डाएट मॉम बनू नका

– शिखर चंद्र जैन

९ वर्षीय मितालीचा जोरजोराने रडण्याचा आवाज ऐकून वैशालीताईंना रहावलं नाही. त्या पटकन् आतल्या खोलीत गेल्या. पाहिलं तर त्यांची सून सुलेखा मितालीला मारत होती. वैशालीताईंनी विचारलं असता त्यांना समजलं की खूप दिवसांपासून मितालीला पास्ता खायचा होता. पण सुलेखा तिला रोज नाश्त्यामध्ये उपमा किंवा लापशीच देत होती. ज्यामुळे मिताली खूप कंटाळून गेली होती. जेवणातही सुलेखा तिला रोज एकच भाजी तिही दुधीभोपळा, कधी पालक बटाटा किंवा पडवळ व एक चपाती एवढंच देत असे.

सुलेखा हल्लीच तिच्या माहेरी जाऊन आली होती. तेव्हापासून तिने मितालीच्या डाएटमध्ये हे बदल केले होते. तिथे एका शेजारणीकडून तिला समजले होतं की मुलांना मोजूनमापून, ‘कॅलरीज’चा हिशोब ठेऊनच जेवण दिलं पाहिजे. तेव्हापासून सुलेखाच्या डोक्यात हे खूळ बसलं होतं.

वैशालीताईंना हे सगळे खूपच विचित्र वाटले, पण भांडणं नकोत म्हणून त्या गप्प बसल्या. महिनाभर हे असेच सुरू राहिले व अचानक एक दिवस मिताली बेशुद्ध झाली. तिला रूग्णालयात दाखल करावे लागले. मिताली खूपच अशक्त झाली होती. विचारले असता असे समजले की रोज एकसारखे जेवण जेवल्यामुळे मितालीला उलट्या होऊ लागल्या होत्या व अनेकदा आईच्या भीतिने ती लपून जेवण टाकून देत असे, म्हणून ती कुपोषणाचा बळी ठरली होती व तिच्यावर ही परिस्थिती ओढवली होती.

अनावश्यक डाएट कंट्रोल

सुलेखाप्रमाणेच हल्ली अनेक आयांची मानसिकता दिसून येते. आपल्या मुलांच्या तब्येतीसंदर्भात गरजेपेक्षा जास्त काळजीचा नव्या पिढीतील आयांचा हा पवित्रा पाहून डॉक्टर व डाएटीशियनदेखील हैराण आहेत. कोलकात्यामधील बेलव्हू रूग्णालयातील डाएटीशिअन संगीता मिस्रा सांगतात की आजकाल बॉडी कॉन्शस नवीन पिढीच्या आया आपल्या ६-७ वर्षांच्या मुलांनाही घेऊन येतात व त्यांना मुलांसाठी आहारातील कॅलरी फिक्स डाएट चार्ट हवा असतो.

आयांची ही नवीन पिढी मुलांच्या ओबॅसिटीच्या बातम्यांमुळे काळजीत आहे. या भानगडीमुळे त्या त्यांच्या छान सुदृढ व व्यवस्थित वजन असणाऱ्या मुलांचेही डाएट कंट्रोल करण्यात व्यस्त आहेत.

डॉक्टर संगीता मिश्रांकडे अशाही काही आया येतात ज्या त्यांच्या मुलांना न्याहारीसाठी फक्त एक उकडलेले अंडे किंवा २ इडल्या खाण्यास देतात व जेवणात कोरडी पोळी व उकडलेल्या भाज्या देण्याचा प्रयत्न करतात.

मानसिक दबाव

व्यावसायिक वर्गसुद्धा आयांच्या या भीतिचा फायदा पुरेपूर घेताना दिसत आहेत. फॅट फ्री फूड प्रॉडक्टस्ची बाजारात रेलचेल आहे. मुलांना सतत हे खाऊ नको ते पिऊ नको, असे बजावले जाते. हे जास्त कॅलरी असणारं खाणं आहे. यात खूप फॅट आहे, इथे जिवाणू आहेत, तिथे व्हायरस आहेत इ. हेल्थ एक्सपर्ट्स पण या स्थितीमुळे खूपच चिंतेत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की मुलांची हल्लीची पिढी जेवणासारखी गोष्ट जी चवीने खायला हवी तीसुद्धा भीतभीत खात आहे. या जेवणाचे जे फायदे आरोग्याला व्हायला हवेत ते मिळतच नाहीत व मुले मानसिक दबावाखाली राहू लागली आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकन प्रसार माध्यमांमध्ये अशाच एका डाएट मॉमचे किस्से चर्चिले गेले. मॅनहॅटनच्या या सोशलाईट महिलेद्वारे लिन वीएने फॅशन मॅगझिनसाठी लिहिलेल्या लेखावरून कळते की ती तिच्या मुलीच्या जेवणावरही पहारा ठेवत असे.

अत्याचारापेक्षा कमी नाही

एक डाएटीशियन सांगतात की त्यांना हे पाहून खूप आश्चर्य वाटते की ज्या माता आपल्या मुलांना माझ्याकडे घेऊन येतात. त्या स्वत: जाड असतात. जोपर्यंत घरातील मोठे खाण्यापिण्यात काळजी घेणार नाहीत आणि मुलांचे आदर्श बनणार नाहीत, तोपर्यंत मुलांकडून तशी आशा करणे हे त्यांच्यावर अत्याचार केल्यासारखेच आहे.

योग्य हेच आहे की मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाण्यासाठी पूर्ण मनाई करण्याऐवजी व जबरदस्ती त्यांच्या मनाविरूद्ध जेवण जेवू घालण्याऐवजी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर मुल निरोगी व सुदृढ राहतील. यासंबंधी खालील उपयोगी बाबी जाणून घेणं गरजेचं आहे.

मायक्रोबायोटिक थेरपी

मायक्रोबायोटिक असे मानते की शरीर दर ७ वर्षांत स्वत:ला भरून काढते. म्हणून वाढत्या वयातील मुलांमध्ये सुरूवातीची २१ वर्षं खूप महत्त्वाची असतात. या दरम्यान मुलांनी पौष्टिक खाणं खावं यासाठी मुलांना प्रेरित करणं यात आईवडिलांची महत्त्वाची भूमिका असते. जी मुलं भाज्या, कडधान्य, सुकामेवा, सर्वप्रकारची धान्य, फळे नियमित खातात त्यांची रोगप्रतिकारक क्षमता खूपच उत्तम असते. यामुळे क्रोनिक डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, सर्दीखोकला, अॅलर्जी, हृदय विकार, ऑस्टियोपोरोसिस सुरक्षित राहतात. यासाठी आईने मुलांसाठी रोज वेगवेगळ्या चवींचे व नाविन्यपूर्ण जेवण बनवले पाहिजे म्हणजे जेवणात त्यांना रस निर्माण होऊन गोडी लागते.

पूर्णत: बंद नको
मुले जर पिझ्झा, बर्गर किंवा इतर फास्टफूडसाठी हट्ट करत असतील तर पूर्णपणे त्या गोष्टी बंद करण्याऐवजी त्यांचा आवडता खाद्यपदार्थ त्यांना विकत घेऊन देऊन त्यातील चुकीच्या बाबी सांगाव्यात, बरोबरीनंच असे पदार्थ घरी बनवण्याचाप्रयत्न करावा. म्हणजे त्यात भाज्या, सुकेमेवे इ. घालून त्यांना पौष्टिक बनवता येईल.

मुलांना खाण्यासाठी बाजारातून काही पॅकबंद जेवणही आणावे. ज्यांचे वेष्टण अत्यंत आकर्षक असते व खाण्यासाठी उपयुक्त असते. जसे रेडी टू इट उपमा, इस्टंट ढोकळा, इडली मिक्स इ. मुलांना साखरेऐवजी इतर काही गोड पर्याय द्यावेत जसे की आंबा, खजूराचा गूळ, कलिंगड, द्राक्ष, डाळिंब इ.

शारीरिक हालचालींची सवय

स्थूलपणाचे मूळ कारण आहे मुलांची कमी प्रमाणात असलेली शारीरिक हालचाल. एक जबाबदार आई म्हणून तुम्ही मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त व प्रोत्साहित केले पाहिजे. जसे क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, खो खो इ. त्याबरोबरच काही ना काही कारणाने दिवसातून एक-दोनवेळा लहान सहान वस्तू आणण्यासाठी बाजारात पाठवले पाहिजे. शाळा जवळ असेल तर चालत किंवा सायकलने येण्याजाण्याची सवय लावावी. अशाप्रकारे मुलांना जास्त ताणतणाव न देताही तुम्ही त्यांना सुदृढ व निरोगी ठेऊ शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें