‘‘मिसेस गोखल्यांच्या साडीसारखी साडी मला हवीय,’’ बायकोचा हट्ट असायचा. नवरा जर ऑफिसात बॉसकडून सज्जड दम घेऊन आला असेल तर संतापून ओरडायचा, ‘‘हवी आहे तर आपल्या माहेराहून आण ना?’’

‘‘हे बघा, माझ्या माहेरचं नाव काढायचं नाही,’’ अन् बघता बघता भांडण इतकं वाढायचं की बायको सरळ माहेरी जाऊन बसायची…झालं! इकडे नवऱ्याचा वनवास सुरू.

सकाळी लवकर दूधवाला येतो. त्याच्याकडून दूध घेऊन पुन्हा अंथरूणावर पडल्या पडल्या गाढ झोप लागते. जाग आल्यावर कळतं, उठायला फारच उशीर झाला आहे. तेवढ्यात ती मोलकरीण येते. बायकोनं अगदी निवडून पारखून कुरूप अन् कळकट बाई निवडली आहे, काय बिशाद आहे घरातला पुरूष तिच्याकडे बघायचं धाडस करेल. तिला तशीच परत पाठवायची अन् जे काही फ्रीजमध्ये दिसेल ते पोटात ढकलून बिना इस्त्रीचे कपडे अंगावर घालून, बिना पॉलिशचे बूट पायात घालून ऑफिसला धापा टाकत पोहोचायचं. उशीर झाल्यामुळे साहेबांची नजर चुकवावीच लागते.

दुपारी सगळे आपापले डबे उघडतात अन् चविष्ट भाज्यांच्या वासानं भूक एकदम खवळते. कॅन्टीनचं बेचव जेवण घशाखाली उतरत नाही. मनात येतं, ‘उगीचच बायकोशी भांडलो…ती माहेरी गेली नसती तर निदान छानसा जेवणाचा डबा तर मिळाला असता.’

सायंकाळी गेल्यावर सकाळचं दूध तसंच ओट्यावर दिसतं. चहा केला तर तो नासतो, कारण दूधच नासलेलं असतं. टीव्हीवरचे कार्यक्रम फारच रटाळ वाटतात. रात्रीच्या जेवणासाठी खिचडीचा बेत ठरतो. स्वयंपाकघरात कधी जावंच लागलं नव्हतं. तरीही डाळतांदूळ धुवून एकत्र करून कुकरमध्ये शिजायला लावलं. पाणी कमी झाल्यामुळे सेफ्टी वॉल्व्ह उडाला. स्वत:लाच शिट्या घालत तीन जिने उतरून स्कूटरला किक मारून जवळचाच एक धाबा गाठला. छोले भटूरे खाऊन घरी आल्यावर अंथरूणावर झोपू म्हटलं तर सकाळचे ओले कपडे अन् टॉवेल तिथंच पसरून बसलेले. त्यांना बाजूला ढकलून झोपायचा प्रयत्न केला. त्यावेळी बायकोची फारच आठवण आली…फोन करून बोलावून घ्यावं का? पण तेवढ्यात पुरूषी अहंकाराने फणा काढला. स्वत: गेली आहे, तर येईल स्वत:च!

सकाळी मोलकरीण लवकरच आली. स्वयंपाकघरातला पसारा बघून वैतागली, कुकरची दुर्दशा बघून अधिकच भडकली.

‘‘ते न…ती खिचडी जरा लागली खाली,’’ कसंबसं तिला चुचकारत…ही बया काम न करता गेली तर केर फरशी, भांडी, ओटा,  सगळंच गळ्यात येणार.

सकाळच्या न्याहारीला बायकोच्या हातचा चविष्ट उपमा पुन्हा पुन्हा आठवतो. बायकोला फोन करावा का? पण पुन्हा तोच पुरूषी अहंकार फणा काढतो.

सायंकाळी ऑफिसातून घरी पोहोचलो तोच मिसेस गोखले घरात शिरल्या. ‘‘साखर हवी होती थोडी,’’ खरं तर बायको कुठं गेलीये अन् कधी यायची आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं. कालही विचारलंच तिनं, ‘‘वहिनी घरी नाहीएत का?’’

विदाऊट ब्रेकफास्ट ऑफिसला जाणं, दुसऱ्यांच्या लंच बॉक्सकडे आशाळभूतपणे बघणं, हॉटेलचं जेवण, त्यामुळे पोट बिघडणं, दुरदर्शनचे अळणी कार्यक्रम, चुरगळलेले शर्ट पॅण्ट अन् धुळीनं माखलेले बूट घालणं अन् रात्री ओल्या टॉवेलमुळे गार झालेल्या अंथरूणावर झोपणं…सगळंच असह्य होतंय. विरंगुळाशोधायचा तरी कुठे?

ऑफिसात एकदोघी स्त्रिया आहेत पण त्या विवाहित आहेत. इतर कुठं जाण्याची सोयच नाही. कुणी बघितलं किंवा बायकोला कळलं तर सोसायटीत काय किंमत राहील? मुलांचीही आठवण येतेच आहे…एकूण सगळंच अवघड आहे.

शिवाय मिसेस गोखल्यांचं पुन्हा:पुन्हा विचारणं, ‘‘वहिनी कधी येणार?’’ त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या साडीसारखी साडी बायकोला आणून देणं सोपं नाही का? दोन दिवसात अक्कल ठिकाणावर आली. बायकोला घ्यायला मुकाट्यानं सासुरवाडी गाठली. बायकोही बिचारी वाटेकडे डोळे लावून बसलीच होती. कधी नवरा घ्यायला येतोय अन् कधी आपण घरी जातोय. म्हणजे एकूणात हॅप्पी एंडिंग!

आजचे पती…वय ३३-३५ वर्षं. एका मुलाचे वडील. करियरच्या सोपानावर पायऱ्या चढताहेत. त्यांची बायको माहेरी जाण्याची शक्यता तशी कमीच. हल्ली तर सासरमाहेर एकाच शहरात असल्यामुळे बायको महिन्यातली एखादी संध्याकाळ फार तर माहेरी जाते. कारण तिही नोकरी करते अन् साप्ताहिक सुट्टीला तिलाही आउटिंगची गरज असते.

माहेरहून क्षणाक्षणाला बातम्या कळतच असतात. कारण सोशल मिडिया अन् नेटवर्क शिवाय मोबाइलचे कॉल असतातच.?खरं तर माहेरी जाणं आता तसं गरजेचं नाहीए. पण मुलं लहान असताना माहेरी त्यांना सोडून नोकरीवर जायचं अन् येताना घेऊन यायचं असं व्हायचं खरं. आता, बायको रूसून माहेरी गेली तर किती फायद्याचं असतं ते बघा. काळाचा महिमा म्हणतात ना? तसंच…

सकाळी ‘‘अहो उठा, उठा ना, किती वेळ लोळायचं म्हणते मी,’’ वगैरे ऐकावं लागत नाही. ‘‘मुलांना?शाळेच्या बसपर्यंत सोडून या,’’ हा धोशा नाही. ओला टॉवेल बेडवर फेकला तरी ओरडणारं कुणी नाही. सकाळी सकाळीच कामावर येणारी स्वच्छ कपड्यातली, टेचात राहणारी मोलकरीण आपल्याला ‘‘गुड मॉर्निंग सर’’ म्हणते. मन प्रसन्न होतं. दिवस चांगला जाणार असल्याची ग्वाही मिळते.

ब्रेकफास्ट स्वत:लाच छानपैकी जमतो. ब्रेड, बटर, ऑमलेट किंवा हाफफ्राय. त्यासोबत ‘डिपडिप’चा चहा. मोकरणीनं तोवर घर स्वच्छ केलेलं असतं. आपण अगदी वेळेतच ऑफिस गाठतो.

बायको माहेरी गेलीय हे ऐकून सगळे मित्र खुशीत येतात. ‘‘पार्टी व्हायलाच हवी’’चा गजर करतात.

ऑफिसातल्या काही जरठ कुमारिका चान्स घ्यायला बघतात. डब्यातून छान छान पदार्थ आणून खायला घालतात. हल्लीच्या नवऱ्यांना फ्लर्ट करायला पूर्ण मोकळीक असते. मज्जाच मजा!

उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत बसा. घरी कुणी विचारणारं नाही. रात्रीचं जेवण एखाद्या चांगल्याशा रेस्ट्रॉरण्टमध्ये ऑफिसमधल्या एखाद्या कलीग लेडीसोबत घ्या किंवा घरीच काही छानसं मागवून घ्या.

पर्याय भरपूर आहेत. सुट्टीच्या दिवशी इंटरनेटवर बघून एखादी सोपीशी, छानशी रेसिपी तयार करणं यातला आनंद काय वर्णावा?

हल्ली बायकांना समानतेच्या अधिकारामुळे नवऱ्याला स्वयंपाकघरात कामं करवून घेता येतात. त्याचा फायदा म्हणून नवरेही बऱ्यापैकी स्वावलंबी झाले आहेत.

वॉशिंग मशिनमध्ये कपडे ऑटोमॅटिक धुवून होतात, नाहीतर ‘‘गुड मार्निंग सर’’ धुवून देते. ढीगभर चॅनल्समधून टीव्हीदेखील हवी तेवढी करमणूक करायला तयार असतो. लॅपटॉप अन् स्मार्ट फोन तैनातीत आहेत. तुमची बायको कुठं गेलीय, हे विचारायला कुणीही येत नाही. सवडच नाहीए कुणाला, इतरांच्या उचापती करायला.

मुलं रोजच फोन करतात. बायकोही तिचं आउटिंग आटोपून फ्रेश होऊन घरी येते. घराचा ताबा घेते. पुन्हा सगळं जैसे थे होतं.

पूर्वी नवऱ्यांना वाटायचं बायकोनं आपल्याला सोडून माहेरी जाऊ नये…आता नवऱ्यांना वाटतं, अधूनमधून गावातल्या गावात का होईना, शनिवार, रविवारच्या सुट्टीत तरी बायकोनं माहेरी जावं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें