दुसरी बाजू

कथा * गरिमा पारवे

‘‘माया , तू चढ बरं आधी…नेहा, अदिलला माझ्याकडे दे, अगं, अगं…साभांळून,’’ गाडी सुटायला केवळ पाच मिनिटं उरलेली…सीमानं आपलं सामान व्यवस्थित लावून पर्समधलं मासिक हातात घेतलंच होतं तेवढ्यात डब्याच्या दारातून येणाऱ्या त्या आवाजानं अगदी अभावितपणे तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली.

हाच तो आवाज जो सीमाला कधी काळी फार आवडत होता. आवाजात गांभीर्य होतंच पण एक मधाळ, मादक अशी किनार होती. इतकी वर्षं उलटली तरी सीमा त्या आवाजाच्या आकर्षणातून मुक्त झाली नव्हती. अजूनही कधी तरी वाटायचं की अचानक हा आवाज तिला साद घालेल आणि जे तिला त्यावेळी ऐकावसं वाटलं होतं ते सांगेल.

आज किती तरी वर्षांनी सीमानं तो आवाज ऐकला होता, पण त्या आवाजात त्यावेळी असलेला सच्चेपणा अन् तो मधाळ गोडवा नाहिसा झाला होता. आवाजात सच्चेपणाऐवजी त्रागा अन् गोडव्याऐवजी कोरडी खरखर जाणवंत होती. तो कधी हमालावर डाफरत होता, बायकोवर खेकसत होता, मुलांवर ओरडत होता…आयुष्यातल्या काटेरी वाटेवरून चालताना असं घडतंच का? की त्या दोघांमध्ये त्या काही निर्माण झालेल्या दुराव्यामुळे असं घडलं होतं?

बरेचदा दोन व्यक्तींमधलं नातं अबोलच राहतं. अंतर कमी होत नाही पण हृदयातली कळही जिरत नाही. सीमाचं अन् त्या आवाजाच्या मालकाचं म्हणजे नवनीतचं नातं असंच काहीसं होतं. सीमाला फारच उत्सुकता होती त्याला एकदा बघायची. दहा बारा वर्षं उलटली होती. ती सीटवरून उठली अन् दरवाज्याकडे बघू लागली. एक माणूस आपल्या बायकोमुलांसह येताना दिसला.

सीमानं लक्षपूर्वक बघितलं…नवनीतचे डोळे फक्त पूर्वीचे होते. पण तो मूळ वयापेक्षा खूपच वयस्कर दिसत होता. पूर्वीचे दाट केस जाऊन बऱ्यापैकी टक्कल पडलं होतं. शरीरावर चरबीचे थर साठले होते. ढेरपोट्याच दिसत होता. डोळ्यातले पूर्वीचे खेळकर मिश्किल भाव नाहीसे होऊन त्या जागी गर्व अन् धूर्तता विराजमान झाली होती. कॉलेजच्या दिवसांतला हाच का तो हॅन्डसम नवनीत?

नवनीतची नजर सीमाकडे गेली, पण त्यानं तिला ओळखली नाही. ही कोण सुंदर मुलगी म्हणून उत्सुकतेनं अन् थोड्याशा वासनेनंच त्यानं तिच्याकडे बघितलं. सीमा त्याची नजर चुकवून आपल्या सीटवर येऊन बसली. ती नजर तिला सहनच झाली नाही.

कॉलेजातले ते एकत्र असण्याचे दिवस. सीमा त्यावेळी अगदीच साधी आणि अनाकर्षक वाटायची, पण नवनीत मात्र स्मार्ट, हॅन्डसम दिसायचा. सीमा त्याच्याकडे आकर्षित झाली होती. इतर कुणाशी न बोलताही सीमा त्याच्याशी बोलण्याची संधीच शोधत असायची.

पण आता काळ बदलला होता. चांगली शैक्षणिक गुणवत्ता, त्यामुळे मिळालेली उत्तम पगाराची, उच्च पदाची नोकरी, त्यातून आलेलं आत्मविश्वासाचं तेज अन् एकूणच अभिरूची जाणवेल असं राहणीमान यामुळे सीमा खूपच आकर्षक वाटू लागली होती. नियमित पायी फिरणं, योगासनं, प्राणायाम आपण मोजका आहार यामुळे ती खूपच तरूण दिसायची. कुठलाही पोषाख तिला शोभून दिसायचा.

मासिकाची पानं उलटता उलटता सीमा विचार करत होती. मागील इतक्या वर्षांत तिला नवनीतची आठवण आली नव्हती असं नाही. फेसबुकवर बघितलं होतं. त्याचा नंबरही टिपून घेतला होता..पण कधी फोन केला नाही की फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही.

आत्ता प्रवासात बऱ्यापैकी वेळ होता. करूयात का थोडं चॅटिंग? निदान कळेल तर तो माणूस खरोखर नवनीत आहे की अजून कुणी दुसराच आहे? तिनं व्हॉट्सअॅपवर नुसतंच ‘हाय’ टाइप करून पाठवलं.

ताबडतोब उत्तर आलं, ‘‘कुठं आहेस? कशी आहेस?’’

ती दचकली. तिला ओळखायला त्याला क्षणभरही लागला नव्हता. प्रोफाइल पिक सीमानं एडिट करून रंगीबरेंगी केलं होतं. चेहराही खूप स्पष्ट नव्हता. पण त्यानं कदाचित ट्रू कॉलरमुळे ओळखलं असेल.

‘‘मला आळखलंस? आठवतेय मी तुला?’’

‘‘१०० टक्के आठवते आहेस आणि इतरही सगळं.’’

‘‘इतरही सगळं म्हणजे?’’ सीमानं दचकून विचारलं.

‘‘तेच…तू अन् मी मिळून ठरवलं होतं?’’

सीमानं उत्तर दिलं नाही.

नवनीतचा पुन्हा मेसेज आला, ‘‘हल्ली कुठं आहेस? काय करतेस?’’

‘‘दिल्लीत आहे. जॉब करतेय.’’ सीमानं उत्तर लिहिलं.

‘‘गुड.’’ त्यानं स्माइली पाठवली.

‘‘तू सांग, घरी सगळे कसे आहेत? दोन मुलं आहेत ना तुला?’’ सीमानं विचारलं.

आता दचकायची पाळी नवनीतची होती. ‘‘तुला कसं माहीत?’’

‘‘बस्स, असंच! माहिती करून घ्यायची इच्छा असली की सगळं होतं.’’ सीमानं त्याच्या विचारांचा कल जाणून घेण्यासाठी म्हटलं.

ताबडतोब त्याचा प्रश्न आला, ‘‘तुझं लग्न झालं?’’

‘‘नाही, अजून केलं नाहीए. कामातच गुंतलेली असते. आनंदात असते.’’

‘‘मला तर वाटलं होतं तुझ्याशी पुन्हा संपर्क तरी होतोय की नाही? पण तू आजही माझ्यासाठी फ्री आहेस तर!’’ नवनीतच्या भावना आता बाहेर डोकावू लागल्या होत्या. सीमाला त्याची भाषा अन् त्याचा स्वर आवडला नाही.

‘‘चुकीचा विचार करतो आहेस. मी कुणासाठीही फ्री नाही. सहजच तुझ्याशी संवाद साधला!!’’

‘‘मी पण हेच म्हणतोय.’’

‘‘तेच काय?’’

‘‘हेच की तुझ्या हृदयात मी आहे कित्येक वर्षांपूर्वी जसा होता, तसाच आहे.’’ नवनीतचा मेसेज आला.

बराच वेळ सीमानं काही उत्तर पाठवलं नाही. नवनीतनं पुन्हा मेसेज पाठवला,

‘‘आज तुझ्याशी संपर्क झाला, खूप बरं वाटलं. नेहमीच चॅटिंग करूयात.’’

‘‘ओ. के?. शुअर!’’

सीमाच्या मनांत विचित्र वादळ होतं. चांगलंही वाटलं अन् बऱ्यापैकी आश्चर्यही वाटलं. नेमकं कसं रिअॅक्ट व्हावं हेच तिला समजत नव्हतं. तिनं पुन्हा एक मेजेस टाकला.

‘‘बाय द वे, आता कुठं आहेस?’’

‘‘आता मी ट्रेनमध्ये आहे अन् बनारसला जातोय.’’

‘‘विथ फॅमिली.’’

‘‘होय!’’

‘‘ठीक आहे, एन्जॉय.’’ सीमानं फोन पूर्णपणे बंद करून ठेवला. म्हणजे तो नवनीतच आहे हे तर नक्की झालं. सीमा विचार करत होती, आयुष्यही किती अन् कसं बदलतं? जुन्या आठवणींच्या नादात मग तिचा पुढला प्रवास मजेत पार पडला.

घरी आल्या आल्या सीमाची कामं सूरू झाली. त्या धबडग्यात ती नवनीतला पार विसरली होती, पण दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी नवनीतचा गुडमॉर्निंगचा मेसेज आला. त्याला रिप्लाय करून सीमा ऑफिसात निघून गेली.

सायंकाळी घरी येऊन, चहा घेऊन तिनं सहज टीव्ही लावला तेवढ्यात नवनीतचा मेसेज, ‘‘काय करतेस?’’

‘‘मी टीव्ही बघतेय, तू काय करतो आहेस?’’

‘‘तुझी वाट बघतोय.’’

सीमाला हसायला आलं…असं का करतोय हा? तिनंही मेसेज टाकला, ‘‘पण कुठं?’’

‘‘जिथं तू आहेस तिथंच!’’

‘‘नक्की तूच आहेस ना? तुझा फोटो पाठव. मला खात्री करून घ्यायचीय.’’

‘‘मी उद्या पाठवतो. तू तुझा फोटो पाठव.’’ सीमानं एक फोटो पाठवला.

ताबडतोब उत्तर आलं, ‘‘कसली मस्त दिसते आहेस.’’

‘‘मस्त नाही. जबाबदार अन् स्मार्ट,’’ सीमानं त्याचं वाक्य दुरूस्त केलं. नवनीत नंतर गप्प होता. दोन दिवस त्याचे मेसेजही आले नाहीत. तिसऱ्या दिवशी गुडमॉर्निंगचा मेसेज बघून सीमानं फोन केला, ‘‘आणि कसं काय? कसा आहेस?’’

‘‘तसाच, तू मला सोडून गेलीस तेव्हा होतो तसाच!’’

‘‘मला नाही वाटत, तुझ्या आयुष्यात तर खूपच बदल झालेत. तू नवरा झाला आहेस, मुलांचा बाबा झाला आहेस,’’ सीमानं म्हटलं.

नवनीतनं खूपच बेजबाबदारपणे म्हटलं ‘‘ ते सगळं सोड गं! तू मला काय बनवशील?’’

‘‘मित्रच ना? मित्र मानेन.’’ पटकन सीमा उत्तरली.

‘‘ते तर आपण आहोतच गं!’’ एवढं बोलून त्यानं हृदयाचं चित्र पाठवलं.

‘‘चल, मी बंद करते मला स्वयंपाक करायचाय.’’

सीमा फोन बंद करणार तेवढ्यात त्यानं म्हटलं, ‘‘अगं ऐक, काही दिवसांनी मी दिल्लीत येतोय.’’

‘‘ठीकाय, आलास की कळव.’’

‘‘काय काय खायला घालशील? कुठं कुठं फिरवशील?’’

‘‘जे तुला हवं असेल ते.’’

‘‘मला तर तू हवी आहेस.’’

त्याच्या बोलण्याच्या टोनमुळे सीमा दचकली. मग म्हणाली, ‘‘खरंच? पण पूर्वी कधी बोलला नाहीत तू?’’

‘‘कारण ऑलरेडी तुला समजलेलं होतं.’’

‘‘होय खरंय ते. शंभर टक्के खरंय. मला समजलं होतं.’’

‘‘तर मग तू का नाही बोललीस?’’ नवनीतनं उलट प्रश्न केला. सीमानं अगदी निर्लिप्तपणे सांगितलं, ‘‘कारण तुलाही समजलेलं होतंच.’’

‘‘आता तू कशी राहतेस?’’

‘‘कशी म्हणजे?’’

‘‘म्हणजे थंडीत.’’

नवनीतचा हा प्रश्न सीमाला विचित्र वाटला. तिनं विचारलं, ‘‘तुमच्याकडे थंडी नसते का?’’

‘‘माझ्याकडे थंडी पळवून लावण्याचा उपाय आहे ना. तुझी थंडी कशी पळवून लावतेस? ’’ त्याचा प्रश्न, त्याची विचारण्याची पद्धत, त्यामागचा किळसपणा, सूचकपणा सगळंच ओंगळ वाटलं सीमाला. ‘‘शी: काहीही काय बोलतोस?’’ तिनं आपला राग व्यक्त केला. पण नवनीतचा टोन कायमच होता. तसाच निर्लज्जपणे म्हणाला, ‘‘हे सगळं आधीच बोलून घेतलं असतं तर आजचा दिवस वेगळाच असता.’’

‘‘ते जुनं विसर आता. तू आता विवाहित आहेस. पत्नी आहे तुला.’’

‘‘ती तिच्या जागी, तू तुझ्या जागी. तू म्हणशील तेव्हा तुझ्याजवळ येऊ शकतो.’’ नवनीतनं म्हटलं.

सीमाला नवनीतची ही भाषा खूपच खटकली. स्वत:च्या पत्नीविषयी आदर, मान, प्रेम काहीच नव्हतं का त्याच्या मनांत? नवनीत इतक्या हलक्या भाषेत बोलू शकतो हे त्यावेळी कळलं नव्हतं. हे असं इतकं उघड आमंत्रण? त्यावेळी त्याबद्दल कोमल भावना मनात होत्या. पण याक्षणी आता मनांत थोडा तिरस्कार अन् दुरावाच जाणवू लागला होता. तिनं फोन बंदच केला.

दोन तासही झाले नसतील पुन्हा नवनीतचा मेसेज आला, ‘‘कशी आहेस?’’

सीमानं मेसेज टाकला, ‘‘हे काय चाललंय? मी चांगली आहे.’’

‘‘रात्र कशी घालवतेस?’’ नवनीतचा पुढचा प्रश्न.

सीमाला असल्या विचित्र प्रश्नाची अपेक्षा नव्हती. तिनं संक्षिप्त उत्तर दिलं,

‘‘झोपून.’’

‘‘झोप येते?’’

हा प्रश्न सीमाला आवडला नाही. तरीही टाइप केले. ‘‘हो, अगदी छान गाढ झोप लागते.’’

‘‘आणि जेव्हा…’’ नवनीतनं असं काही अश्लील वक्तव्य केलं की सीमाचा पारा चढला. तिनं संतापून फोनवर सांगितलं, ‘‘आय डोंट लाइक सच टाइप ऑफ गॉसिप.’’

‘‘अगं, मला वाटलं मी माझ्या मैत्रिणीशी बोलतोय…सॉरी तू तर एकदम फिलॉसॉफर निघालीस.’’

सीमाला त्याची ही चेष्टाही आवडली नाही. ती कडक शब्दात म्हणाली, ‘‘फोन कॉल किंवा चॅटिंगला माझी ना नाही , पण भाषेची मर्यादा सांभालायलाच हवी.’’

‘‘मैत्रीत काही मर्यादा नसतात गं. मला म्हणायचंय, मैत्रीत, सीमा कशाला हव्यात.’’

‘‘पण मला सीमेतलीच मैत्री आवडते. सीमा किंवा मर्यादा नसलेली मैत्री मला मान्य नाही.’’ सीमा संतापून म्हणाली.

‘‘मी तुला आवडत होतो हे विसरू नकोस सीमा…’’

‘‘आवडत असणं वेगळं पण ती आयुष्यभराची चूक ठरणं मला मान्य नाही. तुझं हे गलिच्छ रूप लक्षात आलं हेही बरं झालं. यापुढे आपली मैत्री नाही.’’ अत्यंत संतापानं बोलून तिनं फोन बंद केला. नवनीतचा नंबर कायमचाच बंद केला. ब्लॉक केला.

आता सीमाला शांत शांत वाटलं. नवनीतला स्वत:च्या आयुष्यातून उणे केल्याचा पश्चातापही वाटला नाही. अल्लड वयात त्याच्यावर प्रेम केलं होतं, तो हवासा वाटत होता पण आता तो बदलला की त्यावेळी सीमालाच त्याची दुसरी बाजू कळली नव्हती?

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें