कसौली जिथे क्षणाक्षणाला बदलतो निसर्ग

* ललिता गोयल

हिमाचल प्रदेश रम्य निसर्गासाठी ओळखला जातो. इथे प्रत्येक ऋतूत नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेतला जाऊ शकतो. परंतु जर तुम्ही धावपळीच्या जीवनामुळे कंटाळून थोडया वेळासाठी स्वस्तात हवापालट करू इच्छित असाल तर हिमाचल प्रदेशातील अतिशय सुंदर पर्यटन स्थळ कसौली हा एक चांगला पर्याय आहे. समुद्रपातळीपासून साधारण १,८०० मीटर उंचीवर असलेले कसौली हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात वसलेले एक अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन आहे, जे प्रसन्न वातावरणासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

ब्रिटिशांनी विकसित केलेले एक छोटेसे शहर, कसौलीने अजूनही आपले प्राचीन आकर्षण जपून ठेवले आहे. १८५७ मध्ये जेव्हा भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढयाला सुरूवात झाली, तेव्हा कसौलीनेसुद्धा भारतीय सैनिकांमधील असंतोष पाहिला आहे. कसौलीचे प्रशासन सेनेच्या हातात आहे आणि ही मुळात लष्करी छावणी आहे.

अतिशय सुंदर असे हिलस्टेशन कसौली चंदिगड-सिमल्याला जाणाऱ्या रस्त्यावर अर्ध्या अंतरावर वसलेले आहे. धरमपुर हे कसौलीचे सगळयात जवळचे रेल्वे स्टेशन आहे जिथे टॉय ट्रेनने जाऊ शकतो. इथून कोणत्याही बसने कसौलीला पोहोचू शकतो. रस्त्याने साधारण ३ तासात कालका येथून कसौलीला जाऊ शकतो. संपूर्ण रस्ता देवदार वृक्षांनी आच्छादलेला आहे. या क्षेत्रात वाहनांच्या येण्या जाण्याची वेळ ठरलेली आहे, ज्यामुळे पर्यटक मुक्तपणे निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतात.

इथे सर्वाधिक गजबजलेले ठिकाण अप्पर आणि लोअर मॉल आहे, जेथील दुकानांमध्ये नित्योपयोगी वस्तू आणि पर्यटकांसाठी सोव्हिनिअर विकले जातात. लोअर मॉलमध्ये अनेक रेस्टॉरंटस आहेत, जिथे स्थानिक फास्टफूड मिळते.

क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण

मान्सूनच्या दिवसांमध्ये पावसाच्या सरी सुरु होताच हा हा म्हणता कसौली हिरवेगार दिसू लागते. पाऊस थांबत नाही तोच चहूकडे धुक्याचे साम्राज्य पसरते आणि पर्यटक त्यात भटकायला निघतात. इथले हवामान क्षणाक्षणाला आपला रंग बदलत असते. कधी खूप ढग क्षणात उन्हाखाली दाटतात आणि बरसतात तर दुसऱ्या क्षणाला वातावरण स्वच्छ होते आणि तनामनाला रोमांचित करणारी प्रसन्न हवा वाहू लागते. कसौलीचे हवामान इतके छान आहे की कसौलीत पोहोचण्याच्या २-३ किलोमीटर आधीच तुम्ही कसौलीत प्रवेश करता आहात याची जाणीव होईल.

एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात इथे येण्याचा उत्तम काळ आहे. येथील झाडाझुडपांवर या ऋतूचे जे रंग चढतात, ते फुलापानांवरसुद्धा जाणवतात. ज्यांना बर्फाची मजा घ्यायची इच्छा असेल अशा पर्यटकांना इथे डिसेंबर ते फेब्रुवारीत होणारी दवबिंदूसारखी बर्फवृष्टीसुद्धा भूल पाडते.

मंकी पॉईंट

मंकी पॉईंट कसौलीची सर्वात लोकप्रिय जागा आहे आणि सर्वाधिक उंच शिखर आहे. हे कसौलीपासून साधारण ४ किलोमीटर दूर आहे. या ठिकाणावरून  सतलज नदी, चंडीगड आणि बर्फाने झाकलेले चूर चांदणी शिखर, जे हिमालयाच्या रांगांमधील सगळयात उंच शिखर असल्याचं दृश्य अगदी स्पष्ट पाहू शकतो. कसौलीच्या या सर्वात उंच पॉईंटवर पर्यटकांची विशेष गर्दी असते. मंकी पाईंट हा विभाग संपूर्णत: भारतीय वायुसेनेच्या नियंत्रणाखाली आहे. या ठिकाणी भटकंतीसाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.

या परिसरात कॅमेरा घेऊन जाण्याससुद्धा परवानगी नाही. या स्थळापर्यंत कारने किंवा पायी जाऊ शकतो. मंकी पाईंटवरून निसर्गाच्या दूरदूरच्या अत्यंत सुंदर छटा दिसतात. पर्यटक सकाळ संध्याकाळ मंकी पॉईंट व दुसरीकडे गिल्बर्ट पहाडावर फिरायला निघतात. या दोन्ही ठिकाणी पिकनिकसाठी येणाऱ्यांची नेहमी गर्दी असते.

मंकी पॉईंटकडे जाणारा मुख्य रस्ता एअरफोर्स गार्ड स्टेशनपासून लोअर मॉलपर्यंत जातो, ज्यासाठी प्रत्येकाला आधी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. इथे संध्याकाळी ५ वाजता प्रवेश बंद होतो.

कसौलीमध्ये इंग्रजांनी १८८० मध्ये स्थापन केलेला क्लबसुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ आहे. देशातील नामांकित क्लब्जमध्ये या क्लबचे नाव आहे. या क्लबच्या  सदस्यतेसाठी २० वर्ष वेटिंग असते.

रचनात्मकता आणि स्वास्थ्यलाभाचे ठिकाण

मनमोहक आणि आरोग्यवर्धक निसर्ग कसौलीला रचनात्मक लोकांकरिता उत्तम पर्यटन स्थळ बनवते. या जागेने खुशवंत सिंह, मोहन राकेश, निर्मल वर्मा आणि गुलशन नंदा यासारख्या मान्यवर साहित्यकारांनासुद्धा साहित्य रचनेकरिता आकर्षित केले आहे आणि या ठिकाणाने त्यांना इतके प्रेरित केले की खुशवंत सिंह यांच्याशिवाय अनेक मान्यवर व्यक्ती इथे आपले घर बांधायला विवश झालेत. रचनात्मकतेशिवाय लोक इथे स्वास्थ्यलाभ घेण्याससुद्धा येतात. कसौलीच्या हवामानामुळे येथे क्षयरोगाच्या रुग्णांसाठी एक सॅनिटोरियमसुद्धा बांधले आहे. कदाचित हेच कारण होते की इंग्रजांनी याला हिलस्टेशन म्हणून अगदी व्यवस्थित विकसित करण्यात काही कसर सोडली नाही.

कुठे थांबाल : इथे थांबायची उत्तम व्यवथा आहे. इथे डझनावारी चांगले हॉटेल्स, रिसॉर्ट्स, गेस्टहाऊसेस इत्यादी आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें