लग्नानंतर असे दिसा फॅशनेबल

* शैलैंद्र सिंह

रिना तिच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने केलेला मेकअप आणि पेहरावामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे तोंडभरुन कौतुक करत होता. लग्नाच्या काही दिवसांनंतर रिनाला पतीसोबत गेटटुगेदर पार्टीला जायचे होते. तिथे रिना तिचा हेवी लुक असलेला ब्रायडल ड्रेस घालून गेली, पण या ड्रेसमध्ये तिला कम्फर्टेबल वाटत नव्हते. लग्नानंतर रिनाच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांनी पार्टी दिली. त्यावेळी ती साधी प्लेन साडी नेसून गेली. ती पाहून वाटतच नव्हते की रिनाचे नुकतेच लग्न झाले आहे. रिनाप्रमाणे हीच समस्या अनेक मुलींना सतावत असते.

लग्नातला पेहराव लग्नानंतर एखाद्या प्रसंगी घातल्यास तो शोभून दिसत नाही. त्यामुळेच मुली ब्रायडल ड्रेस खरेदी करणे टाळतात. लग्नानंतर नववधू काय परिधान करेल याचा फारसा विचार केला जात नाही. लग्न, रिसेप्शन आणि लग्नातील इतर प्रसंगांवेळी शोभून दिसणाऱ्या पेहरावाची मोठया प्रमाणात शॉपिंग केली जाते पण, लग्नानंतरच्या समारंभासाठी काय घालावे, यासाठीची खरेदी केली जात नाही.

लग्नानंतरच्या समारंभात नववधूने इतरांपेक्षा वेगळे दिसावे यासाठी फार महागडी खरेदी करण्याची गरज नाही. फॅशन डिझायनर अनामिका राय यांनी सांगितले की, जर नववधूने फक्त या ५ गोष्टी स्वत:जवळ ठेवल्या तरी तिला इतर कुठल्या पेहरावाची गरजच भासणार नाही.

हेवी एम्ब्रॉयडरीचा दुपट्टा

हेवी एम्ब्रॉयडरीची म्हणजेच जड भरतकाम केलेली साडी प्रत्येक प्रसंगी नेसणे शोभत नाही. जड साडी नेसून चालणेही अवघड असते. त्यामुळे स्वत:ला नववधूचा लुक देण्यासाठी तुम्ही हेवी एम्ब्रॉयडरीचा दुपट्टा खरेदी केल्यास ती चांगली गुंतवणूक ठरेल. हा दुपट्टा कुठल्याही प्लेन साडीवर स्टोलसारखा खांद्यावर घेतल्यास खूप छान दिसेल. त्यामुळे साधी साडीही उठून दिसेल. प्रत्येक साडीसोबत तुमचा एक वेगळा लुक लोकांना पहायला मिळेल.

रेडीमेड साडी

लग्नानंतर घरात वेगवेगळया पार्ट्यांचे आयोजन आणि भेटायला येणाऱ्यांचा राबता वाढतो. अशा वेळी प्रत्येक नवरीला घरातील कामेही करावी लागतात. त्यामुळे साडी सांभाळणे कठीण होते. सूनेने चांगले कपडे परिधान न केल्यास लोक नावे ठेवू लागतात. अशा परिस्थितीत ती रेडीमेड साडी नेसून वेगळा लुक मिळवू शकते. रेडीमेड साडी नेसणे खूपच आरामदायक असते. यात मिऱ्या काढणे किंवा साडी सांभाळत बसण्याची गरज नसते. काही रेडीमेड साडयांसोबत वेगवेगळे पदरही मिळतात. दररोज नवीन साडी नेसल्याचा आनंद घ्या.

भरतकाम केलेला कंबरपट्टा

चांदीचा कंबरपट्टा सतत घालून राहणे सोपे नसते. त्यासाठीच भरतकाम केलेला कंबरपट्टा मिळतो. तो तुम्ही साडी, लांब स्कर्ट, पंजाबी ड्रेस अशाप्रकारे कशासोबतही घालू शकता. त्याची रंदी ३ ते १० इंचापर्यंत असते.

भरतकाम केलेला कुरता

साडी, लेहंगा, लाचा आणि लांब स्कर्टवर भरतकाम केलेला कुरता घालून तुम्ही खूपच खास लुक मिळवू शकता. हा कुरता कंबरेपर्यंत लांब असतो. त्यामुळे कुठलाही संकोच न बाळगता तुम्ही तो घालू शकता. तो घालून पार्टीत डान्सही करु शकता.

प्रिंटेड साडी

प्रिंटेड साडीची खरेदी कधीच तोटयाचा व्यवहार ठरत नाही. ती नेसून तुम्ही प्रत्येक पार्टीत वेगळा लुक मिळवू शकता. हलकी असल्याने ती नेसायलाही सोपी असते. शिवाय नववधूचा रुबाब वाढवते. ऑफिस किंवा पार्टीत तुम्ही मॉडर्न लुक असलेली साडी नेसू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें