महिलांनी कसं घ्यावं पर्सनल लोन

* आदित्य कुमार, संस्थापक व सीईओ, क्यूबेरा
पर्सनल लोन हे कर्ज असते, ज्याच्यासाठी काहीही गहाण ठेवावे लागत नाही.
यामुळेच सुरक्षित कर्जाच्या तुलनेत याचे व्याज दर थोडे जास्त असतात. कर्ज
घेणाऱ्या व्यक्तिचा क्रेडिट स्कोअर, कर्ज फेडण्याचा इतिहास, उत्पन्न आणि त्याची
नोकरी या मापदंडांच्या आधारे निश्चित केले जाते की त्याला कर्ज द्यायचे की
नाही. पर्सनल लोनच्या पात्रतेशी निगडीत काही महत्वपूर्ण गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

चांगला क्रेडिट स्कोअर
पर्सनल लोनसाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे ही पायाभूत गरज आहे. स्त्री
असो की पुरुष, कर्ज देण्याआधी कर्जदाता क्रेडिट स्कोअर पाहतो. दुसरीकडे
फायनान्शियल टेक्नोलॉजी (फिनटेक) युक्त स्टार्टअप कर्जदाता कंपन्या या
अटीवर थोडी सूट देत कमी क्रेडिट स्कोअर असलेल्यांनासुद्धा कर्ज देतात.
फिनटेक कर्जदाता केवळ क्रेडिट स्कोअर पाहत नाही, तर इतर मापदंडसुद्धा
वापरतात आणि अशाप्रकारे अर्जदारांना सबप्राईम क्रेडिट स्कोअरसोबत पर्सनल
लोन मिळण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा देतात.

कर्ज फेडण्याचा इतिहास

दुसरी महत्वाची लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही पर्सनल लोन
घेण्यासाठी जाल तेव्हा जुने कर्ज फेडल्याचा चांगला इतिहास असावा. एखाद्या
व्यक्तिचा रिपेमेंट इतिहास हा अतिशय महत्वाचा मापदंड आहे आणि

अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरमध्ये याचे सर्वात जास्त महत्व असते. अर्जदाराच्या
रिपेमेंट इतिहासामुळे कर्जदाराला त्याचे क्रेडिट बिहेवियर समजून घेण्यास मदत
होते, शिवाय त्याच्या कर्ज परताव्याची क्षमता लक्षात येते. ज्या महिला पर्सनल
लोनसाठी अर्ज करतात, त्यांच्या जुन्या कर्ज परताव्याच्या इतिहासाला सर्वात
जास्त महत्व मिळते.

कंपनीचे स्टेटस
कर्जाचा अर्ज मान्य वा अमान्य करणे खूप महत्त्वाचे असते. खाजगी बँक केवळ
त्याच व्यक्तींना पर्सनल लोन देतात, ज्या ‘ए’ अथवा ‘बी’ श्रेणीच्या कंपनीत
नोकरी करतात. ‘सी’ आणि ‘डी’ श्रेणी असलेल्या कंपनीत नोकरी करणाऱ्यांना
स्वीकारले जात नाही. असे यासाठी की खाजगी बँका क्रेडिट हेल्थची चौकशी व
कंपनीचे रिस्क प्रोफाईलिंग करतात आणि त्यांना त्यानुसार श्रेण्या ठरवतात.
खाजगी बँका या माहितीचा वापर हे जाणून घ्यायला करतात की अर्जदाराची
कर्ज परत करण्याची क्षमता कशी आहे. ‘सी’ आणि ‘डी’ श्रेणीतील कंपन्या नव्या
स्टार्टअप कंपन्या असतात, वा अशा असतात ज्यांच्याकडे पुरेसे नकदी खेळते
भांडवल नसते, म्हणून अशा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांची कर्ज परत
करण्याची शक्यता कमी असते.
फिनटेक कर्जदाता आणि पी २ पी लँडिंग प्लॅटफॉर्मच्या बाबतीत कंपनीच्या
स्टेटसची फार पर्वा केली जात नाही आणि त्यानंतरच कर्ज देण्यात येते. म्हणून
जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित कंपनीत काम करत
नाही या कारणास्तव तुम्हाला कर्ज मिळत नसेल तर तुम्हाला फिनटेक कर्जदाता
अथवा पी २ पी लँडिंग प्लॅटफॉर्मकडे जायला हवे.

नोकरीचे स्थैर्य
वर्तमान संघटनेत तुम्ही किती वर्षांपासून नोकरी करत आहात, हा मुद्दासुद्धा
मापदंडामध्ये समाविष्ट आहे आणि कर्जाच्या स्वीकृतीला प्रभावित करतो.

कर्जदाता हे बघतात की एखाद्या अर्जदाराचा नोकरी करण्याचा रेकॉर्ड किती
स्थिर आहे आणि त्यानुसार मूल्यमापन केले जाते. म्हणून अनेक वर्षांच्या
नोकरीचा अनुभव हे स्पष्ट करतो की अर्जदार कमी जोखीम असणारा आहे
आणि म्हणून कर्ज स्वीकृत होण्याची शक्यता आपोआप वाढते.
कर्जाच्या रकमेचा वापर पर्सनल लोनमध्ये अनेक अॅप्लिकेशन्स समाविष्ट
असतात. एक महिला असल्याकारणाने तुम्ही कर्जाच्या रकमेचा वापर
कुटुंबासोबत आपल्या सुट्ट्या साजऱ्या करायला, मोठे लग्न, घराला नवे रूप
देण्याकरिता अथवा करियरमध्ये प्रगतीच्या हेतूने पुढील शिक्षण घेण्याकरिता करू
शकता.

एकसाथ अनेक कर्जदात्यांकडे जाऊ नका
लोकांना ही गोष्ट माहीत नसते, पण हा पैलू तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट
प्रभाव टाकू शकतो, कारण या कर्जादात्यांच्या मनात अशी प्रतिमा बनेल की
अर्जदार कर्जाचा लोभी आहे, ज्याचा परिणाम अर्ज नाकारण्यात होऊ शकतो. कर्ज
नाकारल्याचाही क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो आणि एकापेक्षा अधिक
नकार आल्यावर कर्ज मिळणे कठीण होते.

सहअर्जदाराचा पर्याय : हा खूपच चांगला निर्णय आहे. विशेषत: महिलांसाठी.
पर्सनल लोन घेताना सहअर्जदाराचा पर्याय निवडणे काही नवी गोष्ट नाही आणि
सगळया प्रकारचे कर्जदार मग खाजगी बँक असो वा फिनटेक, लॅण्डर असो, सगळे
या पर्यायाला अनुमती देत आहेत. सहअर्जदार असल्याने कर्ज फेडण्याचा भार
खूप कमी होतो. शिवाय पारदर्शकतेलाही उत्तेजन मिळते. सह अर्जदाराला गॅरंटर
निवडण्याबाबत आणखी एक चांगली गोष्ट ही आहे की प्रभावी क्रेडिट
स्कोअरशिवाय कर्ज मिळते. मात्र सहअर्जदाराचा क्रेडिट स्कोअर स्वीकारण्यायोग्य
असावा. विशेषत: नोकरदार, विवाहित महिलेसाठी सहअर्जदाराचा पर्याय निवडणे

खूपच फायदेशीर असू शकते. तरीही अर्जदार कर्ज फेडण्यात अयशस्वी झाला तर
सहअर्जदार कर्ज फेडण्याकरिता जबाबदार असेल.

जितके हवे त्यापेक्षा जास्त घेऊ नका
साधारणत: पर्सनल लोन घेणारे या चक्रात अडकतात. क्रेडिट स्कोअर, उत्पन्न
आणि कंपनीचे स्टेटस यांसारख्या मापदंडांच्या आधारावर कर्जदाता अर्जात
लिहिलेल्या रकमेपेक्षा खूप जास्त कर्ज देतात. महत्वाची गोष्ट ही आहे की
जितके तुम्हाला हवे तेवढेच कर्ज घ्या .

पगारदार असल्यामुळे
आजकाल कर्जदाता पगारदार आणि स्वयंरोजगारी दोन्ही प्रकारच्या लोकांना
पर्सनल लोन देण्याची ऑफर देत आहेत. पण फिनटेक कंपन्या आणि पी २ पी
लँडिंग प्लॅटफॉर्म अधिकांश पगारदार लोकांनाच कर्ज देण्याची ऑफर देतात.
म्हणून जर तुम्ही पगारदार महिला असाल आणि कमीतकमी कागदी व्यवहार
करत असाल आणि तुम्हाला लगेच आपल्या बँक खात्यात कर्जाची रक्कम
मिळवायची असेल तर हे तुमच्यासाठी जास्त सोपे आणि सुविधाजनक आहे.

हनिमून संस्मरणीयही बजेटमध्येही

* मोनिका अग्रवाल

लग्न एक सुंदर जाणीव आहे. पूर्वी लग्नानंतर एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी हनिमून ट्रिपला जात असत. परंतु आता डेटिंगचे फॅड वाढल्याने कपल्स लग्नापूर्वीच एकमेकांचा स्वभाव, आवडीनिवडी असे एकमेकांबद्दल बरेच काही माहिती करून घेतात. आता हनिमूनची क्रेझ आहे ती फक्त एवढयाचसाठी की लग्नानंतरचे काही दिवस फक्त दोघांनीच एकमेकांसोबत एकांतात घालवावेत. मात्र हनिमूनसाठी एक चांगले ठिकाण शोधणे आणि फायनल करणे हे प्रत्येक कपलसाठी खूप मोठे काम असते.

त्या ठिकाणाबाबत जास्त माहिती नसल्यास ठिकाण निश्चित करायला बऱ्याच अडचणी येतात. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांची माहिती देणार आहोत, ज्यांना हनिमूनसाठी जास्त पसंती मिळते. ही ठिकाणे तुमच्या खिशावर जास्त भार न टाकता तुमच्यासाठी गोड आठवणी ठरतील. या रोमँटिक आणि सुंदर ठिकाणी तुम्ही तुमची हनिमून ट्रीप अधिकच संस्मरणीय बनवू शकाल.

बर्फाचा कटोरा

बर्फाचा स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे ऑली हे हनिमूनसाठी एक सुंदर ठिकाण आहे. ते बर्फाचा कटोरा म्हणूनही ओळखले जाते. मस्त वातावरण असलेले हे ठिकाण उत्तराखंडचा श्वास आहे. उन्हाळयात तुम्हाला येथे फुले पाहायला मिळतील. पण हिवाळयात तुम्ही येथे बर्फात खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक खेळासोबतच स्नोफॉलची मजाही घेऊ शकता. याचे हेच वैशिष्टय तुमच्या हनीमूनची मजा द्विगुणित करेल. अशाच प्रकारचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी तुम्ही उत्तर पूर्वेलाही जाऊ शकता.

वातावरणात असेल फक्त रोमांस

गोवा हनीमूनसाठी एक चांगला पर्याय आहे. येथील बीच तुम्हाला वेगळयाच वातावरणात घेऊन जातील. गोवा खूपच सुंदर ठिकाण आहे. पोतुर्गीजांच्या काळात बनवलेल्या जंगलात रात्री राहण्याचीही व्यवस्था आहे. शिवाय येथे रोमांस करण्याचा वेगळाच अनुभव घेता येईल.

रोमांसच नाही रोमांचही

रोमांसला रोमांचची फोडणी द्यायची असेल तर कपल्ससाठी कसौलीपेक्षा जास्त चांगले ठिकाण असूच शकत नाही. डोंगरांवर चालण्याची मजा आणि थंडीतील पहाडी जीवन तुम्हाला वेगळा अनुभव देईल. येथील अॅडव्हेंचर आणि रोमांसचे वातावरण तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकेल.

कसौली देशातील रोमँटिक डेस्टिनेशनपैकी एक आहे. येथील हिरवळ तुम्हाला आकर्षित करेल. येथे चहूबाजूला पाईन आणि देवनारची उंच झाडे आहेत. कसौली चंदिगड आणि शिमलाच्यामध्ये आहे. येथील अनोखे कॉटेज आणि इंग्रजांच्या काळातील चर्च कुणाचेही लक्ष वेधून घेतील अशीच आहेत.

अॅडव्हेंचर आवडत असेल तर ट्रेकिंग करता येईल. निसर्गप्रेमी असाल तर निसर्गाच्या कुशीत भटकंती करू शकाल. खरेदीची आवड असेल तर शॉपिंग करू शकाल आणि फूडी असाल तर खाण्याच्याही खूप व्हरायटी मिळतील.

जोडीदारासोबत रोमँटिक व्हायचे असेल तर कसौली उत्तम पर्याय आहे, कारण या सुंदर हिल स्टेशनवर आल्यावर तुमचे तन आणि मन दोन्ही प्रसन्न होईल.

वास्तूकलेचे अनोखे उदाहरण

जर तुम्ही पाँडेचरीला गेलात तर समजा की तुम्ही पॅरिसपेक्षाही उत्तम ठिकाणी गेला आहात. फ्रेंच स्टाइलमध्ये सांगायचे झाल्यास, पाँडेचरी तुमची वाट पाहात आहे. फ्रेंच बोलीभाषा, शानदार बीच, मार्केट आदी या ठिकाणाला एका वेगळया सौंदर्यासह सादर करतात.

निसर्गाच्या कुशीत हनिमून

निसर्गाच्या कुशीत हनिमूनचा आनंद घेणे तुमच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरू शकेल. हो, आम्ही रणथंबोर नॅशनल पार्कबद्दलच बोलत आहोत. येथे तुम्ही वाघांसह असंख्य प्रजातींच्या पक्ष्यांनाही पाहू शकता.

परदेशी बेटापेक्षा कमी नाही

शानदार हनिमूनसाठी यापेक्षा उत्तम ठिकाण क्वचितच दुसरे असू शकेल. तुमचे प्रेम आणि रोमांस समुद्राच्या लाटांप्रमाणे येथे उफाळू द्या. तुम्ही साहसी असाल आणि सुंदर बीचेस तसेच लव बर्ड्ससोबत रोमांच अनुभवायचा असेल तर दमण आणि दीवचे बीच तुम्हाला खुणावत आहेत. हे ठिकाण तुमच्या जोडीदारासोबतच्या तुमच्या क्षणांना जास्तच रोमँटिक बनवेल. हे ठिकाण तुम्हाला एखाद्या परदेशी बेटासारखाच अनुभव देईल.

अल्लेप्पी

केरळमधील योजनाबद्ध पद्धतीने बांधलेल्या शहरांपैकी एक असलेल्या या शहरात जलमार्गाचे अनेक कॉरिडॉर आहेत. शांत रोमांससाठी अल्लेपीहून जास्त चांगले ठिकाण असूच शकत नाही. येथे मनाला शांतता लाभेल आणि जोडीदारात हरवून जाण्यासाठी वेळही मिळेल. खूपच सुंदर असलेल्या अल्लेप्पीत  पाण्याच्या मोहक छटा आणि मनमोहक हिरवळही अनुभवता येईल. येथे मार्केट आणि बीचही आहेत.

या गोष्टींकडेही लक्ष द्या

* तुम्ही हवाई प्रवास करत असाल तर काही एअरलाईन्स नवविवाहित दाम्पत्यांसाठी विशेष सवलती देतात. या सवलती किंवा ऑफर्सची माहिती करून घ्या आणि तिकिटे काही महिने आधीच बुक करा.

* हॉटेलसाठी कितीतरी वेबसाईट्स आहेत. यामुळे हॉटेल आधीच बूक करता येईल. हे स्वस्त ठरेल. एकाच परिसरात अनेक दिवसांची ट्रीप असेल तर एका हॉटेलमध्ये एका रात्रीपेक्षा जास्त वेळ राहायचा प्रयत्न करा. कारण अनेकदा असे पाहायला मिळते की बरीच हॉटेल्स एका रात्रीपेक्षा जास्त काळ वास्तव्य केल्यास चांगले डिस्काउंट देतात.

* हॉटेलची बुकिंग करतेवेळीच ब्रेकफास्ट, लंच, डिनरसारख्या सुविधा आहेत की नाहीत, याची संपूर्ण माहिती करून घ्या. बरीच हॉटेल्स ब्रेकफास्ट आणि डिनरचीच सुविधा देतात, कारण लंच टाईमला तुम्ही बाहेर असल्याने बाहेरच लंच करता. तरीही एकदा ऑफर नक्की माहीत करून घ्या.

* खायची ऑर्डर देताना एकदाच सर्व ऑर्डर देण्यापेक्षा थोडे थोडे मागवा. अनेकदा एवढे जास्त ऑर्डर केले जाते की पदार्थ आणि पैसे दोन्ही वाया जातात.

* लक्षात ठेवा की लंच पत्नीच्या आवडीचा असेल तर डिनर पतीच्या आवडीचा असावा. यामुळे खाणे आणि पैसे या दोघांचीही बचत होईल.

* प्रवासात कार्डद्वारे पेमेंट करा. यामुळे डिस्काउंट आणि मनी बॅकचाही फायदा मिळू शकेल.

बऱ्याचदा फिरायला जाताना पूर्ण वेळेसाठी टॅक्सी बूक केली जाते. मात्र, पूर्ण वेळेऐवजी दर दिवशी गरजेनुसारच टॅक्सी बूक करा.

कमी खर्चात विवाह

* सोमा घोष

विवाह आणि कमी खर्च हे ऐकताना कदाचित सर्वांना विचित्र वाटेल, परंतु आता विवाह समारंभात कमी खर्चाची पद्धत सुरू झाली आहे, कारण यामुळे वेळ आणि पैसा दोहोंचीही बचत होते. काही लोकांना हा विचार म्हणजे कंजुषी वाटू शकेल. कारण ते विचार करतात की लाकडी टेबलांवर सफेद कापड अंथरून कँडल लाइट करून आणि कमी लोकांना आमंत्रित करून लग्नाचा खर्च कमी केला जाऊ शकतो. परंतु असे मुळीच नाही.

कमी खर्चाच्या विवाहासाठी हे जरूरी नाही की आपण सर्व इच्छांना मुरड घालावी किंवा काही करूच नये. अर्थात, ज्या गोष्टी विवाहांमध्ये आवश्यक नसतात किंवा केवळ दिखाव्यासाठी असतात, त्या सोडून मुख्य गोष्टींवर लक्ष द्या. अशा प्रकारे केवळ थोडीशी समजदारी आणि योग्य प्लॅनिंगनेच आपण विवाहाला आपल्या मनाप्रमाणे व स्मरणीय बनवू शकता.

याबाबत वेडिंग प्लॅनर आशू गर्ग सांगतात की विवाह सर्वांसाठी स्मरणीय बनेल याचा मी नेहमी प्रयत्न करतो. कारण विवाहाचा खर्च व्यक्तिच्या बजेटनुसार झाला पाहिजे, जेणेकरून कोणालाही ओझे वाटणार नाही. हेच माझ्यासाठी आव्हान आहे. अशा वेळी या गोष्टींवर लक्ष देण्याची गरज असते :

डिटेलिंगवर लक्ष द्या

पीच कलरसोबत रेड आणि गोल्डनचा मेळ विवाहांमध्ये अनेक काळापासून आहे. वेडिंगमध्ये यांना खास महत्त्व असते. परंतु आता यामध्ये हलक्या आणि नैसर्गिक रंगांच्या मिश्रणालाही अधिक महत्त्व दिले जात आहे. यामध्ये तशाच कलाकृतींचे फर्निचर आणि रोपे त्यांची शोभा वाढवतात.

मोठमोठया वस्तू वापरून सजावट करण्याचा काळ आता लोटला. आता लोक आपल्या आवडीने घर किंवा विवाह मंडप सजवतात, ज्यात सजवणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व आणि अभिरुची स्पष्टपणे दिसते. हे त्यांच्यासाठी एक आव्हान असते. यामध्ये दाम्पत्य बहुतेककरून बॉलीवूडच्या सजावटीचा आधार घेतात. त्यामध्ये डिटेलिंगवर जास्त भर असतो, जी बहुंताशी वेगवेगळया रंगांच्या कॉम्बिनेशनवर आधारित असते. जेणेकरून फोटो चांगले यावेत.

कमी खर्चातील विवाहांमध्ये सजावटीबरोबरच बहुतेक कपल्सची इच्छा असते की त्यांच्या सजावटीला एक छानसा लुक असावा. म्हणूनच डिटेलिंगबरोबरच छोटया-छोटया गोष्टींवरही स्वत: लक्ष देण्याची गरज असते. यामध्ये पाहुण्यांचे मनोरंजन प्राधान्याने असले पाहिजे. याबरोबरच स्टेज प्रेझेंटेशन, पाहुण्यांच्या टेबलांचा आकार गोल किंवा चौकोनी असावा आणि सिल्कचे रंगीत कापड त्यावर अंथरलेले असेल, जेणेकरून त्याला एक कोनीय व्ह्यू मिळेल.

डिझाइन मोठी दर्शवा

कमी खर्चातील विवाहांत बहुतेक लोक भिंतींवर कमी सजावट करतात. मात्र, प्रत्यक्षात एक चांगली थीम किंवा डिझाइनचा विचार करून, त्यालाच मोठया आणि कलरफूल पद्धतीने दाखविणे उचित असते. त्याचा केंद्रबिंदू विवाह असला पाहिजे. यामध्ये रंग आणि लाइटसपासून प्रत्येक बेसिक गोष्टीचा समावेश केला पाहिजे.

फ्लॉवर पॉवर

फुलांची सजावट आपल्या प्रत्येक लुकला सुंदर बनवते. आशु म्हणतात की फुलांच्या वेगवेगळया एक्सपेरिमेंट करून तुम्ही वैवाहिक परिदृश्य अधिक सुंदर बनवू शकता. फुलांचा वापर सजवण्यासाठी, नवरा-नवरीसाठी, सेंटर टेबल आणि भिंतीवरील डेकोरेशन इ. सर्व ठिकाणी काही ना काही रूपात करता येऊ शकेल. गेस्ट टेबल आणि भिंतींना सजवण्यासाठी जर कृत्रिम फुलांचा वापर केला गेला, तर खर्च अजून कमी होतो. याबरोबरच कलरफूल बेरी आणि स्ट्रबेरीजचाही सजावटीसाठी वापर करू शकता. त्यामुळे फ्रेश लुक दीर्घकाळ टिकून राहील.

नॅचरल लाइटिंग

प्रकाश योजनेला वेडिंगमध्ये खास स्थान आहे. जर ही योग्य पद्धतीने केली गेली, तर सिंपल आणि एलिगंट वेडिंगची जी कल्पना आपण केलेली आहे, ती गेस्ट आणि वेडिंग दोघांनी आकर्षक वाटते. नॅचरल लाइटिंग विवाहाचा खर्च नेहमी कमी करते. खरे तर ओपन हॉल, कोलोनियल, स्टाइल हॉल्स या मध्यम प्रकाशाच्या कॅफे स्टाईल इ. सर्व पारंपरिक आणि शिल्पकारीच्या पराकाष्ठेला व्यक्त करतात.

डिनर फिएस्टा

विवाहांमध्ये भोजन सर्वात महत्त्वाचे असते. त्यामध्ये संतुलित आहार असण्याबरोबरच त्याच्या गुणवत्तेवरही अधिक लक्ष देणे आवश्यक असते. मेनूची मोठी लिस्ट ठेवून पाहुण्यांना खूश करण्याची गरज नाही, कारण ते सर्व पदार्थांची चव घेण्यास असमर्थ असतात. पदार्थ साधे आणि गुणवत्तापूर्ण ठेवा. कारण आज लोकांचा क्वांटिटीऐवजी क्वालिटीवर अधिक भर असतो. यात सर्व्ह करण्यात थोडी कलात्मकता आणि स्नेह दाखवा, जेणेकरून त्यांना छान वातावरण लाभेल.

ट्रीट ओ ट्रीट

विवाहामध्ये आजकाल केक कापण्याची पद्धत आहे. अशा वेळी वेगवेगळया स्टाईलचे केक याची शोभा वाढवतील. यामध्ये आपण आपली कलात्मकता वापरून त्याला आणखी सुंदर बनवू शकता. आवश्यकता असेल तेव्हा तर काही फुलांनी याची शोभा आणखी वाढवता येईल.

पेहराव असावेत अविस्मरणीय

हेवी एम्ब्रॉयडरीचे गाउन्स आणि लहंग्याचा काळ आता मागे पडला आहे. अशावेळी स्टाइलिश आणि सुंदर दिसणाऱ्या गाउन्सला आज मागणी आहे. आजकाल कपल्स आरामदायक आणि क्लासिक ड्रेस परिधान करणे पसंत करतात, ज्यामध्ये कट्स आणि प्लीट्सवर लक्ष देणे आवश्यक असते. लहंगाचोली किंवा साडी, सिल्क किंवा शिफॉनच्या कपडयावर मनपसंत रंगानुसार चांगले नक्षीकामच वेडिंगला सुंदर बनवतात. त्याचबरोबर सफेद लिलीचा बुके किंवा केसांमध्ये फुले माळल्याने वधू एखाद्या सुंदर मूर्तीप्रमाणे दिसते. दागिने गरजेनुसार घेतले पाहिजेत आणि त्यामध्ये नथ, बाजूबंद आणि कंबरपट्टयाचा समावेश करायला विसरू नका.

मुलांमध्ये चिडचिडेपणा का वाढतो

* गरिमा पंकज

पालक आधीच पालकत्वाबद्दल खूपच त्रासलेले होते आणि आता तर मुले आणि पालक कोरोनाच्या भीतिचा योग्य फायदा घेऊ शकतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करु शकतात की मूल काय विचार करते किंवा त्याच्या आचरणात येणाऱ्या बदलांचे कारण काय आहे. आजच्या मुलांमध्ये संताप आणि चिडचिडेपणा वाढत असल्याचे बऱ्याच अहवालात समोर आले आहे.

मुलांबरोबर काहीतरी चुकीचे होतेय. मुलांच्या जीवनात कुठेतरी काहीतरी अत्यंत महत्वाच्या गोष्टी हरवल्या आहेत आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबियांप्रति घटलेला जिव्हाळा आणि सोशल मिडियाचा वाढता संपर्क.

पूर्वी संयुक्त कुटुंबं असताना लोक त्यांचे विचार गुंतवण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही गॅझेटवर अवलंबून नसत गोष्टी समोरासमोर बसून गप्पा गोष्टी व्हायच्या. त्यात वेगवेगळया प्रकारची नाती-गोती असत आणि त्यांच्यात प्रेमाचे बंध होते. पण आज मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन एकाकी खोलीत बसलेला एखादा मुलगा त्याच्या पोस्ट कुणाला आवडल्या का? त्याच्या छायाचित्रांची स्तुती केली का? कुणाला त्याची आठवण आली का? हे पाहण्यासाठी दर तासाला मोबाइल पाहत राहतो?

आज मुलांना त्यांची स्वत:ची स्वतंत्र खोली मिळते, जिथे ते आपल्या इच्छेने कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय जगू इच्छितात. ते पालकांऐवजी मित्र किंवा सोशल मिडियावर त्यांच्या मनात उद्भवणारे प्रश्न किंवा भावना शेयर करतात. जेव्हा पालक काळजी करतात की आपली मुले मोबाइल किंवा लॅपटॉपचा जास्त वापर तर करीत नाहीत ना, तेव्हा ते त्यांच्यावर नाराज होतात.

केवळ एकटेपणा किंवा सोशल मिडियाचा हस्तक्षेप हेच मुलांच्या नैराश्याचे किंवा पालकांपासून दूर होण्याचे कारण नाही. असे होण्याची अनेक कारणे आहेत :

जीवनशैली : फॅशन, जीवनशैली, करिअर, शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये आजच्या तरूणाईची गती खूप वेगवान आहे. सत्य हे आहे की त्यांना हा वेग कसा नियंत्रित करावा हे माहीत नाही. तरुणांचे रस्त्यावरुन फर्राटेदार दुचाकी चालवणे आणि अपघातांचे भयानक चित्र हेच सत्य सांगतात. ‘मला ते करायचे आहे म्हणजे करायचेच आहे. मग भलेही त्यासाठी काहीही किंमत द्यावी लागो’ या धर्तीवर जीवन जगणाऱ्या तरुणांमध्ये विचारांचा झंझावात इतका तीव्र आहे की ते कधीही एका गोष्टीवर लक्ष देऊ शकत नाहीत. त्यांच्या मनात एक संघर्ष चालू असतो, इतरांच्या पुढे जाण्याची स्पर्धा असते. अशा परिस्थितीत पालकांचे एखाद्या गोष्टीसाठी नाकारणे किंवा समझावणे त्यांना आवडत नाही. पालकांच्या गोष्टी त्यांना उपदेश वाटतात.

अपेक्षांचे ओझे : बऱ्याचदा पालक त्यांच्या स्वप्नांचे ओझे त्यांच्या मुलांवर टाकतात. जेव्हा ते आयुष्यात स्वत:ला जे व्हायचे होते ते बनत नाहीत, तेव्हा आपल्या मुलांना ते बनवण्याचा प्रयत्न करू लागतात, खरे तर प्रत्येक व्यक्तिची स्वत:ची क्षमता आणि आवड असते. अशा परिस्थितीत जेव्हा पालक विशिष्ट अभ्यास किंवा करिअरसाठी मुलांवर दबाव आणतात, तेव्हा मुले गोंधळतात. ते भावनिक आणि मानसिकरीत्या विखुरले जातात आणि हेच विखुरलेपण त्यांना गोंधळात टाकते. आपल्या मुलाची क्षमता किती आहे हे पालकांना समजत नाही. जर मुलाकडे गायक होण्याची क्षमता आणि इच्छा असेल तर ते त्याला डॉक्टर बनवण्याचा प्रयत्न करतात.

वेळेचा अभाव : आजकाल बऱ्याच घरातील आई-वडील दोघे नोकरदार असतात. मुलेही १ किंवा २ पेक्षा जास्त नसतात. दिवसभर मूल एकटयाने लॅपटॉपवर वेळ व्यतित करते. अशा परिस्थितीत त्याच्या पालकांनी त्याच्याबरोबर वेळ घालवावा अशी त्याची इच्छा असते. पण त्यासाठी पालकांना वेळ नसतो.

मित्रांचे समर्थन : या अवस्थेत मुले सगळयात जास्त त्यांच्या मित्रांच्या जवळ असतात. त्यांचे निर्णयदेखील त्यांच्या मित्रांनी प्रभावित असतात. ते मित्रांसह अधिक वेळ घालवतात, त्यांच्याबरोबरच सर्व रहस्ये शेयर करतात आणि त्यांच्याशी भावनिक संबंधही ठेवतात. अशा परिस्थितीत जर पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या मित्रांपासून अंतर ठेवण्यास सांगितले तर मुले पालकांवर नाराज होतात. पालकानीं कितीही रोखले तरी ते आपल्या मित्रांना सोडण्यास तयार नसतात. उलटपक्षी पालकांना सोडण्यास तयार होतात.

गर्ल/बॉयफ्रेंडचे प्रकरण : या वयात विपरीत लिंगाकडे खूप आकर्षण असते. तसेही गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणे ही आजच्या किशोरवयीन मुले आणि तरुण मुलांसाठी स्टेटस इशू बनला आहे. हे स्पष्ट आहे की तरुण मुले त्यांच्या नात्यांबद्दल खूपच संवेदनशील असतात आणि जेव्हा पालक त्यांना आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भेटण्या किंवा बोलण्यापासून रोखतात तेव्हा ते पालकांना शत्रू समजू लागतात.

प्रेमभंग झाल्यास पालकांचे वागणे : या वयात अनेकदा प्रेमभंग होतो आणि त्या दरम्यान ते मानसिकरित्या खूप अस्वस्थ राहू लागतात. अशा परिस्थितीत त्यांना पालकांचे टोकणे अजिबात सहन होत नाही आणि ते डिप्रेशनमध्ये जातात. आईवडिलांवर नाराज राहू लागतात. दुसरीकडे पालकांना असे वाटते की जेव्हा ते मुलांच्या भल्यासाठी सांगत आहेत, तर मुले अशी का वागत आहेत? अशाप्रकारे पालक आणि मुलांमधील अंतर वाढत जाते.

थरार : तरुण मुले जीवनात थरार शोधत असतात. मित्रांची सोबत त्यांना असे करण्यास अजून जास्त प्रवृत्त करते. अशा मुलांना आघाडीवर रहायचे असते. यामुळे ते बहुतेक वेळा मद्यपान, रॅश ड्रायव्हिंग, कायदेभंग, पालकांचा अपमान करणे, सर्वोत्तम गॅझेट मिळविण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गोष्टी करतात. तरुण मन आपले स्वतंत्र अस्तित्व शोधत असते. त्याला सर्व गोष्टींवर नियंत्रण हवे असते, परंतु पालक त्याला तसे करू देत नाही. मग तरुण मुलांना आपल्या पालकांचे विचार पटत नाहीत.

काहीही करेन, माझी इच्छा : तरुणांमध्ये एक गोष्ट सामान्यपणे बघितली जाते, ती म्हणजे स्वत:ची इच्छा चालवण्याची सवय. आज जीवनशैली खूप बदलली आहे. जे पालक करतात, ते त्यांच्यादृष्टीने योग्य असते आणि जे मुले करतात, ते त्यांच्या जनरेशननुसार योग्य असते. अशा परिस्थितीत दोघांमध्ये विरोध होणे स्वाभाविक आहे.

ग्लॅमर आणि फॅशन : सध्याच्या युगात फॅशनबाबत पालक आणि तरुणांमध्ये तणाव आहे. तसंही फॅशनबाबत मुलींना सूट देण्यास पालक सहमत नाहीत. हळूहळू त्यांच्यात संवादाचा अभावदेखील दिसून येतो. मुलांना वाटते की पालक त्यांना मागील युगात ढकळत आहेत.

स्पर्धा : आजच्या काळात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. लहानपणापासूनच मुलांना स्पर्धेच्या आगीत लोटले जाते. मुलांनी नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम यावे अशी पालकांची अपेक्षा असते. त्यांचा हाच दबाव मुलांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ठरतो.

असा बसवा उत्तम समन्वय

आपल्या मुलाच्या मनात काय चालले आहे हे आपल्याला माहिती असल्यास ही परिस्थिती हाताळणे तुम्हाला सोपे जाईल. मुलाशी चांगल्याप्रकारे समन्वय ठेवण्यासाठी पालकांनी या गोष्टींची काळजी घ्यावी :

चांगल्या सवयी शिकवा : घरी एकमेकांशी कसे वागावे, जीवनात कोणत्या आदर्शांना महत्व द्यायचे, चांगुळपणा कसा स्वीकारला पाहिजे आणि वाईटापासून अंतर कसे ठेवायचे यासारख्या गोष्टींचे ज्ञान म्हणजेच संस्कार. एक कुटुंब हा त्याचा पाया आहे. पालकच मुलांमध्ये हे संस्कार पेरत असतात.

थोडेसे स्वातंत्र्यदेखील द्या : घरात स्वातंत्र्याचे वातावरण तयार करा. मुलाला बळजबरीने एखाद्या गोष्टीसाठी तयार करणे योग्य नाही. परंतु जेव्हा आपण योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक स्पष्ट करून निर्णय त्याच्यावर सोडाल तेव्हा तर तो योग्य मार्ग निवडेल. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे दबाव टाकण्याचे टाळा. मुलाला जितके जास्त दडपल्यासारखे वाटेल तितकेच त्याचे वागणे तीव्र असेल.

स्वत: एक उदाहरण बना : मुलासाठी एक उदाहरण व्हा. मुलाकडून आपण जे काही शिकण्याची किंवा न शिकण्याची अपेक्षा करता ते आधी स्वत: अंमलात आणा. हे लक्षात ठेवा की मुले पालकांच्या पदचिन्हांचे अनुसरण करतात. आपण यशासाठी त्यांना कष्ट करताना पाहू इच्छित असाल तर प्रथम आपल्या कार्यासाठी समर्पित व्हा. जर तुम्हाला मुलांकडून सत्य बोलणे हवे असेल तर स्वत: कधीही खोटे बोलू नका.

शिक्षेबरोबर बक्षीसदेखील द्या : मुलांनी वाईट कृत्य केले म्हणून त्यांना ओरडणे गरजेचे आहे, तसेच ते काहीतरी चांगले करतात, तेव्हा त्यांचे कौतुक करण्यासही विसरू नका. तुम्ही त्यांना शिक्षाही करा आणि त्यांना बक्षीसही द्या. आपण असे केल्यास मुलास त्याचा निश्चितच फायदा होईल. त्याला वाईट वागण्याची भीती वाटेल आणि चांगले काम करून बक्षीस मिळविण्यास तो उत्सुक असेल. येथे शिक्षा म्हणजे शारीरिक कष्ट देणे नव्हे तर त्याला दिली जाणारी सूट कमी करूनही दिली जाऊ शकते. जसे टीव्ही पाहण्याची वेळ कमी करून वा घर काम करायला लावून.

शिस्तीबाबत संतुलित दृष्टीकोन : जेव्हा आपण शिस्तीबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगता तेव्हा आपल्या मुलांना हे समजते की त्यांना काही नियम पाळावे लागतील. परंतु काहीवेळा गरज पडल्यास ते थोडे-फार बदललेही जाऊ शकतात. याउलट जर तुम्ही हिटलरप्रमाणे त्यांच्यावर सदैव कठोर शिस्तीची तलवार टांगती ठेवली तर त्याच्यात बंडखोरीची भावना जागृत होण्याची शक्यता असते.

घरगुती कामेही करवून घ्या : लहान मुलांना सुरुवातीपासूनच स्वत:ची कामे करण्याची सवय लावा. उदाहरणार्थ आपली खोली, अंथरूण, कपडे इत्यादी व्यवस्थित करण्यापासून त्यांवर इतर किरकोळ जबाबदाऱ्यांचे ओझे टाका. प्रारंभ करणे कदाचित अवघड जाईल, परंतु सरत्या काळाबरोबर आपल्याला दिलासा वाटेल आणि नंतर आयुष्यामध्ये ते अव्यवस्थित दिसल्यास राग येण्याची शक्यता संपेल.

चांगली सोबत : सुरुवातीपासूनच काळजी घ्या आणि प्रयत्न करा की आपल्या मुलाचे सोबती चांगले असावेत. जर आपल्या मुलाने एखाद्या खास मित्रासह बंद खोलीत तासन् तास घालवले तर समजून घ्या की ही धोक्याची घंटा आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा बंद दाराचा खेळ त्वरित थांबवा. मूल चुकीच्या मार्गावर जाण्यापूर्वीच आपण थोडे कठोर आणि दृढतेने कार्य केले पाहिजे.

सर्वांसमोर कधी ओरडू नका : मुलाला इतरांसमोर ओरडणे योग्य नाही. लक्षात ठेवा जेव्हा आपण एकांतात स्पष्टीकरण देत, कारणे सांगत मुलाला कुठल्या कामापासून थांबवता, तेव्हा त्याचा परिणाम सकारात्मक होईल. उलट सर्वांसमोर चिडल्याने, मूल हट्टी आणि बंडखोर होऊ लागते.

त्याच्या निवडीचा देखील सन्मान करा : आपले मूल तरूण होत आहे आणि गोष्टींना पसंत नापसंत करण्याचा त्याचा आपला दृष्टीकोन आहे, हे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यावर आपल्या इच्छा आणि निवड लादण्याचा प्रयत्न करू नका. जोपर्यंत आपल्याकडे योग्य कारण नाही तोपर्यंत मुलावर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव आणू नका.

हे खरे आहे की किशोरवयीन मुले/तरुण होत असलेली मुले आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट पालकांशी शेयर करणे टाळतात. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्नच करू नये. प्रयत्न करण्याचा अर्थ असा नाही की आपण सक्ती करावी आणि सर्व वेळ त्यांची चौकशी करत रहावी. मुलांबरोबर दर्जेदार वेळ घालवणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, त्यांच्याबरोबर चित्रपट पाहाणे, खाण्यासाठी बाहेर जाणे, त्यांच्याबरोबर मोकळया जागेत काही मनोरंजक खेळ खेळणे इत्यादिंची आवश्यकता आहे. यामुळे मुलाला आपल्याशी कनेक्टेड फिल होईल आणि सर्वकाही आपल्याबरोबर शेयर करण्यास सुरवात करेल.

ऑनलाइन पूजा लुबाडणूकीचे माध्यम

– मनीष अग्रहरि

विकसित देशांच्या तुलनेत भारत विकासाच्या बाबतीत भलेही मागे पडत असेल, पण पुजाऱ्यांनी धर्माच्या मदतीने विधी, पूजापाठ आदींना बरेच उंचीवर नेऊन ठेवले आहे. पूजापाठ आणि विधींचा पगडा सामान्यांवर जस जसा वाढू लागला तशी पुजाऱ्यांचीही भरभराट होत गेली.

१९९१ सालापासून देशात उदारीकरण आणि खासगीकरणाचे युग सुरू झाले. यामुळे लोकांचे स्थलांतर आणि रोजगारही वाढला. अशा परिस्थितीत लोकांचा पूजापाठ आणि धार्मिक विधींवरील विश्वास उडू लागला. यामुळे परिश्रम न करता फुकट खाणाऱ्या पुजाऱ्यांचा धंदा मंदावला. त्यामुळे त्यांनी फसवणुकीसाठी नवे माध्यम आत्मसात केले, जे ऑनलाइन दर्शन, आरती, पूजापाठ आणि पिंडदान, तर्पण, श्राद्धासारख्या विधींच्या रूपात पाहायला मिळत आहे. स्काईप, गुगल, फेसबुक चॅटसारख्या अॅप्लिकेशन्सशी कनेक्ट झालेले हे ऑनलाइन पुजारी ऑनलाइन खिसे कापण्यात तरबेज आहेत.

अर्थ स्पष्ट आहे की पुजारी वर्ग प्रत्येक स्तरावर पूजापाठ कायम ठेवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हद्द म्हणजे सरकारही या कामासाठी मदत करीत आहे. मृत्यूनंतर माणसाचे अस्तित्वच उरत नसले तरी ऑनलाइन पूजापाठ पॅकेजद्वारे लाइव्ह पिंडदानातून मोक्ष मिळवून देण्याचा धंदा जोरात आहे. प्रसिद्ध मंदिरांची आरती व दर्शन ऑनलाइन दाखवून आधुनिक पुजारी आपले खिसे भरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी ऑनलाइन पूजेसाठीची ऑफर देणाऱ्या पुजाऱ्यांपासून सावध राहाणेच योग्य ठरेल.

लाइव पिंडदान

अलिकडेच अलाहाबाद, आताच्या प्रयागराज येथील काही पुजाऱ्यांनी लाइव्ह पिंडदानाची ऑफर सुरू केली. येथील पुजाऱ्यांनी सांगितले, ‘‘व्हिडीओ कॉलिंगद्वारे लाइव्ह पिंडदान करण्यात येते. विधीवेळी एक व्यक्ती मोबाइल घेऊन उभा राहातो. सर्व त्यावर दाखवतो. यामुळे दूर राहणारे यजमानही ते सहज पाहू शकतात. मोबदल्यात आम्ही त्यांच्याकडून बक्कळ रक्कम वसूल करतो.’’

धर्माने बनवले पुजाऱ्यांना धनवान

पुजारी अनेक प्रकारे धर्माच्या नावे पैसे उकळतातच पण, खरी समस्या सुशिक्षित श्रीमंत लोकांच्या विचारसरणीची आहे, ज्यांचे खिसे गरम आहेत आणि धर्माला घाबरून ते पैसे देतात. या श्रीमंत यजमानांना पाहून गरीब समाजही अशाच प्रकारे पुजाऱ्यांसमोर नतमस्तक होतो. हेच कारण आहे की लाइव्ह फसवणूक करणाऱ्या पुजाऱ्यांची मजा होत आहे.

ऑनलाइन पिंडदानाचे अलिकडचेच उदाहरण पाहा. प्रयागराजचे पुजारी विजय पांडेय यांना जयपूरच्या भोलेंद्र राजपूत, विरेंद्र कुमार आणि भैरो सिंह यांनी पिंडदानासाठी २१-२१ हजार रुपये पाठविले. पुजारी आशुतोष पालीवाल यांना मुंबईचे विरेंद्र पांडेय, मोहनीश भार्मा, भयाम द्विवेदी, नवी दिल्लीच्या विकेश, छिंदवाडाच्या विंकेश्वर सिंह चौहान यांनी हजारो रुपये पाठवून ठरलेल्या तिथीला पिंडदान करून घेतले.

हे विचार करण्यासारखे आहे की जिथे एक मजूर दिवसरात्र मेहनत करूनही दरमहा २० हजार रुपये कमावू शकत नाही तिथे पिंडदान करणारे पुजारी फक्त काही तासांत २१ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा गंडा सुशिक्षित माणसांना घालतात. स्वत: कोणतेही काम न करणारे हे पुजारी विधीच्या नावाखाली सुशिक्षित माणसालाही धर्माची भीती दाखवून कंगाल करत आहेत.

ऑफरवर सरकारची मोहोर

अलिकडेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाळ मंदिरात दर्शन आणि आरतीसाठी ऑनलाइन बुकिंग करण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले आहे. तेथे भस्म आरतीचे प्रशासक प्रदीप सोनी यांनी दर्शन काउंटरला त्वरित २५० रूपयांचे पास तयार करण्याचे निर्देश दिले होते. म्हणजेच महाकाळ मंदिर प्रशासन भक्तांकडून दर्शनासाठी २५० रूपयांचे शुल्करूपी धन गोळा करण्यात गुंतले होते.

उघड आहे की आणखी जास्त वसुलीसाठी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असेल. इतकेच नाही तर महाकाल मोबाइल अॅपही सुरू करण्यात आले. या माध्यमातून सुरुवातीला ऑनलाइन दर्शन दिले जात होते पण, नंतर लगेचच बुकिंग करण्यासाठी ते बंद करण्यात आले.

अशाच प्रकारे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या चौका लगतच्या काली मंदिरात २०१८च्या नवरात्रीला सजावटीसाठी २,१०० रूपयांची बुकिंग केली जात होती. अन्य एका प्रकरणात राजस्थानच्या पुष्करमधील ब्रह्मा मंदिरात ५,१०० रुपये ऑनलाइन जमा करून अभिषेक करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मंदिरात व्हीआयपींच्या दर्शन व्यवस्थेसाठी बुकिंग सुरू झाले. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम मंदिर विकासासाठी वापरली जाईल असा दावा केला जात आहे. आश्चर्य म्हणजे पुष्करमध्ये ज्या वेळी हे सर्व निर्णय घेण्यात आले त्यावेळी मंदिराचे व्यवस्थापन एका सरकारी समितीकडे होते. जिचे अध्यक्ष तत्कालीन जिल्हाधिकारी होते.

मृत्यूनंतरही भीती

खरेतर, हिंदू धर्मग्रंथांनी लोकांना इतके भयभीत केले आहे की मृत्यूनंतर जिथे कुणाचे अस्तित्वच उरत नाही त्या वेळेचा विचार करून लोक घाबरतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार, कुटुंबातील आप्ताने मुखाग्नी दिल्याशिवाय मृत व्यक्तीला मुक्ती मिळत नाही. पण पुजाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी नियमात बदल केला आहे जसे की आप्त अंतिम संस्कार करू शकत नसेल तर ब्राह्मण अंतिम संस्कार करू शकतात. यामुळे मृतात्म्याला मोक्ष मिळण्यापासून कुठलीच अडचण येत नाही. अशा प्रकारे ब्राह्मणाच्या मदतीने मोक्ष मिळत असल्याची खात्री गरूड पुराण आणि स्मृती पुराण देते. मृत्यूनंतर मोक्ष मिळवून देण्यासाठी देशातील प्रमुख धार्मिक शहरांच्या हायटेक पुजाऱ्यांसोबतच आता अशा बऱ्याच वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्स आहेत जे अशा प्रकारांचा खुलेआम प्रचार करीत आहेत.

पुजाऱ्यांसोबत सरकार

केंद्र सरकारने २०१६मध्ये टपाल खात्याच्या माध्यमातून सर्व निवडक टपाल कार्यालयांमधून गंगाजल विकण्याची घोषणा केली होती. जेणेकरून गंगोत्रीसारख्या शहरांतून ऑनलाइन बुकिंग करून कोणतीही व्यक्ती गंगाजल मिळवू शकेल. पाटण्यातील जीपीओसह तत्कालीन मंत्री रविशंकर प्रसाद, मनोज सिन्हा, रामकृपाल यादव यांच्या उपस्थितीत सरकारने गाजावाजा करीत टपाल कार्यालयांमधून गंगाजल विक्री सुरू केली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी माध्यमांना सांगितले, ‘‘टपाल खाते ही आपली पुरातन संस्था आहे आणि गंगा ही आपली सर्वोच्च श्रद्धा आहे. संस्थेच्या सहकार्याने श्रद्धेला घरोघरी पोहोचवले जाईल.’’

उल्लेखनीय आहे की वर्तमानात भाजप शासित राज्यात धार्मिक भावनांना खतपाणी घालण्यासाठी सरकार धार्मिक यात्रा व धार्मिक कार्यक्रमांवर कोटयवधी रुपये खर्च करीत आहे. हरियाणा सरकारने गीता महोत्सवासाठी १०० कोटी रुपये खर्च केले आहेत. केंद्र सरकारने प्रयागराजच्या कुंभासाठी १,१५० कोटी रुपये मंजूर केले. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने २०१९च्या अर्धधकुंभासाठी २,५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मध्य प्रदेश सरकार तर देशाबरोबरच परदेशातील धार्मिक यात्रांसाठी पैसे देते.

मात्र, पंजाबच्या काँग्रेस सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना’ बंद करून एक चांगली सुरुवात केली आहे. अन्य राज्यातील सरकारनेही पंजाब सरकारचे अनुकरण करणे योग्य ठरेल. एका धर्मनिरपेक्ष देशाने अशा प्रकारे धार्मिक भावनांना खतपाणी घालून जनतेच्या कष्टाचा पैसा लुटू नये. उलट यातून शिल्लक राहिलेल्या निधीचा वापर शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी केल्यास अधिक चांगले होईल. दुसरीकडे लोकांनी पुजाऱ्यांनी पसरवलेल्या ऑनलाइन पूजापाठ, विधींच्या जाळयात अडकण्यापासून दूर राहावे. आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें