निवडणूक प्रचारात महिलांचा पुढाकार

* शैलेंद्र सिंह

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांचे महत्त्व अधिक दिसून आले. काँग्रेसने ‘मुलगी आहे लढूही शकते’चा नारा दिला. सोबतच विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी ४० टक्के तिकिटे महिलांना दिली. त्यामुळे इतर पक्षही असा प्रयोग करतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तिकीट देताना मात्र कोणताही मोठा बदल केला नाही, तरीही निवडणूक प्रचारात महिलांची भूमिका खूपच विशेष होती.

ज्या घरांमध्ये पुरुष निवडणूक लढवत होते, त्या घरांमध्ये निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा पत्नीने हाती घेतली होती. पत्नी तिच्या मैत्रिणींचा एक गट बनवून सतत प्रचार करत राहिली. निवडणूक प्रचारात महिलांची भूमिका दोन भागात विभागली गेली. एका भागात निवडणूक लढवणारा उमेदवार स्वत: प्रचार होता.

तो त्याचा पक्ष आणि संघटनेच्या लोकांसोबत जनतेच्या भेटीगाठी, रॅली काढणे, बड्या नेत्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात मग्न होता, तर दुसऱ्या भागात उमेदवाराचे कुटुंबीय स्वत: त्यांचा प्रचार करत होते. यात सर्वात महत्त्वाची भूमिका पत्नीने बजावली. याशिवाय काही लोकांच्या मुली, बहिणी आणि इतर महिला नातेवाईकांनीही प्रचार केला.

कार्यालय आणि प्रचार दोन्ही सांभाळले

बिंदू बोरा यांनी त्यांचे पती डॉ. नीरज बोरा यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा स्वत: सांभाळली. डॉ. नीरज बोरा हे भारतीय जनता पक्षाकडून लखनऊच्या उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. बिंदू बोरा यांनी २ प्रकारे निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. त्या कार्यालयात बसून प्रचाराची रणनीती ठरवत असत की, कोणता परिसर आणि कोणत्या घरांना भेट द्यायची. प्रचारासाठी प्रत्येक मतदाराच्या घरोघरी पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य होते. त्यासाठी महिला सहकाऱ्यांचा गट तयार करण्यात आला होता.

बिंदू बोरा सांगतात, ‘‘आम्ही दिवसभरात प्रचारासाठी २० ते २५ किलोमीटर रोज चालत असू. चेहरा थकल्यासारखा वाटणार नाही, याची काळजी घेत असू. स्वत:च्या खाण्यापिण्याव्यतिरिक्त सोबत चालणाऱ्या लोकांची काळजी घ्यावी लागत असे. सतत चालल्याने बरेच वजन कमी झाले. लोक अनेक प्रकारच्या तक्रारीही सांगत. मतदारांना हसतमुखाने भेटण्याचा नेहमीच प्रयत्न असायचा, जेणेकरून ते नाराज होणार नाहीत. रात्री झोप न येण्याची तक्रार दूर झाली. अंथरुणावर पडल्याबरोबर झोप येत असे. रोज रात्री झोपण्यापूर्वी उद्या काय आणि कसे करायचे, याचे मी नियोजन करत असे. निवडणुकीच्या प्रचारामुळे संपूर्ण भागातील जनता मला चांगल्या प्रकारे ओळखू लागली.’’

निवडणुकीच्या रणांगणात

लखनऊच्या सरोजिनी नगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या प्राध्यापक अभिषेक मिश्रा यांच्या पत्नी स्वाती मिश्रा यांनी पतीच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. सरोजिनी नगर परिसरातील बराचसा भाग गावाकडचा आहे. तिथेही त्या गेल्या.

त्यांनी मात्र स्वत:च्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष केले. त्या सांगतात, ‘‘मी एकटीने तसेच माझ्या गटासोबत प्रचार करत राहिले. प्रचारादरम्यान अनेक घरांमध्ये खूप मान मिळत असे. आम्ही सोबत बसून चहा घ्यावा, अशी लोकांची इच्छा असायची. आम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे होते, त्यामुळे मनात असूनही लोकांना हवा असला तरी जास्त वेळ देता येत नव्हता.’’

कोणत्या समस्या यायच्या?

स्वाती सांगतात, ‘कोविड-१९ चा काळ सुरू होता.  त्यापासून स्वत:ला दूर ठेवायचे होते. अडचण अशी होती की, मास्क लावून प्रचार करता येत नव्हता आणि मास्क न घातल्यास कोरोनाचा धोका होता. लोक प्रचारादरम्यान सेल्फी काढण्यासाठी जवळ येत असत. त्यावेळी सावध राहावे लागत असे.

कार्यकर्त्यांना प्रचारासाठी सोबत घेऊन जावे लागायचे. त्यांना हवे तसेच वागावे लागायचे. कधीच कुणाला नाराज करू शकत नव्हते. आमचा मुद्दा लोकांना समजावा आणि त्यांनी माझ्या पतीला मतदान करावे, यासाठी संपूर्ण निवडणूक प्रचारात प्रयत्न केले.’’

सोशल मीडियाचा घेतला आधार

नम्रता पाठक या पती ब्रजेश पाठक यांच्या निवडणूक प्रचारात खूप सक्रिय होत्या. ब्रजेश पाठक लखनऊच्या कँट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. नम्रता पाठक यांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर केला. एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला, ज्याद्वारे हे ठरवले जायचे की, कोणत्या परिसरात जायचे. सकाळी उठून सर्वात आधी त्या घरातील कामं करायच्या.

त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्यांसोबत व्यूहरचना तयार करून पायीच घरोघरी जाऊन प्रचार करत होत्या. संपूर्ण महिलांचा संघ नम्रतेने काम करायचा. प्रत्येक क्षेत्रातील जाणकार व्यक्तींशी संपर्क साधून त्यांनाही प्रचारासाठी बोलावले जायचे.

सेल्फीची क्रे

नम्रता पाठक सांगतात, ‘‘लोकांना भेटून त्यांना समजावून आमचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात असे. १५-२० दिवसांच्या निवडणूक प्रचारात एका व्यक्तीकडे अनेकदा जावे लागायचे. आम्ही ज्या प्रचाराच्या गटात असायचो त्यासोबत लोकं जास्त जोडले जायचे. सर्वसाधारणपणे कार्यकर्ते फक्त घोषणाबाजी करून निघून जातात.

जेव्हा तुम्ही एखाद्याला वैयक्तिकरित्या भेटता आणि त्याच्या काही समस्या समजून घेता, तेव्हा लोक अधिक प्रभावित होतात. मोहिमेत सहभागी लोक ती सोशल मीडियावर लाईव्ह करायचे, त्यामुळे एकाचवेळी अनेक लोक या मोहिमेचा भाग बनले. निवडणूक प्रचारात सेल्फीची क्रेझ सर्वाधिक होती.

याशिवाय परिसरातील लोक ज्या काही समस्या मांडायचे, त्यांचे नाव, पत्ता, मोबाइलसह नोंद ठेवून ती समस्या सोडवली जाईल, असे आश्वासनही आमच्याकडून देण्यात येत असे.’’

लंडनमधून आलेल्या बहिणींनी सांभाळला प्रचार

अमनमणी त्रिपाठीचे वडील मधुमिता खून प्रकरणात कैदेत आहेत, त्यांचा मुलगा अमनमणी त्रिपाठी महाराजगंजच्या नौतनवा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. भावाला मदत करण्यासाठी तनुश्री आणि वंदना या बहिणी लंडनहून आल्या आणि त्यांनी प्रचार केला. तनुश्री ‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’मध्ये ‘इंटरनॅशनल रिलेशनशिप’मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे.

निवडणूक प्रचारात महिला सर्वश्रेष्ठ यासाठी ठरत आहेत, कारण त्यांच्यात लोकांशी संवाद साधण्याची चांगली कला आहे. लोक महिलांचे ऐकण्यास नकार देत नाहीत. विरोधकही महिलांना परावृत्त करू शकत नाहीत. यातून महिला शक्तीचे दर्शन घडते.

समाज महिलांना राजकारणात स्वीकारत आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात महिलांचे महत्त्व वाढले आहे, यावरून निवडणुकीतही महिलांची भूमिका वाढणार असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसने जी मोहीम सुरू केली ती प्रभावी ठरत असून हळूहळू निवडणुकीत महिलांची भूमिका वाढणार आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें