गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट

* कुमुद कुमार

मुकुलने गर्लफ्रेंड जूहीला वाढदिवसानिमित्त जे मनगटावरील घड्याळ भेट म्हणून दिलं होतं, ते तिला काही आवडलं नव्हतं. त्याबाबत जूहीने त्याच्याकडे वर्षभर तक्रार केली होती.

मुकुलने विचार केला होता की यावेळी तो जूहीला छान भेटवस्तू देऊन तिची बोलती बंद करेल. त्याने जूहीशी बोलता बोलता जाणून घेतलं होतं की तिला कोणता आणि कोणत्या कंपनीचा मोबाइल आवडतो.

जेव्हा मोबाइल शॉपमध्ये मुकुलने त्या मोबाइलची किंमत जाणून घेतली, तेव्हा तो विचारात पडला. २५ हजार रुपयांचा मोबाइल, एवढा महागडा मोबाइल अखेरीस तो जूहीला तिच्या वाढदिवसाला कसा भेट देऊ शकणार होता? तो निराश होऊन घरी परतला.

मुकुलचे वडील दिवाणचंद्र एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते. मुकुलला चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांनी एका महागड्या शाळेत त्याचं अॅडमिशन केलं होतं. महागडी फी आणि महागडे शिक्षण. दिवाणचंद्रला यासाठी ओव्हरटाइम करावा लागत होता. नेहमीच ते उशिरा घरी परतत असत.

मुकुल या गोष्टीचा फायदा घेऊ लागला होता. साध्या भोळ्या आईला तर तो कस्पटासमान समजत असे. अभ्यासाचा काहीही बहाणा करून तो घरातून बाहेर पडत असे, जूही आणि मित्रांसोबत मौजमजा करत असे.

जूही एका मोठ्या बिझनेस मॅनची मुलगी होती. तिच्या वडिलांना व्यवसायाच्या निमित्ताने नेहमीच शहराबाहेर जावे लागत होते. जूही या गोष्टीचा खूप फायदा उठवत असे. तीसुद्धा स्वच्छंद वृत्तीची झाली होती. मोठ्या कुटुंबातील मुलगी असल्याकारणाने तिला महागड्या आणि आकर्षक वस्तू आवडत असत.

मुकुलचा जीव संकटात सापडला होता. जूहीला स्वस्त वस्तू भेट म्हणून देऊ शकत नव्हता आणि महागडी वस्तू खरेदी करणे त्याच्या आवाक्यातील गोष्ट नव्हती. आता तो काय करणार? याच विचारात तो गर्क राहत असे.

एके दिवशी मुकुलचा मित्र राकेश त्याला आपल्यासोबत मोबाइल शॉपमध्ये घेऊन गेला. त्याने तिथे एक महागडा मोबाइल खरेदी केला, त्याची किंमत ३५ हजार होती.

मुकुलने जेव्हा त्याला या महागड्या मोबाइलबाबत विचारलं की त्याने तो कोणासाठी खरेदी केला आहे? तेव्हा हे जाणून त्याला आश्चर्य वाटलं की एवढा महागडा मोबाइल राकेशने आपली गर्लफ्रेंड सारिकासाठी खरेदी केला होता. मग मुकुलने आपली उत्सुकता शमवण्यासाठी विचारलं, ‘‘एवढी महागडी भेटवस्तू खरेदी करण्याची काय आवश्यकता होती?’’

‘‘अरे मित्रा मुकुल, या मॉडर्न आणि सुंदर मुली महागड्या आणि आकर्षक वस्तूंवरच भाळतात. त्यांना जेवढ्या महागड्या भेटवस्तू द्याल, त्या तेवढ्याच अधिक खूश होतात. महागड्या भेटवस्तूद्वारेच त्या समोरच्याचीच प्रतिष्ठा जोखतात. चमकूगिरीवर मरतात या मुली, चमकूगिरीवर.’’

‘‘पण राकेश, तुझ्याकडे एवढी महागडी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले? तुझे आई-बाबा तर यासाठी तुला एवढे पैसे देणार नाहीत?’’

‘‘अरे मित्रा मुकुल, ही सर्व आतली गोष्ट आहे. गर्लफ्रेंडला खूश ठेवण्यासाठी खूप काही करावं लागतं.’’

आता मुकुल या ‘खूप काही’मध्ये गुरफटला. त्याने राकेशला याबाबत विचारलंही. परंतु राकेशने हे सांगून त्याला टाळलं की या ‘खूप काही’चा अर्थ त्याला तेव्हाच कळेल, जेव्हा तो त्याच्या इतर मित्रांशी मैत्री करेल.

रात्रभर मुकुल राकेशबाबत विचार करत राहिला. त्याला जूहीला खूश करण्याचा एक मार्ग राकेशच्या मैत्रीतून दिसत होता. एक महागडे गिफ्ट देऊन त्याला कोणत्याही परिस्थितित जूहीला खूश करायची इच्छा होती.

शेवटी त्याने निर्णय घेतला की तो राकेश आणि त्याच्या मित्रांच्या संगतीत राहील आणि ‘खूप काही’ करेल.

राकेशने मुकुलला विश्वासात घेऊन चोरी करण्याचे कौशल्य शिकवले. सायकल आणि बाइक चोरणे त्यांच्या डाव्या हाताचा खेळ होता. भंगार बाजारात कोणाकडे सामान विकायचे आहे, राकेश चांगल्याप्रकारे अशा चोर दुकानदारांशी परिचित होता. चेन स्नॅचिंगचे कामही राकेशच्या ग्रुपला माहित होते. याकामीही ते चांगलेच तज्ज्ञ होते.

मुकुलही लवकरच चोरी करायला, खिसा कापयला आणि सोनसाखळी खेचायला चांगल्याप्रकारे शिकला होता. जूहीला खूश करण्यात आता त्याला काही अडचण येणार नव्हती. यावेळी त्याने जूहीला केवळ महागडा मोबाइलच गिफ्ट दिला नाही तर पंचतारांकित हॉटेलमध्ये तिला बर्थडे पार्टीही दिली. जूहीला मुकुलसारखा बॉयफ्रेंड मिळाल्याने धन्य वाटत होते. मुकुल तर तिच्या स्वप्नातील राजकुमार बनला.

एके दिवशी राकेशने मुकुलसोबत मिळून चेन स्नॅचिंगची योजना बनवली. राकेश अनेक दिवसांपासून दिल्लीच्या मॉडेल टाउन गल्लीची रेकी करत होता. त्याने जाणून घेतलं की संध्याकाळच्या वेळी कोणकोणत्या महिला रोज डेअरीवरून दूध आणतात आणि कोणत्या महिला भाजी मंडईतून भाजी घेऊन परततात. त्यांचे लक्ष्य कमलादेवी होती. ती एकटीच जात-येत असे. तिच्या गळ्यात चमकणारी सोन्याची चेन त्यांचा मोह वाढवत होती.

राकेशने सर्व गोष्टी मुकुलला चांगल्याप्रकारे समजावल्या होत्या. चेनवर झडप घालून हिसकावणं एवढं काही कठीण काम नव्हतं, जेवढं त्यानंतर मोटारसायकलवर बसून पळणं होतं. चेनवर ?ाडप घालण्याचं काम मुकुलला मिळालं आणि मोटारसायकलवर ड्रायव्हिंग करण्याचं काम राकेशने स्वत:कडे घेतलं.

योजनेनुसार मुकुलने अगदी चलाखीने आपलं काम पार पाडलं. चेनवर झडप घातली, कमलादेवीला धक्का देऊन खाली पाडलं, जेणेकरून तिला उठायला उशीर होईल आणि या दरम्यान ते पळून जातील.

चेन काढून घेऊन मुकुल पापणी लवते न लवते तोच राकेशच्या मोटारसायकलवर येऊन बसला. राकेशने मोटारसायकल वेगाने पळवली, परंतु एक भटकं डुक्कर त्यांच्या मोटारसायकलपुढे आलं. डुक्कर तर पळाला, परंतु त्यांच्या मोटारसायकलचे संतुलन बिघडलं आणि दोघे मोटारसायकलसहित खाली कोसळले.

तोपर्यंत कमलादेवीचा आरडाओरडा ऐकून गल्लीतील लोक त्यांच्यामागे धावले. ते मोटारसायकलवरून पडताच, गर्दीने त्यांना पकडलं. गर्दीने त्यांना खूप मारलं.

इतक्यात गर्दीतून एक महिला पुढे आली. तिला मुकुलचा चेहरा ओळखीचा वाटला. तिने मुकुलला लक्षपूर्वक पाहिलं आणि विचारलं, ‘‘तू दिवाणचंद्रचा मुलगा मुकुल आहेस ना?’’

मुकुल रडत म्हणाला, ‘‘हो काकी.’’

त्या महिलेने मुकुलच्या जोरदार थोबाडीत लगावत म्हटलं, ‘‘शी, तुला लाज वाटत नाही, एवढ्या मेहनती आणि इज्जतदार वडिलांचा मुलगा असून असे नीच काम करतोस.’’

मुकुलच्या डोळ्यांतून सतत पाणी वाहू लागले. ती महिला दुसरी कोणी नाही, मुकुलच्या वडिलांसोबत प्रायव्हेट कंपनीमध्ये कार्यरत सहाय्यक प्रबंधक सुशीलादेवी होती. ती मुकुलचे बाबा दिवाणचंद्रना चांगल्याप्रकारे ओळखत होती. तिला हेही माहीत होतं की मुकुलच्या शिक्षणासाठी मुकुलचे वडील कसे अहोरात्र झटत होते.

सुशीलादेवीने मुकुलच्या वडिलांना फोन केला आणि गल्लीतील लोकांना सर्व हकिकत सांगत त्यांना पोलीस स्टेशनला जाण्यापासून रोखलं. जेव्हा गल्लीतील सर्व लोकांना हकिकत कळली, तेव्हा ते चकीत झाले की कसे एका प्रतिष्ठित विद्यालयाचे विद्यार्थी आपल्या गर्लफ्रेंडना खूश करण्यासाठी चोरी आणि चेन स्नॅचिंगचे काम करू लागले आहेत.

लवकरच मुकुल आणि राकेशचे आईवडील घटनास्थळी पोहोचले. त्यांची नजर लाजेने खाली झुकली होती. मुकुल आणि राकेश तर आपल्या आईवडिलांशी नजरही मिळवू शकत नव्हते. मुकुल आपल्या आईवडिलांच्या पायावर लोळण घेत म्हणाला, ‘‘आई… बाबा… मला माफ करा. अशी चूक पुन्हा करणार नाही.’’

‘‘मुकुल, मला तुझा किती अभिमान वाटत होता, पण तू हे काय केलंस तुला माहीत नाहीए. तू माझा आयुष्यभर मिळवलेला मानसन्मान व इज्जत एका क्षणात धुळीला मिळवलीस, जी कधी पुन्हा मिळू शकत नाही,’’ मुकुलचे बाबा म्हणाले.

हे ऐकताच सर्वांचे डोळे ओलावले. सर्व प्रत्यक्ष पाहत होते की, संततीचं एक कृत्य कशाप्रकारे आईवडिलांची मान खाली करायला लावतं.

सुशीलादेवी प्रकरण कसंतरी सावरून घेत गर्दीतून त्यांना आपल्या घरी घेऊन गेली. कमलादेवीलाही त्यांनी आपल्या घरी बोलावलं.

मुकुल आणि राकेशने कमलादेवीचींही माफी मागितली आणि भविष्यात असे कृत्य न करण्याचे वचन दिले.

मुकुल आणि त्याच्या आईवडिलांना त्या रात्री झोप आली नाही. मुकुलने प्रायश्चित्त करत सर्व सत्य हकिकत आईवडिलांच्या कानावर घातली. तेव्हा त्याचे बाबा म्हणाले, ‘‘बाळा, तू वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचला आहेस, जिथे तू माझा मुलगा नाहीस, तर मित्रासमान आहेस. तू मेहनत कर, तुला जूहीच काय, तिच्यापेक्षा चांगली जोडीदार मिळेल, पण आधी शिक्षण घेऊन योग्यता तरी कमाव. चोर बनून तुला जूहीही मिळणार नाही.’’

बाबांचं बोलणं खरं ठरलं. जूहीला जेव्हा मुकुलच्या कृत्याबाबत कळलं, तेव्हा तिने मुकुलला ‘चोर’ बोलून त्याच्याशी असलेले संबंध तोडले. त्याने दिलेल्या भेटवस्तूही तिने त्याला परत केल्या. मुकुलचा चेहरा पडला.

आता मुकुलला योग्य धडा मिळाला होता. त्याला आता आईवडीलच खरे मित्र वाटत होते. त्याला आता कळून चुकलं होतं की भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी योग्य मार्गदर्शक कोण होऊ शकतात, तो आता मन लावून अभ्यास करू लागला. त्याला दाखवून द्यायचं होतं की तो ‘चोर’ नाही, आपल्या आईवडिलांचा लायक मुलगा आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें