घरात पेस्ट कंट्रोल आवश्यक

* सोमा घोष

मुंबईतील एका घरात झुरळांचा इतका उपद्रव झाला होता की, त्यांच्यामुळे घरात राहणारे लोक उलटी, जुलाब यांसारख्या आजारांचे शिकार होऊ लागले होते. औषधे घेऊनही ते बरे होत नव्हते. अशा वेळी त्यांना कोणीतरी घरात पेस्ट कंट्रोल करण्याचा सल्ला दिला. त्यांनी लगेच सल्ला अंमलात आणला आणि घरात दोन वेळा पेस्ट कंट्रोल केले, त्यानंतरच त्यांची झुरळांपासून सुटका झाली.

खरं म्हणजे, या छोटयाशा घरात भरपूर सामान ठासून भरलेले होते. भरपूर वर्षे झाली, पण कोणीही ते सामान हटवून घर साफ केले नव्हते. जेव्हा रात्री लाइट बंद होते, तेव्हा हे जीवजंतू सहजपणे बाहेर येतात आणि खरकटया भांडयांवरून पळू लागतात. असे करताना ते आपल्यासोबतचे बॅक्टेरिया त्यांच्यावर सोडतात.

याबाबत मुंबईच्या कल्पतरू हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट आर.एम. हेगडे, जे ३० वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत, ते सांगतात की, घरात पेस्ट कंट्रोल नेहमीच आवश्यक आहे. शहरांत गटार किंवा पाइपच्या मार्गाने जीवजंतू घरात प्रवेश करतात आणि त्यांचा जर योग्य पद्धतीने बंदोबस्त केला नाहीत, तर ते तिथेच राहून आपला डेरा जमवतात.

नेहमीच असे चित्र दिसते की, बहुतेक घरांमध्ये रात्री उष्टी-खरकटी भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवली जातात. झुरळे किंवा इतर जीव त्या भांडयांवर फिरून मग स्वच्छ भांडयांवर फिरतात. अशा वेळी अनेक आजार उदा. डायरिया, डिसेंट्री, अस्थमा इ. आगंतुक पाहुण्यासारखे हजर होतात. पेस्ट कंट्रोलमुळे ते सर्व जीवजंतू मरून जातात.

गावांमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरते. याउलट शहरांत गटारांमध्ये पाणी साठून राहाते. त्यामुळे झुरळे, डास व माश्यांची पैदास होते. म्हणूनच पेस्ट कंट्रोल दर तीन महिन्यांनी करणे आवश्यक आहे. जर झुरळे जास्त झाली असतील, तर ३० दिवसांत एकदा पेस्ट कंट्रोल करा. जेणेकरून त्यांची अंडी नष्ट होतील.

पेस्ट कंट्रोलच्या पद्धती

* पेस्ट कंट्रोलच्या केमिकल उपायांमध्ये घरातील सामान हटविणे आवश्यक असते. त्याबरोबरच, अशा प्रकारे पेस्ट कंट्रोल केल्यानंतर २ ते ३ तास खोली बंद केल्यानंतर, ती क्लीन करून, खिडकी, दरवाजे उघडून पंखा चालविला पाहिजे. कारण केमिकल ट्रिटमेंटमध्ये जर केमिकलचा दर्प तसाच राहिला आणि तुम्ही खिडकी, दरवाजे न उघडता, एसी लावलात, तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

* हर्बल उपायांमध्ये सामान हटविण्याची गरज नसते. खोलीच्या कोपऱ्यांमध्ये हा उपाय केला जातो आणि व्यक्ती घरात राहूनही पेस्ट कंट्रोल करू शकते.

* जेल उपायांमध्येही सामान हटविण्याची गरज भासत नाही. ‘डॉट’ लावून हा केला जातो आणि हा परिणामकारकही असतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक जेल किंवा हर्बल उपाय अवलंबतात. मात्र, याच्या तुलनेत केमिकल उपायांचा परिणाम दीर्घकाळ राहतो.

या उपायांबरोबरच आपण हेही आजमावू शकता

बोरीक अॅसिड, गव्हाचे पीठ आणि साखर समान प्रमाणात घेऊन छोटया-छोटया गोळया बनवा व घराच्या कोपर्ऱ्यांत २-३ गोळया टाका. त्यामुळे जीवजंतू आणि झुरळे मरतील.

या गोष्टींकडेही लक्ष द्या

* घराच्या मध्यभागी सामान ठेऊन साफसफाई करा. म्हणजे कोपऱ्यांत जीवजंतू उत्पन्न होणार नाहीत.

* जर तुम्ही बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवत असाल, तर ती धुऊन एका छोटया प्लॅस्टिक टबमध्ये गरम पाणी आणि सर्फ घालून भिजवून ठेवा.

* काम संपल्यानंतर सिंकमध्ये गरम पाणी ओता, जेणेकरून जीवजंतू वरती येणार नाहीत.

* नालीच्या वरती जाळी अवश्य लावा. म्हणजे झुरळे वरती येणार नाहीत. एवढे करूनही घरात जीवजंतूंचा प्रादुर्भाव होत असेल, तर प्रोफेशनलची मदत घ्या.

कोणती काळजी घ्याल

पेस्ट कंट्रोल करताना खालील काळजी घ्या

* केमिकल उपाय अवलंबताना घरातील वृद्ध आणि लहान मुलांना दुसरीकडे शिफ्ट करा.

* घरातील कोणाही व्यक्तिला श्वसनासंबंधी आजार असेल, तर केमिकल उपायांचा अवलंब करणे टाळा. कारण त्यामुळे त्यांचा त्रास अधिक वाढू शकतो.

* पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घर योग्य पद्धतीने व्हेंटिलेट करा. जेणेकरून श्वास कोंडणार नाही. यासाठीच जवळपास २ तासांनंतर खिडकी-दरवाजे उघडून पंखा सुरू करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें