सौभाग्यवतीचा अविश्वास प्रस्ताव

* सुशील यादव

‘‘अहो, काय झालेय? तुम्ही पूर्वीसारखे नाही राहिलात,’’ एका वाक्यात सौभाग्यवतीने प्रस्ताव मांडला.

सरकार कोसळणार, अशी अपेक्षा आम्ही करू लागलो.

‘‘वेडे, अगं ४० वर्षांनंतर तुला असे वाटलेच कसे?’’

‘‘मी विकासाची कितीतरी कामं केली. तू मात्र सर्व चुलीत टाकलीस ना?’’

‘‘काय कमी आहे तुझ्या सरकारात?’’

‘‘त्यानंतर आम्ही आमच्या सरकारची म्हणजे आमची बाजू मांडू. मग समजून जा की, धावणाऱ्या गाडीचे चाक अचानक थांबेल.’’

आम्ही असा सूचक इशारा देऊनही ती अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करते. यावेळीही तिने तसेच केले असते, पण आम्ही जरा भावनांमध्ये वाहून थोडे जास्तच बोललो होतो. त्यामुळे या प्रकरणात आम्ही दाम्पत्य जीवनातील शांतता भंग केली होती.

आम्हाला माहीत होते की, आमचे हृदय पाझरले तर सौभाग्यवतीचा राग पेटून उठेल.

तिला शांत करण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही म्हणालो, ‘‘सेवानिवृत्तीपूर्वी आम्ही कमवायचो. बैलासारखे कामावरून थेट घरी यायचो. येताना आमच्यासोबत कितीतरी समस्या कामावरून घरी येऊन आदळण्याच्या प्रयत्नात असायच्या त्यांना आम्ही कसेबसे रोखून धरायचो. आताही आम्ही तुझ्या आज्ञेबाहेर नाही. मग तुम्ही पूर्वीसारखे नाही राहिलात, असे तू कसे म्हणू शकतेस?’’

‘‘चल, निदान आधीचे चांगले गुण तरी सांग. अवगुण नंतर ऐकून ठरवू की, नेमके काय बदलले आहे? आज लग्नाच्या ४० वर्षांनंतर तू विरोधी पक्षासारखे खूप मोठे तोंड उघडलेस.’’

‘‘जेव्हा हनिमूनला गेलो होतो तेव्हा तुम्ही माझ्या मागे-पुढे करून सर्व कामं स्वत:च करत होता. बॅगा घेणे, हॉटेलमध्ये काही मागवण्यापूर्वी माझी आवड विचारणे, शॉपिंग मॉलमधून मी केलेल्या खरेदीचे भरभरून कौतुक करणे, वेणू, तुझी पसंत खूपच सुंदर आहे, असे कौतुकाने बोलणे… मी भारावून जायचे. तुम्ही असेही म्हणायचात की, तुझी निवड उत्तम आहे.’’

‘‘म्हणूनच तर आमची निवड केलीत ना?’’

‘‘सगळे पुरुष लग्न झाल्यावर सुरुवातीला असेच वागतात का?’’

आम्ही म्हटले, ‘‘वेणू, काही वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते, जेव्हा नवरा नवी गाडी घेतो तेव्हा त्या गाडीत पत्नीला बसवताना स्वत: दरवाजा उघडतो. ते पाहून लोक २ निष्कर्ष काढतात. एकतर गाडी नवीन असेल किंवा बायको नवी नवरी असेल.’’

आमच्या या विनोदाची छाप सौभाग्यवतीवर पडू शकली नाही. तिने लगेचच दुसरा प्रहार केला. ‘‘अहो, लग्नानंतर सुरुवातीला तुमची परिस्थिती आपल्या राज्यासारखी होती. चांगले कपडे घालायची तुम्हाला माहिती नव्हती. साधी खाण्याची चव कळत नव्हती. मी फक्त खाण्याची चव म्हणाले, पिण्याची चव तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुरुवातीपासूनच चाखत होता. मी तुमच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले नसते तर भोपळयासारखे फुगला असता.’’

‘‘आम्हाला असे टोमणे मारण्याचा, आमची अवहेलना करण्याचा हा अर्धवार्षिक कार्यक्रम मागील काही दिवसांपासून तिमाहीच्या स्तरावर सेन्सेक्सप्रमाणे घसरत चालला आहे. आम्हाला आमची टीआरपी सुधारण्याचा उपाय तेव्हा सूचतो जेव्हा आम्ही काहीतरी जबरदस्त लिहून ते अंकात छापून आणतो. उत्तरादाखल तेच सौभाग्यवतीला दाखवून आम्ही म्हणतो, ‘‘बघ आम्ही लिहिलेले छापून आलेय.’’ त्यावर ती लगेच आर्थिक बाजूवर बोट ठेवून विचारते, ‘‘हे छापून आलेय त्याला किती पैसे मिळणार?’’

‘‘हे लोक आजकाल काही देत नाहीत. ई मेलवर पाठवले तर नखरे करतात. आम्ही मेलवर पाठवलेले घेत नाही, असे थेट सांगतात. त्यांना लिखाणाची मूळ प्रत हवी असते. ती स्पीड पोस्टने पाठवायची म्हणजे एखाद्या गरीब लेखकाचे काय हाल होत असतील हे त्यालाच माहीत.’’

‘‘मी बघत आलेय, जेव्हा कधी मी रागाला वाट मोकळी करून देते तेव्हा तुम्ही तुमच्या साहित्यिक प्रवासाला निघून जाता किंवा याच साहित्याची ढाल बनवून लढण्यासाठी उभे राहता. साहित्यिक शब्दात बोलायला मलाही येते, पण रांधा-वाढा, उष्टी काढण्याच्या कामात ते शब्द चपतीसारखे गोल होऊन फुगतात. तर… मी सांगत होते.’’

‘‘आजकाल तुम्ही बदलला आहात.’’ ती पुन्हा मूळ मुद्दयावर अली. ‘‘वयाची ६० म्हणजे स्वत:मध्ये बदल करण्याची वेळ. सेवानिवृत्तीनंतरच्या फक्त ६ महिन्यांमध्ये अशी अवस्था. घरात आळशासारखे बसून फुकटची बडबड, आता देवच जाणे पुढे काय होणार, अरे देवा, धाव रे आता…’’

‘‘हे पाहा, दिवसभर घरात कोट-टाय घालून भारतातील कुठलाच पुरुष राहू शकत नाही. देशी लुंगी, बनियान किंवा पायजमा घातला की मस्त वाटते. काही पुरुष तर चट्टेपट्टे आलेल्या रंगीत चड्डया घालूनच घरात फिरतात. तू जर याला बदल म्हणत असशील तर हो, आम्ही बदललोय.’’

सौभाग्यवतीला वायफळ गप्पा ऐकून कानांना त्रास करून घ्यायचा नव्हता. त्यामुळे तिने शेवटचे हत्यार म्हणजे जणू ब्रम्हास्त्र बाहेर काढले. रागाने विचारले, ‘‘आजची तारीख किती?’’

मी अगदी सहजपणे सांगितले, ‘‘६ ऑगस्ट, कालच तर बँकेत जाऊन घर खर्चासाठी लागणारे पैसे काढून तुला दिले होते ना? बुद्धीला चालना देत मी आठवून सांगितले.’’

ती दातओठ चावत रागाने म्हणाली, ‘‘नुसतीच ६ ऑगस्ट… मग काल किती होती?‘‘

मी निरागसपणे म्हटले, ‘‘एक दिवस आधी म्हणजे 5 ऑगस्ट असेल ना…?’’

५ ऑगस्ट आठवतच माझे शब्द अडखळले, ‘‘प्रिये, क्षमा कर, आम्हाला अगदी परवापर्यंत तुझा वाढदिवस व्यवस्थित लक्षात होता. आम्ही आराधना ज्वेलर्सकडे १ तारखेलाच जाऊन तुझ्यासाठी नवीन डिझाईनचा हार बनवायला दिलाय. हा तोच हार आहे जो आम्ही सेवानिवृत्त व्हायच्या आधी तू सतत त्या ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर उभी राहून काचेतून बघायचीस. त्याचवेळी आम्ही स्वत:शीच निर्धार केला होता की, सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या तुझ्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही तुला तोच हार भेट देऊ.’’

सौभाग्यवतीच्या निराश चेहऱ्यावर थोडासा आत्मविश्वास झळकला. ती आमच्या पाया पडण्यासाठी वाकली. आम्ही तिचा हात धरून तिला छानसे आलिंगन दिले. प्रेमाने विचारले, ‘‘दर वाढदिवसाला आमच्या पाया पडतेस, मग काल काय झाले होते…?’’

‘‘जर पाया पडली असतीस तर आमच्या चटकन लक्षात आले असते…’’

‘‘मला हे बघायचे होते की, माझे विसरभोळे राम काय, काय विसरू शकतात…? त्यामुळेच मी मौन बाळगले होते. तुम्हाला आठवण व्हावी म्हणून बरेच प्रयत्न केले, पण तुम्ही तुमच्याच विश्वात हरवलेले असता.’’

‘‘चला, ज्वेलर्सकडे जाऊया, नाहीतर…’’ मी निघायची तयारी करत म्हटले.

‘‘मुलांनी शुभेच्छा दिल्या?’’

सौभाग्यवतीचा आनंदाने फुललेला चेहरा अचानक कोमेजला. ती निराशपणे म्हणाली,

‘‘आजकाल सर्व स्वत:च्याच जगात मग्न असतात… माहीत नाही, त्यांच्या लक्षात असेल का?’’

आम्ही म्हटले, ‘‘काही हरकत नाही. आमच्याप्रमाणे तीही विसरली असतील….

आज तू तुला जे काही आवडते ते सर्व खरेदी कर… आम्ही सोबत एटीएम कार्ड घेतले आहे…. बाहेरूनच जेवून येऊया.’’

सौभाग्यवती शांतपणे आमच्या सोबत निघाल्या.

आम्हाला असे वाटले की, जणू आम्ही जिंकलो. अविश्वास प्रस्तावाने अखेरचा श्वास घेतला.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें