लिप बाम, टिंट, ग्लॉस आणि लिपस्टिकमधील फरक

* भारती तनेजा, सौंदर्य तज्ज्ञ

आजकाल, ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी बाजारात लिप बाम, लिप टिंट, लिप ग्लॉस आणि लिपस्टिक अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु कोणते उत्पादन कोणासाठी योग्य आहे हे समजणे अनेकदा कठीण असते. यापैकी योग्य तेच निवडणे, हे तुमच्या गरजा आणि लूकवर अवलंबून असते. चला, या चारमधील तपशीलवार फरक जाणून घेऊया :

लिप बाम

लिप बामचे प्राथमिक काम ओठांना मऊ बनवून मॉइश्चरायझ करणे आहे. तो ओठांना कोरडेपणा आणि चिरा जाण्यापासून वाचवण्यासाठी डिझाइन केला आहे. त्याची पोत मलईदार किंवा मेणासारखी असते आणि तो नैसर्गिक चमक देतो. काही लिप बाम रंगीत असतात, परंतु बहुतेक रंगहीन असतात. हे सर्व वयोगटासाठी त्वचेची काळजी घेणारे एक मूलभूत उत्पादन आहे. लिप बाममध्ये बहुतेकदा शिया बटर, मेण, कोरफड, ई जीवनसत्त्व आणि एसपीएफसारखे घटक असतात, जे ओठांना ओलावा देऊन सूर्यापासून संरक्षण करतात. याशिवाय, मेकअप करण्यापूर्वी ओठांना प्राइम करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

जर तुम्हाला मुलायम ओठ हवे असतील तर तुमच्या दिनचर्येत लिप बामचा समावेश करा. तो प्रवासासाठी अनुकूल आहे आणि कुठेही वापरण्यास सोपा आहे. बाजारात चवदार आणि औषधी लिप बामदेखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे आणखी चांगला अनुभव मिळतो.

लिप टिंट

लिप टिंट हे एक सौम्य उत्पादन आहे, जे ओठांना नैसर्गिक, दीर्घकाळ टिकणारा रंग देते. ते द्रव किंवा जेल-आधारित आहे आणि मॅट किंवा सेमी-मॅट फिनिश देते. त्याची पोत खूप सौम्य असते आणि ओठांवर चिकट वाटत नाही. लिप टिंटचा रंग दीर्घकाळ टिकतो, ज्यामुळे ते सक्रिय जीवनशैली असलेल्यांसाठी एक आदर्श उत्पादन ठरते.

‘नो मेकअप लूक’ साठी लिप टिंट सर्वोत्तम मानले जाते. हे केवळ ओठांवरच नाही तर गालावर ब्लश म्हणून देखील वापरले जाऊ शकते. हे अनेक नैसर्गिक शेड्समध्ये येते, जे त्वचेशी सहज मिसळते. जर तुम्हाला दिवसभर टिकणारा नैसर्गिक आणि टवटवीत लूक हवा असेल तर लिप टिंट तुमच्यासाठी योग्य आहे.

लिप ग्लॉस

लिप ग्लॉस ओठांना अधिक चमकदार आणि भरलेले दिसण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्याची पोत द्रव किंवा जेल-आधारित आहे. ती थोडीशी चिकट असू शकते. त्याचे फिनिश उच्च-चमक आणि परावर्तक आहे, ज्यामुळे ओठांना त्वरित ग्लॅमरस लूक मिळतो.

हे बहुतेकदा हलक्या किंवा पारदर्शक रंगांमध्ये येते आणि त्यात मॉइश्चरायझिंग घटक असतात, जे ओठांना हायड्रेट करतात. लिप ग्लॉस बहुतेकदा ग्लॅमरस किंवा पार्टी लूकसाठी वापरले जाते. हे साध्या मेकअपची व्याख्या करण्यासाठी आणि ओठांना आकर्षक बनवण्यासाठी परिपूर्ण आहे.

जर तुम्हाला तुमच्या लिपस्टिकला चमकदार फिनिश द्यायची असेल तर तुम्ही त्यावर लिपग्लॉस लावू शकता. हे दिवसा आणि रात्रीच्या लूकसाठी योग्य आहे. लिपग्लॉस त्यांच्यासाठी आहे ज्यांना मऊ आणि चमकदार लूक आवडतो.

लिपस्टिक

लिपस्टिकचे मुख्य काम ओठांना ठळक आणि स्पष्ट लूक देणे आहे. हे सर्वात रंगद्रव्ययुक्त उत्पादन आहे आणि तेजस्वी रंग प्रदान करते. लिपस्टिक अनेक पोतांमध्ये येते – क्रिमी, मॅट, सॅटिन किंवा लिक्विड. लिपस्टिकचे फिनिश मॅट किंवा वेल्वेटी असू शकते.

लिपस्टिकचा वापर खास प्रसंगी, औपचारिक कार्यक्रमांसाठी किंवा पार्ट्यांसाठी केला जातो. ती विविध शेड्समध्ये येते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या पोशाख आणि मेकअपशी जुळणारी योग्य शेड निवडू शकता. जर तुम्हाला तुमच्या मेकअपचा केंद्रबिंदू तुमच्या ओठांना बनवायचे असेल तर लिपस्टिकपेक्षा चांगले दुसरे काहीही नाही.

लिपस्टिक आता अशा प्रकारांमध्ये येते, जी जास्त काळ टिकते आणि ओठांना मॉइश्चरायझ करते. प्रत्येक महिलेच्या मेकअप किटचा हा एक आवश्यक भाग आहे.

काय निवडावे आणि कधी?

जर तुमचे ओठ फाटलेले किंवा कोरडे असतील तर लिप बाम वापरा. नैसर्गिक लूकसाठी, लिप टिंट निवडा. चमकदार आणि मऊ लूकसाठी, लिप ग्लॉस लावा. तुम्ही ही उत्पादने एकत्रितपणे वापरू शकता. उदाहरणार्थ, ओठांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी लिपस्टिक बामवर लावा. मुलायम, नैसर्गिक लूकसाठी, लिप टिंटसह लिप ग्लॉस लावण्याचा प्रयत्न करा. मॅट लिपस्टिक आणि पातळ लिपग्लॉस लावून परिपूर्ण पार्टी लूक मिळवा. यामुळे तुम्ही प्रत्येक प्रसंगासाठी आकर्षक दिसू शकता.

विखुरलेल्या केसांपासून सुटका

* गरिमा पंकज

फ्रिझ केस म्हणजेच कोरडे, विखुरलेले आणि गुंतलेले केस जे सांभाळणं खूपच कठीण असतं. याचं कारण केसांमध्ये ओलावा आणि पोषणाची कमी असते. अनेकदा केसांवरती खूप जास्त ड्रायर आणि ब्लोअरचा वापर केल्यामुळे देखील त्यांची अशी अवस्था होते. चला तर या समस्येवरचा उपाय शोधून काढूया :

चांगल्या दर्जाचा शाम्पू निवडा : जेव्हा शाम्पूमध्ये सल्फेटचे प्रमाण अधिक असतं तेव्हा ते केसातून नैसर्गिक तेल काढून घेतं म्हणून नेहमी अशा शाम्पूचा वापर करायला हवा, जे सल्फेट आणि पॅराबेन फ्री असावं. सोबतच हे देखील पहा की शाम्पूमध्ये ग्लिसरीनचे प्रमाण किती आहे. ग्लिसरीन केसांचा फ्रिझनेस कमी करण्यात मदत करतं. जेव्हादेखील शाम्पू करायचा असेल तेव्हा तुमच्या हातामध्ये शाम्पू घेऊन त्यामध्ये चार-पाच थेंब पाणी एकत्रित करा आणि नंतर शाम्पूचा वापर हलक्या हाताने करा.

नियमितपणे हेअर कट करा : तुमच्या केसांना नियमितपणे ट्रिमिंग करत रहा. यामुळे फ्रिझनेस आणि द्विमुखी केसांची समस्येपासून सुटका करण्यात मदत मिळेल. तुम्हाला जवळजवळ ४०-४५ दिवसातून एकदा केस नक्कीच कापायला हवेत.

डाएट : तुम्ही जे काही खाता ते फक्त तुमच्या त्वचेलाच नाही तर तुमच्या केसांनादेखील नरिश करतं. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन युक्त खाद्यपदार्थ घ्या. संध्याकाळी स्नॅक्समध्ये ड्रायफ्रूट्स खा आणि ग्रीन टी प्या. या व्यतिरिक्त तुम्ही टोमॅटो, आळशी, हिरव्या भाज्या, फळं, पनीर आणि चणे इत्यादींचादेखील तुमच्या डाएटमध्ये समावेश करायला हवा.

हीटिंग टूल्स वापरू नका : हीटिंग टूल्सपासून दूर रहा. कारण यामुळे केसांमधील सर्व मॉईश्चर संपून जाईल. हेअर हीटिंग टूल्स कोरडे व निस्तेज केसांसाठी जबाबदार असतं. एखाद्या खास प्रसंगी जाण्यासाठी जर तुम्ही तुमच्या केसांना कर्ल करणे वा त्यांना स्ट्रेट करण्यासाठी मशीनचा वापर करत असाल तर याचं सेटिंग कूल मोडवर ठेवावं वा खूपच लो मोडवरती ठेवा.

योग्य कोंबची निवड : अशा केसांसाठी ब्रँड ब्रीसल्स हेअर ब्रश वा कोंब सर्वात चांगलं असावं. या व्यतिरिक्त ओलसर केसांमध्ये कंगवा फिरवायचा असेल तर वाईड ब्रशचा वापर करणे योग्य होईल.

कंडिशनर लावा : कंडीशनर आणि सिरमच्या वापरामुळे केस खूपच मुलायम होतात. शाम्पू केल्यानंतर केसांना मुळापासून ते टिपपर्यंत कंडिशनर लावा आणि दोन मिनिटानंतर स्वच्छ धुवा. यामुळे केसांना मजबुती मिळेल.

चला तर, जाणून घेऊया फ्रिझ केसांना घरगुती उपायाने रेशमी आणि मुलायम कसे बनवावे :

केळयाचं मास्क : केळं विटामिन ए, सी आणि ई, नैसर्गिक तेल, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, जस्त आणि आयरनचं एक खूप मोठं स्त्रोत आहे. हे कोरडया व निस्तेज केसांना ठीक करण्यात मदत करतं. हे केसांना चमकदार आणि मुलायम बनवतं.

मध आणि दुधाचा हेअर मास्क : ४-५ चमचे दुधासोबत २ मोठे चमचे मध एकत्रित करून तुमच्या बोटांच्या सहाय्याने हे केसांवर लावा. ३० मिनिटानंतर केसांना शाम्पू करा.

अंडयाचं मास्क : अंडयाच्या पांढऱ्या भागाला एका भांडयामध्ये काढा. आता यामध्ये १ लिंबाचा रस टाका. हे व्यवस्थित एकत्रित करून केसांवर लावा. २०-२५ मिनिटानंतर शाम्पू करा.

मेंदीचा मास्क : मेंदी कोरडया आणि कुरळया केसांसाठी सर्वात उपयोगी हर्बल उपचारांपैकी एक आहे. १ कप चहाच्या पाण्यामध्ये ३-४ चमचे मेंदी पावडर टाका. थोडं दहीदेखील टाका आणि घट्ट पेस्ट बनवा. पेस्टला हेअरमास्क प्रमाणे लावा आणि अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी रात्रभर तसंच राहू द्या.

तेलामुळे मिळतो मुलायमपणा

ऑलिव्ह ऑइलला हलकं गरम करा. हे पूर्ण केसांवर लावा. १०-१५ मिनिटं तसेच राहू द्या. अशा प्रकारे खोबरेल तेलाचा वापर देखील फायदेशीर राहतो. तुम्ही जोजोबा आणि खोबरेल तेल कोमट करून केसांमध्ये लावा आणि हे मसाज करत लावा. साधारणपणे तासभर तसंच राहू द्या आणि नंतर केस स्वच्छ धुवा. शाम्पू आणि कंडिशनरच्या वापरानंतर केस स्वच्छ धुवा. आता केसांना टॉवेलने सुकवा. यानंतर ४ थेंब हेअर सिरम हातावर घ्या आणि व्यवस्थित केसांवर लावा. आता केसांना कोरडे होऊ द्या. सिरम केसांना मुलायमपणा देऊन त्यांना नरम आणि मुलायम बनवतं. तुम्ही तुमच्या केसांच्या नैसर्गिक पोतानुसार हेयर सिरम निवडायला हवा.

स्किन फास्टिंग म्हणजे काय?

* शोभा कटारे

उपवास म्हणजे काही काळ काही गोष्टीपासून दूर राहाणे, जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकाल. अशाच प्रकारे तुम्हाला तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही स्किन फास्टिंग म्हणजे त्वचेसाठीचा उपवास करू शकता. तो त्वचेला आराम देऊन त्वचा नव्याने पूर्ववत करण्यास मदत करतो. या काळात, त्वचा सौंदर्यप्रसाधनांपासून काही काळ दूर राहाते आणि मोकळा श्वास घेण्यास सक्षम होते. असे करणे तुमच्या त्वचेसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

त्वचेमध्ये नैसर्गिक तेल असते. तज्ज्ञांच्या मते जेव्हा तुम्ही सतत त्वचेसाठी काही करत असता तेव्हा तुमच्या त्वचेला नैसर्गिक राहण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत त्वचेसाठीच्या उपवासामुळे त्वचेची नैसर्गिक देखभाल व्यवस्था सुधारण्यास मदत होते आणि ती डिटॉक्सिफाय होते.

वास्तविक, त्वचा डिटॉक्स करणे म्हणजेच त्वचेसाठीचा उपवास होय. यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर १ दिवस, १ आठवडा, १ महिना टोनर, क्लिंजर, स्क्रब, सीरम, फेस मास्क, मॉइश्चरायझर न वापरता किती वेळ राहाल, हे नक्की ठरवा.

त्वचेचा उपवास म्हणजे काय?

त्वचेचा उपवास म्हणजे तुमची त्वचा काही काळ त्वचेची निगा ठेवणाऱ्या उत्पादनांपासून दूर ठेवणे किंवा काही काळ त्यांचा वापर थांबवणे. म्हणजे तुमची त्वचा श्वास घेऊ शकेल आणि विश्रांती घेईल तसेच पूर्ववत होईल. असे केल्याने तुम्ही कोणत्याही उत्पादनाच्या मदतीशिवाय नैसर्गिक पद्धतीने तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.

त्वचेचा उपवास का महत्त्वाचा आहे?

त्वचेत सिबम नावाचा तेलकट पदार्थ तयार होतो, ज्यामुळे ओलावा कमी होण्यास मदत होते. त्वचेच्या उपवासामुळे क्रीम इत्यादी कमी लावले जाते किंवा अजिबात लावले जात नाही, ज्यामुळे सिबम नैसर्गिकरित्या त्वचेला मॉइश्चरायझ करते.

सिबम काय आहे?

सिबम हे शरीरातील नैसर्गिक तेल आहे जे शरीरातील सिबेशियस ग्रंथी नावाच्या विशेष ग्रंथीमध्ये तयार होते, जे सहसा छिद्रातून वरच्या बाजूस वाहाते आणि केस तसेच त्वचेला वंगण देते.

सिबम हे एक असे मिश्रण आहे जे शक्यतो तेलकट आणि मेणासारखे असते, ज्याचे कार्य त्वचेला आर्द्रता देणे आणि संरक्षित करणे आहे. त्यात फॅटी अॅसिड, साखर, मेण आणि इतर नैसर्गिक रसायने असतात. त्याची वाढ किंवा घट याचा थेट परिणाम त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर होतो.

त्वचेच्या उपवासाचे फायदे

* त्वचेच्या उपवासामुळे त्वचेला चमक आणि ताजेपणा मिळतो.

* त्वचेची संवेदनशीलता कमी होऊ लागते.

* त्वचा स्वत:ला संतुलित आणि पूर्ववत करते.

* त्वचेचे आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारू लागते.

* त्वचेचे नैसर्गिक संरक्षणात्मक आवरण मजबूत होते.

* त्वचेची छिद्रे उघडतात.

* त्वचेला श्वास घेण्यास आणि टवटवीत होण्यास मदत होते.

* त्वचा उत्पादनांचा अतिवापर टाळता येतो.

तोटा

* कधीकधी त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेसाठीचा उपवास करताना भरपूर पाणी आणि ताजा रस प्या.

* त्वचेचा उपवास सुधारित रुपात करा. त्यासाठी खोबरेल तेल, मुलतानी माती, मध, पाणी यासारख्या नैसर्गिक गोष्टी त्वचेवर वापरा.

* पुरळ, पुटकुळ्या येऊनही त्वचेची काळजी घेणारी उत्पादने न वापरणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लक्षात ठेवा

* एकाच वेळी सर्व उत्पादनांचा वापर थांबवण्याऐवजी, हळूहळू एक-एक करून उत्पादनांचा वापर कमी करणे चांगले ठरेल.

* ज्यांची त्वचा नाजूक आहे आणि ज्यांना काही समस्या असतील, सोबतच काही उत्पादनांचा वापर आवश्यक असेल तर त्वचेचा उपवास करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

* तुमची त्वचा अंतर्गत हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या.

* जर त्वचेचा उपवास तुमच्या त्वचेला लागू पडत नसेल तर तो जास्त काळ करू नका.

* त्वचा आणि हवामानाचा अंदाज घेऊनच त्वचेचा उपवास करा.

त्वचेचा उपवास हा खूप उपयुक्त उपचार आहे. त्वचेला डिटॉक्सिफाय करण्याचा आणि तिला चांगली चमक देण्याचा हा जपानी मार्ग आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामुळे तसेच अशुद्धता आणि प्रदूषणामुळे त्वचा निर्जीव होऊ शकते, ज्यामुळे तिच्या समस्या वाढतात आणि चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व दिसू लागते. ज्याप्रमाणे आपल्याला विश्रांतीची गरज असते, त्याचप्रमाणे त्वचेलाही विश्रांतीची गरज असते, जेणेकरून ती देखील निरोगी राहील.

असा दूर करा ओठांपासून गुडघ्यांपर्यंतचा काळपटपणा

* ब्लॉसम कोचर, सौंदर्य तज्ज्ञ

काळे डाग किंवा त्वचेचा असमान रंग, ही एक सामान्य सौंदर्य समस्या आहे जी अनेक लोकांसाठी त्रासदायक ठरते. ओठांवर, गुडघ्यांवर, कोपरांवर, मानेवर, काखेत आणि अगदी नितंबांवर काळे डाग किंवा असमान त्वचेचा रंग असण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये सूर्यप्रकाश, प्रदूषण, त्वचेची योग्य काळजी न घेण्याची दिनचर्या आणि हार्मोनल बदल यांचा समावेश असतो. तसे तर ही समस्या दूर करणे फारसे अवघड नाही.

ओठांचा काळपटपणा

ओठांचा काळपटपणा, ही एक सामान्य समस्या आहे, विशेषत: त्या लोकांसाठी जे धूम्रपान करतात किंवा जास्त उन्हात राहातात. याशिवाय, ओठांना नियमितपणे मॉइश्चरायझ न केल्यानेही ओठ कोरडे आणि काळे पडू शकतात.

उपाय

लिंबू आणि मधाचे मिश्रण : लिंबामध्ये असलेले नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म ओठांचा काळेपणा दूर करण्यास मदत करतात. लिंबाच्या रसात थोडे मध मिसळून ओठांवर लावा आणि १०-१५ मिनिटांनी धुवा. याचा वापर दररोज केल्याने ओठांची त्वचा हळूहळू उजळ होईल.

गुलाबजल आणि ग्लिसरीन : गुलाबजल ओठांना ताजेपणा आणि आर्द्रता मिळवून देते तर ग्लिसरीन त्यांना ओलावा मिळवून देते. रात्री झोपण्यापूर्वी गुलाबजल आणि ग्लिसरीन एकत्र मिसळून ओठांवर लावा.

साखरेचे स्क्रब : साखरेचे छोटे कण मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात. साखर आणि खोबरेल तेलाचा स्क्रब बनवा आणि ओठांवर हलक्या हातांनी मालिश करा. यामुळे ओठ स्वच्छ, मऊ आणि गुलाबी दिसतील.

कोपर आणि गुडघ्यांवरील काळपटपणा

कोपर आणि गुडघे काळवंडणे, हे बहुतेकदा कडक त्वचेमुळे होते. या भागांवर नेहमीच घर्षण होते, ज्यामुळे तेथील त्वचा जाड आणि काळी पडते.

उपाय

लिंबू आणि बेकिंग सोडा : कोपर आणि गुडघ्यांवरील काळे डाग सौम्य करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण प्रभावी ठरते. अर्ध्या लिंबावर बेकिंग सोडा पसरवा आणि प्रभावित भागांवर चोळा. ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून काळे डाग सौम्य करते.

कोरफड जेल : कोरफड जेल केवळ त्वचेचा रंग सुधारत नाही तर त्याला ओलावा आणि पोषणदेखील मिळवून देते. कोरफड जेल थेट गुडघ्यावर आणि कोपरांवर लावा आणि २० मिनिटांनी धुवा. ते दररोज वापरा.

मानेचा काळपटपणा

बहुतेकदा अशुद्धता आणि धुळीमुळे मान काळवंडते. त्वचा स्वच्छ न करणे किंवा नियमित काळजी न घेतल्याने देखील मानेचा रंग असमान होऊ शकतो.

उपाय

दूध आणि बेसन : दूध हे एक नैसर्गिक क्लिंजर आहे तर बेसन त्वचेला खोलवर स्वच्छ करते. दूध आणि बेसन मिसळून पेस्ट बनवा आणि ती मानेवर लावा.

लिंबू आणि गुलाबजल : लिंबाचा रस आणि गुलाबजल एकत्र मिसळून दररोज रात्री झोपण्यापूर्वी मानेवर लावा. यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते आणि काळे डाग दूर होतात.

काख काळी पडणे

अतिरिक्त घाम येणे, काखेतील केस काढणे आणि कडक डिओडोरंट्सचा वापर यासारख्या अनेक कारणांमुळे अंडरआर्म्स म्हणजे काख काळी पडू शकते.

उपाय

बटाट्याचा रस : बटाटा हा एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. बटाट्याचा रस काखेत लावा आणि १५-२० मिनिटांनी धुवा. यामुळे काळेपणा दूर होण्यास मदत होते.

अॅपल सायडर व्हिनेगर : अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये आम्लयुक्त गुणधर्म असतात, जे त्वचा स्वच्छ करण्यास आणि मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. ते पाण्यात मिसळून काखेतील काळपट भागावर लावा आणि काही वेळाने धुवा.

टी ट्री ऑईल आणि पाणी : टी ट्री ऑईल म्हणजे चहाच्या झाडाच्या तेलात अँटीसेप्टिक आणि जीवजंतूविरोधक गुणधर्म असतात, जे काखेच्या आतील भागांना ताजेतवाने करतात तसेच त्वचेचा रंग सुधारतात. पाण्यात चहाच्या झाडाच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि काखेच्या आतील भागांवर लावा.

पावसाळ्यात मेकअप खराब होऊ नये यासाठी या टिप्स फॉलो करा

* शिखा जैन

पावसाळ्यातील मेकअप टिप्स: उन्हाळा असो वा पावसाळा, आपण मेकअप करायला विसरत नाही. पण जेव्हा पावसात मेकअप पसरू लागतो, तेव्हा तो एक समस्या बनतो आणि तुमचा चेहरा खराब दिसू लागतो. म्हणून, पावसात मेकअप खराब होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या:

क्रीम-आधारित मेकअप वापरणे टाळा

पावसाळ्यातील जास्त आर्द्रतेमुळे, क्रीम-आधारित उत्पादने खूप चिकट होतात. त्यामुळे, पावसाळ्यात त्यांचा वापर जपून करा. जर तुम्हाला ते वापरावेच लागले, तर ते व्यवस्थित मिसळून घ्या. क्रीम-आधारित मेकअप उत्पादने पावडरच्या घटकांसोबत मिसळून वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत होईल.

स्वच्छतेकडेही लक्ष द्या

पावसाळ्यात जास्त मेकअप करणे टाळा. याव्यतिरिक्त, तुमच्या त्वचेची विशेष काळजी घ्या. नेहमी हात धुवा आणि क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करा. दमटपणामुळे जास्त घाम येऊ शकतो, ज्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. शिवाय, जास्त फाउंडेशन लावणे टाळा.

ब्लश कसा लावावा

जास्त ब्लश लावल्याने तुमचा चेहरा जास्त मेकअप केल्यासारखा दिसू शकतो. पावसाळ्यात लिक्विड ब्लश तुमच्या गालांवर सहज पसरू शकतो. फ्रेश आणि सॉफ्ट लूकसाठी हलका, नैसर्गिक ब्लश लावा.

योग्य मेकअप उत्पादने निवडा

फक्त वॉटरप्रूफ उत्पादने निवडा. यासाठी तुम्ही मॅट कॉम्पॅक्ट्स आणि वॉटरप्रूफ लायनर्स वापरू शकता. पावसाळ्यात हेवी मॉइश्चरायझर्स, तेलकट फाउंडेशन आणि क्रीम-आधारित कलर्स वापरणे टाळा. तसेच, मस्करा लावणे टाळा.

तुमच्या चेहऱ्यावर बर्फ लावा

पावसात मेकअप लावण्याच्या १० मिनिटे आधी तुमच्या चेहऱ्यावर बर्फ लावा. यामुळे तुमचा मेकअप पसरणार नाही आणि तो जास्त काळ टिकण्यास मदत होईल.

प्रायमर लावा

मेकअप लावण्यापूर्वी तुमच्या त्वचेवर प्रायमर वापरल्याने तुमचा मेकअप चांगल्या प्रकारे टिकून राहण्यास आणि सेट होण्यास मदत होईल. तुमच्याकडे प्रायमर नसल्यास, तुम्ही प्रायमर म्हणून कोरफडीचा गर (ॲलोवेरा जेल) वापरू शकता. यामुळे तुमचा चेहरा व्यवस्थित सेट होण्यासही मदत होते.

तसेच, एक गुळगुळीत बेस तयार करण्यासाठी आणि अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करण्यासाठी मेकअप करण्यापूर्वी मॅटिफायिंग प्रायमर लावा. यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकण्यासही मदत होईल.

फाउंडेशन हलके असावे

पावसाळ्यात लिक्विड फाउंडेशन वापरणे टाळा. पावडर फाउंडेशन वापरा. यामुळे चिकटपणा टाळण्यास मदत होईल. दमटपणा आणि पावसाचा सामना करण्यासाठी, हलके, वॉटरप्रूफ फाउंडेशन निवडा. यामुळे तुमचा मेकअप जागेवर टिकून राहण्यास मदत होईल.

आयशॅडो, आयलाइनर आणि मस्कारा

पावसाळ्यात, तुमचा बाकीचा मेकअप कमीत कमी ठेवणे आणि तुमचे डोळे व ओठ हायलाइट करणे ही एक चांगली कल्पना आहे. यासाठी चमकदार, वॉटरप्रूफ आयशॅडो निवडा. याव्यतिरिक्त, वॉटरप्रूफ आयलाइनरने तुमचे डोळे डिफाइन करा. तुमच्या पापण्या मोठ्या दिसण्यासाठी वॉटरप्रूफ मस्काराने त्यांना कर्ल करा.

सेटिंग स्प्रेने तुमचा मेकअप सेट करा

पावसाळ्यात जेव्हाही तुम्ही मेकअप करता, तेव्हा तो सेटिंग स्प्रेने सेट करा. मेकअप लावण्यापूर्वी सेटिंग स्प्रे वापरा. मेकअप करून झाल्यावर सेटिंग स्प्रे लावा. यामुळे पावसात तुमचा मेकअप पसरणार नाही.

फक्त मॅट लिपस्टिक वापरा

काही लिक्विड लिपस्टिक्स पावसाळ्यात लवकर पसरतात, ज्यामुळे ओठ अस्ताव्यस्त आणि केकी दिसतात. जास्त काळ टिकणारी, मॅट लिपस्टिक वापरा. यामुळे तुमचे ओठ जास्त काळ चांगले दिसतील. पावसाळ्यासाठी जास्त काळ टिकणारे मॅट टोन्स किंवा क्रीम मॅट लिप कलर्स आदर्श आहेत.

खूप गडद लिपस्टिक लावल्याने तुम्ही वयस्कर आणि प्रौढ दिसू शकता. गुलाबी रंगाच्या छटा वापरणे उत्तम. तुम्ही लिप ग्लॉस देखील वापरू शकता, ज्यामुळे तुम्हाला तरुण दिसण्यास मदत होईल.

हवामानानुसार योग्य हेअरस्टाईल

पावसाळ्यात मोकळे केस तुटण्याची शक्यता असते आणि ते वापरण्यायोग्य राहत नाहीत. त्यामुळे, पोनीटेल किंवा तुमच्या केसांच्या प्रकाराला शोभेल अशी हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न करा. वेणीची केशभूषा देखील शक्य आहे, कारण ती पावसातही टिकू शकते.

हायड्रा फेशियल फेअरनेस ट्रीटमेंट

* चंद्रकला

मुले असोत किंवा मुली, सर्वांनाच मुलायम, गोरी, तेजस्वी आणि तरुण त्वचा हवी असते. तेजस्वी आणि चमकदार त्वचेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. भारतात, चमकदार आणि गोऱ्या त्वचेची क्रेझ् शतकानुशतके आहे, ज्यामुळे फेअरनेस क्रीम कंपन्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींद्वारे भरपूर पैसे कमावले आहेत. तुम्हीही महिन्यातून एक किंवा दोनदा पार्लरमधून फेशियलसारख्या गोष्टी करून घेत असाल. नवीन तंत्रज्ञानामुळे या क्रेझला चालना मिळू लागली आहे. याचे एक उदाहरण म्हणजे बाजारात आलेला हायड्रा फेशियल, जो तुमचा चेहरा अनेक पातळ्यांवर गोरा बनवतो. चला, याबद्दल जाणून घेऊया :

हायड्रा फेशियल म्हणजे काय?

हायड्रा फेशियल हे एक कॉस्मेटिक तंत्र आहे, जे त्वचेला स्वच्छ आणि हायड्रेट करण्यासाठी एका विशेष उपकरणाचा वापर करते. हे सहसा छिद्रे स्वच्छ करण्यासाठी आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी तसेच त्वचेला चमकदार बनवण्यासाठी वापरले जाते.

हे त्वचेची छिद्रे मोकळी करून आणि उघडून सुरू होते आणि नंतर ग्लायकोलिक अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड तसेच अनेक वनस्पति घटकांच्या मिश्रणाचा वापर करून त्वचेला अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी तयार करते.

हायड्रा फेशियलचे फायदे काय आहेत?

हायड्रा फेशियल त्वचेला एक तेजस्वी लूक देते. त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते. आधुनिक उपकरणांच्या मदतीने मृत त्वचा काढून टाकली जाते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास मदत करते

हायड्रा फेशियल ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास देखील मदत करते. जर तुमच्या त्वचेवर खूप ब्लॅकहेड्स असतील तर तुम्ही हायड्रा फेशियल वापरू शकता. ते ब्लॅकहेड्सचे मुख्य कारण असलेली मृत त्वचा काढून टाकते. फेशियल करताना वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या मदतीने त्वचा एक्सफोलिएट होते आणि ब्लॅकहेड्स दूर करता येतात.

वृद्धत्वविरोधी म्हणून काम करते

हायड्रा फेशियल वृद्धत्वविरोधी म्हणूनही काम करते. हायड्रा फेशियल केल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. एका अभ्यासानुसार, हायड्रा फेशियल त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्या इत्यादी वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यास मदत करते.

दुष्परिणाम आणि खबरदारी

जरी हायड्रा फेशियलला दुष्परिणाम नसतात असे म्हटले जाते, परंतु ते करण्यापूर्वी, तुम्ही या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.

* जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर तुम्ही एकदा त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

* खूपच जास्त मुरुमे असतील तरी एकदा फेशियल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

* गर्भधारणेदरम्यान, शरीराशी संबंधित कोणत्याही प्रकारचे उपचार घेण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

* फेशियल करण्यापूर्वी आणि नंतर घ्यावयाच्या खबरदारीची काळजी घ्या. असे न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

शरीरावर कोणताही अनावश्यक उपचार करण्यापूर्वी, कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येक व्यक्तीचे शरीर एकमेकांपेक्षा वेगळे असते, त्यामुळे उपचारांचे फायदे आणि तोटे देखील वेगळे असणे स्वाभाविक आहे.

सौंदर्य प्रसाधने आणि मेकअप उत्पादने तुमच्या डोळ्यांवर कसा परिणाम करतात ते जाणून घ्या

* मोनिका अग्रवाल

सौंदर्य प्रसाधनांचे धोके : आपल्या सर्वांना माहित आहे की मेकअप उत्पादनांच्या वापरामुळे आपल्या त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते, परंतु अशा सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांना सर्वाधिक त्रास होतो. आपण आपल्या डोळ्यांसाठी आयलाइनर, मस्करा इत्यादी अनेक प्रकारची उत्पादने वापरतो, परंतु जर ही उत्पादने काळजीपूर्वक वापरली नाहीत, तर ती तुमच्या डोळ्यांचे मोठे नुकसान करू शकतात. त्यांचा चुकीच्या पद्धतीने किंवा अतिवापर केल्यास डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो किंवा दाह (सूज)सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. चला जाणून घेऊया की या उत्पादनांच्या वापरामुळे तुमच्या डोळ्यांवर कसा परिणाम होऊ शकतो आणि हा परिणाम टाळण्यासाठी काही टिप्स.

काजळ आणि आयलाइनरचे हानिकारक परिणाम : काजळ आणि आयलाइनर वापरल्याने तुमच्या पापण्यांमधील ग्रंथी बंद होऊ शकतात. यामुळे दाह (सूज) होऊ शकतो. जर ही समस्या दीर्घकाळ टिकली, तर तुम्हाला डोळे कोरडे पडण्याचा अनुभव देखील येऊ शकतो.

मस्करा आणि आय शॅडो : ग्लिटर, आय शॅडो आणि मस्करा यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास नेत्रश्लेष्मशोथ (conjunctivitis) होऊ शकतो. तुम्हाला सूज आणि त्वचेचा रंग बदलणे (pigmentation) याचाही अनुभव येऊ शकतो.

कृत्रिम पापण्या (Faux eyelashes) : या पापण्या गोंदाने तुमच्या पापण्यांना चिकटवल्या जातात. गोंदामुळे तुमच्या संवेदनशील त्वचेला त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला त्यांचा योग्य वापर कसा करायचा हे माहित नसेल, तर गोंद तुमच्या डोळ्यात जाऊ शकतो, ज्यामुळे त्वचारोग (dermatitis) किंवा ॲलर्जीचा धोका वाढतो.

कॉन्टॅक्ट लेन्स : कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यामुळे तुमच्या डोळ्यात इतर वस्तू अडकू शकतात, ज्यामुळे डोळ्यांच्या गंभीर संसर्गाचा धोका वाढतो.

डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी सूचना

* तुमच्या डोळ्यांवर कधीही कालबाह्य झालेली किंवा खराब झालेली उत्पादने वापरू नका.

* मेकअप लावण्यापूर्वी, तुमचे डोळे आणि चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.

* तुमची स्वतःची साधने आणि मेकअप वापरा. दुसऱ्या महिलेची उत्पादने तुमच्या डोळ्यांवर वापरू नका.

* कोणताही मेकअप लावण्यापूर्वी, तुम्ही प्रथम कॉन्टॅक्ट लेन्स काढून टाकाव्यात.

* जर तुम्हाला डोळ्यांचा संसर्ग झाला असेल किंवा डोळे लाल झाले असतील, तर लेन्स अजिबात घालू नका.

* संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी, तुमची उत्पादने दर ६ ते ८ महिन्यांनी बदला.

* तुमची मेकअपची उत्पादने थंड ठिकाणी ठेवा, जेणेकरून त्यात जीवाणूंचा (बॅक्टेरियाचा) प्रादुर्भाव होणार नाही.

* झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप काढा आणि मेकअप लावण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्स काढा. या गोष्टी घालून कधीही झोपू नका.

* जर तुम्हाला आधीच संसर्ग झाला असेल, तर डोळ्यांचा मेकअप वापरणे टाळा.

* जर तुम्ही फक्त अधूनमधून मेकअप वापरत असाल आणि उत्पादने काळजीपूर्वक लावत असाल, तर तुम्ही कोणत्याही हानीशिवाय सहजपणे मेकअप वापरू शकता. तथापि, जर तुमच्या व्यवसायामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मेकअप वापरावा लागत असेल, तर तुम्ही सुरक्षिततेच्या सूचनांचे नक्कीच पालन केले पाहिजे.

पावसाळ्यात कशी घ्यायची टाळूची काळजी

* प्रियंका यादव

केस आपल्या एकूण लुकला अधिक सुंदर बनवण्याचे काम करतात, पण जेव्हा केस स्वत:च चिकट होतात तेव्हा काय होते? पावसाळ्यात हे अनेकदा घडते. वातावरणातील आर्द्रतेमुळे केस चिकट होतात आणि चिकट केसांमुळे केवळ तेलकटपणा येत नाही तर आपले सौंदर्यही खराब होते.

याशिवाय, पावसाळ्यात महिलांना टाळूशी संबंधित समस्या उद्भवू लागतात, ज्यामुळे केसांना सतत खाज सुटते, शिवाय, हवामानातील आर्द्रतेमुळे, डोक्यात कोंडा तयार होऊन त्वचेचा संसर्ग होतो. यामुळे केसांचे नुकसान तर होतेच, शिवाय त्यांची वाढही मंदावते.

केस वारंवार धुवू नका

पावसाळ्यात केस वारंवार धुवू नयेत. केस जास्त धुण्यामुळे टाळूमध्ये ओलावा येतो. पावसाळ्यामुळे वातावरणात आधीच ओलावा असतो. आर्द्रता आणि वारंवार केस धुण्यामुळे केस तेलकट दिसू लागतात आणि या काळात जास्त गळू लागतात.

या समस्या टाळण्यासाठी, तुमचे केस वारंवार धुवू नका आणि केसांमध्ये अतिरिक्त ओलावा जमा होऊ देऊ नका. आठवड्यातून ३-४ वेळेपेक्षा जास्त केस धुवू नका.

कठोर शाम्पूंना नाही म्हणा

शाम्पू करताना, तुम्ही वापरत असलेला शाम्पू कठोर नाही, याची विशेष काळजी घ्या. असा शाम्पू तुमच्या केसांसाठी आणि टाळूसाठी चांगला नसतो. असा शाम्पू वापरल्याने केसांचा नैसर्गिक रंग फिका पडू शकतो.

शिवाय, यामुळे अॅलर्जीदेखील होऊ शकते. कठोर शाम्पूचा जास्त वापर केल्याने पुरळ किंवा खाजदेखील येऊ शकते. म्हणून, केसांना असा शाम्पू लावू नका.

अॅप्पल सायडर व्हिनेगरवरयुक्त शाम्पू

पावसाळ्यात, टाळूवर भरपूर ओलावा जमा होतो, ज्यामुळे केसांची पीएच पातळी बिघडते. तुमचे केसही चिकट दिसू लागतात. हे टाळण्यासाठी तुम्ही अँप्पल सायडर व्हिनेगरपासून बनवलेले शाम्पू वापरू शकता. यासाठी तुम्ही वावचे अँप्पल सायदर व्हिनेगर खरेदी करू शकता.

स्कॅल्प स्क्रब वापरा

ज्याप्रमाणे आपण आपला चेहरा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी स्क्रब वापरतो, त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसात आपल्या टाळूचीदेखील अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. यासाठी स्कॅल्प स्क्रब वापरता येईल.

केसांना तेल नक्की लावा

पावसाळ्यात त्वचेसोबतच केसांनाही भरपूर पोषणाची आवश्यकता असते. केसांना असे पोषण तेल लावल्यामुळे आणि खोलवर कंडिशनिंगद्वारे मिळते. यासाठी तुम्ही दर आठवड्याला केसांना तेल लावा. दर १५ दिवसांनी तुमचे केस डीप कंडिशन करा.

ओले केस स्वच्छ पुसून घ्या

मान्सून येताच मुसळधार पाऊस सुरू होतो. पावसाचे पाणी केसांसाठी हानिकारक ठरते, कारण त्यात पीएच पातळी जास्त असते. अशा परिस्थितीत, जर तुमचे केस पावसात ओले झाले तर तुम्ही ते ताबडतोब शाम्पू करा.

केसांना नैसर्गिकरित्या सुकू द्या

अनेक महिला दररोज केसांवर ब्लो ड्रायर आणि हीटिंग स्प्रे वापरतात.

पावसाळ्यात ब्लो ड्रायिंग केल्याने केस अधिक कुरळे होतात.

ते आपले केस आणि टाळू कोरडी बनवते. ब्लो ड्रायर आणि हीटिंग स्प्रे वापरा, पण जास्त नको. केस नैसर्गिकरित्या सुकू द्या.

ओले केस विंचरू नका

पावसाळ्यात ओल्या केसांना फणीने विंचरण्याची चूक करू नका. जर तुम्ही केस विंचरले तर तुमचे केस गळायला आणि तुटायला सुरुवात होईल.

म्हणूनच, ओले केस विंचरू नका. लक्षात ठेवा की, जेव्हा तुमचे केस ओले असतील तेव्हा सर्वात आधी ते टॉवेलने चांगले पुसून घ्या. केस पूर्णपणे कोरडे झाल्यावरच फणीचा वापर करा.

सुंदर दिसणे हा तुमचा हक्क

* भावना खाकर ‘भावू’

‘‘सुंदर मुली, तुझ्या लावण्यावरील मरगळ दूर सार, तुझे सौंदर्य घायाळ करणारे आहे, तू स्वत:ला सावर, अशी कशीही फिरू नकोस, नीटनेटका साजशृंगार करून तुझे सौंदर्य खुलव.’’

यात काहीच शंका नाही की, मेकअप करून स्वत:ला सुंदर ठेवल्याने तुमची प्रतिमा, तुमचे व्यक्तिमत्त्व आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. जास्त काही करू नका, फक्त पार्लरमध्ये जा आणि भुवया तसेच केस कापून घ्या आणि मग घरी येऊन आरशात स्वत:ला पाहा. तुम्ही स्वत:च्याच प्रेमात पडाल. तुम्हाला बाहेर जायचे असेल तर खूप नटून – थटून जाण्याऐवजी फक्त गडद रंगाची लिपस्टिक आणि काजळ लावा तसेच केस मोकळे सोडा.

सुंदर आणि आत्मविश्वासू

सौम्य मेकअप आणि महिन्यातून एकदा पार्लरला गेल्याने सर्वसामान्य दिसणारी महिलाही सुंदर आणि आत्मविश्वासू बनते. असे असेल तर नीटनेटके राहून आकर्षणाचा केंद्र बिंदू बनण्यात काय नुकसान आहे? हे देखील तितकंच खरं आहे की, पार्लरमध्ये जाण्याऐवजी घरगुती उपाय करूनही तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवू शकता.

महिलेने सौंदर्याप्रती जागरूक असणे, हे सुखी वैवाहिक जीवनाचे कारण ठरू शकते. संध्याकाळी पती थकून घरी परततो, तेव्हा त्याची नीटनेटकी, साजशृंगार केलेली पत्नी पाहून त्याचा सगळा थकवा निघून जातो. विचार करा, कंबरेला पदर खोचून, केसांचा घट्ट अंबाडा, मिरच्या, मसाले, फिनाईल आणि घामाचा वास घेऊन समोर उभी असलेली पत्नी पाहून पतीला बरे वाटेल का?

या कामासाठी फक्त 2 मिनिटे लागतात. आपले हात आणि चेहरा धुवा, केस विचरा. टिकली आणि डोळ्यांना काजळ लावा. बस, तुमचा साजशृंगार पूर्ण झाला. जेव्हा तुम्ही दररोज असा साजशृंगार करून तुमच्या पतीची मैत्रीण बनाल, जेव्हा सर्वजण तुमच्या अशा सुंदर राहणीमानाचे, साजशृंगाराचे कौतुक करतील तेव्हा तुमच्या पतीला तुमचा नक्कीच अभिमान वाटेल.

मुले काही कमी नाहीत

‘मिस्टर इंडिया’ ते ‘मिस्टर युनिव्हर्स’पर्यंत आता पुरुषही अशा स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळेच सध्याच्या काळातील ब्युटी पार्लरची वाढती संख्या आणि पुरुषांसाठी जीमची वाढती संख्या हे दर्शविते की, ते देखील स्वत:ला आकर्षक दिसण्याच्या प्रयत्नात मागे राहू इच्छित नाहीत, कारण आता मुलींनाही तीच मुलं आवडतात जी स्वत:ला सुंदर ठेवतात.

दाढीची स्टाईल, केशरचना, केसांचा रंग, कानात घालणे, पोनीटेल ठेवणे, कपड्यांमध्ये स्टाईल इ. इतकेच काय, आता मुलांना मॉइश्चरायझर्स, पौष्टिक क्रीम, आफ्टर शेव्ह क्रीम्स, लोशन, लिप बाम, सनस्क्रीन, हेअर क्रोम्स आणि हेअर जेलबद्दल माहिती आहे आणि ते हे सर्व वापरतात.

तुमच्या शरीरातील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग करणे, यामध्ये हात, पाय, काख आणि छातीच्या वॅक्सिंगचाही समावेश आहे. मुलांची त्वचा लक्षात घेऊन विविध प्रकारचे क्लीनअप आणि फेशियल केले जात आहे. त्यांचे हात-पाय स्वच्छ ठेवण्यासाठी काही महिन्यांच्या अंतराने ते मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करून घेत आहेत.

असे असेल तर मग आम्हा महिलांनीही सुंदर दिसायलाच हवं. तर मग तुम्ही कशाची वाट पाहात आहात? आपण आपला मोबाईलदेखील अपडेट करतो. हा तर आपल्या व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे.

अशी घ्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी

* प्रियंका यादव

धूळ, सनबर्न, टॅनिंग या अशा समस्या आहेत ज्यांना पुरुष असो किंवा महिला, प्रत्येकालाच उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणं खूप गरजेचे असते. बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत ज्यांचा समावेश दैनंदिन दिनचर्येत केला तर तुमच्या चेहऱ्याला एक वेगळीच चमक येईल.

ही उत्पादने कोणती आहेत, चला जाणून घेऊया :

वेस्ट क्लींजिग बँड

बायोटिक बायो बेरीबेरीचे हायड्रेटिंग क्लीन्सर – यामुळे तुमची त्वचा चमकदार, स्वच्छ, मुलायम आणि कोमल होते. याची किंमत २१० रुपये आहे. यात १२० मिली क्लीन्सर असते.

प्लम क्लिंजिंग लोशन – हे क्लिंजिंग लोशन त्वचा चमकदार आणि मुलायम बनवते आणि त्वचेचे पोषणदेखील करते. याच्या २०० मिली बाटलीची किंमत रुपये ३७० आहे.

व्हीएलएलसी सँडल क्लॉगिंग मिल्क – हे त्वचेतील घाण साफ करण्यास आणि ती तेलमुक्त करण्यास मदत करते. याची किंमत रुपये २०५ आहे.

ऑक्सिग्लो ग्लो व्हेरा क्लीनिंग मिल्क – हे सर्वोत्कृष्ट क्लीन्सरच्या यादीत समाविष्ट आहे, जे सायट्स आणि कोरफड व्हेरापासून बनवले जाते. कोरफड त्वचेला मॉइश्चरायझर करते आणि मऊ बनवते. त्वचा आतून स्वच्छ करते. याच्या १२० मिली बाटलीची किंमत रुपये १४० आहे.

लॉरियल पॅरिस ग्लायकोलिक ब्राईट फेस क्लीन्सर – याचा वापर करून त्वचा उजळ, चमकदार आणि निरोगी बनवता येते. हे त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि काळे डाग कमी करते. त्यामुळे पुरळ, पुटकुळ्यांसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. याच्या १०० मिली बाटलीची किंमत रुपये ३२९ आहे.

या व्यतिरिक्त, बाजारात इतर अनेक उत्कृष्ट क्लिंजिंग उत्पादने उपलब्ध आहेत.

मॉइश्चरायझर

पौंड्स सुपर लाइट जेल मॉइश्चरायझर : यात तेल नसलेला जेल फॉर्म्युला आहे. हे सौम्य आहे. त्यामुळे त्वचेला २४ तास मॉइश्चरायझेशन मिळते. याची किंमत रुपये ११९ आहे.

न्यूट्रोजेना ऑइल फ्री फेशियल मॉइश्चरायझर : हे अल्कोहोल फ्री आहे आणि अँलर्जीची चाचणीदेखील केली जाते. याची किंमत रुपये ३६७ आहे.

बायोटिक बायो मॉर्निंग नेचर सनस्क्रीन अल्ट्रा सुदिंग फेस लोशन : हे लोशन एसपीएफ ३० सह येते. हे सनस्क्रीनचेही काम करते. याच्या १२० मिली बाटलीची किंमत रुपये १४८ आहे.

लॅक्मे पीच मिल्क मॉइश्चरायझर : हे खूप सौम्य आहे आणि एसपीएफ २४ सह येते. हे मॉइश्चरायझर त्वचेत शोषले जाते. ते लावल्यानंतर १२ तास पुन्हा मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही.

याशिवाय इतरही अनेक मॉइश्चरायझर्स बाजारात उपलब्ध आहेत.

सनस्क्रीन

ब्रिटन यूवी डॉक्स सनस्क्रीन लोशन : हे यूवीए, यूवीबी किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. याची किंमत रुपये १,०८० आहे.

न्यूट्रोजेना अल्ट्रा शीअर ड्राइटचे सनब्लॉक : हे एसपीएफ ५०+ सह येते. या सनस्क्रीनमधील ड्राइटचे वैशिष्ट्य म्हणजे ते मॅट फिनिश देते. हे सनस्क्रीन वृद्धत्वाची चिन्हे आणि सूर्यकिरणांपासून होणारे नुकसान टाळण्यास देखील मदत करते. याची किंमत रुपये २९९ आहे.

ला शील्ड सनस्क्रीन जेल : हे जेल असलेले सनस्क्रीन आहे. यात यूवीए आणि यूवीबी फिल्टरचा समावेश आहे. हे अतिशय चांगल्या प्रकारे एसपीएफ 50+++ पीए संरक्षण मिळवून देते. याची किंमत रूपये ९८८ आहे.

ममाअर्थ हाइड्राजेल इंडियन सनस्क्रीन : या सनस्क्रीनमध्ये एसपीएफ ५० आणि जेल आधारित फॉर्म्युला आहे. हे त्वचेला हायड्रेटदेखील करते. याची किंमत रुपये ३९९ आहे.

याशिवाय इतरही अनेक सनस्क्रीन बाजारात उपलब्ध आहेत.

ही सर्व उन्हाळी सौंदर्य उत्पादने कोणत्याही मेडिकल आणि कॉस्मेटिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतात. याशिवाय ती ऑनलाइनही उपलब्ध आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें