चल, आपण कॉफी घेऊयात

कथा * मीना वाखले

वैदेही कमालीची बेचैन झाली होती. अचानक सौरभचा ई मेल वाचून, तोही दहा वर्षांनी प्रथमच आलेला ई मेल बघून ती अंतर्बाह्य ढवळून निघाली होती. तिला न जुमानता तिचं मन सौरभचाच विचार करत होतं… का? का तो तिला अचानक सोडून गेला होता? न कळवता, न सांगता पार नाहीसाच झाला होता. मारे म्हणायचा, ‘‘मी तुझ्यासाठी आकाशातले तारे तोडून आणू शकत नाही, पण जीव देईन तुझ्यासाठी…पण नाही, जीव तरी कसा देऊ? माझा जीव तर तुझ्यात वसलाय ना?’’ हसून वैदेही म्हणायची, ‘‘खोटारडा कुठला…अन् भित्रासुद्धा’’ आज इतक्या वर्षांनी हे सगळं आठवल्यावरही वैदेहीच्या चेहऱ्यावर हास्य उमललं होतं. पण दुसऱ्याच क्षणी त्याने केलेल्या विश्वासघाताची आठवण येऊन तिचा चेहरा रागाने लाललाल झाला. पुन्हा प्रश्नांचा तोच गुंता… तो मुळात तिला सोडून गेलाच का? अन् गेलाच होता तर आज ई मेल कशाला केला?

वैदेहीने मेल पुन्हा वाचला. फक्त दोन ओळी लिहिल्या होत्या सौरवने, ‘‘आय एम कमिंग टू सिंगापूर टुमारो, प्लीज कम अॅण्ड सी मी. विल अपडेट यू द टाइम प्लीज गिव्ह मी योअर नंबर. विल कॉल यू.’’

वैदेहीला कळेना, त्याला नंबर द्यावा की न द्यावा? इतक्या वर्षांनंतर त्याला भेटणं योग्य ठरेल की अयोग्य? आज मारे ईमेल करतोए पण दहा वर्षांत भेटायची एकदाही इच्छा झाली नाही? मी जिवंत आहे की मेलेय याची चौकशी करावीशी वाटली नाही? आता परत यायचं काय कारण असेल? प्रश्न अन् प्रश्न…पण उत्तर एकाचंही नाही.

पण शेवटी तिने त्याला आपला नंबर पाठवून दिला? खुर्चीवर बसल्या बसल्या तिला त्या दोघांची पहिली भेट आठवली.

दहा वर्षांपूर्वी ‘फोम द शॉपिंग मॉल’च्या समोर ऑर्चर्ड रोडवर वैदेहीला कुणा कारवाल्याने ठोकरलं होतं. तो बेधडक निघून गेला. रस्त्यावर पडलेली वैदेही ‘हेल्प..हेल्प..’ म्हणून ओरडत होती. पण त्या गर्दीतला एकही सिंगापुरी तिच्या मदतीला येत नव्हता. कुणी तरी पोलिसांच्या हेल्पलाइनला फोन केला.

वैदेहीच्या पायाला झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त वाहात होतं. वेदनेने ती तळमळत होती. टफिक जाम झाला होता. त्याच जाममध्ये सौरभही अडकलेला. एक भारतीय मुलगी बघून तो मात्र पटकन् गाडीतून उतरला. वैदेहीला उचलून आपल्या ब्रॅण्ड न्यू स्पोर्ट्स कारमध्ये ठेवली अन् तडक हॉस्पिटल गाठलं.

एव्हाना वैदेहीची शुद्ध हरपत आलेली. कुणीतरी उचललंय, त्याच्या अंगात लेमन यलो रंगाचा टीशर्ट आहे एवढंच तिला अंधुकसं कळलं अन् ती बेशुद्ध झाली.

परदेशात तर नियम आणखी वेगवेगळे असतात. पोलिसांनी सौरभला भरपूर पिडलं. एक भारतीय मुलगी या पलीकडे त्याला वैदेहीची काहीही माहिती नव्हती. त्यानेही केवळ भारतीय असण्याचं कर्तव्य पार पाडलं होतं. चारपाच तासांनी जेव्हा वैदेही शुद्धीवर आली तेव्हा तो तिथेच तिच्या बेडजवळ बसलेला तिला दिसला. वैदेहीच्या एका पायाला जखम झाली होती. दुसरा पाय फ्रॅक्चर झाला होता. मोबाइलही तुटला होता. सौरभ ती शुद्धीवर कधी येतेय याचीच वाट बघत होता. तिच्या घरी या अपघाताची बातमी पोहोचवायला हवी होती.

डोळे उघडल्यावर एकूण परिस्थितीचं आकलन व्हायला थोडा वेळ लागला. त्यावेळी तिने त्याच्याकडे नीट बघितलं. दिसायला साधासाच होता. पण त्याच्यात काहीतरी वेगळं होतं. कदाचित त्याचं निर्मळ हृदय अन् माणुसकीची जाण त्यामुळेच त्याने वैदेहीला इस्पितळात आणलं होतं.

ती शुद्धीवर आल्याचं लक्षात येताच तो म्हणाला, ‘‘बरं झालं तुम्ही शुद्धीवर आलात…मी काळजीत होतो, अजून किती वेळ इथे बसून राहावं लागेल म्हणून…मी सौरभ…’’

वैदेही काहीच बोलली नाही.

त्याने तिच्या घरच्यांपैकी कुणाचा तरी नंबर मागितला. तिने आईचा फोन नंबर दिला. त्याने ताबडतोब त्या नंबरवर वैदेहीच्या अपघाताची व तिला कुठे अॅडमिट केलंय त्या इस्पितळाची सगळी माहिती दिली. त्यानंतर तो तिथून निघून गेला. जाताना ‘बाय पण केलं नाही,’ वैदेहीने त्याचं नाव ‘खडूस’ ठेवलं.

वैदेहीचे आईबाबा इस्पितळात आले. वैदेहीने त्यांना सगळी हकिगत सांगितली. तो कोण, कुठला काहीच तिला ठाऊक नव्हतं. त्याने स्वत:चा मोबाइल नंबर तिला दिला नव्हता की तिच्याकडून तिचा नंबर घेतला नव्हता. त्यामुळे आता भेटण्याची शक्यता नव्हतीच.

तीन-चार दिवस इस्पितळामध्ये काढल्यावर तिला घरी पाठवण्यात आलं. अजून पंधरा दिवस बाहेर जाता येणार नव्हतं. तिने मैत्रिणीला (ऑफिसमधून रजा घ्यायची म्हणून) फोन करायचा म्हटलं, तर मोबाइल होता कुठे? तिला आठवलं तो सौरभच्या हातात बघितला होता. तो जाताना तिला द्यायला विसरला की मुद्दामच दिला नाही? झालं…आता सगळे कॉण्टॅक्ट नंबर्स गेले. तिला एकदम आठवलं त्याने स्वत:च्या मोबाइलवरून आईला फोन केला होता. आईच्या मोबाइलमध्ये कॉल्स चेक केले अन् त्याचा नंबर सापडला.

तिने ताबडतोब फोन लावला अन् आपली ओळख देत तिचा मोबाइल परत करण्याची विनंती केली. तो म्हणाला, ‘‘मोबाइल मी परत करणारच आहे पण असा फुकटाफाकटी नाही. मला जेवण पाहिजे. उद्या संध्याकाळी येतो…पत्ता सांगा.’’

बाप रे…घरी येणार? हक्काने जेवायला? काय माणूस आहे? पण मोबाइल तर हवाच होता. मुकाट पत्ता सांगितला.

दुसऱ्यादिवशी दस्तूरखुद्द सौरभ महाशय दारात हजर होते. आल्या आल्या सर्वांना आपली ओळख करून दिली. सर्वांशी ओळख करून घेतली. आल्या आल्या मोकळपणाने वागून घरात असा काही रमला जणू फार पूर्वीपासूनची ओळख असावी. वैदेहीला हे सगळं विचित्रही वाटत होतं आणि आवडतही होतं. आई, बाबा, धाकटी भावंडं सर्वांनाच तो आवडला. मुख्य म्हणजे त्याने वेळेवर केलेल्या मदतीमुळेच वैदेही सुखरूप हाती लागली होती. त्याच्या व्यतिमत्त्वात एक गोडवा होता. त्याचं बोलघेवडेपण हे त्याच्या निर्मळ मनाचं प्रतीक होतं.

सिंगापूरमध्ये तो एकटाच राहात होता. एका कार डिस्ट्रीब्यूशन कंपनीत नोकरी करत होता. त्यामुळेच त्याला रोज नवी कार टेस्ट ड्राइव्हसाठी मिळत होती. ज्या दिवशी त्याने वैदेहीला मदत केली होती त्यावेळीही तो नवीन स्पोर्ट्स कारच्या टेस्ट ड्राइव्हरच होता. त्याचे आईवडील भारतात असतात. हळूहळू तो घरच्यासारखाच झाला. थोडा हट्टी होता, पण भाबडाही होता. हवं तेच करायचा. पण ते करण्यामागची भूमिका खूप छान समजावून सांगत असे. स्वत:च्या नकळत वैदेही त्यात गुंतत चालली. तिला कळलं होत, सौरभच्या मनातही तिच्यासाठी खास स्थान होतं.

सौरभच्या ऑफिसच्या जवळपास ऑर्चर्ड रोडला वैदेहीचंही ऑफिस होतं. पंधरा दिवसांनी वैदेही ऑफिसला जाऊ लागली. तिची नेण्याआणण्याची जबाबदारी सौरभने स्वत:हून स्वीकारली. कारण अजून पायाचं फ्रॅक्चर दुरुस्त झालेलं नव्हतं. आईबाबांना त्याच्या या मदतीचं कौतुक वाटलं, कृतज्ञताही वाटली.

सौरभची ओळख होऊन सहा महिने झाले होते. तिचा बाविसावा वाढदिवस होता. त्याच दिवशी सौरभने तिला प्रपोज केलं होतं. त्याची प्रपोज करण्याची पद्धतही आगळीवेगळी होती. बहुतेक लोक आपल्या प्रेयसीला पुष्पगुच्छ, अंगठी, नेकलेस किंवा घड्याळ अथवा चॉकलेट देत प्रपोज करतात. सौरभने कारचं एक नवीन अगदी सुबक असं मॉडेल तिच्या हातात ठेवत विचारलं होतं, ‘‘पुढल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास तू माझ्याबरोबर करशील?’’ त्यांच्या डोळ्यांतून, त्याच्या देहबोलीतून तिच्याविषयीचं प्रेम तिला दिसत होतं. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले अन् तिच्या डोळ्यांत बघत परत तोच प्रश्न केला. वैदेहीचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. त्या क्षणी तिला काहीच बोलणं सुधरेना. त्याच्यापासून दूर होत तिने म्हटलं, ‘‘मलाही तुला काही सांगायचंय, उद्या तू बरोबर पाच वाजता ‘गार्डन बाय द वे’मध्ये भेट.’’

ती संपूर्ण रात्र वैदेहीला झोप लागली नाही. सौरभ, त्याने प्रपोज करणं, अजून तिला पुढलं शिक्षणही घ्यायचं आहे. नोकरी, करिअर खूप काही करायचंय. अजून वयही फक्त बावीस वर्षांचं आहे. सौरभ अजून तसा लहान म्हणजे पंचवीस वर्षांचाच आहे, पण ती त्याच्या आकंठ प्रेमात आहे. तिला त्याच्याबरोबरच पुढचं सर्व आयुष्य घालवायचं आहे. पण अजून थोडा वेळ हवाय तिला. खरं तर कधीपासून हे सगळं तिला सौरभला सांगायचं होतं. पण तेच नेमकं सांगता आलं नव्हतं.

बरोबर सायंकाळी पाच वाजता ती ‘गार्डन बाय द वे’ला पोहोचली. सौरभ आलेला नव्हता. तिने त्याचा फोन लावला तो स्विच ऑफ आला. ती त्याची वाट बघत तिथेच थांबली. अर्ध्या तासाने फोन केला तरीही ऑफ…वैदेहीला काय करावं कळेना. प्रथम तिला राग आला. सौरभ असा बेजबाबदारपणे कसा वागू शकतो? आठ वाजायला आले अन् फोन लागेना तेव्हा मात्र तिच्या मनात शंकाकुशंकांनी थैमान मांडलं. काय झालं असावं? ती रडकुंडीला आली. फोन लागलाच नाही अन् त्यानंतर कधीच सौरभचा फोन आला नाही.

दोन वर्षं वैदेही त्याच्या फोनची, त्याची वाट बघत होती. शेवटीआईबाबांनी तिच्यासाठी पसंत केलेल्या मुलाशी आदित्यशी ती विवाहबद्ध झाली. त्याची स्वत:ची ऑडिटिंग फर्म होती. आईवडिलांसह तो सिंगापूरमध्येच राहात होता.

लग्नानंतरही सौरभला विसरायला तिला फार वेळ लागला. कधी ना कधी, कशावरून तरी त्याची आठवण यायचीच. आता कुठे जरा ती सावरली होती तोवर तो असा अचानक आलाय…आता काय हवंय त्याला?

विचारांच्या गुंत्यात हरवलेली वैदेही फोनच्या घंटीने दचकून भानावर आली. नंबर माहितीचा नव्हता. हृदय जोरात धडधडू लागलं…सौरभचाच असावा. भावना अनावर झाल्या. फोन उचलून हॅलो म्हटलं, पलीकडे सौरभच होता. त्याने विचारलं, ‘‘इज दॅट वैदेही?’’ त्याच्या आवाजाने ती मोहरली. अंगभर झणझिण्या उठल्या.

स्वत:ला संयमित करून तिने म्हटलं, ‘‘या..दिस इज वैदेही,’’ मुद्दामच न ओळखल्याचं नाटक करत म्हणाली, ‘‘मे आय नो हूज स्पीकिंग?’’

‘‘कमाल करतेस? मला ओळखलं नाहीस, अगं मी सौरभ…’’ तो नेहमीच्याच स्टाइलने बोलला.

‘‘ओह!’’

‘‘उद्या सायंकाळी पाच वाजता ‘मरीना वे सॅण्डस होटेल’च्या रूफ टॉप रेस्टॉरण्टमध्ये भेटायला येशील, प्लीज?’’

काही क्षण विचार करून वैदेही उत्तरली, ‘‘हो, तुला भेटायचंय मला. उद्या पाच वाजता येते मी.’’ तिने फोन कट केला.

या क्षणी जर संभाषण वाढलं असतं तर तिचा सगळा राग, सगळा संताप सौरभवर कोसळला असता. तिच्या मनात उठलेल्या वादळाची कल्पनाच कुणी करू शकणार नाही. तिच्या मनात सौरभविषयी प्रेम होतं की राग? त्याला भेटायला ती उत्सुक होती की भेट तिला टाळायची होती? कदाचित दोन्ही असेल…तिचं तिलाच काही कळत नव्हतं.

दुसऱ्या दिवशी ती बाहेर जाण्यासाठी आवरत असताना आदित्यने, तिच्या नवऱ्याने विचारलं, ‘‘कुठे निघालीस?’’

‘‘सौरभ आलाय सिंगापूरला…त्याची इच्छा आहे मला भेटायची,’’ वैदेहीने सांगितलं.

‘‘जाऊ की नको जाऊ?’’ तिने आदित्यालाच प्रश्न केला.

‘‘जा ना, जाऊन ये. रात्रीचं जेवण आपण घरीच एकत्र घेऊयात,’’ आदित्यने म्हटलं.

आदित्य सौरभविषयी ऐकून होता. वैदेहीला त्याने संकटात केलेली मदत, त्याचा आनंदी स्वभाव, आर्जवी बोलणं, वैदेहीच्या माहेरी तो सर्वांच्या लाडका होता हेही आदित्यला ठाऊक होतं. त्यामुळेच सौरभला भेटणं यात त्याला काहीच वावगं वाटलं नाही.

फिकट जांभळ्या रंगाच्या सलवार सुटमध्ये वैदेही सुरेख दिसत होती. तिचे लांबसडक केस तिने मोकळे सोडले होते. सौरभला आवडणाराच मेकअप तिने केला होता. हे सगळं तिने मुद्दाम केलं नव्हतं, अभावितपणेच घडलं होतं. अन् मग तिला स्वत:चाच राग आला…की ती सगळं सौरभला आवडणारंच करतेय? सौरभ तिच्या आयुष्यात इतका खोलवर रूतला होता हे तिला आता जाणवलं. त्याच्यात असं गुंतून चालणार नाही हे तिला कळत होतं पण वेडं मन तिच्या ताब्यातच नव्हतं.

बरोबर पाच वाजता ती मरीना बाय सॅण्ड्सच्या रूफ टॉप रेस्टॉरण्टमध्ये पोहोचली. सौरभ तिच्या आधीच येऊन बसला होता. तिला बघताच तो खुर्चीतून उठला अन् त्याने वैदेहीची गळाभेट घेतली. ‘‘सो नाइस टू सी यू आफ्टर अ डिकेड…यू आर लुकिंग गॉर्जियस.’’

वैदेही अजूनही विचारातच होती. पण हसून म्हणाली, ‘‘थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट…आय एम सरप्राइज टू सी यू अॅक्चुअली.’’

सौरभला कळलं तिला काय म्हणायचंय ते. त्याने म्हटलं, ‘‘तू मला क्षमा केली नाहीस…कारण मी त्या दिवशी कबूल करूनही तुला भेटलो नाही. पण नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेतल्यावर तुझा राग अन् गैरसमजही दूर होईल.’’

‘‘दहा वर्षं म्हणजे अगदी लहानसा काळ नाही. काय घडलं होतं तेव्हा?’’

एक दीर्घ श्वास घेत सौरभने सांगायला सुरूवात केली. ‘‘ज्या दिवशी मी तुला भेटायला येणार होतो त्याच दिवशी आमच्या कंपनीच्या बॉसला पोलिसांनी पकडून नेलं. स्मगलिंग करत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. टॉप लेव्हल मॅनेजरलाही रिमांडवर ठेवलं होतं. आमचे फोन, आमचे अकाउंट सगळं सगळं सील करून टाकलं होतं. तीन दिवस सतत विचारपूस चालली होती अन् नंतर कित्येक महिने आम्ही तुरुंगात होतो. दोन वर्षं केस चालली. आम्ही खरं तर अगदी निरपराध होतो, पण तुरुंगात खितपत पडावं लागलं. शेवटी एकदाचे आम्ही निरपराध आहोत हे सिद्ध झालं पण आम्हाला इथून लगेच डिपॉर्ट केलं गेलं. ते दिवस कसे काढले, आमचं आम्हाला ठाऊक!

‘‘आजही आठवण आली की घशाला कोरड पडते. जेव्हा मी भारतात, मुंबईला पोहोचलो तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. मोबाइल नव्हता. कुणाचेही कॉण्टॅक्ट नंबर्स नव्हते. घरी गेलो तेव्हा आई फार सीरियस असल्याचं कळलं. माझा फोन बंद असल्यामुळे घरचे लोक मला कळवूच शकले नव्हते. तिथली परिस्थिती अशी काही विचित्र होती की मी काहीच बोललो नाही. आईने माझ्यासाठी मुलगी बघून ठेवली होती. मरण्यापूर्वी आईला माझं लग्न झालेलं बघायचं होतं. घरीच भटजी बोलावून लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी आई देवाघरी गेली.

‘‘माझी पत्नी फार चांगली निघाली. तिने मला समजून घेतलं. माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगामुळे माझं पोलीस रेकॉर्ड खराब झालं होतं. तिच्या वडिलांनी स्वत:चे सोर्सेस वापरून मला पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याचं बळ दिलं. खरं सांगतो वैदेही, गेल्या दहा वर्षांत मी सतत तुझी आठवण काढत होतो. पण तुला भेटायला मला जमत नव्हतं. तुझ्या मनातला राग, माझ्याविषयीचा गैरसमज, किल्मिष दूर व्हायला हवं असं फार फार वाटायचं म्हणूनच आज तुझ्याशी सगळं बोललो. तू भेटायला आलीस यात सगळं भरून पावलो. मी तुझा विश्वासघात केला नाही. फक्त दैवाने आपल्याला एकमेकांपासून दूर केलं. एवढंच समजून घे.’’ सौरभने दिलगिरीच्या आवाजात म्हटलं.

वैदेहीने नुसतीच मान डोलावली.

‘‘तू त्या दिवशी मला काय सांगणार होतीस?’’ सौरभने विचारलं…‘‘आज सांगून टाक?’’

‘‘त्या गोष्टीचं आता काहीच महत्त्व नाहीए…चल, आपण कॉफी घेऊयात…’’ मोकळेपणाने हसून वैदेहीने म्हटलं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें