घुसमट

कथा * पौर्णिमा अत्रे

पाच महिन्यांची सिया, शुभीची पहिलीच मुलगी. लाडक्या लेकीचे पुन्हा:पुन्हा लाड करून शुभीनं तिला खाली ठेवली. बाळंतपणाच्या दीर्घ रजेनंतर शुभी आज प्रथमच ऑफिसला निघाली होती. लहानग्या, गोंडस सियाला सोडून जावंसं वाटत नव्हतं, पण जायला हवंच होतं. गेले सहा महिने ती घरीच होती.

मयंकनं शुभीकडे बघितलं. ती पुन्हा:पुन्हा सियाला छातीशी कवटांळत होती.

‘‘काय झालं?’’ त्यानं विचारलं.

‘‘सियाला सोडून जावंसं वाटत नाहीए.’’

‘‘हो गं! मी समजू शकतो. पण तू काळजी करू नकोस. आईबाबा आहेत…शिवाय रमाबाई आहेच. सिया अगदी सुरक्षित वातावरणात आनंदात राहील. डोंट वरी…चल, निघायला हवं.’’

दिनेश आणि लता म्हणजे शुभीच्या सासूसासऱ्यांनीही तिला आश्वस्त केलं, ‘‘शुभी, अगदी नि:शंक मनानं जा. आम्ही आहोत ना? सिया मजेत राहील.’’

शुभी केविलवाणं हसली. सिया आजीच्या कडेवरून आईकडे बघत होती. शुभीचे डोळे भरून आले. पण ही वेळ भावनाविवश होण्याची नव्हती. तिनं पटकन पर्स उचलली अन् ती मयंकबरोबर घराबाहेर पडली.

शुभी अन् मयंक नवी मुंबईत राहत होती. तिथून आठ किलोमीटर अंतरावर शुभीचं ऑफिस होतं. मयंकनं तिला बस स्टॉपवर सोडलं अन् तो पुढे निघून गेला. बसमध्ये बसायला जागा नव्हती. उभ्याउभ्याच शुभी विचारात गढून गेली.

एका प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन कंपनीत शुभी एक्सपोर्ट मॅनेजर होती. पगार भरपूर होता. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती घरी, ऑफिसातही सर्वांना हवीशी वाटायची. आत्तापर्यंतचं तिचं आयुष्य खूपच निवांत अन् आनंदात गेलं होतं. पण आज सियाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच ऑफिसात आली होती, त्यामुळे ती जरा उदास होती.

ऑफिसात गेल्यावर शुभीनं सर्वत्र नजर फिरवली. बरेच नवे चेहरे दिसले. जुन्या लोकांनी तिचं अभिनंदन केलं अन् ते आपापल्या कामाला लागले. शुभी ज्या पोस्टवर होती तिथं जबाबदाऱ्या भरपूर होत्या. आत्तापर्यंत प्रत्येक प्रॉडक्ट तिच अप्रूव्ह करत होती.

शुभीची बॉस शिल्पी तिच्या कामावर खुश होती. कितीही काम असलं तरी शुभी हसतमुखानं सर्व कामाचा फडशा पाडायची. त्यामुळे शिल्पी आपलीही बरीचशी कामं शुभीवर टाकायची. शुभीनंही ती कामं आनंदाने केली होती.

शिल्पी खूपदा म्हणायची, ‘‘शुभी, तू नसतीस तर इतकं काम मी एकटी करू शकले नसते. तुझ्यावर सगळी कामं सोपवून मी अगदी निश्चिंत होते.’’

शुभीला आपल्या कर्तबगारीचा, योग्यतेचा गर्व वाटायचा. तशी शिल्पी बऱ्यापैकी खडूस अन् खवंट होती. पण अशा बॉसकडून कौतुक ऐकलं की शुभीचाही अहंकार सुखावत असे. आपल्या कामाव्यतिरिक्त इतरही अनेक कामं शुभी आटोपत असे.

ऑफिसात आपल्या सीटवर आल्या आल्याच शुभीला स्वत:त उर्जेचा संचार झाल्याचं जाणवलं. कर्तव्याची भावना मनातून उसळी मारून वर आली. शिल्पीला भेटून औपचारिक बोलणं झाल्यावर ती उत्साहानं कामाला लागली. महिनाभरातच एक नवा प्रॉडक्ट लाँच व्हायचा होता. त्याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी शुभी शिल्पीकडे गेली, तेव्हा अगदी थंडपणे ती म्हणाली, ‘‘शुभी, एक नवी मुलगी आली आहे, तिलाच हे असाइनमेंट दिलंय.’’

‘‘पण का? मी आलेय आता तर मी करते ना?’’

‘‘नको, तू राहू दे. बऱ्याच उशिरापर्यंत थांबावं लागेल…तुला तर आता घरी पोहोचण्याची घाई असणार ना?’’

‘‘नाही नाही, असं काही नाहीए…काम तर मी करणारच ना?’’

‘‘नको, तू राहू दे…’’

मनात खळकन् काही तरी फुटल्यासारखं वाटलं शुभीला. ती तर आत्तापर्यंत प्रत्येक प्रॉडक्टसाठी जिवाचं रान करत होती, तर आता का नाही करू शकणार काम? सियासाठी तिला घरी लवकर जावं लागेल हे खरं असलं तरी ती जमवून घेईल सगळं. तिच्या मानसिक समाधानासाठी, मानसिक आनंदासाठीच तर ती नोकरी करतेय ना? काही न बोलता ती परत टेबलपाशी आली, पण मघाचा उत्साह, उर्जा आता लोप पावली होती.

तिनं ऑफिसात सर्वत्र नजर फिरवली. तिला एकदम कपिलची आठवण आली. कपिल कुठाय? सकाळपासून दिसलाही नाहीए. त्याच्या आठवणीनं तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मोकळ्या ढाकळ्या विनोदी स्वभावाचा कपिल सतत तिच्याशी चेष्टा मस्करी करायचा. फ्लर्टिंगच म्हणा ना. शुभीला गंमत वाटायची. ती विवाहित होती. त्यातून गरोदर होती, तरीही कपिल तिच्या मागेपुढे करायचा. कपिल तिला एकदम लंच टाइममध्ये भेटला. आज तिनं आपला डबा घरून आणला नव्हता. कॅन्टीनमध्ये जेवावं असं ठरलं होतं. उद्यापासून डबा आणता येईल. ती कॅन्टीनकडे निघाली. तेवढ्यात तिला कपिल दिसला. तिनं हाक मारली,

‘‘कपिल…’’

‘‘अरेच्चा? तू? कशी आहेस?’’

‘‘छान आहे. सकाळपासून दिसला नाहीस?’’

‘‘हो…फिल्डवर होतो. एवढ्यात येतोय.’’

‘‘आणि कसं काय?’’

‘‘छान आहे. तुझी मुलगी कशी आहे?’’

‘‘मस्त आहे, चल, लंच घेऊयात.’’

‘‘हो तू हो पुढे, मी येतोच,’’ म्हणत कपिल दुसरीकडे निघून गेला.

शुभीला नवलच वाटलं? हा तोच कपिल का? इतका फॉर्मल? असा तर तो कधीच वागत नसे. शुभीनं तिच्या जुन्या सहकाऱ्यांबरोबर जेवण उरकलं, सहज लक्ष गेलं तर कपिल एका नव्या ग्रुपसोबत खिदळत होता. तिनं एक नि:श्वास सोडला. घरी फोन करून सासूला सियाबद्दल विचारलं. सगळं ठीक आहे कळल्यावर ती पुन्हा आपल्या टेबलपाशी येऊन कामाला लागली.

संध्याकाळी सहाला शुभी ऑफिसमधून निघून बस स्टॅन्डवर पोहोचली. एरवी इतक्या लवकर ती कधीच निघत नव्हती. कामंच आटोपत नव्हती. आज कामच कमी होतं. ती विचार करत होती. इतक्या दिवसांनी कामावर आल्यावर ऑफिसात चित्त का लागत नव्हतं. कदाचित सियाला पहिल्यांदाच इतका वेळ सोडून आल्यामुळे असेल का? की ऑफिसात बरेच बदल झालेत. नवी माणसं आली आहेत म्हणून? पूर्वी तिला कपिलचं फ्लर्ट करणं आवडायचं. छान टाइमपास होता तो. तिला वाटत होतं, इतक्या दिवसांनी कपिल भेटेल तेव्हा खूप गप्पा मारेल, बडबड करेल, तिला कामही सुचू देणार नाही. पण आज तर त्यानं शुभीला चक्क टाळलंच. ती रजेवर गेल्यानंतर सुरूवातीला तो आवर्जून फोन करायचा. पुढे पुढे मेसेजना रिप्लायसुद्धा देणं बंद केलं होतं. ती ही बाळात गुंतली. आत्ताच्या नव्या प्रॉडक्टमध्ये तिला इंटरेस्ट होता पण शिल्पीशी वाद कुणी घालायचा.

ती घरी पोहोचली, तेव्हा सियाला सांभाळताना सासू सासऱ्यांची चांगलीच दमछाक झालेली होती. शुभीनं सिया म्हणून हाक मारताच सिया आईकडे झेपावली. शुभीनं भराभर हातपाय तोंड धुवून कपडे बदलून सियाला जवळ घेतलं. तिला छातीशी कवटाळून ती आपल्या बेडरूममध्ये येऊन अंथरूणावर पडली. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

सासू खोलीत आली. ‘‘कसा गेला दिवस?’’

‘‘सियानं त्रास नाही ना दिला?’’ शुभीनं विचारलं.

‘‘रडली थोडीशी, पण हळूहळू होईल तिला सवय. तिला, आम्हाला अन् तुलाही, कारण तुझं ऑफिसला जाणंही गरजेचं आहे ना?’’ सासू म्हणाली.

एव्हाना मयंकही आला होता. रमाबाई सायंकाळचा स्वयंपाक आटोपून निघून गेल्या होत्या. रात्रीची जेवणं एकत्रच झाली. सिया सर्व वेळ आईला चिकटूनच होती.

मयंकनं विचारलं, ‘‘शुभी, आज खूप दिवसांनी ऑफिसला गेली होतीस, कसा गेला दिवस?’’

‘‘वातावरण खूपच बदलेलं वाटलं. खूप नवीन लोकही आले आहेत. आज काही माझं चित्त लागेना कामात?’’

‘‘कदाचित तुला सतत सियाची आठवण येत असेल…होईल हळूहळू सवय.’’

त्या नंतरच्या पंधरा वीस दिवसांत ऑफिसचे झालेले एकूण बदल लक्षात आल्यावर शुभीला टेन्शनच आलं. हा प्रकार नवा होता. शिल्पी तशीही चिडचिडी होती. नवरा बंगळुरूला जॉब करत होता. ही मुंबईत एकटीच असायची. पंधरा दिवसांनी एकदा नवरा मुंबईत यायचा. त्यामुळे तिला बंधनं काहीच नव्हती. नेमकी सायंकाळी सहा वाजता तिला मीटिंग घेण्याची हुक्की यायची. अत्यंत महत्त्वाची डिस्कशन्स तिला नेमकी साडेसहाला आठवायची. मग सात वाजता मीटिंग व्हायची.

शुभीला आपलं काम आवडायचं. प्रामाणिकपणे ती काम करायची. जास्तीच्या कामाबद्दलही कधी तिनं तक्रार केली नव्हती. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शुभीनं इथवर पोहोचायला खूप श्रम घेतले होते. सहाच्या सुमाराला शुभीनं तिच्या नव्या सहकारी मैत्रिणीला घरी विचारलं तर ती म्हणाली, ‘‘आता तर मीटिंग आहे ना?’’

शुभी दचकलीच! ‘‘मीटिंग कुणी ठेवलीय? मला तर काहीच ठाऊक नव्हतं.’’

वैतागून हेमानं म्हटलं, ‘‘शिल्पीनं बोलावलीय. तिला स्वत:ला घरी जाण्याची कधीच घाई नसते. पण इतरांना घरदार, मुलं, नवरा, कुटुंब सांभाळायचं असतं हे ती लक्षातच घेत नाही.’’

शुभीला जरा गोंधळल्यासारखं झालं…शेवटी न राहवून ती शिल्पीकडे पोहोचली, ‘‘मॅम, मला माटिंगबद्दल ठाऊकच नव्हतं. काय डिस्कस करायचंय? मी काही तयारी करू?’’

‘‘नको, तू राहू दे. एका नव्या असाइनमेंटवर काम करायचंय.’’

‘‘मग मी थांबू का?’’

‘‘नाही…नको, तू घरी जा.’’ लॅपटॉपवरची नजरही न काढता शिल्पी आपलं काम करत राहिली. शुभीला ती उपेक्षा, तो अपमान खूपच खटकला. त्याच मन:स्थितीत ती घरी आली. रात्रीच्या जेवणाच्या वेळी तिला मनातल्या भावना मोकळ्या कराव्याशा वाटल्या. तिनं म्हटलं, ‘‘मयंक, हल्ली ऑफिसात वातावरण विचित्र आहे. मला तिथं घुसमटायला होतंय. पूर्वी माझ्या खेरीज शिल्पीच्या मीटिंग्ज होत नव्हत्या. आता तिला माझी गरजच नाहीए. मला नवी असाइनमेंटही देत नाहीए.’’

कुणी काहीच बोललं नाही, तेव्हा तिच पुढे म्हणाली, ‘‘पूर्वी जे लोक सतत मागेपुढे करायचे, ते ही आता टाळायला बघतात. मला अजिबात आवडत नाहीए तिथं काम करायला. सियाच्या जन्मानंतर मी ऑफिस जॉइन करून चूक केली असं वाटतंय मला. घुसमट सहन होत नाहीए. जीव गुदमरतोय जणू…’’

मयंकनं तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं अन् तो म्हणाला, ‘‘टेकइट ईझी शुभी, तुला कदाचित फार दिवसांनी गेल्यामुळे असं वाटत असेल…पण नोकरी तर करायचीच आहे ना?’’

‘‘नाही, मला नाही जावंसं वाटत…’’

‘‘असं कसं? जावं तर लागेलंच!’’

आता सासूलाही संभाषणांत भाग घ्यावासा वाटला, ‘‘अगं, पण घरात इतके खर्च आहेत, दोघं कमवता आहात म्हणून सगळं सुरळीत चाललंय. एकट्या मयंकाच्या पगारात असं सगळं होईल का?’’

शुभी गप्प बसली. तिलाही माहीत होतं की तिला मिळणाऱ्या दणदणीत पगारामुळेच त्यांचं स्टॅन्डर्ड इतकं ‘हाय’ आहे. स्वत:च्या पायावर उभं असण्याचा तिलाही अभिमान होताच. पण ऑफिसात खरंच तिला घुसमटायला होतंय. नाहीच जावंस वाटत. तिला वाटतंय सध्या ब्रेक घ्यावा. घरीच सियाबरोबर रहावं…पण ब्रेक घेतल्यामुळेच तर सगळं बदललं आहे. सासूसासरे, मयंक सगळेच आपापल्या परीनं तिला समजवंत होते. काही तिला समजलं, काही तिनं समजून घेतलं नाही…ती स्वत:च्याच मनाची समजूत घालत होती.

काही दिवस अजून गेले. सिया आता नऊ महिन्यांची झाली होती. खूपच शांत अन् खेळकर होती सिया. दिवसभर ती आईशिवाय छान राहायची. संध्याकाळी मात्र आई आल्यावर आईला अजिबात सोडत नसे.

शुभीला आता ऑफिसच्या कामात मजा येत नव्हती. शिल्पी आता तिला अजिबात विचारत नव्हती. नवी जबाबदारी देणं तर दूरची गोष्ट होती. सहा महिन्यांत इतका फरक का पडावा हेच तिला कळत नव्हतं. कुठं काय चुकलं? तिनं बाळंतपणाची रजाच घ्यायला नको होती का? पण तो तर तिचा हक्कच होता. पण तेवढ्यामुळे ऑफिसमधली तिची गरजच संपून जावी?

त्यातून पुन्हा कपिलचं तुसडेपणानं वागणं, त्याच्याकडून होणारी उपेक्षा तिला अधिकच दु:खी करत होती. ती एका बाळाची आई झाल्यामुळे त्याच्या स्वभावात इतका फरक पडावा? कधी तरी भेटला तर इतका औपचारिकपणे बोलायचा, वागायचा, जणू हा तो कपिल नाहीच. पूर्वी त्याचे रोमँटिक डॉयलॉग, फ्लर्टिंग, जोक्स ती एन्जॉय करायची. दिवसा कसा उत्साहानं सळसळत संपायचा. आता मात्र ती उदास कंटाळवाणा दिवस कसाबसा रेटून घरी परतायची.

आपली योग्यता, आपल्या अधिकाराच्या अनुरूप काम ऑफिसात दिलं जात नाही यामुळे ती निराश असायची. टेन्शन यायचं तिला. मनाची घुसमट वाढत होती. घरात कुणीच तिला समजून घेत नव्हतं अन् ऑफिसमध्ये मनाजोगतं काम मिळत नव्हतं.

नेमकं तिच्या मागे काय घडलं होतं ते तिला समजलं नाही. पण ऑफिसात वातावरण बदललं होतं. त्यामुळे ती फार त्रस्त होती. ती घुसमट, तो ताण सहन होईना. डिप्रेशन येईल की काय असं वाटत होतं. शेवटी तिनं सरळ राजीनामा लिहिला अन् शिल्पीकडे पाठवला. तिला नवल वाटलं…कुणीच काही रिएक्शन दिली नाही. ती ऑफिसबाहेर पडली अन् तिनं मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेतला.

थोड्या दिवसांनी दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न करता येतील. तिच्याजवळ योग्यता आहे. वय अजून गेलेलं नाही. ती मेहनती आहे. दुसरी नोकरी सहज मिळेल. सध्या तरी सियाबरोबर वेळ घालवता येईल. इतकी वर्षं इथं मरेमरेतो काम केलं. रात्र की दिवस बघितला नाही, तिथंच तिला इतकं इग्नोर करताहेत. नकोच ती नोकरी.

खूपच दिवसांनी ती त्या दिवशी आनंदी अन् शांत मन:स्थितीत होती. घरी परतताना तिनं सियासाठी खेळणी अन् फ्रॉक्स विकत घेतले. घरी पोहोचताच सिया तिच्याकडे झेपावली. सियाला जवळ घेतल्यावर तिला अजूनच छान वाटलं. रात्री जेवताना तिनं शांतपणे सांगितलं, ‘‘मी आज राजीनामा दिला.’’

सगळ्यांना जणू विजेचा शॉक बसला. सगळ्यांनी एकदमच विचारलं, ‘‘का?’’

‘‘मला तिथलं टेंशन सहन होईना. ते वातावरण डिप्रेशन आणणारं होतं. मी दुसरी नोकरी शोधेन. मला तिथं आवडत नव्हतं.’’

मयंक चिडचिडून म्हणाला, ‘‘हा काय मूर्खपणा आहे? तिथं नोकरी करायची, वातावरण आवडत नाही याला काय अर्थ आहे?’’

‘‘नोकरीच करत होते, पण मला माझ्या योग्यतेप्रमाणे काम दिलं जात नाही. काम करण्याचं मानसिक समाधान नाही. त्यामुळे मला तिथं आवडत नव्हतं…’’

‘‘पण आधी दुसरा जॉब बघायचा. मग हा सोडायचा.’’

‘‘मी बघणारच आहे. माझ्याकडे योग्यता आहे, अनुभव आहे, वयही गेलेलं नाहीए.’’

सासू रागातच होती. म्हणाली, ‘‘दुसऱ्या जॉबमध्ये मन रमेल याची काय गॅरेंटी आहे? आणि मन लागत नाही हे काय नोकरी सोडायचं कारण असतं का? आता मयंकच्या एका पगारात कसं भागायचं? इतकी घाई का केलीस तू नोकरी सोडायची? थोडा धीर धरला असता…’’

सासरेही म्हणाले, ‘‘आता कधी नोकरी शोधणार, कधी मिळणार, कधी पगार येणार…इतके खर्च आहेत. एका पगारात काय काय होणार? कठीणच आहे…’’

सियाला मांडीवर घेऊन बसलेली शुभी त्या तिघांकडे आळीपाळीनं बघत होती. तिच्या मनाची घुसमट, तिचा होणारा कोंडमारा कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. तिची व्यथा, वेदना यापेक्षाही तिचा पगार थांबला हे महत्त्वांचं होतं…बिचारी शुभी…तिची घुसमट आता अधिकच वाढली होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें