प्रायश्चित्त

कथा * सुधा कोतापल्ले

वरात नवरीच्या निवासस्थानापर्यंत येऊन पोहोचली होती. नवरदेवावरून ओवाळायला पाण्याची कळशी घेतलेल्या स्त्रिया व औक्षणाचं तबक घेऊन वधूची आई दारातच उभ्या होत्या. नवरदेवाला घोड्यावरून उतरवून घेण्यासाठी वधूचे वडिल आणि भाऊ पुढे आले. घोड्यावरून उतरतानाच नवरदेव भडकला. कसाबसा उभा राहिला. पण बोहल्यापर्यंत पोहोचेतो त्या दोघांच्या लक्षात आलं, नवरदेव भरपूर दारू ढोसून आलेला आहे. त्यामुळे त्याचा चालताना तोल जातोय. कसंबसं त्याला स्टेजपर्यंत आणून खुर्चीवर बसवलं. बापलेकांचं डोळ्यांच्या भाषेतच बोलणं झालं.

मुलानं वडिलांचं टेन्शन कमी करण्यासाठी हळूच म्हटलं, ‘‘बाबा, कदाचित लग्नाच्या आनंदात त्यांना जास्त झाली असेल, काळजी करू नका…’’

तो पुढे काही बोलणार होता, तेवढ्यात वधुवेषात नटलेली तनीषा तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात स्टेजवर पोहोचली. तिच्या हातातली वरमाला त्याच्या गळ्यात घालायला, त्याला खुर्चीतून उठून तिच्यासमोर उभं राहायला हवं होतं. दोनदा तो कसाबसा उठला अन् पुन्हा खुर्चीवर धप्पकन बसला. दोघांनी धरून त्याला उभा केला. तनीषाच्या गळ्यात माळ घालण्यासाठी त्याच्या हातात फुलांचा हार दिला. त्यानं हात उचलले, पण ते खाली आले. दोनदा असंच झाल्यावर लोक कुजबुजायला लागले.

वधुवेषातल्या लाजऱ्याबुजऱ्या तनीषानं हा सगळा प्रकार बघितला अन् तिचं डोकं तडकलं. हातातली वरमाला तिनं स्टेजवर फेकली अन् ती कडाडली, ‘‘मला अशा दारूड्याशी लग्न करायचं नाहीए.’’ ताडकन् वळून ती चालायला लागली. या अनपेक्षित घटनेनं सगळेच भांबावले. तनीषाला अडवायला मैत्रिणी धावल्या तोवर तिनं आपल्या खोलीत जाऊन धाडकन् दरवाजा लावून घेतला होता.

‘‘तनीषा दार उघड,’’ पुन्हा पुन्हा आईवडिल म्हणत होते.

तनीषानं सांगितलं, ‘‘एकाच अटीवर दार उघडेन, माझा निर्णय कुणी बदलायचा नाही.’’ तिनं दार उघडलं तेव्हा तिनं वधुवेष व सगळा शृंगार उतरवून नेहमीचे साधे कपडे घातलेले होते.

‘‘अगं, वेड लागलंय का तुला?’’ आईनं म्हटलं, ‘‘अशी दारातून वरात परत पाठवतात का कुणी? विचार कर एकदा. लग्न मोडलं तर पुन्हा लग्न करताना किती प्रॉब्लेम येतात. इतका झालेला खर्च वाया जाईल. दूरदूरच्या गावाहून पाहुणे आले आहेत. तू आततायीपणा करू नकोस..पुढे सगळं नीट होईल.’’ आईला अजूनही काही बोलायचं होतं पण बाबांनी मधेच तिला अडवलं.

‘‘तिचा निर्णय योग्य आहे. मी माझ्या मुलीला विहिरीत ढकलू शकत नाही. लग्नासारख्या पवित्र कार्यात तो असा पिऊन आला आहे तर त्याची खात्री कुणी द्यायची? एरवीही तो पितच असेल. लग्नानंतरही त्यानं दारू नाहीच सोडली तर? माझी लेक शिक्षित आहे. नोकरी करते, तिला तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा हक्क आहेच. मी जरा तिकडे मुलाकडच्या मंडळींची परिस्थिती बघतो. निर्णय फक्त तनीषा घेईल.’’

‘‘हिच्याबरोबर तुमचीही बुद्धी भ्रष्ट झाली का? ती लहान आहे. तुम्ही जरा विचार करा ना?’’ आईला अश्रू आवरेनात.

‘‘मी जीव देईन पण व्यसनी, दारूड्या माणसाशी लग्न करणार नाही. माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये किती हसू झालंय माझं. दारूड्यांची मी नक्कल करायचे. दारूबंदी झालीच पाहिजे म्हणून वाद घालायचे…अन् माझ्याच नशिबी असा दारूड्या यावा? शक्यच नाही,’’ तनीषानं आपला निर्णय सांगितला.

आईची रेकॉर्ड सुरू झाली. ‘‘म्हणूनच म्हणत होते, मुलीला फार शिकवायची गरज नाहीए…आता भोगा आपल्या कर्माची फळं…आमच्यावेळी तर…’’

ती अजूनही पुढे बोलणार तेवढ्यात नवरदेवाचा भाऊ त्यांना शोधत तिथे आला आणि त्याचे आईवडिल भेटू इच्छितात असं सांगू लागला.

तनीषाच्या बाबांनी आईला व तनीषाला तिथंच सोडलं आणि ते आपला मुलगा व तनीषाच्या मामाला घेऊन नवरदेवाच्या आईवडिलांना भेटायला निघाले. सगळे समोरासमोर बसल्यावर काही वेळ कुणीच बोललं नाही. नवरदेव असलेल्या पनवच्य आईबाबांचे चेहरे शरमेनं काळवंडले होते…पवनचे वडील हात जोडून म्हणाले, ‘‘आम्हाला क्षमा करा. आमच्या मुलामुळे तुमची व आमचीही अप्रतिष्ठा झाली आहे. त्याला प्यायची सवय आहे पण आजच्या दिवशी तो इतकी ढोसेल अन् अशी परिस्थिती येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. दोष त्याच्या मित्रांचा आहे. हल्लीच्या मुलांवर त्यांच्या मित्रांचा, त्यांच्या लाइफस्टाइलचा खूप प्रभाव असतो. पण मी तुम्हाला सांगतो, लग्नानंतर तुम्हाला कधी तक्रार करायची संधी मिळणार नाही. कृपा करून हे लग्न लावून द्या. नातं तोडू नका, यातच दोन्ही कुटुंबांचं भलं आहे.’’

‘‘रमेशसाहेब, आमच्या कुटुंबाचं भलं कशात आहे हे तुम्ही आम्हाला सांगू नये. पण मला असला व्यसनी, दारूडा जावई नको आहे. तुम्ही आमचा विश्वासघात केलाय. आधीच तुम्ही त्याच्या व्यसनाबद्दल आम्हाला सांगायला हवं होतं. बरं झालं लग्न लागायच्या आधीच सर्व समजलं. नाही तर माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आमचा झालेला खर्च आणि अपमान, गेलेली अब्रू याची नुकसान भरपाई कशी होणार? माझ्या मुलीला या सर्व प्रकारानं जो मानसिक धक्का बसला आहे, त्यावरचा उपाय आहे का तुमच्याकडे?’’ तनीषाच्या बाबांनी म्हटलं.

‘‘मी पुन्हा तुमच्यापुढे हात जोडतो…आम्हाला वाटलं होतं की लग्न झाल्यावर पवन सुधरेल. आम्ही तर त्याला समजावून थकलो होतो.’’

तनीषाचे मामा संतापून म्हणाले, ‘‘सुधरवण्यासाठी तुम्हाला आमचीच मुलगी मिळाली का? स्वत:च्या स्वार्थासाठी त्या पोरीच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्याचा काय हक्क आहे तुम्हाला? हे लग्न होणार नाही. आत्तापर्यंत दागिने, कपड्यांसाठी जो खर्च दोन्हीकडून झालाय, त्याचा हिशेब करून टाका?’’

एव्हाना नवरदेवाची दारू उतरली होती. तो खाली मान घालून बसला होता. त्याचे वडील जड पावलांनी उठले. त्यांनी मुलाला खांद्याला धरून उभं केलं अन् गाडीकडे निघाले. नवऱ्याची आई व भाऊही सजवलेल्या गाडीत बसून निघून गेले पाठोपाठ इतर वराती मंडळींही झालेला अपमान मनात घेऊन निघून गेली.

काही वेळापूर्वी जिथं हास्य, विनोद, संगीत, लगबग होती, तिथं आता भकास शांतता पसरलेली होती. तनीषाच्या लग्नाचा आता पुन्हा विचार करावा लागणार…जे आईबाप स्वत:च्या मुलाचं व्यसन सोडवू शकले नाहीत, त्यांनी परक्या घरातली मुलगी व्यसन सोडवेल हे कसं काय ठरवलं? तनीषा कोपऱ्यात गुडघ्यात मान घालून बसली होती. आईवडील पलंगावर आडवे झाले होते, फक्त धाकटा भाऊ आशिष तेवढा भाड्यानं आणलेलं सगळं सामान परत करण्यासाठी झटत होता. गडी माणसांना सूचना देत होता.

नवरदेव पनवलाही या सर्व प्रकारामुळे खूपच जोराचा झटका बसला होता. तो स्वत: उच्चशिक्षित होता. चांगल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी होती. पण वाईट मित्रांच्या संगतीत अडकला अन् त्याला दारूची सवय लागली. सवयीचं पर्यावसन व्यसनात झालं. पण ऐन लग्नाच्या मुर्हुतावर मित्र इतकी दारू पाजतील असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. सगळ्या प्रकारानं त्याला अंतर्बाह्य हादरवलं होतं. त्याला स्वत:चीच किळस वाटली, घृणा आली. आईवडिल, नातलग सगळेच किती अपमानित अन् दु:खी झाले होते. त्यांचा असा अपमान करण्याचा, नातलगांसमोर त्यांना खाली मान घालायला लावण्याचा त्याला काय अधिकार होता? त्याला खूपच पश्चात्ताप वाटत होता. हे सगळं बदलायला हवं. प्रायश्चित्त घ्यायला हवं.

एकदा ठरवल्यावर अशक्य काहीच नसतं. सगळ्यात आधी त्यानं त्या मित्रांची संगत सोडली. दारूच्या बाटल्या गटारात रिकाम्या केल्या. आईवडिलांच्या पायाला विळखा घालून मनसोक्त रडून घेतलं. त्यांची परोपरीनं क्षमा मागितली. त्या क्षणी ते ही काही बोलले नाहीत.

पवनला तनीषाच्या घरी जाण्याचं धाडस झालं नाही. पण त्यानं तिच्या मोबाइलवर क्षमा याचना करणारा व दारूला कायमची सोडचिठ्ठी दिली असल्याचा मेसेज तेवढा टाकला. झाल्या प्रकारासाठी तो सर्वस्वी दोषी असून या कृत्यासाठी प्रायश्चितही घेतो आहे हेही कळवलं. तनीषानं काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही.

पवननं सरळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू केले. समुपदेशन, व्यायाम, उपचार यामुळे बदल दिसू लागला. ऑफिस व घर यातच तो मन रमवू लागला. जोडीला व्यायाम, चांगलं वाचन याचाही आधार होता. सुरूवातीला दारूची फार आठवण यायची. जिवाची तगमग व्हायची पण हळूहळू सगळंच सावरलं.

पवनच्या आईवडिलांनाही हा सुखद बदल आवडला. ते मनोमन तनीषाला धन्यवाद देत होते. तिनं अपमान करून धुडकावून लावल्यामुळे पवन असा बदलला आहे, हे त्यांना लक्षात आलं होतं. असंच सगळं सुरळीत राहिलं तर पवनचं भवितव्य उज्जवल होतं. कदाचित तनीषा पुन्हा हो म्हणेल असंही त्यांना वाटत होतं.

इकडे तनीषाच्या घरात तिच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली होती. तो विषय निघाला की तिला फार वाईट वाटायचं. ती तिथून उठून जायची. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. कारण साखरपुड्यानंतर ती दोन तीन वेळा पवनला भेटली होती. फोनवरही त्यांचं संभाषण व्हायचं. पण त्यावेळी तिला त्याच्या या व्यसनाबद्दल लक्षात आलं नव्हतं. त्यावेळी तिला त्याच्या दारूबद्दल समजलं असतं तरी तिनं तेव्हाच लग्न मोडलं असतं. कदाचित साखरपुडाही झाला नसता. तनीषानं आईबाबांना सांगितलं की तिला अजून मानसिकदृष्ट्या सावरायला थोडा वेळ हवा आहे. नोकरी तर सुरूच होती. मन रमवण्यासाठी तिनं एक दोन हॉबी क्लासही लावून घेतले होते.

बघता बघता वर्ष उलटलं. एव्हाना पवनची दारू पूर्णपणे सुटली होती. वर्षभर केलेल्या परिक्षणामुळे त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वातही आकर्षक बदल झाला होता. एक दिवस धाडस करून तो तनीषाच्या ऑफिसमध्ये पोहोचला. त्याला अवचित आलेला बघून ती थोडी भांबावलीच! तरीही त्याच्यातल्या बदलाची नोंद तिच्या नजरेनं आणि मेंदूनं घेतलीच. वरकरणी कोरडेपणानं तिनं म्हटलं, ‘‘तू इथं कशाला आला आहेस? मला तुझ्याशी अजिबात संबंध नकोय.’’

‘‘फक्त एकदाच माझं ऐक. माझ्यावर विश्वास ठेव. मी दारू पूर्णपणे सोडलीय.’’

पण तनीषानं त्याचं ऐकून घेतलं नाही. अर्थातच पवनला प्रतिक्रियेची कल्पना होती. त्याच्या डॉक्टरांनी आणि समुपदेशकांनीही त्याला त्याबद्दल सूचना दिलेल्याच होत्या.

आठ दिवसांनी तो पुन्हा एकदा तिला भेटला. ‘‘मी प्रायश्चित्त घेतोय…मला क्षमा कर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव.’’ त्याच्या बोलण्याकडे यावेळीही तनीषानं दुर्लक्षच केलं.

पण पवननं चिकाटी सोडली नाही. तो तिला वरचेवर भेटतच राहिला. एकदा तर त्यानं तिला त्याच्या डॉक्टर व समुपदेशकाकडे नेऊन भेटवून आणलं. त्यांनीही पवनच्या एकूण प्रगतीबद्दल तिला खात्री दिली. पवन पुन्हा पुन्हा तिला भेटत होता. क्षमा मागत होता. त्याचं तिच्यावर प्रेम आहे व तो तिच्याशिवाय आयुष्याची कलप्नाच करू शकत नाही हे ही तिला पटवून देत होता. शेवटी तनीषाही विरघळली. तिचंही त्याच्यावर प्रेम होतंच. तिरस्कार त्याच्या व्यसनाचा होता.

दोघांच्या भेटीतून हे निश्चित झालं की दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आणि घडलेली घटना एक अपघात समजून विसरून जायची व नव्यानं संसाराचा डाव मांडायचा.

तनीषानं आईवडिलांना व भावाला सगळं सांगितलं. तनीषा पुन्हा लग्नाला तयार आहे हे ऐकूनच त्यांना आनंद झाला. ते पवनच्या आईवडिलांना भेटायला तयार झाले.

‘‘पण तनू, जर पुन्हा पवन व्यसनाकडे वळला तर?’’ वडिलांना शंका वाटली.

‘‘बाबा, त्याला अद्दल घडलीय. पश्चात्ताप झालाय अन् त्यानं प्रायश्चित्तही घेतलंय…आता तो कधीच पुन्हा त्या वाटेवर जाणार नाही.’’ तनीषा म्हणाली, ‘‘आता तो पूर्णपणे बदलला आहे. माझा त्याच्यावर विश्वास आहे.’’

पवनच्या घरी निरोप पोहोचला. तनीषाचे आईबाबा व तनीषा त्यांना भेटायला येताहेत. तेव्हा तेही खूप आनंदले. त्यांनी या मंडळींच्या स्वागताची, आतिथ्याची जोरदार तयारी केली.

पवनची तपश्चर्या फळाला आली. दोन्ही कुटुंब आंनदानं एकमेकांना भेटली.

पवनचे वडील म्हणाले, ‘‘तुमच्या पोरीच्या ऋणात आहोत. आम्हाला आमचा मुलगा सांभाळता आला नाही, पण तिनं त्याला सुधारला.’’

‘‘खरंय, आता लवकर दोघांचं लग्न लावून देऊयात.’’ तनीषाचे बाबा म्हणाले.

‘‘पण एक अट आहे,’’ हे ऐकून तनीषाचे बाबा चकित झाले.

तनीषाच्या बाबांना चकित झालेलं पाहून पवनचे वडील म्हणाले, ‘‘यावेळी लग्नाचा सगला खर्च मी करणार.’’

अट ऐकून सगळेच हसायला लागले. टाळ्या वाजवून सर्वांनी संमती दिली. पवन व तनीषाही एकमेकांना बघून हसत होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें